कल्याण : कल्याण लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या या हॅट्रीक मध्ये कल्याण ग्रामीणचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते आहे. केवळ या एका विधानसभा क्षेत्रातून शिंदे यांनी 1 लाख 51 हजार मते मिळविली आहेत.
2019 च्या तुलनेत यंदा 5 टक्क्यांनी मतदान येथे जास्त झाले असून त्याचाच फायदा शिंदे यांना झाला आहे. मनसेचे पंतप्रधान मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर खासदार शिंदे यांच्या विजयासाठी आमदार पाटील प्रयत्न करत होते. मनसेचा आधीचा असलेला प्रखर विरोध पाहता मनसे साथ नक्की देईल ना ? असे बोलले जात होते.
मात्र शंका घ्यायची गरज नाही मनसे काम करणार हा शब्द पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर खासदारांना दिला होता आणि तो खरा करुन दाखविला असल्याचे आता बोलले जात आहे.
कल्याण लोकसभेचा निकाल जाहीर झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे विजयी झाले आहेत. या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवित त्यांनी आपला विजय संपादन केला आहे. खासदार शिंदे यांचा 2 लाखांच्या फरकाने विजय झाला असला तरी त्यांना अपेक्षित असे मताधिक्य मिळविता आलेले नाही.
ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी पावणे चार लाख मते मिळवित या मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाची ताकद शिंदे गटाला दाखवून दिली आहे. तर शिंदे गटास येथे विजय मिळवून आणताना मोठी कसरत करावी लागली आहे. ही विजयश्री खेचून आणण्यात मनसेचा मोठा हातभार असून कल्याण ग्रामीणच्या मतांनी शिंदे यांना तारले असल्याचे बोलले जात आहे.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठींबा दिल्यानंतर कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन शिवसेनेस दिले.
आमदार पाटील आणि खासदार शिंदे यांच्यामध्ये 2014 च्या निवडणूकीपासून वैर होते. मात्र ते राजकीय वैर असून वैयक्तीक कोणतेच मतभेद आमच्यात नाही. पक्षप्रमुखांचा आदेश असून त्यानुसार आम्ही शिंदे यांच्यासाठी काम करणार असे पाटील नंतर वारंवार सांगत असत.
कल्याण लोकसभेत मनसेच्या पाठिंब्याशिवाय कोणाचाही खासदार होऊ शकत नाही असं मनसे आमदार राजू पाटील यांनी माध्यमांसमोर ठणकावून सांगितलं होतं. यानंतर मनसेने देखील कल्याण लोकसभेची तयारी सुरू केली होती. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर मनसे आणि शिवसेनेची मन काही काळातच जुळलेली कल्याण लोकसभेत दिसुन आली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार राजू पाटील यांचे असलेले घनिष्ठ संबंध आणि डॉ.शिंदेंची आमदार पाटील यांच्याशी असलेली मैत्री यशस्वी झाली आहे.
