Category: महाराष्ट्र

Maharashtra News

‘एसआयआर’चा पहिला टप्पा वेळेत पूर्ण, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचे निवडणूक आयुक्तांकडून कौतुक

Photo-1 पुणे: मतदार याद्यांच्या  सखोल पुनरीक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील ‘हाऊस-टू-हाऊस ‘सर्व्हेचे काम मुदतवाढीसह निर्धारित कालावधीत पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पथकाचे कौतुक करत, पुढील टप्प्यातील प्रारुप मतदार यादी, हरकती-सुनावणी व पुढील कार्यवाहीसाठी…

बापगाव- आमणे- पडघा रस्त्याच्या दुरवस्थे विरोधात आमणे येथे उपोषण सुरू

आरती परब दिवा : भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रा.८१ बापगाव- आमणे- पडघा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावरील खड्डे, खराब झालेला रस्ता आणि त्यामुळे होणारे अपघात याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमणे येथे आज उपोषण सुरू करण्यात आले. ‘चला, आपली समस्या आपणच सोडवूया!’ या भूमिकेतून उपोषण कर्ता कॉ. रमेश गायकवाड (सचिव) भा.का.प. ठाणे जिल्हा, जयवंत दळवी (समाजसेवक) यांनी सर्व प्रवाशांच्या वतीने हे उपोषण सुरु करण्यात आले. उपोषणासाठी उभारण्यात आलेल्या मंडपातील फलकावर रस्त्याच्या दुरवस्थेचे छायाचित्रही लावण्यात आले असून, प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. उपोषण कर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता कायमस्वरूपी सुस्थितीत करावा, रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच मागील काही वर्षांत रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलेल्या खर्चाची व कामाची चौकशी करावी, अशा मागण्यांचा समावेश आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ तात्पुरती डागडुजी न करता रस्त्याचे कायमस्वरूपी दर्जेदार काम करावे, अशी मागणी उपोषण कर्त्यांनी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 0000

सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू

मिरा -भाईंदर चेकनाक्याजवळ सोमवारी दुपारी एका भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात १४ वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. सौरभ विश्वकर्मा असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अवजड वाहनांच्या बेफिकीर वाहतुकीबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सौरभ विश्वकर्मा हा शाळा सुटल्यानंतर वडिलांसोबत दुचाकीवरून जात होता. दुपारी एकच्या सुमारास त्यांची दुचाकी दहिसर चेकनाक्याजवळील गोदावरी लॉजसमोर आली असता, पाठीमागून वेगाने आलेल्या एका सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

राजस्थान महिला समितीतर्फे काजली महोत्सव साजरा

कल्याण : राजस्थान महिला समितीतर्फे काजली महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  लक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित हा कार्यक्रम राजस्थानी संस्कृती आणि वातावरणाशी एकरूप होऊन मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख…

तिसऱ्या मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईचा अशोक शर्मा व पारस विजेते

चिंचवड ( पुणे)  येथील एस अरेना येथे शीख हेल्पलाइन फाऊंडेशन आणि हंड्रेड मास्टर्स बॅडमिंटन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात समारोप झाला. स्पर्धेच्या…

– कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर , फसवणुकीचा आकडा ५०० ते ६०० कोटींवर

 मंत्री महाजन यांचा गौप्यस्फोट हरिभाऊ लाखे नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्यातील कामांच्या नावाखाली बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचे नाव आणि ‘एस’ अक्षराची डिजिटल स्वाक्षरी असलेले हुबेहूब बनावट कार्यारंभ आदेश तयार करून संबंधितांकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचे समोर आले आहे. हा फसवणुकीचा आकडा तब्बल ५०० ते ६०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी जळगाव येथे पत्रकार परिषदेत केला. कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी नियुक्त नाशिक शहर तसेच राज्य राखीव दलाच्या पोलिसांना जेवण, पिण्याचे पाणी, चटया, बादल्या, चादरी आणि अन्य साहित्य पुरविण्याच्या नावाखाली हे कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. विशेष म्हणजे, प्रत्येक आदेशाची रक्कम १०० ते १५० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्याच्या कामांसाठी प्रत्यक्षात ऑनलाइन निविदा प्रक्रिया राबविली जाते. मात्र, या प्रकरणात ज्यांना बनावट कार्यारंभ आदेश देण्यात आले, त्यांनी संबंधित कामांसाठी कोणतीही ऑनलाइन निविदा भरलेली नव्हती. तरीही संशयितांनी संबंधितांकडून रोख तसेच धनादेशाद्वारे पैसे उकळून त्यांना ऑफलाइन कार्यारंभ आदेश दिले. हे आदेश शासनाच्या अधिकृत कार्यारंभ आदेशांसारखेच हुबेहूब तयार करण्यात आल्याने अनेकांची फसवणूक झाल्याचे महाजन यांनी सांगितले. सामान्यतः अधिकृत कार्यारंभ आदेशावर क्यूआर कोड असतो. तसेच महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचे नाव अशा प्रकारे नमूद केले जात नाही. मात्र, बनावट आदेशांमध्ये गेडाम यांचे नाव आणि केवळ ‘एस’ अक्षराची डिजिटल स्वाक्षरी वापरण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या आदेशांची सत्यता तपासल्यानंतर त्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय बळावला आहे. या प्रकारासंदर्भात चार ते पाच जण नुकतेच आपल्याकडे आले होते. त्यांनी काही कार्यारंभ आदेश दाखविल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. सध्या त्यांच्याकडे चार बनावट कार्यारंभ आदेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मार्च आणि एप्रिल महिन्यातील हे आदेश असल्याची माहिती असून, त्याद्वारे संबंधितांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात आल्याचे समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील दोन आणि धुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीचा या प्रकरणातील संशयितांमध्ये समावेश असल्याचा दावाही महाजन यांनी केला. याशिवाय आणखी काही व्यक्ती या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची शक्यता आहे. 0000

फुले विकणाऱ्या आई- वडिलांच्या लेकीने गाठले यशाचे शिखर!

 मैत्री ठक्करची पोलीस शिपाईपदी निवड; शिवसेनेच्या वतीने ठक्कर कुटुंबीयांसह शिवनेरी अकादमीच्या संचालकांचा सत्कार दिवा, दि. १० ऑगस्ट : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर स्वप्नांना यशाची किनार देता येते, हे डोंबिवलीतील मैत्री विनोद ठक्कर हिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फुले विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे तिचे आई-वडील विनोद विठ्ठल ठक्कर आणि आसमा विनोद ठक्कर यांच्या संघर्षाला अखेर यश मिळाले असून, मैत्रीची पोलीस शिपाईपदी निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही मुलींना चांगले शिक्षण देण्याची जिद्द ठक्कर दाम्पत्याने सोडली नाही. आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत मैत्रीनेही आपल्या ध्येयासाठी सातत्याने मेहनत घेतली. डोंबिवलीतील शिवनेरी अकादमी येथे पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेताना तिने शिस्त, सातत्यपूर्ण सराव आणि नियोजनबद्ध तयारीच्या जोरावर हे यश संपादन केले. मैत्रीचे हे यश केवळ ठक्कर कुटुंबासाठी अभिमानाची बाब नसून, आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत मोठी स्वप्ने पाहणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. शिवनेरी अकादमीचे संचालक लखन मुंडेकर हे स्वतः पोलीस दलात कार्यरत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना पोलीस दल, अग्निवीर तसेच विविध शासकीय सेवांमध्ये संधी मिळावी, या उद्देशाने अकादमीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना केवळ शारीरिक प्रशिक्षण न देता मैदानी सराव, लेखी परीक्षेची तयारी, मानसिक तयारी, नियोजन आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन अशा विविध अंगांनी प्रशिक्षण देण्यावर अकादमीचा भर आहे. डोंबिवलीपुरती मर्यादा न ठेवता सातारा, सांगली, मुंबई उपनगर, ठाणे तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतील विद्यार्थीही या अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना खीळ बसू नये, यासाठी गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य, प्रशिक्षणासाठी आवश्यक सहकार्य, आर्थिक मदत आणि मानसिक आधार देण्याचे सामाजिक कार्य शिवसेना परिवाराच्या माध्यमातूनही सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मैत्री विनोद ठक्कर हिची पोलीस शिपाईपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेच्या वतीने तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत मैत्री, तिचे आई-वडील, बहीण आणि शिवनेरी अकादमीचे संचालक लखन मुंडेकर यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी ठक्कर कुटुंबीयांशी संवाद साधताना शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि गरजू कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगण्यात आले. तसेच मैत्री आणि तिच्या कुटुंबाच्या भविष्यातील वाटचालीत आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही देण्यात आली. “फुले विकणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टातून पोलीस दलात दाखल झालेली मैत्री ही केवळ एका कुटुंबाच्या संघर्षाची यशोगाथा नाही, तर परिस्थितीशी दोन हात करून स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुला-मुलीसाठी प्रेरणेची ज्योत आहे,” अशा शब्दांत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी मैत्रीच्या यशाचे कौतुक केले. मैत्रीच्या यशामागे तिच्या आई-वडिलांची अथक मेहनत, मुलींना चांगले शिक्षण देण्याची जिद्द, मैत्रीची प्रामाणिक मेहनत आणि शिवनेरी अकादमीचे संचालक लखन मुंडेकर यांचे मार्गदर्शन व नियोजनबद्ध प्रशिक्षण यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. “परिस्थितीपेक्षा जिद्द मोठी असते” हा संदेश मैत्री ठक्करच्या यशाने अधोरेखित केला आहे.

ई20 पेट्रोलमध्ये 500 ppm क्लोराइड आणि आर्द्रतेच्या उपस्थितीचे दावे पडताळणीत सिद्ध झाले नाहीत

ई20 पेट्रोलमध्ये आर्द्रता (Moisture) आणि क्लोराइडच्या उपस्थितीची तेल विपणन कंपन्यांकडून (OMCs) तपासणी ई20 पेट्रोलमध्ये 500 ppm क्लोराइड आणि आर्द्रतेच्या उपस्थितीचे दावे पडताळणीत सिद्ध झाले नाहीत नवी दिल्ली : अलीकडेच ईबीएमएस…

 विश्वचषक विजेत्या खो-खोपटूंना रोख पारितोषिक व शासकीय नोकरी द्या!

आमदार सतीश चव्हाण यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी – तातडीने कार्यवाहीचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश छत्रपती संभाजीनगर: पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना अद्यापही शासनाने जाहीर केलेली रोख पारितोषिकाची रक्कम मिळालेली नसल्याचा मुद्दा आता विधान भवनापर्यंत पोहोचला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन विश्वविजेत्या खेळाडूंना शासन निर्णयानुसार ₹२.२५ कोटींचे रोख पारितोषिक आणि शासकीय सेवेत नोकरी देण्याची ठाम मागणी केली. दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत झालेल्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्य सरकारने ₹१० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ७ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशिप / वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या सांघिक क्रीडा प्रकारातील खेळाडूंना ₹२.२५ कोटींचे रोख पारितोषिक देण्याची तरतूद असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून देशाला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना अद्यापही जाहीर केलेले पारितोषिक मिळालेले नाही. त्यामुळे शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून संबंधित खेळाडूंना रोख बक्षीस तसेच शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली. या मागणीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या विषयावर त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी दिली.

निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेकडून ५० लाख मोफत वह्यांचे वितरण अभियान

अनिल ठाणेकर ठाणे-निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने कोकणातील विद्यार्थ्यांसाठी ५० लाख मोफत वह्यांचे वितरण अभियान राबविण्यात येत असून, रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण…