Category: होम

ठाणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्याला वेग

 १.१६ लाख नागरिकांनी केली स्व-गणना ठाणे : केंद्र शासनाच्या ‘जनगणना २०२७’ मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्ह्यात घर यादी व घरगणना (House Listing & Housing Census) या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू असून, स्व-गणना सुविधेला नागरिकांकडून…

– झाराप रेल्वे स्टेशनवरून होते हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक…!

– चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘उबाठा ‘ सेनेला आश्वासन…! सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील झाराप रेल्वे स्टेशनवरुन अवैधरित्या हजारो टन खनिज सदृश्य मातीची रेल्वेने वास्को-गोवा येथे वाहतुक केली जात आहे.त्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथे अवैद्यरित्या उत्खनन केले जात आहे. ‘उबाठा ‘सेनेचे जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर आणि पक्षाचे  प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. त्याबाबतचे लेखी निवदेन यावेळी त्यांना देण्यात आले. जनसुनावणी न घेता मायनिंग उद्योग कसा काय सुरु करण्यात आला.संबंधितांनी  उत्खनन आणि वाहतुकीसाठी आवश्यक असणारे शासकीय परवाने घेतले आहेत का? असे प्रश्न यावेळी उपस्थित करत  प्रति वर्षी २५ कोटी रुपयांचा शासनाचा महसूल बुडविण्यात आला आहे असा आरोप यावेळी  करण्यात आला. या माध्यमातून सिंधुदुर्गात मोठा खनिज घोटाळा होत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बर्डे देखील उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी या अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या  तक्रारीची गंभीर दखल घेत उत्खननासाठी आवश्यक असणारे शासकीय परवाने व इतर कायदेशीर बाबींची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश खनिकर्म  अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकऱ्यांना  देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, गेले दोन आठवडे कुडाळ तालुक्यातील झाराप रेल्वे स्टेशनवरुन फार मोठ्या प्रमाणावर खनिज सदृश्य मातीची वाहतुक वास्को-गोवा येथे होत आहे. गेल्या दोन आठवड्यात १० ते १२ रेल्वे वॅगन  मालवाहतूक  दररोज भरुन ही खनिज सदृश्य माती नेली जात आहे. दिवसाला ५००-६०० डंपर भरुन आणण्यात येणाऱ्या खनिज सदृश्य मातीच्या  वाहतुकीमुळे झाराप येथील ग्रामस्थांना प्रदुषणाचा त्रास होत आहे. शिवाय या परिसरातील अरुंद रस्ते यामुळे अपघात होण्याची भिती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत  याकडे लक्ष वेधण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथून अवैद्यरित्या उत्खनन करुन ही खनिज माती आणली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर ही खनिज माती तळवणे, कोंडुरा भागातून आणण्यात येत आहे तर तिथे कुठल्याही शासकीय, प्रशासकीय परवानग्या न घेता तसेच कुठल्याही प्रकारचा पर्यावरण आघात अहवाल तसेच  जनसुनावणी न घेता मायनिंग उद्योग सुरु झाला आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुठल्याही शासकीय प्रशासकीय परवानग्या न घेता होत असलेला अवैद्य मायनिंग उद्योग शासनाचा महसुल बुडवून सुरु आहे काय? असाही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी ‘एमआयडीसी’ क्षेत्रात रात्रीच्या अंधारात होत असलेल्या खनिज सदृश्य मातीच्या चोरीचा प्रकार उघड झालेला आहे. असे असताना झाराप रेल्वे स्टेशनवरुन नेण्यात आलेली हजारो टन खनिज सदृश्य माती ही  कुठल्या नियमांतर्गत नेण्यात आली आहे. हे जनतेला कळले पाहिजे. अशाच प्रकारे जिल्ह्यात जागोजागी होत असलेल्या बेकायदेशीर अवैध मायनिंग विरोधात देखील कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मिरा-भाईंदरमध्ये रेशनकार्डमधून हजारो नावे गायब

गरिबांच्या अन्नावर घाला मिरा -भाईंदर : मिरा-ईंदर शहरातील हजारो रेशनकार्डधारकांना नावावर अचानक ऑनलाइन प्रणालीतून गंडांतर आले असून, गेल्या ८ ते १० महिन्यांपासून केशरी आणि पिवळ्या रेशनकार्डमधील हजारो नावे गायब झाल्याची…

कलेक्टर एनओसीसाठी म्हाडा रहिवाशांना पडतोय दीड लाखाचा अतिरिक्त भुर्दंड

केतन खेडेकर मुंबई -भायखळा घोडपदेव येथील न्यू हिंद म्हाडा कॉलनी येथील कलेक्टरवरील जमिनीच्या प्रॉपर्टी कार्डवर अजूनही कलेक्टरचे नाव असल्याने महाराष्ट्र शासनाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात सदनिका हस्तांतर करण्यासाठी हेलफाटे मारावे लागत…

घनकचरा नियमावली जनतेच्या दारी

 महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन अशोक गायकवाड नवी मुंबई :  १ एप्रिल २०२६ पासून घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ लागू झाले असून याची माहिती नागरिकांपर्यंत विविध माध्यमातून पोहचविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ ते ११ जून या कालावधीत विविध सोसायट्या व वसाहतींमध्ये विशेष जनजागृती करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठही विभाग कार्यालय क्षेत्रात अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून संबधित स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांचेमार्फत नागरिकांपर्यंत पोहचून घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत लोकजागृती करण्यात येत आहे. यामध्ये से.१४,१५ ऐरोली येथील विविध सोसायट्या, दिघा कृष्णावाडी येथील त्रिमूर्ती सोसायटी, सानपाडा येथील मोराज सोसायटी, से.१२ कोपरखैरणे येथील फाम सोसायटी व से.५ येथील शकुंतला सोसायटी तसेच से.१९ ऐरोली येथील काकासाहेब थोरात सोसायटी, वाशी येथील वर्धमान पॅलेस सोसायटी, सिबीडी बेलापूर से.६ येथील वर्षा सोसायटी अशा विविध सोसायट्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अंतर्गत निर्मितीच्या ठिकाणी घरापासूनच ओला, सुका, घरगुती घातक व सॅनेटरी अशा चार प्रकारे कचरा वर्गीकरण करावयाचा आहे याविषयी माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे वर्गीकरण झालेला कचरा हा कचरा वाहतूक करणा-या वाहनांमध्ये वेगवेगळा देणे अत्यावश्यक असल्याचेही सूचित करण्यात आलेले आहे. दररोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणा-या सोसायट्या यांनी स्वत:च्या आवारात कच-याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प राबविणे नव्या नियमानुसार बंधनकारक असल्याने याविषयी सोसायटी व संस्था पदाधिकारी, सदस्य यांना मार्गदर्शन करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आठही विभागांमध्ये एजी एन्व्हायरो आणि परिसर सखी या संस्थांच्या वतीने सोसायट्यांमध्ये जाऊन तसेच आस्थापना व संस्था याठिकाणी व्यापक जनजागृती करण्यात येत असून नवी मुंबईकर नागरिकांचा याकामी चांगला प्रतिसाद लाभत आहे.

फुगाळे येथील २५ ते ३० कुटुंबे रेशन धान्यापासून वंचित असल्याची तक्रार

अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील फुगाळे येथील रास्त भाव दुकानाच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या असून दर महिन्याला सुमारे २५ ते ३० शिधापत्रिकाधारक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.विशेषतःमे आणि जून २०२६ या दोन महिन्यांचे धान्य अनेक लाभार्थ्यांना अद्याप मिळाले नसल्याची तक्रार संबंधित नागरिकांनी शहापूर तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात केली आहे. गावातील शिधापत्रिकाधारकांनी सांगितले की, शासनाकडून गरीब व गरजू कुटुंबांसाठी वितरित करण्यात येणारे धान्य हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र फुगाळे येथील रास्त भाव दुकानातून अनेक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नसल्याने त्यांना मोठ्या आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अनेक वेळा दुकानावर जाऊनही धान्य उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते किंवा विविध कारणे देऊन लाभार्थ्यांना परत पाठविले जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात गावातील काही रेशनधारकांनी प्रत्यक्ष धान्य मिळत नसल्याचा व्हिडिओ तयार करून संबंधित प्रशासनाकडे पाठविला आहे. या व्हिडिओमध्ये लाभार्थी आपली व्यथा मांडताना दिसत असून अनेक कुटुंबांना धान्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.सध्या पावसाळ्याची सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील अनेक मजूर कुटुंबांना नियमित रोजगार उपलब्ध झालेला नाही. शेतीची कामे अद्याप पूर्णपणे सुरू नसल्याने अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत आहेत.अशा परिस्थितीत शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य हेच अनेक कुटुंबांसाठी जगण्याचा आधार ठरत असते.मात्र हे धान्य वेळेवर मिळत नसल्याने संबंधित कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,फुगाळे येथील रास्त भाव दुकानाच्या कामकाजाची तातडीने चौकशी करण्यात यावी, मे व जून २०२६ चे थकीत धान्य त्वरित लाभार्थ्यांना वितरित करण्यात यावे आणि भविष्यात कोणतेही कुटुंब धान्यापासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्यात यावी. शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचावा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कायम राहावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी श्री पुष्टीपती गणेश मंदिरात महाआरती

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपद भूषविण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मागाठाणे विधानसभेतर्फे श्री पुष्टीपती गणेश मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले…

– सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचा ‘एम बीबीएस’चा ९८.९४ टक्के निकाल….!

९५ पैकी ९४ विद्यार्थी उत्तीर्ण …! सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची एम बी बी एसची पहिली बॅच आता आरोग्य सेवेसाठी सज्ज झाली असून महाविद्यालयातील ९५ पैकी ९४ विद्यार्थी  उत्तीर्ण झाले असून ९८.९४ टक्के निकाल लागला आहे. २०२१ साली सेना -भाजपा युती सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या सिंधुदुर्गनगरीत,जिल्हा रुंग्णालयाच्या भव्य संकुलात हे महाविद्यालय सुरु झाले. महाविद्यालय सुरु झाले तेव्हा कसल्याच सोयी सुविधा नाहीत.स्वतःचे म्हणून असे काहीच नाही. जिल्हा रुंग्णालयाच्या  इमा तींमध्ये आपला संसार थाटला. कोणत्याही मूलभूत, पायाभूत सोयीसुविधा नाहीत.त्यातच जुन्या इमारतींची  पाडापाडी, वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुंग्णालय या दोघांचा संसार एकाच संकुलात सुरु झाला. महाराष्ट्र वैद्यकीय विदयापीठाचा काल निकाल आल्यानंतर अधिष्ठाता डॉ. अनंत दवांगे, त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक,अधिकारी, कर्मचारी वर्ग या सर्वांनी आनंद व्यक्त केला. नव्याने सुरू झालेल्या या महाविद्यालयात सुरुवातीची दोन -तीन वर्ष परिस्थिती अत्यंत प्रतिकुल होती.अनेक अडचणी होत्या, साधनांची कमतरता, पूर्णपणे तयार नसलेली व्यवस्था आणि नवीन वातावरण. सुरुवातीला सगळ्यांनाच जुळवून घ्यावे लागले. विभाग तयार होत होते, आणि शिकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती. महाविद्यालयात वरिष्ठ विद्यार्थी नसल्यामुळे त्यांचेही  मार्गदर्शन नव्हते. त्यामुळे ही पहिली ‘बॅच’ खऱ्या अर्थाने ‘पायोनियर’ ठरली अशी प्रतिक्रिया सहाय्यक प्राध्यापक (मेडिसिन )डॉ. गौरव घुर्ये यांनी व्यक्त केली आहे. या सगळ्या अडचणी असूनही विद्यार्थ्यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतः अभ्यास केला, एकमेकांना मदत केली आणि उपलब्ध संधींचा योग्य उपयोग केला. शिक्षकांनीही खूप सहकार्य केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चार-साडेचार वर्षांच्या प्रवासात हे विद्यार्थी खूप काही शिकले.फक्त अभ्यासच नाही तर परिस्थितीशी जुळवून घेणे, आत्मविश्वासाने काम करणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे. त्यांचा प्रवास सोपा नव्हता, पण त्यांनी मेहनतीने तो पूर्ण केला. ‘एमबीबीएस’ पूर्ण केल्याने   ते डॉक्टर झालेच पण त्यांचे यश हे या महाविद्यालयाची मजबूत पायाभरणी ठरली आहे.  अडचणी असल्या तरी मेहनत आणि जिद्दीने यश मिळवता येते.हे त्यांच्या यशामुळे सिद्ध झाले आहे. भविष्यात हे महाविद्यालय विस्तीर्ण होईल आणि प्रगतीचे नवीन टप्पे गाठेल यात शंका नाही. सिंधुदुर्ग वासियांसाठी आरोग्याच्या सुविधा टप्प्याटप्प्याने अत्युच्च दर्जाच्या  होतील असा विश्वास डॉ.घुर्ये यांनी व्यक्त केला आहे. या यशाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे,शिंदे सेनेचे स्थानिक आमदार डॉ.निलेश राणे, उबा ठा चे माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थी,महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनंत दवांगे,सर्व प्राध्यापक वर्ग ,अधिकारी ,कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. प्रथम क्रमांक- गायत्री शिवराम शिर्के ७४.२२% व्दितीय क्रमांक- मिथ जयेश जोशी ७३.२२% तृतीय क्रमांक- सानिका भाऊसाहेब चौगुले ७१.५०% 00000000

 भांडुपकरांची पाण्यासाठी वणवण

– पालिकेच्या निष्काळजीपणाविरोधात जल अभियंत्यांकडे धाव  डोंगराळ भागातील नागरिकांचा संताप उफाळला! मुंबई : भांडुप विधानसभा क्षेत्रात पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, विशेषतः डोंगराळ भागातील रहिवाशांना अपुऱ्या व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी नळांना अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने ते डोंगराळ भागात पोहोचत नाही. परिणामी नागरिकांना पिण्याचे व दैनंदिन वापराचे पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर भांडुपमधील पाणीपुरवठा व प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज वरळी येथे जल अभियंता दिलीप पाटील यांच्या दालनात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगरसेवक सुरेश शिंदे,  नगरसेविका दिपमाला बडे, राजोल संजय पाटील, शाखाप्रमुख राजेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत भांडुपमधील डोंगराळ भागात पाणी पुरेशा दाबाने पोहोचत नसल्याचा मुद्दा अत्यंत ठामपणे मांडण्यात आला. अनेक वर्षांपासून नागरिक या समस्येला सामोरे जात असताना पालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली. विशेषतः उंच भागातील वस्त्यांमध्ये नळांना पाणीच न येणे किंवा अत्यल्प दाबाने येणे ही बाब प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे द्योतक असल्याचा आरोप करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जल अभियंत्यांकडे डोंगराळ भागात पाणी वरपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पंपिंग व्यवस्था, जलवाहिन्यांचे सक्षमीकरण तसेच कमी दाबाच्या भागांसाठी विशेष तांत्रिक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली. तसेच खालच्या भागातही जास्तीत जास्त आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी सांगितले. दरम्यान, भांडुपकरांना मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना पालिका प्रशासन मात्र केवळ बैठका व आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. उन्हाळ्यात आणि वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. बैठकीत नागरिकांच्या पाणीप्रश्नावर तातडीने कार्यवाही करून डोंगराळ भागातील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. आता पालिका प्रशासन प्रत्यक्ष कृती करून भांडुपकरांचा पाणीप्रश्न सोडवते की पुन्हा एकदा आश्वासनांचीच मालिका सुरू राहते, याकडे संपूर्ण भांडुपकरांचे लक्ष लागले आहे.