Author: bittambatami.com

पथनाट्यांव्दारे निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक गायकवाड नवी मुंबई : जनजागृतीच्या विविध माध्यमांमध्ये पथनाट्य हे अत्यंत प्रभावी माध्यम असून २० मे रोजी होणा-या २५ ठाणे लोकसभा निवडणूकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे या अनुषंगाने स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांमध्ये पथनाट्याचाही प्रभावी वापर करण्यात येत आहे. या पथनाट्यांतील कलावंत समुह महापालिका क्षेत्रात संध्याकाळच्या सत्रात गर्दीच्या ठिकाणी जाऊन चौकाचौकात लोकशाहीचा जागर करीत निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. मनोरंजक पध्दतीने सादर होणारी ही पथनाट्ये मतदान करण्याचे महत्व हसतखेळत पटवून देत आहेत. हा लोकशाहीचा उत्सव आपण सर्वांनी मिळून साजरा करावयाचा असून मतदान करून आपल्याला संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार बजावयाचा आहे हे लोकांना पथनाट्याव्दारे पटवून दिले जात आहे. वाशी विभागात रेल्वे स्टेशन परिसर, मिनी सी शोअर सेक्टर ९, सेक्टर ९ मार्केट, सेक्टर १५ मार्केट, सेक्टर १० चौक तसेच नेरूळ विभागात रेल्वे स्टेशन पश्चिम बाजू आणि पूर्व बाजू, सेक्टर १० पूर्व, नेरूळ गाव, नेरूळ सेक्टर २० चौक अशा विविध ठिकाणी झालेली पथनाट्ये बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पथनाट्ये सादर केल्यानंतर नागरिकांनी टाळ्यांची दाद देत कलावंतांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित प्रेक्षक नागरिकांनी डाव्या हाताची तर्जनी उंचावत सामुहिक सेल्फी काढून आपण मतदान करणार असल्याचे दर्शविले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर ते दिघा अशा आठही विभागांमध्ये गर्दीच्या ठिकाणी पथनाट्ये सादर करून मतदार जनजागृती केली जात असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक उपआयुक्त शरद पवार यांनी दिली आहे.

विविध चाळी व सोसायट्यांमध्ये गृहभेटीद्वारे मतदान जनजागृती

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 24- कल्याण लोकसभा मतदारसंघातील स्वीप पथकाने 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील विविध चाळी व सोसायट्यांमध्ये मतदान जनजागृती केली व नागरिकांना येत्या 20 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. 142 कल्याण पूर्व विघानसभा मतदारसंघात सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अति.सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकातील (मतदार जनजागृती पथक) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखालील पथकाने ही गृहभेटीद्वारे जनजागृती कार्यक्रम पार पाडला. यावेळी या पथकांनी  कैलास नगर, शंकर पावशे रोड, काटेमानेवाली  परिसरातील मॉर्डन गृहनिर्माण सोसायटी, ज्ञानदिप गृहनिर्माण सोसायटी, जय अंबे कॉलनी, जय माँ दुर्गा कॉलनी, जय महालक्ष्मी सोसायटी, एल.डी. गायकवाड चाळ, महालक्ष्मी सोसायटी, जय बजरंग चाळ, न्यू अनमोल सोसायटी, मयुर सोसायटी , न्यु शबरी सोसायटी, श्री निवास कॉलनी या ठिकाणी घरोघरी जाऊन मतदान जनजागृतीचा कार्यक्रम करुन मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन केले. त्याचप्रमाणे या ठिकाणी निवडणुकीविषयी पत्रके वाटण्यात आली. तसेच सदर परिसरातील नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. या परिसरात लाऊड स्पिकरद्वारे मतदान जनजागृतीपर गीत वाजवून  त्यांना येत्या 20 मे रोजी मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी स्वीप टिमचे कर्मचारी समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, अजय खंडाळे, भारती डगळे उपस्थित होते.

मतदात्यांसाठी मतदान केंद्रावर ‘थंडा थंडा कूल कूल’ची व्यवस्था!

मुंबई : लोकशाहीच्या उत्सवात मतदात्यांसाठी यंदा मतदान केंद्रावर थंडा थंडा कूल कूल अशीच काहीशी व्यवस्था असणार आहे. तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे मुंबईकर अक्षरश: घामाघूम होत असून त्याचा मतदानावर परिणाम…

२३ वर्षांच्या पाणी टंचाईच्या संघर्षाला ठाण्यातील गृहसंस्थेने दिली मात

पाण्याच्या साठवणूकीचे केले यशस्वी नियोजन ठाणे : गेली अनेक वर्ष लोकमान्य नगर येथील लक्ष्मी पार्क गृहसंकुलातील फेज एक मधील सप्रेम या इमारतीतील रहिवाशांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. पाण्याच्या समस्येमुळे रहिवाशी हैराण झाले होते. अखेर गृहसंस्थेतील सभासद आणि सदस्यांनी एक बैठक घेतली आणि उपाययोजना करण्यासाठी विविध कल्पना सूचविल्या. पावसाच्या पाण्याची आणि वातानूकुलीत (एसी) यंत्रांतून निघणारे पाणी साठवून या रहिवाशांनी गृहसंस्थांना वेगळा आदर्श घालून दिला आहे. लोकमान्य नगर येथे लक्ष्मी पार्क गृहनिर्माण संस्था आहे. या गृहसंस्थेत फेज एक मध्ये सप्रेम को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी ही सात मजली इमारत आहे. इमारतीमध्ये ६४ सदनिका आहेत. १९९७ मध्ये या इमारतीची नोंदणी झाली आहे. ठाणे महापालिके मार्फत या इमारतीला पाणी पुरवठा होतो. परंतु पाण्याच्या वेळा ठराविक असल्याने रहिवाशी हैराण झाले होते. अनेकदा एक – दोन दिवस पाणी आले नाही, तर नागरिकांचे हाल होत असे. उन्हाळ्यात दररोज दोन टँकर मागविण्याची वेळ रहिवाशांवर येत होती. त्यामुळे पाण्याचे देयकही वाढत होते. २०१९ मध्ये गृहसंकुलातील सदस्यांनी येथील स्थानिक माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्या मदतीने बोअरवेल खणली. येथे ३५० फूट खोलावर पाणी लागले. परंतु हे पाणी किती दिवस टिकणार हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे इमारतीतील संस्थेचे पदाधिकारी अविनाश शालीग्राम, किशोर नायर, सुरेश कदम, अरुण देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत पावसाचे पाणी साठविण्याचा निर्णय घेण्यात आला. इमारतीच्या गच्चीवर शेड बांधण्यात आले होते. पावसाचे पाणी शेडमधून गटारात जात होते. त्यामुळे हे पाणी त्यांनी एका जल वाहिनीच्या मदतीने बोअरिंग टाकीमध्ये टाकले. त्यामुळे दोन वर्षांत पावसाच्या पाण्याची मोठ्याप्रमाणात साठवणूक झाली आहे. हे पाणी आता वापरासाठी २४ तास उपलब्ध होत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सभासदांनी दोन महिन्यांपूर्वी आणखी एक प्रयोग केला. इमारतीतील अनेक रहिवाशांकडे वातानुकूलीत यंत्रणा आहे. वातानुकूलीत यंत्रामधून पाणी बाहेर फेकले जाते. त्यामुळे या यंत्रातून वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर व्हावा यासाठी सर्व वातानुकूलीत यंत्रांचे पाणी वाहून नेणारी एक वाहिनी जोडण्यात आली. या पाण्याचा वापर वाहने धुणे, रोपांना पाणी घालणे यासाठी केला जात आहे. पिण्याचा पाण्याचा सर्वाधिक वापर स्वच्छतागृहात होत होता. महापालिकेकडून येणारे पाणी ठराविक वेळेत येत होते. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. आम्ही सर्व सभासद आणि सदस्यांनी पाण्याची साठवणूक कशी करता येईल याकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. आता २४ तास पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.

कैद्यांनाही वैद्यकीय उपचार मिळण्याचा अधिकार

मुंबई : कैद्यांनाही वैद्यकीय उपचार मिळण्याचा अधिकार असून तो त्यांचा आत्मसन्मानाचा हक्क आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर करताना नोंदवले आहे. कच्चा कैदी म्हणून उपचार घेणे आणि कोणत्याही बंधनात नसलेल्या सर्वसामान्य व्यक्तीने उपचार घेणे यामध्ये फरक आहे, असेही न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकल खंडपीठाने स्पष्ट केले. गोयल यांच्या वैद्यकीय चाचण्या, अहवालांचा अभ्यास केल्यानंतर ते आजारी नाहीत असे म्हणू शकत नाही. तसेच, गोयल हे आवडीच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांना जामीन नाकारावा हा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) युक्तिवादही मान्य करता येणार नाही. किंबहुना, एखाद्या व्यक्तीला आवश्यक उपचार मिळाल्यास तो जामिनास पात्र नाही हा युक्तिवाद स्वीकरणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातत्र्यांवर गदा आणण्यासारखे आहे, असेही न्यायालयाने गोयल यांची वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर करण्याची मागणी मान्य करताना नमूद केले. गोयल हे खटल्यापासून पळ काढण्याची किंवा पुरावे नष्ट करण्याचीही शक्यता नाही, असेही न्यायालयाने म्हटले. कॅनरा बँकेची ५३८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने गोयल यांना अटक केली होती. विशेष न्यायालयाने वैद्यकीय जामीन देण्यास नकार दिल्यानंतर गोयल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने गोयल यांना सोमवारी दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर केला होता.

कल्याण-सीएसएमटी सकाळची १५ डबा लोकल तीन महिन्यांपासून गायब

कल्याण: सकाळी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने सकाळच्या वेळेत कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १५ डब्यांची लोकल गेल्या वर्षीपासून सुरू केली आहे. अशा प्रकारच्या दोन लोकल आहेत. यामधील एक लोकल गेल्या तीन महिन्यांपासून गायब असल्याने रेल्वे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. कल्याण रेल्वे स्थानकातून सकाळी ८.३२ वाजता सुटणारी १५ डब्यांच्या लोकलमुळे प्रवाशांना धक्के खाण्यापेक्षा सुखाने प्रवास करता येत होता. या लोकलला महिलांंसाठी दोन स्वतंत्र डबे, प्रथम श्रेणीचे वाढीव डबे होते. त्यामुळे नियमित लोकलवर येणारा भार या लोकलमुळे कमी होत होता. या लोकलला महिलांसाठी वाढीव डबे असल्याने महिला प्रवाशांना धक्केबुक्के न खाता लोकलमध्ये शिरता येत होते. या १५ डब्यांच्या लोकलमुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे दरम्यानच्या फलाटांवरील प्रवाशांंना नऊ आणि १२ डब्याच्या लोकलपेक्षा दिलासा मिळत होता. अशाप्रकारच्या दोन लोकल सकाळच्या दरम्यान होत्या. यामधील कल्याणहून सकाळी ८.३२ वाजता सुटणारी लोकल गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. प्रवाशांसाठी महत्वाची असणारी ही लोकल का बंद आहे याचे कोणतेही कारण रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दिले जात नाही. ही लोकल सुरू करावी म्हणून रेल्वे प्रवासी, प्रवासी संघटना रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत, त्यांना कोणी दाद देत नाही. कल्याण ते ठाणे दरम्यान रेल्वे प्रवाशांचे गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर उपाय म्हणून अधिकाधिक प्रवाशांच्या सोयीच्या लोकल सोडणे आवश्यक असताना रेल्वे प्रशासन उलट महत्वाच्या लोकल बंद ठेऊन प्रवाशांची गैरसोय करत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे अशा लोकलची आता गरज आहे, असे प्रवासी सांगतात. उपनगरी रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी यासंदर्भात मध्य रेल्वेच्या विभागीय परिचलन अधिकाऱ्यांना संपर्क साधला, त्यांनी १५ डब्याच्या लोकलची दोन वर्षातून एकदा देखभाल, दुरुस्ती करावी लागते. या कामासाठी कमीतकमी ४० दिवस लागतात. त्यामुळे अशा लोकल प्रवासी सेवेत येण्यास उशीर होतो. यावर अरगडे यांनी अलीकडे लोकल देखभाल, दुरुस्तीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असताना एवढे दिवस देखभालीसाठी लावून रेल्वे प्रशासन नक्की काय साध्य करते, असे प्रश्न अरगडे यांनी अधिकाऱ्यांंसमोर उपस्थित केले. डोंबिवली ते मुंब्रा दरम्यानचे बहुतांशी रेल्वे प्रवासी मृत्यू हे गर्दीमुळे होत आहेत. याची जाणीव ठेऊन रेल्वे प्रशासनाने १५ डबा लोकल लवकर सुरू करावी, अशी मागणी अध्यक्षा अरगडे यांनी केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात २५ ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई !

आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ठाणे : दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने महापालिका क्षेत्रात २५ ठिकाणी एमसीएचआय आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संकटावरील नियंत्रणासाठी ठाण्याचा सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व काऊन्सील ऑफ ऍनर्जी एनव्हायरोमेंट अॅण्ड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार केलेला आहे. उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार, सीएसआरच्या माध्यमातून पाणपोई सुविधा उपलब्ध केली गेली आहे. या २५ ठिकाणी पाण्याचे मोठे माठ, ग्लास ठेवण्यात आले आहेत. तेथे दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित संस्था करत आहेत, माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली. ठाणे स्टेशन, कोपरी पूल, आईस फॅक्टरी, जवाहरबाग, आशर आयटी पार्क, किसननगर शाळा, अंबिका नगर नं. ३, पडवळ नगर, हाजुरी गाव, पासपोर्ट ऑफिस, तीन हात नाका, कोलशेत रोड नाका, बाळकूम नाका, माजीवडा नाका, कळवा स्टेशन, ९० फूट रस्ता-खारेगाव, कळवा नाका-दत्त मंदिर, कौसा तलाव, वफा पार्क, अमृत नगर, लोकमान्य डेपो, राबोडी, कोर्ट नाका, वर्तकनगर नाका, शास्त्री नगर नाका अशा २५ ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली आहे.

श्रम घेतले तर कमी खर्चात ही यश मिळू शकते –  डॉ. प्रणिता पगारे

अनिल ठाणेकर ठाणे : पदवीनंतर स्टाफ सिलेक्शन सारख्या अनेक सरकारी परीक्षा आहेत. बैंकांच्या आँनलाईन परीक्षा आहेत. मोबाईलचा योग्य उपयोग करून अभ्यास केला तर श्रम घेतले तर कमी खर्चात ही यश मिळवू शकता, असा सल्ला फादर एग्लेल प्रशिक्षण संस्थेच्या सेंटर मैनेजर डॉ.प्रणिता पगारे यांनी दहावी नंतर काय? या विषयावर बोलताना दिला. राबोडी फ्रैंड्स सर्कल संचालित शाळेत समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने एकलव्य सक्षमीकरण कार्यशाळेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे जनरल सेक्रेटरी सईद शेख होते. फादर एग्नेल टेक्निकल इंस्ट्यूट मार्फत सुरू असलेले विविध टेक्निकल कोर्सेस ची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सर्व कोर्सेस मोफत शिकवले जातात. शिवाय नोकरी मिळवून देण्यासाठी सुध्दा संस्था मदत करते. पुढे त्यांनी सांगितले की, आपले स्वप्न साकार करण्यासाठी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतचे टाईम टेबल तयार करून मेहनतीने अभ्यास करावा. टेक्सटाइल टेक्नॉलॉजीस्ट व करिअर मार्गदर्शक शैलेश मोहिले यांनी दहावी नंतर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स शाखेतील विविध विषयांची माहिती देत पदवीनंतर रोजगाराभिमुख शिक्षणासाठी भरपूर संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. विदेशी भाषांमध्ये पदवीनंतर रोजगार मिळवू शकता. त्यांनी दहावीचा निकाल लागण्या आगोदर आपल्याला पुढे काय करायचं ते  आत्मविश्वासाने ठरवा. असा सल्ला ही त्यांनी दिला. माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक डॉ नसिब मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना आपलं व्हिजन ठरविण्याचे या वेळी सुचविले. सक्षमीकरण योजनेच्या संयोजिका लतिका सुप्रभा मोतीराम यांनी आपल्या कुवतीनुसार कौशल्य प्रशिक्षण घ्यावे असे सूचविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या इंग्रजी शिक्षिका हुसना शेख यांनी केले तर  कार्यक्रमात समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा हर्षलता कदम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया, फादर एग्नेल टेक्निकल इंस्ट्यूटच्या फैशन डिझाईन शिक्षिका अश्विनी पाटील आणि प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका फरहाना शेख आदी उपस्थित होते. यावेळी सुमारे ६० विद्यार्थी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी झाले होते.

उल्हासनगरमधील लेवा पाटीदार एकता संघाचा डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठींबा!

लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होण्यासाठी दिल्या शुभेच्छा! डोंबिवली : उल्हासनगरमधील लेवा पाटीदार एकता संघाने कल्याण लोकसभेचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. लेवा पाटीदार एकता संघाच्या सदस्यांनी आज डोंबिवली येथे डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत हा जाहीर पाठिंबा दिला. याप्रसंगी खासदार शिंदे यांनी त्यांचे आभार मानत आगामी काळात समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगितले. कल्याण लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी मागील १० वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण लोकसभा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ओळख निर्माण झाली असून त्यामुळेच विविध संस्था, संघटना यांच्याकडून सातत्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला जात आहे. आता उल्हासनगरमध्ये मोठ्या संख्येने वास्तव्याला असलेल्या लेवा पाटीदार समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघानेही खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी शिवसेनेचे उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाचे सदस्य उपस्थित होते.

श्री गणेशपूजा प्रशिक्षण निशुल्क वर्ग

मुंबई : भाद्रपद शुद्ध चतुर्थी, गणेश चतुर्थीला, श्री गणेश पूजन कसे करावे ह्याचे प्रशिक्षण आणि पूर्वी शिकलेल्यांसाठी उजळणी वर्ग १२  मे २०२४  पासून, दर वर्षी प्रमाणे, दर रविवारी सकाळी ९  ते ११ वाजे पर्यंत, वनमाळी हॉल , छबिलदास रोड, दादर पश्चिम, मुंबई ४०००२८ येथे होतील.  सदर वर्ग नि:शुल्क आहेत आणि सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, लिंग, वय असे कसलेही भेद पाळत नाही.  सर्वास खुले आहेत. प्रत्येकास १२ मे पासून श्रावण महिना संपे पर्यंत दर  रविवारी हजर राहायचे आहे. नोंदणी आवश्यक नाही.  ईच्छुकांनी थेट  वनमाळी हॉल येथे वही आणि पेन घेऊन हजर  रहावे. काही शंका असल्यास, प्रमोद नाईक —, ९९२००६६५७५