Category: मुंबई

Mumbai news

मृत्यूशी झुंज देणाऱ्या बिबट्याला जीवनदान

 वन विभागाची थरारक मोहीम यशस्वी!” ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली वनपरिक्षेत्रातील येऊर नियंत्रण क्षेत्रात जखमी अवस्थेत झाडावर बसलेल्या बिबट्याची वन विभागाने थरारक बचावमोहीम राबवत यशस्वी सुटका केली. गंभीर जखमी आणि अशक्त झालेल्या या बिबट्याला सुरक्षितपणे पकडून उपचारासाठी बिबट्या बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे. पाचपाखाडी (इंदिरानगर)  राखीव वन क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक ५२० मध्ये ३० मे रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता एका झाडावर जखमी बिबट्या बसल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच वन विभाग, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ, WWA आणि RAWW संस्थांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या गंभीर जखमी असल्याने त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्याचे दिसून आले. रात्रीच्या अंधारात बचावकार्य धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने वन विभागाने संपूर्ण रात्र परिसरावर कडेकोट नजर ठेवली. अखेर रविवारी सकाळी सहा वाजता शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी बिबट्या मूळ ठिकाणापासून सुमारे ७० ते ८० मीटर अंतर चालत जाऊन झाडीत पडल्याचे आढळले. वन्यजीव अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि बचाव पथकाच्या उपस्थितीत बिबट्याला सुरक्षितपणे भूल देऊन जेरबंद करण्यात आले. प्राथमिक तपासणीत बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या चारही पायांच्या तळव्यांना गंभीर जखमा असून मागील पायावरील मोठ्या जखमेमुळे हाड उघडे पडल्याचे दिसून आले. तसेच शरीरावर अनेक ओरखडे आणि जखमांचे व्रण आढळले. उपचारासाठी या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली येथील बिबट्या बचाव केंद्रात हलविण्यात आले असून त्याच्यावर तज्ज्ञ पशुवैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. वन विभाग, बचाव पथक आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयामुळे एका  वन्यजीवाचा जीव वाचविण्यात यश आल्याने या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. कोट बिबट्याच्या शरीरावरील जखमा गंभीर स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे त्याला सुरक्षितपणे पकडून तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक होते. बचाव पथकाच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी झाली असून बिबट्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मयूर सुरवसे (वनपरिक्षेत्र अधिकारी येऊर)

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक

: अजितदादा नंतर अहिल्यादेवींचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभ – सुनेत्रा पवार मुंबई : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १ जूनला ‘स्वर संध्या’

सारेगमप लिटल चॅम्प फेम अंजली गायकवाड व ज्ञानेश्वरी गाडगे यांचे सुमधुर गायन पनवेल : माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती”,…

हेडलाईटच्या प्रकाशावरून वाद, तरुणावर जीवघेणा हल्ला

कल्याण  : कल्याण पुर्वेतील  कोळसेवाडी परिसरात मोटारसायकलच्या हेडलाईटचा प्रकाश डोळ्यांत पडल्याच्या किरकोळ कारणावरून झालेला वाद हिंसक वळणावर गेला. तिघा तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना…

अभय मोकाशी शेवटपर्यंत लढत राहिले; ७० दिवस अन्न-पाण्याविना कर्करोगाशी झुंज

वडील बंधू संदेश मोकाशी यांनी कथन केली अंगावर शहारे आणणारी हकीकत मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ झुंझार पत्रकार अभय मोकाशी यांचे २ मे रोजी पोटाच्या कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ उत्तर…

 हसत खेळत निवृत्त झाले ‘खेळिराम’- अवकीरकर आणि मुंगेकर यांना दिला टपाल खात्याने निरोप

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतीय टपाल खात्याच्या बोरीवली पूर्व येथील कार्यालयात सुमारे ३५ वर्षे सेवा बजावणारे खेळिराम अवकीरकर आणि तीस वर्षे सेवा केलेले प्रसाद मुंगेकर हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त…

– आदिवासी पाड्यांवर भीषण पाणीटंचाई

 श्रमजीवी संघटनेचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा मिरा -भाईंदर : मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या मिरा -भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आदिवासी पाड्यांवर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ‘श्रमजीवी संघटने’च्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. मिरा -भाईंदर महापालिका क्षेत्रातील जीवित्त्व नगर, केसरी पाडा, शेंबाड पाडा, वाड्याचा पाडा, शक्ती नगर, चवलीपाडा, मरगळीपाडा आणि केळीचा पाडा या आदिवासी पाड्यांमधील नागरिक अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहेत. शुद्ध आणि मुबलक पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असतानाही, येथील नागरिकांना पाण्यासाठी मैलोन्‌मैल पायपीट करावी लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांना नाले आणि खड्ड्यांमधील दूषित पाणी पिऊन तहान भागवावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव संघटनेने निवेदनात मांडले आहे. केंद्र सरकारच्या ‘अमृत जल योजने’द्वारे प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून मीरा-भाईंदरमधील २१ आदिवासी गावांमधील नागरिकांनी ७५३ अर्ज सादर केले आहेत. मात्र, प्रशासनाकडून या अर्जांवर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यापूर्वीही अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप करत संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. संघटनेच्या प्रमुख मागण्या १. २१ आदिवासी पाड्यांमधील ७५३ अर्जदारांना तातडीने वैयक्तिक नळ कनेक्शन देण्यात यावे. २. ज्या आदिवासी पाड्यांवर तीव्र पाणीटंचाई आहे, तिथे तातडीने पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. प्रशासनाने या मागण्यांची तातडीने पूर्तता न केल्यास ‘श्रमजीवी संघटना’ तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

महिला स्वसंरक्षणाच्या उपक्रमाची मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार दखल

 भाजप नेते माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला विश्वास कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १३४ व्या भागाचे सामूहिक श्रवण रविवारी कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा परिसरात उत्साहात पार पडले. भाजप नगरसेविका हेमलता पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रतिष्ठीत सामाजिक संस्थांच्या प्रमुख, सामान्य नागरिक, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार आणि नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम झाल्यानंतर भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपला संकल्प व्यक्त केला. गेल्या वर्षीच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सुरू केलेल्या महिला स्वसंरक्षणाच्या लाठी-काठी प्रशिक्षण उपक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमध्ये दखल घेतील असा विश्वास यावेळी भाजप नेते नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमामध्ये विद्यार्थिनींचा सहभाग वाढवण्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व्यक्तींना केले. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांच्यासह प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय कल्याण केंद्राच्या प्रमुख अलका दीदी, श्री संत गजानन शेगांव भक्त मंडळ कल्याण विश्वस्त गणेश खैरनार, नितिन चौधरी, मयुरेश आगलावे, रवी गुप्ता, शत्रुघ्न भोईर, डॉ.सुनिल हरपाले, ॲड.समृद्ध ताडमारे, रोहीत लांबतुरे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संवादातून देशातील सकारात्मक बदल, सामाजिक उपक्रम, क्रीडा क्षेत्रातील यश तसेच पर्यावरण संवर्धन यावर भर दिला. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करत पारंपरिक भारतीय पेयांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. आंबा पन्हे, ताक, सोलकढी, कोकम सरबत यांसारखी पारंपरिक पेये शरीरासाठी फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.

मुरबाडकरांवर अन्याय, काँक्रीट रस्ता झाला, आता टोलचा भुर्दंड!

राजीव चंदने मुरबाड : सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू असलेले कल्याण-माळशेज राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ चे काँक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र रस्ता पूर्ण होताच या मार्गावर टोल वसुली सुरू होणार असल्याने मुरबाडकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या मार्गावर धावणाऱ्या एसटी बस, काळी-पिवळी टॅक्सी, व खाजगी खासगी चारचाकी वाहनांसह सर्वच वाहनांना टोल भरावा लागणार आहे. यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या सर्वच वाहनांचे भाडे वाढणार असून त्याचा थेट आर्थिक फटका सामान्य प्रवाशांना बसणार आहे लोकमित्र रमेश हिंदुराव यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. “वास्तविक रस्त्याच्या कामाचे संपूर्ण देयक ठेकेदाराला अदा करण्यात आलेले असताना पुन्हा जनतेकडून टोल वसूल करणे अन्यायकारक आहे. काँक्रीटचा रस्ता करून सामान्य जनतेचे हित नेमके काय साधले, हेच कळत नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “मुरबाड तालुक्यातील नागरिकांना या टोलमधून पूर्णपणे मुक्त करावे,” अशी ठाम मागणी रमेश हिंदुराव यांनी केली आहे. तसेच हा प्रश्न केवळ एका पक्षाचा नसून सर्वसामान्य जनतेचा आहे, त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येत या अन्यायाविरोधात लढा उभारावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. काँक्रीट रस्त्यामुळे प्रवास सुखकर होईल हे खरे, पण त्यासाठी रोजच्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असेल तर हा विकास कुणासाठी, असा प्रश्न आता मुरबाडकर विचारत आहेत.

डोंबिवलीतील रेल्वे ग्राऊंड वाचवण्यासाठी भाजप-शिवसेनेचे आंदोलन

आरती परब डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मुला-मुलींसाठी आणि खेळाडूंसाठी महत्त्वाचे मानले जाणारे रेल्वे ग्राऊंड वाचवण्यासाठी आज भाजप आणि शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून मैदानाच्या काही भागात बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत स्थानिक खेळाडू आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. डोंबिवली पश्चिमेतील मोठ्या मैदानांपैकी एक असलेल्या या रेल्वे ग्राऊंडवर दररोज शेकडो युवक-युवती विविध खेळांचा सराव करतात. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या प्रस्तावित बांधकामामुळे मैदानाची जागा कमी होऊन खेळाडूंना अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज रेल्वे मैदानात स्थानिक तरुण, खेळाडू आणि नागरिकांसह भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत मैदानावरील बांधकाम तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली. तसेच रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा होईपर्यंत कोणतेही काम सुरू करू नये, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. आंदोलनानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी बैठकीपर्यंत काम स्थगित ठेवण्याचे मान्य केल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. त्यामुळे डोंबिवलीतील खेळाडूंना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, नगरसेविका, विविध पदाधिकारी तसेच शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मैदानाच्या संरक्षणासाठी पुढील काळातही लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.