माथेरान : चौथ्या शनिवारी सुट्ट्यांमुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती. सलग दोन दिवस घाटात नेहमीप्रमाणे प्रशासनाच्या निष्क्रिय व्यवस्थेमुळे आणि कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.त्यामुळे पर्यटकांना घाटातून आपल्या लवाजम्यासह पायपीट करण्याची एकप्रकारे माथेरानला आल्याची शिक्षा सहन करावी लागली होती. गावातील सर्व हॉटेल्स आणि लॉज फुल्ल झाले होते तर काहींना रूम्स अभावी माघारी जाण्याची वेळ आली. ई रिक्षाच्या स्वस्त आणि सुरक्षित वाहतुक सुविधेच्या प्रवासामुळे पर्यटकांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे.
प्रशासनाने वाहतूक कोंडी बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर भविष्यात माथेरानला पर्यटकांची संख्या निश्चितच रोडावेल आणि याचा सर्वाधिक फटका इथे पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या स्थानिक भूमिपुत्रांना सोसावा लागणार आहे.स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील ,जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, नेतेमंडळीनी माथेरान मधील अल्प वोट बँकेचा विचार न करता या पर्यटन स्थळाला संजीवनी देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे वयोवृध्द मंडळी बोलत आहेत.
