माथेरान मधील मुख्य रस्त्यांची बत्ती गुल
माथेरान : पर्यटन नगरी माथेरान मधील मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून बत्तीगुल असल्याने पर्यटकांना आणि नागरिकांना अंधारातून चाचपडत मार्गक्रमण करावे लागत आहे. संबंधीत ठेकेदार याबाबत काहीही ठोस उपाययोजना करत नसून केवळ आपली कामांची बिले वसुलीसाठी केव्हातरी येऊन हजेरी लावत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. त्याचप्रमाणे गावातील गल्लीबोळात सुध्दा हीच परिस्थिती असल्याने काळोखातून अपंग व्यक्तींना पायी चालत जाणे खूपच त्रासदायक बनलेले आहे. अनेकदा याबाबत सोशल मीडियावर काहींनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्याकडे संबंधित खात्याने दुर्लक्षच केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. माथेरान हे पर्यटनस्थळ असल्यामुळे रात्री अपरात्री केव्हाही पर्यटक येत असतात. दस्तुरी पासून गावांपर्यंत क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते असल्याने चालत येणे सोयीचे ठरते. परंतु या मुख्य रस्त्यावर नेहमीच बत्ती गुल असते. काही दिवसांपूर्वी मुख्य बाजारपेठ येथील मुन्ना पानवाले यांच्या दुकानात चोरीची घटना घडली होती. असे प्रकार आगामी काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रहदारीच्या रस्त्यावर सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या पर्यटकांना रात्रीच्या वेळी खरेदी करणे कठीण होते. त्यामुळे काहीही खरेदी न करता ते आपल्या हॉटेलमध्ये जातात याचा परिणाम इथल्या व्यापारी वर्गावर, लहानमोठ्या स्टोल्स धारकांवर होत असतो. याकामी संबंधित खात्याने या समस्या मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर कामे करावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.