Category: महाराष्ट्र

Maharashtra News

मुरबाडमध्ये गरजू ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी मोफत साहित्य वाटप शिबिर

राजीव चंदने मुरबाड :  कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि भारत सरकारच्या अल्मिको मुंबई व जिल्हा प्रशासन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी मोफत सहाय्यक साहित्य वाटप योजनेअंतर्गत पूर्वतपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार ३१ ऑगस्ट, सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कुणबी समाज हॉल, मुरबाड, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथे आयोजित केले आहे. या शिबिरात केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत साहित्य वाटप केले जाणार आहे. यामध्ये तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, कुबड्या (काखेतील व हातातील), वॉकर, अंधांसाठी काठी, श्रवणयंत्र, कमरेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा, मानेचा पट्टा, कृत्रिम हात-पाय व इतर सुमारे चोवीस प्रकारचे साहित्य समाविष्ट आहे. शिबिरासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे – अ) गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी – १) वय साठ वर्ष पूर्ण झाल्याचा पुरावा म्हणून आधार कार्डची छायाप्रत २) उत्पन्नाचा दाखला किंवा शिधापत्रिकेची छायाप्रत ३) पासपोर्ट आकाराचा एक फोटो ब) दिव्यांग बांधवांसाठी – १) दिव्यांग प्रमाणपत्राची छायाप्रत २) आधार कार्डची छायाप्रत ३) उत्पन्नाचा दाखला किंवा शिधापत्रिकेची छायाप्रत ४) पासपोर्ट आकाराचा एक फोटो या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून तपासणी व नोंदणी करून घ्यावी आणि शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किसन कथोरे व त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी उल्हास बांगर ९२६०४२००७०, रामभाऊ दळवी ९२०९४०८९९९, मोहन गडगे ९९२२७०१०००, दिपक पवार ८३०८५३५२००, जितेंद्र भावार्थे ९८९०९२५०५६ यांच्याशी सम्पर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

महेंद्रशेठ घरत यांनी ३५ जणांना घडवले नितांतसुंदर व्हिएतनामचे पर्यटन!

उलवे : आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत यांचे अनोखे दातृत्व‌ सर्वपरिचित आहे. दुसऱ्यांची स्वप्नं पूर्ण करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे. ज्यांनी केवळ विमान हा शब्द…

आयुक्तांच्या दालनासमोर श्रमजीवी कामगारांचे धरणे आंदोलन

 गेल्या काही महिन्यांपासून वेतन थकले मिरा-ईंदर: मिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) मुख्यालयात श्रमजीवी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक मोर्चा काढला. हा मोर्चा थेट आयुक्तांच्या केबिन समोर धडकला आणि कामगार आपल्या विविध मागण्यांसाठी…

कुडाळ -कोल्हापूर अंतर होणार कमी…!

घोटगे -सोनवडे घाट मार्गाला केंद्राची अंतिम मंजुरी! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)–सिंधुदुर्ग- कोल्हापूर जोडणाऱ्या गेली कित्येक वर्षे रखडलेल्या घोटगे -सोनवडे घाट मार्गाला अखेर केंद्रीय पर्यावरण समितीने अंतिम परवानगी दिली आहे.  त्यामुळे आता या नव्या घाटाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी ही माहिती दिली. यापूर्वी सदर घाट मार्गाला पर्यावरणीय मंजुरी मिळाली होती आता केंद्र सरकारकडून अंतिम परवानगी मिळाल्याने प्रकल्पाला आता हिरवा कंदील मिळाला आहे खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे तसेच राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून ही मंजुरी मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो असे राणे यावेळी म्हणाले या मार्गामुळे परिसराच्या विकासालाही मोठी चालना मिळेल हा घाट मार्ग पूर्ण करण्यासाठी स्थानिक तसेच राज्य पातळीवर आवश्यक ती पावले लवकरात लवकर उचलण्यात येतील आणि प्रकल्प मार्गी लावला जाईल असेही राणे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग कोल्हापूर जोडणाऱ्या या घाट  मार्गाचा प्रश्न १९८५ पासून प्रलंबित आहे. हा घाट मार्ग व्हावा ही तत्कालीन जि. प. सदस्य कै.महेंद्र नाटेकर यांची मूळ कल्पना. या मागणीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली घोटगे- सोनवडे व आसपासच्या गावातील ग्रामस्थांनी अनेक आंदोलने उपोषणे, धरणा कार्यक्रम केले. मोर्चेही काढले. मात्र दिल्लीच्या पर्यावरण विभागात हा प्रकल्प मंजुरीसाठी अडकून पडला. माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी गेली दोन वर्षे केंद्राकडे या संबंधात पाठपुरावा केला अखेर त्याला यश येऊन आता अंतिम मंजुरी मिळाली आहे. या घाट मार्गामुळे कुडाळ  घोटगे -सोनवडे ते कोल्हापूर हे अंतर तब्बल ४० किलोमीटरने कमी होणार आहे. दीड ते दोन तासात कुडाळ वरून कोल्हापूर गाठता येणार आहे. सह्याद्रीच्या रांगांमधील अनेक गावे  मुख्य विकास प्रवास सामील होणार आहेत. या घाट मार्गामुळे संपूर्ण कुडाळ मालवण या दोन तालुक्यांसह वेंगुर्ले आणि कणकवली तालुक्यातील अनेक गावे कोल्हापूरच्या अधिक जवळ येणार आहेत. भुदरगड (कोल्हापूर )ते कुडाळ (सिंधुदुर्ग) ही ब्रिटिश काळातील पाऊलवाट होती. २०२५ मध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशाने, प्रयत्नाने तांत्रिक सर्वेक्षण करून मार्ग निश्चित करण्यात आला. जुलै,२०२५ मध्ये स्थानिक आमदार डॉ. निलेश राणे यांनी दिल्लीत पर्यावरण विभागात अडकलेल्या या प्रकल्पाच्या अंतिम परवानगीसाठी  हालचाली सुरू केल्या. खासदार विद्यमान खासदार नारायण राणे यांनीही या प्रश्नाचा दिल्लीत जोरदार पाठपुरावा केला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीही राज्य सरकारच्या पातळीवर त्याचा पाठपुरावा केला अखेर या तिघांनी दिल्ली गाठत पर्यावरण मंत्रालयाची अंतिम परवानगी मिळवली. १३ किलोमीटर लांबीच्या सोनवडे (कुडाळ)-शिवडाव (कोल्हापूर) या नव्या घाट  मार्गाला केंद्रीय पर्यावरण समितीची अंतिम मंजुरी मिळाली असून त्यासाठी १३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा मार्ग बनवला जाणारा असून संपूर्ण वर्षभर या घाटातून प्रवास करता येणार आहे.

आपले सरकार सेवा केंद्रांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा: जिल्हाधिकारी किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड-अलिबाग: रायगड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे अनिवार्य आहे. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ३० सप्टेंबर, सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. राज्यातील महा ई-सेवा, सेतू सुविधा, नागरी सुविधा व संग्राम केंद्रांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ असे एकसमान नाव व ब्रँडिंग देण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील रिक्त केंद्रांची माहिती raigad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करताना तांत्रिक अडचण आल्यास जिल्हा माहिती तंत्रज्ञान कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान दोन, तर पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात किमान चार केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रात दहा हजार लोकसंख्येमागे दोन केंद्रे प्रस्तावित आहेत. अर्ज मागविण्याचा कालावधी १ ते ३० सप्टेंबर २०२६ असा असून, अर्जांची छाननी १ ते १५ ऑक्टोबर आणि जिल्हास्तरीय कार्यवाही १६ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात तालुकानिहाय नव्याने सुरू होणाऱ्या केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : अलिबाग २६, कर्जत ४३, खालापूर ४५, महाड ११८, माणगाव ३४, म्हसळा ३३, मुरुड १२, पनवेल ग्रामीण २२, पनवेल शहरी ७९, पेण ४१, पोलादपूर ३५, रोहा ५३, श्रीवर्धन ३१, सुधागड २२, तळा २२ आणि उरण ३८. या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र व इच्छुक नागरिकांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून त्याची प्रत आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयात वेळेत जमा करावी.

नाशिक जिल्ह्यातील महिला बचतगटांना आता येणार ‘अच्छे दिन’

हरिभाऊ लाखे नाशिक : शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना आता घरच्या जेवणाचा स्वाद आणि पौष्टिक आहार मिळणार आहे. रुग्णांना महिला बचतगटांकडून जेवण दिले जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने राज्यातील २०० पेक्षा कमी खाटांच्या जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात आहार पुरवण्याचे कंत्राट स्थानिक महिला स्वयंसहायता गटांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील महिला बचतगटांसाठी रोजगाराचे मोठे दालन उघडले आहे. जिल्ह्यातील ३३ हजारांहून अधिक बचतगटांना यामुळे ‘अच्छे दिन’ आले आहेत. जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि १०५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या ठिकाणी दरदिवशी किमान एक हजारपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करून दाखल करण्यात येतात. या रुग्णांसाठी सकस अन्न देता यावे, यासाठी आधीपासूनच प्रयत्न सुरू आहेत. यात आता शासनाच्या निर्णयामुळे अन्नपुरवठ्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. यासाठी पात्र बचतगटांची निवड विविध निकषांवर केली जाणार आहे. आहाराच्या गुणवत्तेबरोबरच वेळ आणि स्वच्छतेबाबतही कडक नियम लागू करण्यात आले आहेत. बचतगटांची निवड थेट कंत्राट देऊन न करता १०० गुणांच्या निकषांवर केली जाणार आहे. गटाचा अनुभव, आहार तयार करण्याची क्षमता, उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ, स्वच्छता, आर्थिक क्षमता आणि संबंधित कामाचा अनुभवांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे सक्षम आणि दर्जेदार सेवा देऊ शकणाऱ्या गटांची निवड होणार आहे. शासनाकडून प्रतिरुग्ण दररोज १९१.४० रुपये या दराने बचतगटांना रक्कम दिली जाणार आहे. यात रुग्णाचा निर्धारित आहार आणि व्यवस्थापनाच्या खर्चाचा समावेश असेल. रुग्णसंख्या जास्त असलेल्या रुग्णालयांत बचतगटांना यातून मोठा आर्थिक लाभ आणि शाश्वत रोजगार मिळणार आहे. आहार पुरवठ्यात हलगर्जीपणा करणाऱ्या बचतगटांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. वेळेत जेवण न दिल्यास ५०० रुपये दंड, अपुरा आहार दिल्यास २२० रुपये दंड, अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास एक ते पाच हजार रुपये दंड, आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा याबाबत तडजोड झाल्यास संबंधित गटावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. या निर्णयामुळे केवळ रुग्णांना सकस आहारासह जिल्ह्यातील हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची एक नवी व सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

नाशिकमध्ये कुंभमेळा रामकुंडात, मग आमच्या जमिनी कशासाठी?

शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल हरिभाऊ लाखे नाशिक : कुंभमेळा व साधुग्रामच्या नावाखाली प्रशासन नांदूर, टाकळी परिसरातील सुपीक शेतजमिनी अन्यायकारकपणे ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. मागील अडीच दशकांत डीपी रोड, छत्रपती संभाजीनगर रस्ता, साधुग्राम व सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) यासाठी घेतलेल्या, वापरलेल्या जागांचा मोबदला अद्याप दिला नसल्याची तक्रार करीत साधुग्राम शेतकरी कृती समितीने साधुग्रामसाठी नव्याने जागा देण्यास ठाम विरोध दर्शविला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने नाशिक, नांदूर व टाकळी शिवारातील सुमारे एक हजार एकर जमीन साधुग्रामसाठी तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या विरोधात साधुग्राम शेतकरी कृती समितीने उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देत शेतकऱ्यांची सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंगळवारी अपर तहसीलदार अमोल निकम यांच्यासमोर संबंधित शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी सुरू झाली. यावेळी जमीन मालकी, शेती, कुटुंबाची उपजीविका आणि अधिग्रहण संबंधी हरकतींशी संबंधित कागदपत्रे शेतकऱ्यांनी सादर केली. कुंभमेळा रामकुंडात भरतो. आमच्या सुपीक जमिनींचा कुंभमेळ्याशी काहीच संबंध नाही. वर्षानुवर्षे आम्ही शेती करीत असून प्रशासन मनमानीपणे नोटिसा देऊन मोजण्या करीत आहे, असा आरोप शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष समाधान जेजुरकर आणि शेतकऱ्यांनी केला. यापूर्वी विविध कारणांसाठी आमच्या ताब्यात घेतलेल्या, वापरलेल्या जमिनींचे पैसे थकवून नवीन विकास आराखड्यातील (डीपी) जमिनींसाठी मात्र प्रशासनाने ९०० कोटी रुपयांचे वाटप केल्याचा दावा त्यांनी केला. प्रशासनाने थकीत पैसे न दिल्यास सातबारा उताऱ्यावर आमची नावे असून ऐन कुंभमेळ्यात जमिनींवर ताबा घेऊन खोदाई केली जाईल, असा इशाराही जेजुरकर यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला. प्रशासनाने न्यायालयाच्या निर्देशानुसार सुनावणी पूर्ण होईपर्यंत संबंधित जागेवर जैसे थे परिस्थिती कायम ठेवली जाणार असल्याचे म्हटले आहे. तात्पुरत्या अधिग्रहणातील मूल्यांकन व अर्जदारांनी न्यायालयात मांडलेल्या सर्व मुद्यांवर सविस्तर सुनावणी घेतली जाईल. नागरिकांच्या शंका, समस्या व कायदेशीर हरकतींचा सहानुभूतीपूर्वक व कायदेशीर चौकटीत विचार केला जाणार असल्याचे प्रशासकीय वर्तुळातून सांगण्यात आले. गोदावरी काठावर दर १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील लाखो साधू-महंतांच्या निवासासाठी नाशिकमध्ये साधुग्राम वसविण्यात येते. २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात सुमारे १६१८ एकर क्षेत्रावर साधुग्राम उभारण्याचे प्रस्तावित आहे. यातील तपोवन परिसरातील सुमारे ३१८ एकर जागा साधुग्रामसाठी आरक्षित असून यावेळी ती कायमस्वरूपी संपादित केली जाणार आहे. याव्यतिरिक्त लागणारी सुमारे १२५० एकर जागा तात्पुरत्या स्वरूपात घेतली जाणार आहे. नव्याने जागा देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. मागील २०१५ च्या कुंभमेळ्याच्या वेळी साधुग्रामसाठी जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. सिंहस्थ संपल्यानंतर या जमिनी पुन्हा शेतीयोग्य करून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र प्रत्यक्षात खडी, मुरूम, सिमेंट, दगड, पाइप आदी साहित्य पूर्णपणे काढून जमीन पूर्ववत करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने अनेक जमिनी पुन्हा शेतीसाठी योग्य राहिल्या नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा हजारो एकर सुपीक व बागायती जमीन अधिग्रहित केल्यास शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी नुकसान होईल, अशी भूमिका समितीने घेतली आहे.

साबे गावातील नाल्यात टोरंट पॉवरची केबल

 पाण्याचा निचरा खोळंबल्याने भाजपचे टोरंट पॉवरला निवेदन दिवा, दि. २५ ऑगस्ट: दिवा पूर्वेकडील साबे गावातील विठ्ठल मंदिराशेजारील मुख्य नाल्यामधून टोरंट पॉवर कंपनीची केबल गेल्यामुळे नाल्यातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळित होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या समस्येमुळे नाल्याला वारंवार चौकअप होऊन परिसरात सांडपाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने भारतीय जनता पक्ष, दिवा शहरच्या वतीने टोरंट पॉवर कंपनीच्या दिवा पूर्व कार्यालयाला निवेदन देण्यात आले. भाजप दिवा शहरचे अध्यक्ष सचिन रमेश भोईर यांनी टोरंट पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन दिले. सावे गावातील विठ्ठल मंदिरा शेजारील मुख्य नाल्यामधून टोरंट पॉवरची केबल नेण्यात आली आहे. या केबलमुळे नाल्यातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह व्यवस्थित होत नसून पाणी अडून राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नाल्यात वारंवार चोकअप होऊन परिसरातील सांडपाणी साचत असल्याने नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता तसेच डासांचा प्रादुर्भाव यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होत असून नागरिकांच्या आरोग्यासोबतच परिसराच्या स्वच्छतेलाही धोका निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे टोरंट पॉवर कंपनीने या ठिकाणी तातडीने पाहणी करून नाल्यातील पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. केबलमुळे अडथळा निर्माण होत असल्यास ती योग्य पद्धतीने स्थलांतरित किंवा व्यवस्थित करून नाल्याचा पूर्ण क्षमतेने पाणी निचरा होईल, याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ही समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि आरोग्याशी संबंधित असल्याने प्रशासनाने तसेच संबंधित कंपनीने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. 0000

सिंधुदुर्ग जि.प. शाळांमध्ये पाणी-वीज मुबलक; इंटरनेटचा मोठा अनुशेष

१,३२३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा; मुलींच्या स्वच्छतागृहांची उपलब्धता ९७.२ टक्के राजन चव्हाण सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मूलभूत सुविधांच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थिती समाधानकारक असली, तरी इंटरनेट सुविधेच्या बाबतीत जिल्हा राज्याच्या सरासरीपेक्षा…

एमपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या निखिल मोहिते यांचा चिखली बौद्धवाडी शाळेत सन्मान

संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा चिखली बौद्धवाडी येथील माजी विद्यार्थी निखिल अनिल मोहिते यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण करून विक्रीकर निरीक्षक तसेच सहाय्यक…