Category: ठाणे

Thane news

सुखटणकर सावित्री मोहन यांना राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कास्य पदक

मंडगाव, गोवा येथे सुरू असलेल्या  ४८वी भारतीय मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन २0२५-२६ स्पर्धेत  ६५ वर्षावरील मिश्र दुहेरी गटात  दिलीप सुखटणकर व सावित्री मोहन यांना “” कास्य पदक “” मिळाले.  त्यांनी उपउपांत्य फेरीत मणके राम चौधरी…

युवा कुस्तीपटू सुरज मानेला रौप्य

ठाणे : पुण्यात ,वाघोली येथे संपन्न झालेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील पैलवान व क्रांतीअग्रणी जी.डि…

किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर

किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर उल्हासनगर : उल्हासनगर आगरी सेना ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय विठ्ठलजी तुकाराम जोशी यांच्या सातवे पुण्यस्मरण दिनानिमित्त ठाणे जिल्हा आगरी सेना नेते विजय जोशी यांनी किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते आयोजित करण्यात आलेले या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मोतीबिंदू निदान, व निवडक रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया ठेवण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. हा कार्यक्रम माणेरेगाव येथील सोमेश्वर पॅलेस या ठिकाणी शुक्रवारी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. तसेच ह. भ. प राजेश महाराज देसाई यांचे कीर्तन व प्रवचन ठेवण्यात आले होते. नागरिकांनी कीर्तन व प्रवचनला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती भाजप जिल्हा प्रमुख नंदू परब , शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी, नगरसेवक महेशजी पाटील, निलेशजी शिंदे, नवीनजी गवळी, आगरी सेना कार्यअध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी ठाणकर, संघर्ष समितीचे सुमित वजे, संजय फुलोरे ,नगरसेविका पूजा गायकवाड, कविता म्हात्रे , सरोज रॉय, इंदिरा तरे, हेमलता पावशे आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती उल्हासनगर आगरी सेना तालुकाप्रमुख जितेंद्र जोशी यांनी दिली.

साबेगाव खाडी परिसरात विसर्जन व दशक्रिया घाटासाठी पाठपुरावा सुरू

साबेगाव खाडी परिसरात विसर्जन व दशक्रिया घाटासाठी पाठपुरावा सुरू खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना नगरसेविका अर्चना पाटील यांच्याकडून निवेदन आरती परब दिवा: साबेगाव खाडी परिसरात दिवा शहरासाठी स्वतंत्र व भव्य गणेश विसर्जन घाट तसेच दशक्रिया विधीसाठी घाट उभारण्याची मागणी पुढे आली असून, यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांची नगरसेविका अर्चना पाटील यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रस्तावासाठी महाराष्ट्र सागरी महामंडळ यांची परवानगी मिळविण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. दिवा शहरातील वाढती लोकवस्ती आणि मोठ्या सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सध्या शहराबाहेर जावे लागत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शहरातच योग्य व सुरक्षित विसर्जन व्यवस्था उभी करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी या प्रकल्पाची सविस्तर संकल्पना खासदारांना समजावून सांगितली. या संकल्पनेचे कौतुक करत “ही चांगली आणि उपयुक्त योजना आहे,” असे मत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. संबंधित विभागाला याबाबत पत्र पाठवून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. माजी उपमहापौर तथा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या सूचनेनुसार या कामाचा पाठपुरावा सुरू असल्याचे नगरसेविका अर्चना पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील आणि विभाग प्रमुख नीलेश पाटील हेही उपस्थित होते. या प्रस्तावित घाटामुळे दिवा शहरातील नागरिकांना गणेश विसर्जन व दशक्रिया विधींसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि स्थानिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

२९ मार्चला ठाण्यात ३० वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

२९ मार्चला ठाण्यात ३० वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा ठाणे- ठाणे जिल्हा धनगर समाज उन्नती मंडळ, ठाणे यांच्या वतीने तिसावा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवार, २९ मार्च , दुपारी ४.०० ते ८.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा एन. के. टी. कॉलेज हॉल, खारकर आळी, ठाणे (प.) येथे पार पडणार असून, राज्यभरातील धनगर समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना एकत्र आणून योग्य जोडीदार निवडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या राज्यस्तरीय मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने वधू-वर, पालक व नातेवाईक सहभागी होणार आहेत.सदर मेळाव्याचे आयोजन  प्रमुख मार्गदर्शक  ॲड. नानासाहेब मोटे, अध्यक्ष डॉक्टर अरुण गावडे, खजिनदार रमेश तोंडे व चिटणीस सुनील राहींज यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली होत असून, ही माहिती संघटक प्रा. प्रमोद वाघमोडे यांनी जाहीर केली. या प्रसंगी प्रा. वाघमोडे यांनी समाजबांधवांना आवाहन करताना सांगितले की, ‘राज्यस्तरीय वधू-वर मेळावा हा समाजातील एकोपा वाढवणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला यशस्वी करावे.’ तसेच इच्छुक वधू-वरांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क: सुरेश पिंगळे -९००४८९४२१२, बाळकृष्ण लवटे ९९६७५९१९५५

शहिद कॅप्टन विनयकुमार सचान यांना मिरवणूक द्वारे आदरांजली

शहिद कॅप्टन विनयकुमार सचान यांना मिरवणूक द्वारे आदरांजली कल्याण : येत्या मंगळवारी २४ मार्च रोजी डोंबिवलीतील शहीद कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मृतीदिनी अभिवादन मिरवणुकीद्वारे आदरांजली वाहण्यात येणार आहे. शहिद कॅप्टन विनयकुमार सचान प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिक सहभागी होणार आहेत. डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील कॅप्टन विनयकुमार सचान या सचान कुटूंबातील सुपुत्राने देशहित रक्षणासाठी प्राण पणाला लावले. त्याला वर्षे पूर्ण होत आहेत. मंगळवार २४ मार्च या स्मृतीदिनी त्यांच्या स्मारकावर आदरांजली अर्पण करण्याकरिता सकाळी ठिक ८ वाजता वीर सावरकर वाचनालय एम.आय.डी.सी. निवासी विभाग येथे उपस्थित राहून तद्नंतर सचान यांच्या राहत्या घरी जावून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल. तेथून दिव्यज्योत प्रज्वलीत करुन सर्वाच्या समवेत घरडा सर्कल येथील  कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकापर्यंत मिरवणुकीने ज्योत नेण्यात येणार आहे. शहिद कॅप्टन विनयकुमार सचान प्रतिष्ठानची स्थापना २०१० साली झाली असून यंदा त्यांच्या या उपक्रमाचे १६ वे वर्ष आहे. कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करणे हे जागृत देशप्रेमी नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकावर स्मृतिगंधाच्या सुमनांची आदरांजली वाहण्याकरिता मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शहिद कॅप्टन विनयकुमार सचान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकूंद म्हात्रे यांनी केले आहे.

२०२७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट-गणेश नाईक

२०२७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट-गणेश नाईक अनिल ठाणेकर ठाणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला असून, २०२७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला असून, गायमुख ते फाऊंटन दरम्यान भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. तसेच पेण येथे “तिसरी मुंबई” विकसित करण्यात येणार असून, या प्रकल्पातून सुमारे १२ लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ऊर्जा क्षेत्रात प्रत्येक जिल्ह्यात MSEM केंद्र उभारण्यात येणार असून, यामुळे सुमारे ५० लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘एक पेड मा के नाम’ या अभियानालाही चालना देण्यात येणार आहे.पालघर येथे आशिया खंडातील दहावे सर्वात मोठे बंदर उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहितीही गणेश नाईक यांनी दिली. भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा संपर्क मंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना आधार देणारा, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीला गती देणारा आणि महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेणारा आहे.गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अ‍ॅग्रीस्टॅक, महावेध, क्रॉपसॅप, महाडीबीटी यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेती क्षेत्र अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.“मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना” सुरूच राहणार असून, यासाठी सुमारे २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०” अंतर्गत १६ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती होऊन १००% कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा केला जाणार आहे.राज्यातील जलसंपत्तीचे व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी विविध नदीजोड प्रकल्प राबवले जाणार आहेत. वैनगंगा-नळगंगा, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, नार-पार-गिरणा आणि दमणगंगा-एकदरे-गोदावरी या प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरनियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने प्रकल्प राबवण्यात येणार आहे. राज्यातील मेट्रो नेटवर्क १२०० किमीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो-११, तसेच पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे. विविध द्रुतगती मार्ग, उन्नत मार्ग आणि ग्रीनफिल्ड महामार्गांच्या माध्यमातून वाहतूक अधिक सुलभ व वेगवान होणार आहे.“महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना” अंतर्गत हजारो किलोमीटर रस्त्यांचे जाळे उभारले जाणार असून, ग्रामीण भागातील रस्ते आणि संपर्क व्यवस्था अधिक मजबूत केली जाणार आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांच्याद्वारे दुर्गम भागांना जोडण्यावर भर दिला जाणार आहे.या सर्व उपक्रमांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन विकासाला गती मिळेल, असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

मीरा-भाईंदरकरांचे मेट्रोस्वप्न साकार

मीरा-भाईंदरकरांचे मेट्रोस्वप्न साकार ‘सुरक्षेची खात्री, मगच प्रवासाची सुसाट भरारी’ – प्रताप सरनाईक मीरा-भाईंदर:  गेल्या दीड दशकापासून मीरा-भाईंदरकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, ते मेट्रोचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. ‘प्रवासाला थोडा विलंब झाला तरी चालेल, पण प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड कदापि मान्य नाही,’ असा ठाम विश्वास व्यक्त करत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काशीगाव मेट्रो स्थानकाची सविस्तर पाहणी केली. सुरक्षिततेची सर्व तांत्रिक प्रमाणपत्रे प्राप्त झाली असून, आगामी एप्रिल महिन्यात ही सेवा जनतेसाठी खुली होणार असल्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली. एप्रिलमध्ये घुमणार मेट्रोची शिट्टी २००९ च्या निवडणूक वचननाम्यात दिलेले ‘मेट्रोचे वचन’ आज पूर्णत्वास येत असल्याने १५ वर्षांच्या संघर्षाचे फळ मिळत असल्याची भावना मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली. तसेच मेट्रोची सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत. सुरक्षा विषयक (Security Certificates) प्रमाणपत्रे मिळण्यास काही काळ लागल्याने उद्घाटनाला विलंब झाला, मात्र आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज काशिगाव मेट्रो स्थानकावरील आपत्कालीन यंत्रणा, दुर्घटना नियंत्रण कक्ष आणि प्रवासी सुविधांची बारकाईने पडताळणी केली. कोणत्याही संकटाच्या वेळी ही यंत्रणा सक्षमपणे कार्य करेल, याची त्यांनी खात्री केली. एका तासाला ४,५०० म्हणजे  दिवसाला जवळ जवळ ५० हजार प्रवाशांना या मेट्रो मार्गिकेमुळे दररोज सुखकर, वेगवान आणि प्रदूषणमुक्त प्रवास करता येणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण पूर्तता आणि पडताळणी आज स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते या मेट्रोचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या प्रसंगी बोलताना मंत्री प्रतात्प सरनाईक म्हणतात कि, “मी या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सुविधा देण्याला महत्त्व देत नाही, तर त्या सुविधेमध्ये माझ्या नागरिकांचा जीव सुरक्षित असण्याला माझे प्रथम प्राधान्य आहे. आज सर्व तपासण्या पूर्ण झाल्या असून एप्रिलपासून मीरा-भाईंदरकर मेट्रोचा सुखद प्रवास अनुभवू शकतील. वाचन दिले आणि ते पूर्ण हि केले. आता मीरा-भाईंदरकरांचा प्रवास फक्त वेगवानच नाही, तर सुरक्षित आणि सुखकरही असेल”

उल्हासनगरमध्ये रेग्युलरायझेशन प्रक्रियेला गती देण्याची मागणी विधानसभेत

उल्हासनगरमध्ये रेग्युलरायझेशन प्रक्रियेला गती देण्याची मागणी विधानसभेत उल्हासनगर (सुनिल इंगळे )- शहरातील धोकादायक व अनधिकृत इमारतींच्या रेग्युलरायझेशनचा महत्त्वाचा प्रश्न आज विधानसभेत लक्षवेधीद्वारे उपस्थित करण्यात आला. यावेळी आमदार कुमार आयलानी व बालाजी किणीकर यांनी उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील रेग्युलरायझेशन प्रक्रियेच्या मंद गतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदार कुमार आयलानी यांनी स्पष्टपणे नमूद केले की, अनेक प्रयत्नांनंतरही रेग्युलरायझेशनचे काम अपेक्षित गतीने होत नाही. या प्रक्रियेला वेग देण्यासाठी ‘वन विंडो सिस्टम’ तसेच विशेष शिबिरांच्या माध्यमातून उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मनपामध्ये एडीटीपी (ADTP) पदाची कायमस्वरूपी नियुक्ती कधीपर्यंत होणार याबाबत निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, असेही त्यांनी सांगितले. यावर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी सतीश मिसाळ यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २००५ पूर्वीच्या बांधकामांना अधिकृत करण्यासाठी २००६ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले होते. त्या वेळी उल्हासनगरमध्ये एकूण २२,०१३ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी १५,५८७ अर्ज नामंजूर करण्यात आले, तर केवळ १३८ अर्जदारांना डी-फॉर्म देऊन रेग्युलरायझेशन करण्यात आले. तसेच २०१९ मध्ये रेग्युलरायझेशनचे अधिकार मनपा आयुक्तांना देण्यात आले. मात्र २०२० मध्ये कोविड-१९ महामारीमुळे ही प्रक्रिया प्रभावित झाली. त्या काळात १०० टक्के रेडी रेकनर दर लागू असल्यामुळे नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यानंतर १४ मार्च २०२४ पासून रेडी रेकनर दर १० टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सुमारे १ लाख ८० हजार नागरिकांना नोटिसा पाठविण्यात आल्या.सद्यस्थितीत ४४५ प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी ३ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत, तर १३ प्रकरणांमध्ये डी-फॉर्म देण्यात आले आहेत. उर्वरित अर्जदारांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आश्वासन दिले की, रेग्युलरायझेशन प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महानगरपालिका, महसूल व भू-अभिलेख विभाग यांच्या समन्वयातून “एक खिडकी योजना” राबविण्यात येईल. तसेच या कामात कोणत्याही अधिकाऱ्याने निष्क्रियता दाखविल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. विधानसभेत उपस्थित करण्यात आलेला हा प्रश्न शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, यामुळे जुन्या इमारतींचा पुनर्विकास तसेच मोकळ्या जागांचा नियोजनबद्ध विकास होऊन उल्हासनगर शहराला नव्या दिशेने गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चोरुन वीज वापराबाबत डोंबिवलीत गुन्हा दाखल

चोरुन वीज वापराबाबत डोंबिवलीत गुन्हा दाखल कल्याण: वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरता आकडे टाकून वीज वापरणाऱ्या डोंबिवलीतील एका ग्राहकावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथील तानाजी काळूराम काठे या वीज ग्राहकाच्या घरी स्मार्ट मीटर लावण्यात आले. फेब्रुवारी-२०२६ अखेरीसची ५६४६० रूपयांची थकबाकी न भरल्याने मुख्य कार्यालयाकडून सदर ग्राहकाचा वीज पुरवठा स्वयंचलित पद्धतीने बंद करण्यात आला. वीज पुरवठा खंडित केल्यावर सदर ग्राहकाने देयकाचे पैसे न भरता मीटर बायपास करून चोरीची वीज वापरण्यास सुरुवात केली. ही बाब महावितरणच्या तपासणी पथकाला आढळून आली. या नंतर सदर ग्राहकाचा वीज पुरवठा थेट वीज खांबावरून बंद करण्यात आला. या प्रकरणी महावितरण कडून वीज ग्राहक तानाजी काठे याच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात वीज कायदा-२००३ कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा पुढील तपास करत आहेत.