Category: होम

पाणी पुरवठ्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसविण्याचा महापौरांचा इशारा

मोहिली पंप हाऊसवर महापौर हर्षाली चौधरी यांची सरप्राईज व्हिजिट – कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची घेतली झाडाझडती कल्याण : पाणी पुरवठ्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसविण्याचा इशारा केडीएमसी महापौरांनी दिला असून केडीएमसीच्या मोहिली पंप हाऊसवर महापौर हर्षाली चौधरी यांनी सरप्राईज व्हिजिट करत कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. कल्याण डोंबिवलीकरांच्या घशाला पडलेली कोरड आता प्रशासकीय पातळीवर गंभीर वळण घेत आहे. शहरात वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये संताप असतानाच, महापौर हर्षाली चौधरी यांनी थेट ग्राऊंड झिरोवर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महापौरांनी  ‘अ’ प्रभागातील मोहिली पंप हाऊसवर अचानक भेट देऊन पाहणी केली. कामात होत असलेली दिरंगाई आणि कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा पाहून महापौरांनी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले असून, पाण्यासाठी वणवण करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी कडक आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणे किंवा पाणीच न मिळणे अशा तक्रारींचा पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर हर्षाली चौधरी यांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मोहिली पंप हाऊसला भेट दिली. महापौरांनी जेव्हा पंप हाऊसमध्ये प्रवेश केला, तेव्हा तेथील यंत्रणा आणि कामाची संथ गती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी संबंधित अभियंता आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून तांत्रिक अडचणी समजून घेतल्या. मात्र, तांत्रिक कारणांपेक्षा मानवी दिरंगाईमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे दिसून आल्यावर महापौरांनी आक्रमक पवित्रा घेतला.पाहणी दरम्यान महापौरांनी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली: यावेळी कामचुकारपणा खपवून घेणार नाही: कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. याबरोबर कोणत्या प्रभागात किती पाणी जाते आणि कुठे कमतरता आहे, याचे चोख नियोजन सादर करण्याचे आदेश दिले. तसेच पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येऊ देऊ नका  अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. ंनागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना प्रशासन ढिम्म राहू शकत नाही. मोहिली पंप हाऊस हे शहराच्या पाणीपुरवठ्याचे हृदय आहे, तिथेच जर कामात दिरंगाई होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. जनतेला पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि तो मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे सागितले. महापौरांच्या या धडक कारवाईमुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आता या भेटीनंतर तरी कल्याण-डोंबिवलीतील नळांना पाणी वेळेवर आणि पुरेशा दाबाने येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 नवी मुंबई महानगरपालिकेची २०२६-२७ च्या मालमत्ता कराची ई-बिले आता ऑनलाइन उपलब्ध

 महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांचे आवाहन अशोक गायकवाड नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मालमत्ता कराची ई-बिले तयार करण्यात आली असून, नागरिकांना आपले मालमत्ता कराचे बिल व्हाट्सअॅप चॅटबॉट तसेच महापालिकेच्या www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून केवळ काही मिनिटांत पाहता येईल, डाऊनलोड करता येईल आणि त्यासोबतच बिलाचा भरणा करता येणार आहे. महापालिकेकडून नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्याच्या उद्देशाने ही डिजीटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच लवकरच ऑफलाईन पद्धतीने देखील घरपोच बिल वाटप करण्यात येणार आहेत. मात्र ई-बिलमुळे नागरिकांना आता ऑफलाइन बिलाची प्रतीक्षा करण्याची गरज नसून, घरबसल्या कोणत्याही वेळी आपले बिल मिळवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्र तसेच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रामधील संकलन केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत तसेच पहिल्या व तिस-या शनिवारी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत कार्यरत आहे. व्हाट्स अॅप चॅटबॉट द्वारे मालमत्ता कर बिल मिळवण्याची प्रक्रिया: नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमधून ८२९१९२०५०४ या क्रमांकावर “Hi” असा संदेश पाठवावा. त्यानंतर उपलब्ध पर्यायांमधून आपल्या पसंतीची भाषा निवडावी. पुढे “Pay Your Property Tax” हा पर्याय निवडल्यानंतर आपला १२ अंकी मालमत्ता क्रमांक (Property ID) प्रविष्ट करावा. मालमत्ता क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर संबंधित मालमत्तेची सविस्तर माहिती जसे की मालकाचे नाव, मालमत्तेचा पत्ता इत्यादी तपशील स्क्रीनवर दिसेल. तसेच संबंधित आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचे मालमत्ता कराचे बिल PDF स्वरूपात उपलब्ध होईल. या PDF वर क्लिक करून बिल पाहता आणि डाऊनलोड करता येईल. “Pay Now” पर्याय निवडून त्वरित भरणा करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. अधिकृत संकेतस्थळाद्वारे मालमत्ता कर बिल मिळवण्याची प्रक्रिया: नागरिकांनी आपल्या ब्राऊझरमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.nmmc.gov.in) भेट द्यावी. संकेतस्थळावरील “Property Tax” हा पर्याय निवडल्यानंतर नागरिकांनी आपला १२ अंकी मालमत्ता क्रमांक प्रविष्ट करावा. यानंतर संबंधित मालमत्तेची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल. पुढे “Bill” या पर्यायावर क्लिक करून नागरिकांना त्यांच्या मालमत्ता कराच्या बिलाची प्रत ऑनलाइन स्वरूपात पाहता तसेच डाऊनलोड करता येईल. “Pay Now” या पर्यायावर क्लिक करून थेट भरणा करता येईल. मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याच्या सुविधा: नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर करता येणार असून त्यामध्ये पुढील पर्यायांचा समावेश आहे: क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग, वॉलेट, QR कोड अवघ्या काही मिनिटात मिलणार बिल नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांना अधिक सुलभ, जलद व पारदर्शक सेवा देण्यासाठी सातत्याने डिजिटल माध्यमांचा वापर वाढवत आहे. मालमत्ता कराची ई-बिले व्हाट्सअॅप चॅटबॉट आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांना केवळ काही मिनिटांत आपले बिल प्राप्त करून त्याचा भरणा करता येणार आहे. या सुविधेमुळे वेळेची बचत होणार असून, नागरिकांनी या सेवांचा अधिकाधिक वापर करून निर्धारित कालावधीत मालमत्ता कर भरावा आणि शहराच्या विकासासाठी साथ द्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी

  २,५०० नागरिकांनी घेतला विविध शासकीय सेवांचा लाभ कल्याण : जीवनदीप महाविद्यालय, गोवेली यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ जलदगतीने व सुलभ पद्धतीने मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. शुक्रवारी पार पडलेल्या या शिबिरात सुमारे २,५०० नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. या शिबिराचे उद्घाटन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार कथोरे म्हणाले, “शासकीय योजना व दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागू नयेत; त्यांना तात्काळ आणि सुलभ सेवा मिळणे गरजेचे आहे.” या शिबिरामध्ये प्रामुख्याने उत्पन्न दाखला, अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र, आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड नोंदणी, जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर दाखला, रेशन कार्डवरील नाव बदल व इतर दुरुस्त्या (पुरवठा विभाग), सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज व मंजुरी, महिला व बालविकास तसेच आरोग्य विभागाशी संबंधित विविध योजनासेवा प्रभावीपणे पुरविण्यात आल्या. विशेष बाब म्हणजे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेल्या नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते तत्काळ दाखले वितरित करण्यात आले. या प्रसंगी ठाण्याचे उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, प्रांत अधिकारी विश्वास गुजर, सहायक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर, प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर तसेच टीडीसी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र घोडविंदे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पहार देऊन स्वागत केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, महसूल, वन व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, तसेच पत्रकार आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश टेंभे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जीवनदीप संस्थेचे संचालक प्रशांत घोडविंदे, प्राचार्य डॉ. अशोक वाघ, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 सलमान खान, आमिर खान यांच्या चित्रपटांऐवजी रणवीर सिंग, विकी कौशल यांचे चित्रपट पहा!

मंत्री नितेश राणे यांचे मोठे विधान हरिभाऊ लाखे नाशिक –महाराष्ट्रातील भाजपमधील हिंदुत्ववादी आक्रमक चेहरा म्हणून ओळख निर्माण करणारे मंत्री नितेश राणे हे कायमच वादग्रस्त ठरत आले आहेत. हिंदू राष्ट्र म्हणून एक…

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देत आमदार निरंजन डावखरे यांचा वाढदिवस साजरा

अनिल ठाणेकर ठाणे-विर्थ्यांसोबतचा प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असतो आणि समाजाला काहीतरी परत देण्याची हीच खरी संधी असते. अशा भावना व्यक्त करत आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी कर्णबधीर विशेष विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल…

बृहन्मुंबई गुजराती समाजाचे नवनियुक्त अध्यक्ष आणि ज्यांच्यावर कादंबरी, डॉक्युमेंटरी व नाट्यकृती निर्माण झाली आहे असे विक्रमादित्य डॉ. हेमराज शाह यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त बिर्ला मातोश्री सभागृहात ‘हेमूदादा’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात…

मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून वा-यावर सोडल्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महिनाअखेरीस कोकणातील आंबा व काजू बागायतदार धडक देणार आहे.  या मोर्चास सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा देवून सहभागी व्हावे याकरिता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे , कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाने झालेल्या नुकसानीत हेक्टरी ५ लाख व ३ लाख रूपये नुकसान भरपाई मागणीसाठी रस्त्यावरची लढाई लढत आहे. राज्य सरकारने हेक्टरी २२ हजारांची मदत जाहीर करून बोळवण केली आहे. यामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानभरपाई बाबत राज्य सरकारने आज अखेर कोणतेही पंचनामे अथवा प्रशासकीय आदेश दिलेले नाहीत. एकीकडे २५ हजार कोटींचा कुंभमेळा ३५ हजार कोटी व ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ १ लाख कोटींपर्यंत खर्च करण्यास मान्यता दिली जात आहे. मात्र दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर,ठाणे जिल्ह्यातील शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत असताना राज्य सरकार आंबा बागायतदार शेतकऱ्यांची चेष्टा करू लागले आहे. यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी गिरगांव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी मा. खासदार राजू शेट्टी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे , कॅाग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या सर्वांनी या मोर्चात सहभागी होवून लढा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. यावेळी रत्नागिरीचे आमदार बाळा माने , सुशांत नाईक, गणेश गायकर , किरण टेंभुलकर ,अजय तेली यांच्यासह कोकणातील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील सोनार समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक-पंकज भोयर

मुंबई / रमेश औताडे राज्यांतील गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ने सरकारकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असून काही मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गांभीर्याने घेतल्या आहेत. लवकरच एक बैठक घेऊन मागण्या पूर्ण करू. असे आश्वासन सहकार राज्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशन ने मुंबईत आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केले. सोनार समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा करून न्याय मिळवून देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आमदार चित्राताई वाघ यांनी विधान भवनात सोनार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून त्यावर मार्ग काढण्यासाठी खूप पाठपुरावा केला. सोने गहाण ठेवण्याच्या प्रकियेत हा घटक खूप महत्त्वाचा असतो, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले. प्रमुख मार्गदर्शक संजीव खडके, अध्यक्ष डॉ राजेंद्र दिंडोरकर, कार्यकारी सचिव सतीश पितळे, खजिनदार दीपक देवरुखकर, सल्लागार भरत ओसवाल, पद्मिनी ताई शंकरशेट आदी मान्यवर उपस्थित होते.

आनंद नगर मधील बुद्धविहाराचा कायापालट होणार

ठाणे :  गेलीं अनेक वर्षें मोडकळीस आलेल्या आनंद नगर मधील बुद्धविहार आता नव्या रूपात साकारले जाणार आहे. १९ एप्रिलपासून या बुद्धविहाराच्या पुनर्बांधणीच्या कामास सुरवात होणार आहे. पूर्व ठाण्यातील आनंद नगर विभागात असलेल्या बुद्धविहाराची अवस्था खराब झाली होती. त्यातच गेली अनेक वर्षे पुनर्बांधणीचे काम या ना त्या कारणाने रखडले होते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनीच पुढाकार घेऊन निधी गोळा करून बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता १९ एप्रिलपासून बांधकामाला सुरुवात होत आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपोळलकर, आमदार जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, निरंजन डावखरे,माजी आमदार रवींद्र फाटक, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. बुद्धविहाराच्या पुनर्बांधणीसाठी  आनंदनगर बौद्ध सेवा संस्थेचे अध्यक्ष मिलिंद बनकर, उपाध्यक्ष आनंद कांबळे, राहुल लोंढे, वृक्षाली जाधव – दळवी, सचिव प्रविण गायकवाड, खजिनदार संजय बुकाणे, सहसचिव हिरा वानखेडे, सहखजीनदार राजू साबळे, अमोल जोशी, दिलीप जाधव, नितीन दुधसागर, सुनील सौंदाणे, भरत उबाळे, सुनील कदम प्रवीण झेंडे आणि इतर  मेहनत घेत आहेत.

विलेपार्ल्याला साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेती प्रकल्प

मुंबई: महापौर आणि उपमहापौर आयुक्तांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार आहे. मुंबई  विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत…