Category: मुंबई

Mumbai news

फ्लेमिंगोच्या मृत्यूची हरित न्यायाधीकरणाकडून दखल

सिडकोसह वनविभाग, प्राधिकरणाला नोटीस नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या प्रधान खंडपीठाने येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावाजवळ फ्लेमिंगोच्या मृत्यूची स्वत:हून दखल घेत राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या (एनजीटी) प्रधान खंडपीठाने सिडको, राज्य वनविभाग आणि पाणथळ प्राधिकरण यांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटीसमध्ये पर्यावरणीय नियमांचे पालन करण्याशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले आहेत. विशेषत: वेटलँड (संवर्धन आणि व्यवस्थापन) नियम, २०१७ च्या तरतुदींचे पालन; जैविक विविधता कायदा, २००२ आणि पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ बाबत एनजीटीने टिप्पणी केली आहे. एनजीटी अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव, न्यायमूर्ती अरुण कुमार त्यागी आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. अफरोज अहमद यांच्या खंडपीठाने फ्लेमिंगोच्या मृत्यूचे प्रकरण पश्चिम विभागाकडे वर्ग केले आणि सुनावणीसाठी १८ जुलैची तारीख निश्चित केली आहे. एनजीटीने नमूद केले की, प्राथमिक निरीक्षणांवर आधारानुसार शहर आणि औद्याोगिक विकास महामंडळाने (सिडको) नव्याने बांधलेल्या उंच रस्त्यांमुळे टी एस चाणक्य तलावातील तीनपैकी दोन तलावांत पाणी येण्याचे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे तलावात पाणी साचले होते. फ्लेमिंगो सामान्यत: वाहते पाणी असलेल्या भागात राहतात हे तथ्य. फ्लेमिंगोच्या मृत्यूनंतर त्यांनी उपस्थित केलेल्या चिंतेला त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल पर्यावरणवाद्यांनी स्वागत केले आहे. नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी निदर्शनास आणून दिले की, सिडकोने नेरुळ येथील वाहतूक जेट्टीच्या अर्थात टर्मिनलच्या कामामुळे आंतरभरतीच्या पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होणार नाही असे सिडकोने म्हटले असताना स्वत:च्या कामात नियमांचे उल्लंघन केले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दिलेल्या पर्यावरण मंजुरीमध्ये नमूद केलेल्या अटींचे हे उल्लंघन आहे. आणि पाण्याचा प्रवाह आणि जीवजंतू अबाधित आहे याची खात्री करण्यासाठी राज्याने दिलेल्या सरकारी आदेशाचेही उल्लंघन केले आहे. जबाब नोंदवण्याचे निर्देश फ्लेमिंगोच्या मृत्यूचे कारण ह्यप्रकाश प्रदूषणह्ण असू शकते, जे त्यांच्या नाजूक डोळ्यांमुळे पक्ष्यांची दृष्टी अंशत: बिघडवते. त्यात असे नमूद केले आहे की, पक्ष्यांना उडताना नवीन स्थापित एलईडी दिवे दिशाभूल करतात, असे एनजीटीने आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे एनजीटीने प्रधान मुख्य वनसंरक्षक-नागपूर, महाराष्ट्र वेटलँड प्राधिकरण, सिडको आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पश्चिम विभागीय खंडपीठासमोर जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

आषाढी वारीसाठी खास गाड्या

मुंबई : न्यु सातारा समूहाच्या वतीन २००१ पासून दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्ताने मुंबई ते पंढरपूर अशी बस सेवा दिली जाते. यासोबत मोफत चहा, न्याहरी, जेवण, राहण्याची तसेच इतर सोयीसुविधादेखील दिल्या जातात. यंदा १७ जुलै २०२४ रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्ताने मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ या दिवशी सकाळी दहा वाजता या बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ः राजेंद्र घाडगे , न्यू सातारा समूह, डॉ. कंपाऊंड, दत्ताराम लाड मार्ग, चिंचपोकळी पूर्व, मुंबई ४०००११. दूरध्वनी क्र. २३७९१५२०, २३७४९६३८, ९९८७१९९५८७ (वेळ सकाळी ९ ते २, दुपारी २.३० ते सायंकाळी ६.३०) यंदा या गाड्या चिंचपोकळी, ना. म. जोशी मार्ग, कांदिवली, मानखुर्द, वाशी, डोंबिवली येथून सोडण्यात येणार आहेत. आषाढी वारीसाठी खास गाड्या मुंबई : न्यु सातारा समूहाच्या वतीन २००१ पासून दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्ताने मुंबई ते पंढरपूर अशी बस सेवा दिली जाते. यासोबत मोफत चहा, न्याहरी, जेवण, राहण्याची तसेच इतर सोयीसुविधादेखील दिल्या जातात. यंदा १७ जुलै २०२४ रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्ताने मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ या दिवशी सकाळी दहा वाजता या बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ः राजेंद्र घाडगे , न्यू सातारा समूह, डॉ. कंपाऊंड, दत्ताराम लाड मार्ग, चिंचपोकळी पूर्व, मुंबई ४०००११. दूरध्वनी क्र. २३७९१५२०, २३७४९६३८, ९९८७१९९५८७ (वेळ सकाळी ९ ते २, दुपारी २.३० ते सायंकाळी ६.३०) यंदा या गाड्या चिंचपोकळी, ना. म. जोशी मार्ग, कांदिवली, मानखुर्द, वाशी, डोंबिवली येथून सोडण्यात येणार आहेत.

तंत्रज्ञान क्रांतीमुळे दिव्यांगांचे जीवन सुलभ होईल : राज्यपाल रमेश बैस

अशोक गायकवाड मुंबई : नजीकच्या भविष्यकाळात तंत्रज्ञान विकासामुळे दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक बदल संभवणार असून त्यांचे जीवन सुलभ होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता दिव्यांगांकरिता वरदान ठरेल, असे सांगताना विकलांगता ही गैरसोय राहील, परंतु प्रगतीत अडचण ठरणार नाही, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. ८) मालाड मुंबई येथे १०० दृष्टिहीन विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आधारित स्मार्ट चष्म्यांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अंदाजे वीस हजार रुपये किंमत असलेल्या या तंत्रज्ञान आधारित स्मार्ट चष्म्यांमुळे दृष्टिहीन विद्यार्थ्यांना अभ्यास करणे, शाळेत अथवा अन्यत्र जाणे तसेच इतर दिनचर्येत मदत होणार आहे. या चष्म्यामध्ये लेन्स, प्रोसेसर व स्पीकरचा समावेश आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी दर आठ व्यक्तींमागे एक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे दिव्यांग असून भारताची दोन टक्के लोकसंख्या दिव्यांग आहे. देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविणे गरजेचे आहे, असे राज्यपालांनी सांगितले.दिव्यांगांची सेवा हीच वास्तविक नारायणाची सेवा आहे. दिव्यांग व्यक्तींमध्ये अनेक दिव्य गुण असतात. त्यांना योग्य संधी मिळाली तर ते प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात असे सांगून दिव्यांगांच्या सक्षमीकरणाबद्दल मानवाधिकार आयोग व हेतू चॅरिटेबल ट्रस्ट करीत असलेल्या कार्याबद्दल राज्यपालांनी उभय संस्थांचे कौतुक केले. स्मार्ट चष्मे खरेदीसाठी आर्थिक सहकार्य केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच इतर दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते हेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या संकेतस्थळाचे देखील यावेळी उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमात ७५ दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश देखील प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. संदीप मेहता, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. शिवकुमार दिघे व न्या.अभय आहुजा, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमल किशोर तातेड (नि.) व हेतू चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रिखबचंद जैन प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई उपनगर जिल्हा तसेच हेतू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारत निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ 3 तासांनी वाढवली

पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विनंती निवडणूक आयोगाने स्वीकारली मुंबई: भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदानाची वेळ तीन तासांनी वाढवली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विनंती केल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या 3 जून 2024 रोजीच्या आदेशानुसार, मतदानाचा कालावधी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वी हा कालावधी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदानाचा कालावधी होता. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार ॲड अनिल परब यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 28 मे रोजी आम्ही आयोगाला पत्र लिहून मतदारांसाठी वेळ योग्य नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. बहुतेक मतदार हे नोकरदार वर्गातील असून ते नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा मतदान करण्यास प्राधान्य देतात, असे आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते ऍड अनिल परब यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत मतदानासाठी कोणतीही सार्वजनिक सुट्टी नाही. त्यामुळे मतदारांना त्यांचा लोकशाही हक्क बजावणे कठीण झाले आहे. त्यांना मतदानाच्या त्यांच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवले जाईल. त्यामुळे निवडणुकीत मतदान कमी होऊ शकते. त्यामुळे मतदानाची वेळ वाढवणे गरजेचे आहे असे आम्ही आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्याचे परब पुढे म्हणाले. 8 मे रोजी निवडणूक आयोगाने मुंबई आणि कोकण पदवीधर आणि नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या चार विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत.

शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप हॉटेल व्यावसायिक गोविंद शेट्टी तसेच उडिपीचे आमदार गुर्मे सुरेश शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.

अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक कॅरम स्पर्धा

भव्या सोळंकी विजेता मुंबई : अमृत महोत्सवी गोविंदराव माहिते चषक १९ वर्षाखालील मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे विजेतेपद विवा कॉलेज-विरारचा राष्ट्रीय ज्युनियर कॅरमपटू भव्या सोळंकीने पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात प्रथमपासून अचूक फटकेबाजीसह आघाडी घेत भव्याने त्याचाच कॉलेज सहकारी जोनाथन बोनालचा ८-२ असा पराभव केला. परिणामी मुंबई उपनगरचा सबज्युनियर विजेता पार्ले टिळक हायस्कूलचा सार्थक केरकर व राष्ट्रीय सबज्युनियर कॅरमपटू डॉ. दासिल्व्हा हायस्कूलचा ध्रुव भालेकर यांना सहज हरवून विजयीदौड करणाऱ्या जोनाथनला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गौरवमूर्ती क्रीडापटू गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते संपन्न झाला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित परेल येथे झालेल्या उपांत्य फेरीत भव्या सोळंकीने मयुरेश पवारला १४-१० असे तर जोनाथन बोनालने सार्थक केरकरला १४-२ असे नमविले. उपांत्यपूर्व उपविजेतेपदाचे मानकरी कौस्तुभ जागुष्टे, प्रसन्ना गोळे, ध्रुव भालेराव व मिहीर शेख ठरले. उपउपांत्यपूर्व उपविजेतेपद समीर खान, अथर्व म्हात्रे, अमेय जंगम, निधी सावंत, तन्वी परब, पृथ्वी बडेकर, रुची माचीवले, नेहाल उस्मानी यांनी मिळविले. याप्रसंगी छबिलदास हायस्कूलचे माजी प्राचार्य सतीश इनामदार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण व मीनानाथ धानजी, क्रीडा शिक्षक प्रॉमिस सैतवडेकर व सुनील खोपकर आदी उपस्थित होते. कॅरमपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रशिक्षक सचिन शिंदे, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक व क्रीडापटू ओमकार चव्हाण यांनी पंचाचे कामकाज केले.

राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान

अशोक गायकवाड मुंबई :राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ६) पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली. तीस (३०) पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले, तर ७ पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आली. अठ्ठयात्तर (७८) पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली. पोलीस अलंकरण समारोहाला अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. विनय कारगांवकर, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक, वाहतूक मुंबई, आशुतोष डुंबरे, आयुक्त ठाणे शहर, अशोक अहिरे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, नाशिक ग्रामीण, विनोदकुमार तिवारी, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, चंद्रपूर जिल्हा, प्रल्हाद खाडे, सेवानिवृत्त समादेशक, रा रा पो बल गट क्र. ६, धुळे, चंद्रकांत गुंडगे, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज, दौंड व मिर्झा अन्वर बेग इब्राहिम बेग, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, नांदेड यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.

तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई : आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. ७ जून च्या रात्री तुर्भे विभागात सेव्हन स्काय बार अँड लोंज, पाम बीच गॅलरीया मॉल सेक्टर १९ डी, टीप्सीब्रो बारअँड लोंज पाम बीच गॅलरीया मॉल सेक्टर १९ डी, करिश्मा बार सेक्टर १९ सी. असे एकूण ०३ बार यांनी केलेल्या अनधिकृत बाधकामाविरूद्ध कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई स्थानिक पोलीस स्थानक व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार डॉ राहुल गेठे उप आयुक्त (अतिक्रमण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर मोहिमेसाठी भरत धांडे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तुर्भे,डॉ अमोल पालवे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी,नेरूळ आणि तुर्भे विभागातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी,अतिक्रमण मुख्यालय पोलीस पथकथातील अधिकारी/कर्मचारी यांचासह करण्यात आली. सदर कारवाई पोटी २,५०,०००/- इतके दंडात्मक शुल्क वसूल करण्यात आले असून यापुढे अशीच कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

घाटकोपरमध्ये दुर्गंधीमुक्तीसाठी भूमिगत कचरा पेट्या

मुंबईः आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात दररोज हजारो मेट्रिक टन कचरा निर्माण होत असतो. झोपडपट्टी परिसर असलेल्या भागात कचरा मोठ्या प्रमाणात साठत असल्याने दुर्गंधीचा आरोग्यावर परिणाम होतो. रस्त्यावर टाकण्यात येणारा कचरा भटकी जनावरे आणि कचरा वेचणाऱ्यांकडून इतरत्र पसरत असल्याने परिसरात अस्वच्छता देखील निर्माण होत आहे. त्यामुळे भूमिगत कचरा पेट्या बसवण्यावर पालिकेने भर दिला आहे. येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल, असे घन कचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक अभियंता सूर्यकांत सातपुते यांनी सांगितले. हा परिसर दुर्गंधीमुक्त आणि कचरा मुक्त होणार असल्याने स्थानिकांकडून पालिकेच्या या धोरणाचे कौतुक होत आहे. स्थानिक आमदार राम कदम यांनी पालिकेकडे याबाबत पाठपुरावा केला होता. जगदुशा नगर येथे महादेव मंदिर, तसेच खेळाचे मैदान असल्याने लोकांची मोठी वर्दळ असते. अशात झोपडपट्टीतून जमा होणारा कचरा मंदिरासमोरील रस्त्यावर टाकला जात असत. त्यामुळे भटकी जनावरे आणि कचरा वेचणाऱ्यांकडून इतरत्र कचरा पसरत होता. परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने अखेर इथे भूमिगत कचरा पेट्या बसवण्यात येत असल्याने नागरिकांनी पालिका प्रशासनाने आभार मानले.

राज्यसभेच्या दोन जागा भाजप राष्ट्रवादीसाठी सोडणार का?

मुंबई : पियूष गोयल आणि उदयनराजे भोसले या राज्यसभा सदस्यांची लोकसभेवर निवड झाल्याने या रिक्त झालेल्या दोन्ही जागा भाजप स्वत:कडे कायम ठेवणार की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दावा केल्याप्रमाणे एक जागा या पक्षाला सोडणार याची उत्सुकता आहे. राज्यसभेचा सदस्य लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यास त्याचे सदस्यत्वपद आपोआपच रद्द होते. राज्यातून राज्यसभेवर प्रतिनिधीत्व करणारे पियूष गोयल आणि उदयनाराजे भोसले यांची अनुक्रमे उत्तर मुंबई व सातारा मतदारसंघांमधून लोकसभेवर निवड झाली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार गोयल आणि भोसले या दोघांचे राज्यसभेचे सदस्यत्वपद आपोआपच रद्द झाले आहे. लोकसभेच्या जागावाटपात महायुतीमध्ये अजित पवार गटाला चारच जागा वाट्याला आल्या होत्या. गोयल यांची रिक्त होणारी जागा आम्हाला देण्याचा शब्द भाजप नेतृत्वाने दिला असल्याचा दावा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. यानुसार भाजप ही जागा राष्ट्रवादीला देणार का, हा प्रश्न आहे. अजित पवार गटाचा दारुण पराभव झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीला फारसे महत्त्व देण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. यामुळेच आणखी चार वर्षे मुदत असलेली गोयल यांची जागा भाजप राष्ट्रवादीला सोडण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. राज्यसभेच्या दोन्ही रिक्त जागांबाबत दिल्लीच्या पातळीवरच निर्णय होईल, असे भाजपच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले. नियम काय सांगतो ? विधानसभा आमदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यास भारताच्या राजपत्रात नावे प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या मुदतीत आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. या मुदतीत राजीनामा न दिल्यास त्याची लोकसभेची जागा आपोआपच रिक्त होते. १९९९ मध्ये पंजाबमध्ये विधानसभा सदस्य गुरुचरणसिंग तोहरा यांनी लोकसभेवर निवडून येऊनही १४ दिवसांत राजीनामा दिला नव्हता. परिणामी त्यांची लोकसभेची जागा रिक्त झाली होती. राज्यसभा किंवा विधान परिषद सदस्य लोकसभा वा विधानसभेवर निवडून आल्यास सदस्यत्व आपोआपच रद्द होते. लोकसभेत निवडून आलेले विद्यामान लोकप्रतिनिधी पियूष गोयल (भाजप) – राज्यसभा उदयनराजे भोसले (भाजप ) – राज्यसभा लोकसभेवर निवडून गेलेले आमदार बळवंत वानखडे (अमरावती, काँग्रेस), प्रणिती शिंदे (सोलापूर, काँग्रेस), संदिपान भूमरे (औरंगाबाद, शिवसेना शिंदे गट), रविंद्र वायकर (वायव्य मुंबई, शिवसेना शिंदे गट), वर्षा गायकवाड (उत्तर मध्य मुंबई काँग्रेस), प्रतिभा धानोकर (चंद्रपूर, काँग्रेस)