Category: ठाणे

Thane news

ठाण्यातील वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणारे आरएमसी प्लांट बंद करा – महेशसिंग ठाकूर

अनिल ठाणेकर ठाणे : वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या ठाणे शहरातील घोडबंदर महामार्गाच्या गायमुख परिसरासह इतर ठिकाणी असलेले आरएमसी प्लांट त्वरित बंद करण्यात यावेत, अशी मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव यांच्याकडे केली आहे. गेल्या काही कालावधीपासून ठाणे शहरातील वातावरण प्रदूषित झालेले असून, शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा मेट्रो प्रकल्प आणि ठिकठिकाणी सुरु असलेली निवासी प्रकल्पांची बांधकामे, यामुळे ठाण्याची हवा दुषित होऊन, हवेचा स्तर पूर्णपणे घसरलेला दिसून येत आहे. परिणामी, खोकला आणि दम्याच्या आजारात मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे आढळून येत आहे. मुंबईचे धाकटे भावंडं, अशी ठाणे शहराची ओळख गेल्या काही वर्षांत निर्माण झालेली असतानाच, ठाण्याचे नागरीकीकरणही तेवढ्याच प्रचंड प्रमाणात झालेले आहे. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या ही, वाढत्या वाहतूक कोंडीलादेखील कारणीभूत ठरत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे, आधीच वायुप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषणामुळे ठाणेकर नागरिक त्रासलेले असतानाच, सध्या ठाणे शहरात मोठ्याप्रमाणात सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे, एकेकाळी “तलावांचे शहर” अशी ओळख असणाऱ्या ठाण्याची ओळख आता, ‘प्रदूषित शहर’ अशी निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत ठाणे शहरातील हवेचा दर्जा पूर्णपणे घसरलेला असल्याचे, प्रसिद्धीमाध्यमांतील बातम्यांच्या माध्यमातून स्पष्ट झालेले आहे. गेल्या काही वर्षांत, घोडबंदर महामार्गालगत अनेक निवासी संकुले उभी राहिली आहेत आणि आजही मोठमोठ्या निवासी संकुलांची/प्रकल्पांची बांधकामे सुरु आहेत. वाघबीळ परिसरातील हिरानंदानी-मेडोज याठिकाणी, गेल्या काही दिवसांपासून एका मोठ्या प्रकल्पाचे खोदकाम सुरु असून, अनेक जेसीबी मशिन्सच्या माध्यमातून हे काम दिवस-रात्र सुरु असते. या खोदकामामुळे मोठ्याप्रमाणात धुरळा उडून, परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे. असे असतानाही, ठाणे शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, महापालिका प्रशासनाकडून याबाबत कोणतीही दाखल घेतली जात नाही. याच अनुषंगाने, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव-सदस्य अविनाश ढाकणे आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पत्र पाठविण्यात आले असून, वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या ठाणे शहरातील बांधकाम प्रकल्पांवर बंदी आणण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबईच्या हवेचा स्तर वाईट झालेला असल्याकारणाने, तसेच बोरीवली पूर्व आणि भायखळा या परिसरांतील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत गेल्याने, तेथील सर्व बांधकामे बंद करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे. ज्या विभागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक २००च्या वर जाईल, त्या विभागातील सर्वच बांधकामे बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांद्वारे स्पष्ट झालेले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर, ठाणे शहरातील वायुप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या किंवा ठरु पाहणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर कठोर निर्बंध लादण्यात यावेत. बांधकामांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी, सविस्तर मार्गदर्शक सुचना तयार करण्यात याव्यात, त्याचप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी नियमावलीचे योग्य पालन न झाल्यास, सरसकट सर्वच बांधकामे बंद करण्याचा कठोर निर्णय घेण्यात यावा. तसेच, ठाणे शहरातील घोडबंदर महामार्गाच्या गायमुख परिसरासह, इतर ठिकाणी असलेले आरएमसी प्लांट त्वरित बंद करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी महेशसिंग ठाकूर यांनी अविनाश ढाकणे आणि सौरव राव यांच्याकडे केली आहे. ०००००

 नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत

 नेरुळ विभागात पाडकामाची कारवाई   नवी मुंबई:  उच्च न्यायालयाचे वेळोवेळी आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे अतिरिक्त आयुक्त (2) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने नेरुळ विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागाअंतर्गत 1) श्री. श्रीमंत हजारे, एन.एल.-1 बी-16/15, से.10, नेरूळ, नवी मुंबई, 2) श्री. गंगाराम देशमुख, एन.एल.1 ए-6/4, से.10, नेरूळ, नवी मुंबई, यांचे सदर ठिकाणी प्रत्यक्ष पहाणी केली असता अंदाजे 3.50मी X 7.20मी मोजमापाचे G+4 आर. सी. सी. बांधकाम अनधिकृतरित्या करीत असल्याचे निदर्शनास आल्याने सदर अनधिकृत बांधकामधारकाला अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नेरुळ विभाग कार्यालयाकडून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये दि.10/12/2024 रोजी नोटीस बजावण्यात आलेली होती. तथापि, नोटीसीची मुदत संपुष्टात येऊनही अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविण्यात आले नाही. सदर कारवाई  सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. जयंत जावडेकर व अतिक्रमण विभागातील कर्मचारी, 10 मजूर, 2 गॅस कटर, 6 ब्रेकर च्या सहाय्याने अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक समवेत सुरक्षारक्षक यांच्या मार्फत करण्यात आली आहे. यापुढे देखील अशाप्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

ठाण्यातील ३९ बांधकाम व्यावसायिकांना बजावली कारणे दाखवा नोटीस

हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे पालन न केल्यास महापालिका देणार काम थांबवण्याचे आदेश ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाय केले जात आहेत. त्यानुसार, महापालिकेने धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एकूण २९७ बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या ३९ बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांनी नियमावलीचे तत्काळ पालन न केल्यास त्यांना तातडीने काम थांबण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचे पालन करण्याबाबत २९७ बांधकामांना प्राथमिक नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यापैकी, ३१ जणांनी सर्व नियमावलीचे पालन केले आहे. तर, १५१ जणांकडे काही त्रुटी आढळल्याने त्यांना त्यांना सुमारे चार लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आले आहे. तर, ३९ जणांनी नियमावलीची पूर्तता न केल्याने त्यांना बांधकाम का थांबवू नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या व्यावसायिकांकडून तातडीने पूर्तता न झाल्यास तत्काळ काम थांबवण्याचे आदेश काढावेत, असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी दिले आहेत. तसेच, सर्व २९७ बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी, असेही माळवी यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या उपाययोजनांचा आढावा बुधवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी घेतला. या आढावा बैठकीस, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त पद्मश्री बैनाडे, उपायुक्त सचिन सांगळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितील, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह महापालिकेचे सर्व सहाय्यक आयुक्त, मेट्रो, एमएसआरडीसी, परिवहन विभाग, पोलीस आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. हवा प्रदूषणाचा परिणाम सगळ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी महापालिकेच्या समन्वयाने मा. उच्च न्यायालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे, असे माळवी यांनी स्पष्ट केले. मेट्रो आणि एमएसआरडीसी यांनीही कामे करताना हरित जाळी लावून धूळ नियंत्रण करावे, असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत, हवा प्रदूषणाबाबत महापालिकेकडे प्राप्त झालेल्या विविध तक्रारींबाबत पर्यावरण विभागाने १,७०,००० रुपये दंडाची कारवाई केली असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, ठाण्यातील विकासकांद्वारे त्यांच्या प्रकल्पात, ५० ठिकाणी हवा प्रदूषण मोजणीचे यंत्र बसविण्यात आले आहे. त्याची सातत्याने पाहणी पर्यावरण विभागामार्फत केली जात आहे. इतर व्यावसायिकांनीही ही यंत्रणा ताबडतोब बसवावी. त्याबाबत हयगय झाल्यास कारवाई करावी, असेही माळवी यांनी स्पष्ट केले. पालापाचोळा जाळणाऱ्यांवर कारवाई ठाणे महापालिका क्षेत्रात उघड्यावर पालापाचोळा, कचरा, प्लास्टिक जाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याची काटेकोर अमलबजावणी करण्यात येत आहे. आतापर्यंत त्याबाबतच्या ०९ तक्रारी प्राप्त झाल्या असून घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे पाहणी करून २० हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली.  तसेच, हॉटेल्स, तंदूर, रेस्टॉरंट, बेकरी येथे जळाऊ लाकूड वापरण्याबाबत बंदी घालण्यात आली आहे. तोडफोड कचऱ्याची विल्हेवाट ठाणे महापालिकेचा बांधकाम व तोडफोड कचरा विल्हेवाट प्रकल्प ३०० टन क्षमतेचा आहे. या प्रकल्पात मार्च २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या काळात ७४१४ टन तोडफोड कचऱ्याचे संकलन आणि पुनर्वापर करण्यात आले आहे. त्याचबरोबर, सर्व बांधकाम विकासक आणि ठेकेदार यांनी जीपीएस यंत्रणा असलेल्या वाहनांमधूनच डेब्रिज वाहतूक करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ५९०९ वाहनांवर कारवाई ठाणे महापालिकेतर्फे प्रादेशिक परिवहन विभागाशी समन्वय साधून आनंद नगर चेक नाका व दहिसर चेक नाका येथे डेब्रिज वाहतूक करणाऱ्या व ताडपत्री नसलेल्या एकूण ५९०९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, पीयूसी नसलेल्या ४००८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. डेब्रिजची विल्हेवाट लावण्यात येणाऱ्या स्थळाचा वाहतूक पास असल्याशिवाय अशा वाहनांना ठाणे महापालिका हद्दीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक व इमेल हवा प्रजूषण नियंत्रणाबदद्लच्या तक्रारी करण्यासाठी ८६५७८८७१०१ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर, pcctmc.ho@gmail.com या इमेलवरही तक्रार नोंदवता येईल.

महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय-राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय असून हे देशातील आदर्श पोलीस दल असल्याचे प्रतिपादन राज्यपाल राधाकृष्णन…

‘एकनाथ हिरक आरोग्यवर्षा’साठी शिवसेना वैद्यकीय कक्ष सज्ज

सिध्देश शिगवण ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साठाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘शिवसेना वैद्यकीय मदत’ कक्षाच्या वतीने हे संपूर्ण वर्षे ‘एकनाथ हिरक आरोग्यवर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे. परंपरेनुसा ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री एकनाथ शिंदे यांनी…

 ह्युमॅनिटी स्टील लाईव्हच्या मार्फत अनोखा थर्टी फर्स्ट साजरा

गोरगरीब गरजूंना केले जेवण व ब्लँकेट वाटप   कल्याण :  ह्युमॅनिटी स्टील लाईव्ह च्या मार्फत तेजस सांगळे व त्यांचे सहकारी मुकुल सोनटक्के, आदित्य लासुरे, सुधीर शेट्टी, शुभम शुक्ला, श्रीराम अय्यर व अन्य सहकारी यांच्या मार्फत थर्टी फर्स्ट च्या पार्ट्या झुगारत गोरगरीब गरजूंना मोफत जेवण व ब्लँकेट वाटप करण्यात आले. हा उपक्रम गेले पंधरा वर्षे झाले करण्यात येत आहे.  सरत्या वर्षाला 2024 ला गुड बाय करत 2025 मध्ये वेलकम करत कोणत्यातरी गोरगरिबांचे एक दिवसाचा पोट भरून व त्यांच्या अंगावर वस्त्र देण्यात आले. आपल्याला देवाने अन्न वस्त्र निवारा या सर्व गोष्टी दिल्या आहेत. तरीही आपण आपल्यापासून वंचित असलेल्या लोकांना या सर्व गोष्टी पुरवाव्यात आणि पुढच्या वर्षी या उपक्रमाला कल्याणातल्या नागरिकांनी भरभरून  प्रतिसाद द्यावा अशी प्रतिक्रिया तेजस सांगळे यांनी दिली. ०००००

महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन

पुणे : पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील वेहेरगाव-कार्ला नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असे हे देवीचे जागृत देवस्थान मानले…

दिवाळी अंकांचे भव्य प्रदर्शन संपन्न!

ठाणे : मराठी वृत्तपत्र लेखक संघ आणि स्वराज्य सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकांचे विनामूल्य प्रदर्शन ठाणे पूर्व येथील महापालिकेचे खुले कलादालनात संपन्न झाले. प्रदर्शनाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव मंडलिक यांनी हस्ते केले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक सावंत हे आवर्जून उपस्थित होते. प्रदर्शनात महाराष्ट्रातून विविधांगी सुमारे २५० हून अधिक दिवाळी अंक प्रदर्शनात मांडण्यात आले होते. दिवाळीअंक वाचकांची याप्रसंगी लक्षणीय उपस्थिती होती. निशिकांत महांकाळ, विनोद भोईर, हेमंत आळवे, विनोद ठाणेकर आदी मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक मनोहर चव्हाण यांनी प्रास्ताविकातून दिवाळी अंकांची माहिती व महती सांगून संस्था हा उपक्रम अनेक वर्ष एक सामाजिक बांधिलकी आणि महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक लोकांना निदान एकाच ठिकाणी चाळता  यावेत, हाताळता यावेत यासाठी संस्था हा उपक्रम अनेक वर्ष राबवीत आहे असे प्रतिपादन केले. स्वराज सामाजिक सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.

 कर्णबधिर मुलेही गिरवू लागली ए.आय.चे धडे !

देशातील पहिलाच प्रयोग दापोलीत; अद्ययावत लॅबची उभारणी     ठाणे : नियतीने केलेल्या अन्यायामुळे बोलता आणि कानाने ऐकता न येणार्‍या मुलांसाठी आज अनेक संस्था धडपडत आहेत. या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. शिकून हिच मुले स्वत:च्या पायावर उभी राहिली पाहिजेत म्हणून काही संस्था, व्यक्तींचे काम सुरू आहे. भारतातील पहिली कर्णबधीर मुलांसाठीची ‘ए.आय. आणि रोबोटिक्स’ लॅब स्थापन झाली आहे. दापोली येथील इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयातील 30 कर्णबधिर विद्यार्थी ए.आय. (कृत्रीम प्रज्ञा) आणि रोबोटिक्सचे धडे घेऊ लागले आहेत. स्काय रोबोटिक्स पुणे यांच्या माध्यमातून भारतातील ही पहिली कर्णबधिर मुलांसाठीची लॅब निर्माण करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. स्काय रोबोट़िक्सचे संचालक अभिजीत सहस्त्रबुद्धे व कृष्णमूर्ती बुक्का यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. दापोली या ठिकाणी इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयात तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना ही मोठी उपलब्धी झाली आहे. आज अनेक मोठ्या शाळांमध्ये देखील ए. आय. आणि रोबोटिक्सचे शिक्षण मिळत नाही. मात्र, या संस्थेने बोलता आणि ऐकता न येणार्‍या या मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी हे शिक्षण सुरू केले आहे. त्यासाठी अद्ययावत लॅब तयार करण्यात आली असून आवश्यक संगणक, अभ्यासक्रमाचे सर्व साहित्य उपलब्ध केले आहे. या शाळेतील शिक्षिका श्रद्धा गोविलकर या विद्यार्थ्यांना ए.आय. आणि रोबोटिक्सचे धडे देत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी स्वत: पुणे येथे जाऊन प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना ए.आय. व रोबोटिक्सचे धडे देत आहेत. या कर्णबधिर विद्यालयात दहावीपर्यंतचे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांमधील सर्जनशिलता, नवकल्पना आणि तांत्रिक कौशल्यांना वाव देण्यासाठी स्काय रोबोटिक्सने कर्णबधिर विद्यार्थ्यांना हे व्यासपीठ मिळवून दिले आहे. या मुलांना एकविसाव्या शतकातील कौशल्यांच्या विकासासाठी प्रेरित करावे, त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन व्हावे या हेतूने या ठिकाणी ही सुविधा मोफत देण्यात आली आहे. येथील मूकबधिर विद्यार्थी आता ए.आय. व रोबोटिक्सचे धडे घेत असून त्यांनी कोडिंगचे शिक्षण देखील पूर्ण केले आहे. या पुढच्या काळात अ‍ॅप डेव्हलपिंग, गेमिंग असे अभ्यासक्रम देखील त्यांना शिकविले जाणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नव्याने प्रकाश निर्माण होणार आहे. दापोली येथील डॉ. गंगाधर विनायक काणे यांनी 1984 मध्ये स्नेहदीप संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या अंतर्गत इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय हे गेली अनेक वर्षे सुरू आहे. या विद्यालयातून आजपर्यंत 280 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊन गेले आहेत. कर्णबधिर असूनही यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी स्वत:चे उद्योग व स्वयंरोजगार सुरू केला आहे. या विद्यालयात कर्णबधिरांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा अद्ययावत आहेत. साऊंड प्रूफ रूम, ऑडिओ मीटर, डॉक्टर स्पीच, समूह श्रवण यंत्र या शिवाय आता संगणक लॅब देखील अद्ययावत झाली आहे. कोट स्नेहदीप़ संस्थेच्या अध्यक्ष म्हणून स्मिता सुर्वे या कार्यरत आहेत तर कर्णबधिर विद्यालयाचे अध्यक्ष म्हणून दीपक हर्डीकर हे यशस्वीपणे काम करीत आहेत. नव्या ए.आय. व रोबोटिक्स लॅब संदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, आमच्या शाळेतील विद्यार्थी खरेतर नशिबवान आहेत. आज अनेक चांगल्या प्राथमिक, माध्यमिक आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेतदेखील ए.आय. आणि रोबोटिक्सची लॅब नाही. मात्र, आमच्या कर्णबधिर मुलांना हे शिक्षण घेण्याचे भाग्य मिळाले आहे. ही मुले सामान्य मुलांपेक्षा कुशाग्र बुद्धीमत्तेची असतात. त्यांना आता ए.आय. आणि रोबोटिक्सची आवड लागली आहे. डॉ. दीपक हर्डीकर, दापोली ०००००

 जिद्द आणि चिकाटीच्या जीवावर कुणाल खरात सीए परीक्षेत उत्तीर्ण

 पनवेलमधील कुणाल प्रमिला सिद्धार्थ खरात याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव   राज भंडारी पनवेल : लहानपणापासूनच एखादी जिद्द आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत कशी पोहोचवू शकते, याचे द्योतक उदाहरणं म्हणजे नवीन पनवेल येथील कुणाल प्रमिला सिद्धार्थ खरात. कुणाल याने आपल्या जिद्दीच्या जोरावर चार्टर्ड अकाउंटंट्सच्या (सीए) नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होत यश संपादन केलं आहे. त्याच्या या यशानंतर परिसरातील नागरिकांनी कुणाल याला भेटून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कुणालचे पिता सिद्धार्थ खरात हे वरळी येथील बीडीडी चाळीमध्ये राहत होते. ते पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल कार शेडमध्ये शासकीय सेवेत होते. सन 1994 साली ते पनवेलमध्ये राहण्यास आले. त्यांना एकूण 3 मुलगे आहेत. मोठा शशांक आणि त्याच्या पाठीमागे कुणाल आणि मृणाल ही जुळी भावंडे असा त्यांचा परिवार. कुणाल आणि मृणालचा जन्म सन 1998 साली पनवेलमध्येच झाला. लहानपणापासूनच अतिशय हुशार असणारा कुणाल हा नक्कीच उच्च स्थानी जाईल असा विश्वास घरातील सर्वांनाच होता. सुरुवातीचे शिक्षण हे नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर येथून सुरु केले आणि दहावीपर्यंत कुणाल एकाच शाळेत शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी त्याने पोतदार महाविद्यालयात प्रवेश घेतला. कुणाल याला लहानपणापासूनच सीए बनण्याची इच्छा होती. तशी इच्छा त्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांना सांगितली होती. घरातील संस्कार आणि कुणालची जिद्द त्याला सीए च्या पदापर्यंत जाण्यासाठी कारणीभूत ठरली. कुणालने आपली जिद्द खरी करण्यासाठी त्याने आपल्या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानच सीएच्या अभ्यासक्रमाची तयारी सुरु केली होती. पदवीपर्यंतच्या शिक्षणामध्ये तो साईटीची परीक्षा देऊन उत्तीर्ण देखील झाला. यानंतर त्याने पोतदार महाविद्यालयातील आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आणि 3 वर्षांसाठी नवीन पनवेल येथील जैन अँड सन्स या फर्ममध्ये त्याने प्रशिक्षण (एंटरशिप) घेतले. नुकत्याच पार पडलेल्या सीएच्या परीक्षेत त्यांनी प्रयत्न केले. परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत सीएच्या परीक्षेतील आपल्या सहाव्या प्रयत्नाचे सातत्य राखत त्याने यश संपादित करून तो उत्तीर्ण झाला. कुणालच्या या यशामध्ये त्याचे आई – वडील, भाऊ, मित्र परिवार, तसेच प्रशिक्षण घेत असलेल्या जैन अँड सन्स मधील सहकाऱ्यांचा मोठा हातभार लागला असल्याचे त्याने बोलताना सांगितले. कुणालच्या या नेत्रदिपक यशानंतर त्याच्यावर नातेवाईक, मित्र परिवारासह पनवेलमधील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. ००००००