Category: ठाणे

Thane news

भरदिवसा घराचे कुलूप तोडून लाखोंची चोरी

कल्याण: भरदिवसा घर फोडून चोरीची मोठी घटना डोंबिवली पूर्व परिसरात उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे…

 कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी रिक्षा स्टँडवर चालकांकडून दादागिरी

अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आश्वासन कल्याण :  कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी रिक्षा स्टँडवर रिक्षाचालकांची मनमानी आणि दादागिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. स्टँडच्या आजूबाजूला येणारे दुचाकी चालक आणि खासगी वाहनातून येणाऱ्या प्रवाशासबोत स्टँन्डमधील रिक्क्षा चालक गैरवर्तन करतात, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक रात्रीच्या वेळी स्काय वाँक वरून येणाऱ्या प्रवाशांचे कुटुंबातील सदस्य त्यांना घेण्यासाठी रिक्क्षा स्टँन्ड परिसरात आपल्या वाहनासह थांबतात. रिक्षाचालक  तेथे वाहने उभी करण्यास नकार देतात. रिक्षा स्टँडला आपली मालमत्ता समजून रिक्षाचालक सामान्य नागरिकांना तेथे वाहनासह थांबण्यास मज्जाव करत असल्याचा आरोप केला जात आहे. शनिवारी रात्री  येथील एका स्थानिक नागरिकाशी रिक्क्षा चालकांनी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. शरद शिंदे नावाचा व्यक्ती आपल्या मुलीला घेण्यासाठी स्कायवॉकजवळ पोहोचला असता, काही रिक्षाचालकांनी त्यांना तेथे थांबवण्यापासून रोखले आणि वाद सुरू झाला, शिंदे यांनी स्पष्टीकरण देऊनही रिक्षा चालक संतापला आणि त्याने दादागिरी केली असल्याचा प्रकार समोर आला. स्टँडवर प्रवाशांकडून जास्त भाडे आकारले जाते आणि चौथ्या राईडच्या नावाखाली लोकांना बराच वेळ ताटकळत बसवले जाते असा आरोप स्थानिकांनी केला आहे. एवढेच नाही तर वाहनचालक गणवेशाचे नियमही पाळत नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी शरद शिंदे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे, वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. अशा वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी वाहतूक विभाग आणि आरटीओकडे केली आहे.

केडीएमसी स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड

केडीएमसी स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड महिला बालकल्याण समितीसाठी सारिका जाधव, शिक्षण मंडळासाठी भाजपाचे अभिजित थरवळ यांची निवड कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असून स्थायी समिती सभापती पदी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्याच नगरसेविका सारिका जाधव  आणि शिक्षण मंडळ सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक अभिजीत थरवळ यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. या उमेदवारांनी 2 एप्रिलला आपली नामनिर्देशन पत्रे महापालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे दाखल केली होती. केडीएमसी मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आज या तिन्ही सभापती पदांसाठी निवडणूक अधिकारी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या तिन्ही पदांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या तिघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, आमदार राजेश मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह शिवसेना भाजपाचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र खो-खोला नवी दिशा! २०२६-२७ साठी निवड समितीची दमदार घोषणा!

अनुभवी तज्ज्ञांवर निवडीची जबाबदारी पुणे : “उत्कृष्टतेची निवड, विजयाची पायाभरणी!” या ब्रीदवाक्यासह महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनने २०२६-२७ हंगामासाठी निवड समिती व राष्ट्रीय संघ प्रशिक्षकांची भव्य घोषणा करत क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह निर्माण केला आहे. राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धांसाठी अनुभवी आणि कसलेल्या तज्ज्ञांवर जबाबदारी सोपवण्यात आल्याने आगामी स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा दबदबा कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. निवड प्रक्रियेचा पाया: अनुभवी हातात सूत्रे! या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव यांनी पुणे येथे पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत केली. यावेळी कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. विविध वयोगटांतील खेळाडूंची निवड, त्यांचे मार्गदर्शन आणि राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघांची उभारणी यासाठी या समित्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्य निवड समिती: पुरुष व महिला गटासाठी दिग्गज सज्ज! पुरुष व महिला गटासाठी निवड समितीत अनुभवी सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत सोमनाथ स्वामी (सांगली), तुषार मोरे (मुंबई उपनगर), रविराज परामने (ठाणे) आणि रत्नराणी कोळी (लातूर) यांचा समावेश असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्वोत्तम खेळाडूंची निवड होणार आहे. कुमार व मुली गट: नवोदित प्रतिभेला संधी! कुमार व मुली गटासाठी निवड समितीत श्रीरंग बनसोडे (सोलापूर), विशाल पाटील (जळगाव), यतीश आक्रे (पालघर) आणि नंदिनी धुमाळ (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमार्फत उदयोन्मुख खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळणार असून, राज्यासाठी नवी प्रतिभा घडवली जाणार आहे. किशोर – किशोरी गट: भविष्यातील स्टार्सची निवड! किशोर व किशोरी गटासाठी अमोल चव्हाण (जालना), पंकज चवंडे (रत्नागिरी), रमेश लव्हाट (अहिल्यानगर) आणि तृप्ती गाडगीळ अग्रवाल (पुणे) यांची निवड समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. या गटातील खेळाडूंमध्ये असलेली ऊर्जा आणि क्षमता योग्य दिशेने विकसित करण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भविष्यासाठी भक्कम पायाभरणी: महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर! “योग्य निवड, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत” या त्रिसूत्रीवर आधारित ही निवड प्रक्रिया महाराष्ट्राच्या खो-खो संघांना अधिक सक्षम बनवणार आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचा झेंडा उंचावण्यासाठी ही समिती निर्णायक भूमिका बजावेल, अशी खात्री व्यक्त केली जात आहे. एकंदरीत, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनने घेतलेला हा निर्णय म्हणजे केवळ निवड नव्हे, तर ‘विजयाच्या नव्या पर्वाची’ दमदार सुरुवात आहे!

 डोंबिवली पश्चिमेतही नव्याने होणार दुय्यम निबंधक कार्यालय

डोंबिवली पश्चिमेतही नव्याने होणार दुय्यम निबंधक कार्यालय रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा कल्याण : शहरात पश्चिमेकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली दुय्यम प्रबंधक कार्यालयाची मागणी लवकरच मार्गी लागणार असून त्यासंदर्भात शासन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र शासन पुणे यांनी डोंबिवलीत पश्चिमेलाही ती सुविधा देण्यास हिरवा कंदील दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी त्यासंदर्भात माहिती देतांना सांगितले की, यासंदर्भात पश्चिमेला स्वतंत्र शिधावाटप केंद्राप्रमाणेच ही सुविधा देखील असावी यासाठी पाठपुरावा केला होता, त्या सुविधेमुळे आपल्या पंच क्रोशीतील नागरिकांची गैरसॊय दूर होणार आहे. पूर्वेकडील यंत्रणेवर पडणारा ताण देखील कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर्वेला ती सुविधा आहेच, पण आता वाढत्या शहरीकरणामुळे ती सुविधा आता पश्चिमेलाही सुरू होणार आहे. त्यामुळे त्या विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. शासनाच्या महसूल व वन विभागाने १ एप्रिल रोजी त्यासंदर्भात शासन आदेश काढले असून डोंबिवली पश्चिमेला ती सुविधा असेल असेही शासन आदेशात म्हंटले आहे. त्या विभागाच्या कार्यासन अधिकारी प्राची पालव यांनी ते आदेश दिले असल्याचे आदेशावरून स्पष्ट झाले. नागरिकांची अनेक वर्षांची मागणी होती, त्याबाबत अलीकडे महसूल विभाग आणि शासनाला पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला, त्यानुसार मागणीला यश आले असून लवकरच पश्चिमेलाही दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होईल असे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

मुख्यमंत्री रोजगार योजनेत १११% उद्दिष्टपूर्ती ,१६ हजार युवकांना रोजगार

मुख्यमंत्री रोजगार योजनेत १११% उद्दिष्टपूर्ती ,१६ हजार युवकांना रोजगार कोकण विभागाची उल्लेखनीय कामगिरी नवी मुंबई : (अशोक गायकवाड )—महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत कोकण विभागाने यंदा उल्लेखनीय कामगिरी करत १११.५७ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे. या योजनेअंतर्गत एकूण ३ हजार ७४९ उद्योजकांना कर्ज मंजूर करण्यात आले असून, त्यातून सुमारे १६ हजारांहून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. चालू आर्थिक वर्षात कोकण विभागाला ४,४५२ प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी जिल्हा उद्योग केंद्र यंत्रणेसाठी २,६७१ तर खादी व ग्रामोद्योग मंडळासाठी १,७८१ प्रकरणांचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात मात्र ३,७४९ कर्जप्रकरणे मंजूर झाली असून, यात सुमारे ८४ कोटी रुपयांच्या अनुदानाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कोकण विभागाने सलग तिसऱ्यांदा १०० टक्क्यांहून अधिक उद्दिष्टपूर्ती करत आपली आघाडी कायम राखली आहे. जिल्हानिहाय कामगिरीत रत्नागिरी जिल्ह्याने १३०.६४ टक्के उद्दिष्टपूर्ती करून अव्वल स्थान पटकावले आहे. त्याखालोखाल रायगड जिल्ह्याने १००.५० टक्के, सिंधुदुर्गने १२३.३३ टक्के आणि पालघरने १०३.३० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ठाणे जिल्ह्यानेही ६१.६५ टक्के कामगिरी नोंदवत विभागाच्या एकूण यशात आपला सहभाग नोंदविला आहे. मंजूर प्रकल्पांमध्ये ९१४ उत्पादन क्षेत्रातील तर २ हजार ८३५ सेवा क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश असून, यातील सुमारे ५० टक्के लाभार्थी महिला व मागासवर्गीय घटकांतील आहेत. यामुळे सामाजिक समावेशकतेलाही चालना मिळाली आहे. अनुदान वितरणात कोकण विभागाने ९३५ प्रकरणांद्वारे (२१ टक्के) राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्याने ७३.७२ टक्के मार्जिन मनी दावे सादर करून विशेष कामगिरी बजावली आहे. या यशामागे विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह यांचे नेतृत्व तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर व ठाणे येथील जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. उद्योग सहसंचालक विजू सिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उद्योग केंद्रांचे अधिकारी, बँक अधिकारी आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व सुलभ व्हावी यासाठी mah-cmegp.gov.in हे ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अधिकाधिक युवकांनी पुढे येऊन उद्योग उभारावेत आणि स्वावलंबी व्हावे, असे आवाहन उद्योग सहसंचालकांनी केले आहे. दरम्यान, कोकण विभागाने विविध उद्योग प्रोत्साहन उपक्रम, निर्यात परिषद, ‘महाराष्ट्र इग्नाईट’, ‘एक्सपोर्ट कॉन्क्लेव्ह’ आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून युवकांना उद्योगक्षेत्राकडे वळविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

शहापूरच्या माळरानावर ग्रह-नक्षत्रांची फुले फुलली

शहापूरच्या माळरानावर ग्रह-नक्षत्रांची फुले फुलली  ठाणे जिल्ह्यातील पहिल्या तारांगणाचे शहापूरला उद्घाटन ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण आणि अत्याधुनिक दुर्बिणीने सुसज्ज वेधशाळा शहापूर येथे उभारण्यात आली असून, खगोलप्रेमींसाठी हा एक मोठा आकर्षणबिंदू…

फेरीवाल्यांकडून ८० रुपयांवरून थेट २४० रुपये आकारल्याने संताप

फेरीवाल्यांकडून ८० रुपयांवरून थेट २४० रुपये आकारल्याने संताप भाजप नगरसेविका नीला सोन्स यांचा महानगरपालिका आणि ठेकेदारंविरुद्ध एल्गार मिरा – भाईंदर / अरविंद जोशी मीरा-भयंदर महानगरपालिका अधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचा कट रचत असल्याचा एक गंभीर प्रकरण समोर आला आहे. महानगरपालिकेने उभारलेल्या मंगलनगर आणि रामदेव पार्क येथील भाजी मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. आतापर्यंत फेरीवाल्यांकडून प्रतिदिन ८० रुपये आकारले जात होते, परंतु महानगरपालिकेने त्यात थेट १५० टक्क्यांनी वाढ करून २४० रुपये केले आहेत. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे फेरीवाल्यांमध्ये मोठी चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. फेरीवाल्यांनी या निर्णयाचा निषेध करत महानगरपालिकेला एक निवेदन सादर केले होते, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्यांना नोटीस दिली आहे की, जर त्यांनी २४० रुपयांनुसार रक्कम भरली नाही, तर त्यांना जागा खाली करावी लागेल. भाजप नगरसेविका नीला सोन्स या संपूर्ण प्रकरणात फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. काल, मंगलनगर भाजी मार्केटमध्ये पोहोचलेल्या फेरीवाल्यांनी त्यांना घेराव घातला आणि आपल्या समस्या मांडल्या. नीला सोन्स म्हणाल्या की, मार्केट बांधताना बांधकामाचा खर्च भागवण्यासाठी कंत्राटदाराने ८० रुपये घेणे अपेक्षित होते, पण आता अतिरिक्त वसुली केली जात आहे. त्यांनी असा आरोप केला की, गेल्या दोन वर्षांपासून घेतलेल्या रकमेची कोणतीही पावती फेरीवाल्यांना देण्यात आलेली नाही, त्यामुळे पैशांच्या हिशोबावर शंका आहे. त्या पुढे म्हणाल्या की, वसुलीतून १०० रुपये नगरपालिकेला आणि १४० रुपये कंत्राटदाराला दिले जातील. मंगलनगर मार्केटमध्ये सुमारे १८० फेरीवाले आहेत, ज्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले जातात. नीला सोन्स यांनी सुचवले की, या डिजिटल युगात नगरपालिकेने थेट ऑनलाइन वसुली करावी आणि मधला कंत्राटदार काढून टाकावा, जेणेकरून फेरीवाल्यांना दिलासा मिळेल.

काळीजादू / जादूटोणा केल्याच्या संशयातून अपहरण करणाऱ्यांना अटक

काळीजादू / जादूटोणा केल्याच्या संशयातून अपहरण करणाऱ्यांना अटक मिरा भाईंदर:- जादूटोणा केल्याच्या  गैरसमजातून  ६२ वर्षीय व्यक्तिचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करणाऱ्याना दोन जणांना नवघर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे  भाईंदर पूर्वच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात भाईंदर पूर्व परिसरात राहणाऱ्या ६२ वर्षीय सोलंकी नामक व्यक्ती यांचे पाच जणांनी आपल्या ओळखीच्या व्यक्तीवर काळी जादू केल्याच्या संशयातून त्याचे अपहरण केले होते. पोलीसांनी दिलेल्या माहितनुसार सोलंकी यांना एका चारचाकी गाडीत बसवून त्यांना गाडी मध्ये अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकत, चाकूने देखील त्यांच्या शरीरावर जखम करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वर येथे सोडून देत आरोपींनी पळ काढला होता. त्यानंतर सोलंकी यांनी ओला गाडी बुक करत भाईंदरला येत नवघर पोलिसांकडे मदती करता धाव घेत घडलेली सर्व घटना सांगितली. त्यांनतर पोलीसांनी त्यांना उपचाराकरता रुग्णालयात पाठवत अपहरण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला होता. नवघर पोलिसांनी माहितीच्या आधारे आरोपींच्या शोध घेण्यास सुरुवात केली असता  आरोपी काशिमीरा परिसरात लपल्याची गुप्त माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी त्या ठिकाणी जात, सापळा रचत लपून बसलेल्या आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी एकूण चार जणांना ताब्यात घेतले असून एकाचा शोध अजून सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन जण पोलीस रेकॉर्डरच्या आरोपी असून त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी  दिलेली आहे तर  दोन जणांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

घरे नाहीत, भाडेही नाही; विकासकावर होणार कारवाई – संजय केळकर

घरे नाहीत, भाडेही नाही; विकासकावर होणार कारवाई – संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे: गेली दहा वर्षे रहिवाशांना हक्काची घरे आणि नियमित भाडे देण्यास असमर्थ ठरलेल्या कोपरी येथील विकासकावर कारवाई करण्याचे एसआरए विभागाने मान्य केले आहे. आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता तसेच एसआरए कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता. यावेळी माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, नगरसेवक दीपक जाधव, सुरेश कांबळे, राजेश गाडे, विशाल वाघ, उपस्थित होते. ठाणे पूर्वेत कोपरी येथे एसआरए प्रकल्प सुरू असून गेली दहा वर्षे येथील रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरे मिळालेली नाहीत, शिवाय सुमारे पाच कोटी रुपयांचे भाडेही विकासकाने थकवले आहे. विशेष म्हणजे विकासकाने सेल इमारतीमधील घरांची विक्रीही सुरू केली असून रहिवाशांना हक्काची घरे देण्यास टाळाटाळ करत आहे. या प्रकरणी केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. अखेर चार दिवसांत विकासकावर कारवाई न झाल्यास रहिवाशांचा मोर्चा एसआरए कार्यालयावर नेण्याचा इशारा  केळकर यांनी दिला. त्यामुळे विभागाच्या सीईओंनी विकासकावर कारवाई करण्याचे मान्य केल्याची माहिती केळकर यांनी दिली. ठाण्यात बाधितांना रेंटल इमारतीत तात्पुरती घरे देण्यात आली असून या घरांची दुरवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षे त्यांना बीएसयूपी योजनेत हक्काची घरे मिळालेली नसून आता रेंटल इमारतीतील घरेही खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. हा रहिवाशांवर अन्याय आहे. त्यामुळे किती कुटुंबे बाधित झालेली असून किती जणांना घरे मिळालेली आहेत, महापालिकेकडे किती घरे उपलब्ध असून किती जण प्रतीक्षा यादीत आहेत याचा एकत्रित आराखडा करण्याची गरज असून लवकरच याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली.जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात मुंबईतील आदर्श स्टॉलधारक संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. ब्रिटिशकालीन हजारो स्टॉल धारकांना फेरीवाला ठरवणारा अन्यायकारक निर्णय महापालिकेने घेतला असून हजारो कुटुंबे रस्त्यावर येण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबाबत आमदार केळकर यांनी सातत्याने महापालिकेशी पाठपुरावा करून अधिवेशनातही त्यांची बाजू मांडली. येत्या गुरुवारी मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहितीही केळकर यांनी दिली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही गेली दहा वर्षे विकासकाने रहिवाशांना घरे दिली नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली असून याबाबतही पाठपुरावा करणार असल्याचे केळकर म्हणाले. या कार्यक्रमात फायनान्स कंपन्यांनी केलेली फसवणूक आणि इतर अनेक समस्यांबाबत सुमारे ७०० लोकांनी उपस्थित राहून केळकर यांच्याकडे निवेदने दिली.