Category: ठाणे

Thane news

 रामबाग परिसरातील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने त्रस्त

रामबाग परिसरातील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने त्रस्त नगरसेविका स्वप्नाली केणे यांनी वेधले महासभेचे लक्ष कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून सोमवारी पार पडलेल्या महासभेत हा मुद्दा चांगलाच गाजला. कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात देखील भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या या समस्येकडे प्रभाग क्र. ६ च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका स्वप्नाली केणे यांनी पहिल्याच महासभेत संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले. रामबाग परिसरात सव्वाशे ते दीडशे कुत्र्यांची संख्या असून लहानमुलांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत शेकडो लोकांना हे भटके कुत्रे चावले आहेत. या परिसरात चार शाळा, दोन महाविद्यालये आहेत. त्यामुळे हा भागात लहान मुलं, विद्यार्थी यांची वर्दळ जास्त आहे. काही श्वानप्रेमी त्यांना कच्चे मांस खायला देत असल्याने ते अधिक आक्रमक होत आहेत. त्यामुळे त्यांचे चावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांची होणाऱ्या त्रासातून मुक्तता करण्याची मागणी नगरसेविका स्वनाली केणे यांनी सभागृहात केली आहे. दरम्यान गृहिणी असलेल्या स्वप्नाली केणे यांनी पहिल्याच महासभेत जनतेच्या न्यायहक्कासाठी आवाज उठवल्याने नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी केलेला नगसेवक शिवसेना शिंदे गटात दाखल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी केलेला नगसेवक शिवसेना शिंदे गटात दाखल कल्याण: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी केलेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील  नगसेवक मधुर म्हात्रे शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत उबाठा पक्षाचे एकूण ११ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी १० नगरसेवकांनी एकत्र येऊन पक्षाचा अधिकृत गट स्थापन केला. मात्र नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी या अधिकृत गटात सहभागी होण्यास नकार दिला. पक्षाची शिस्त अबाधित राहावी यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून मधुर म्हात्रे यांना सलग तीन वेळा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसांद्वारे त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याची आणि पक्षाच्या अधिकृत गटात सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती. मात्र तीनही नोटिसांना त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच पक्षाच्या अधिकृत गटात सहभागी होण्यासही त्यांनी नकार कायम ठेवला. पक्षाच्या आदेशांकडे सातत्याने दुर्लक्ष करणे आणि अधिकृत गटात सहभागी होण्यास टाळाटाळ करणे हे गंभीर शिस्तभंगाचे कृत्य मानले जाते. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने शिस्तभंगाची कारवाई करत मधुर म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेवून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. दरम्यान, पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर मधुर म्हात्रे यांनी सार्वजनिकरित्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. ही बाब कायदेशीर दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जाते. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता अधिनियम, १९८६ नुसार एखादा नगरसेवक ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेला असतो आणि नंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो, तर त्याचे वर्तन “स्वेच्छेने पक्षत्याग” असे मानले जाऊ शकते. तसेच पक्षाच्या वारंवार नोटिसांकडे दुर्लक्ष करणे आणि अधिकृत गटात सहभागी न होणे या गोष्टीही त्या संदर्भात महत्वाच्या मानल्या जातात. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून संबंधित नगरसेवकाविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. या प्रक्रियेत संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यासमोर पुरावे सादर करून नगरसेवकाने स्वेच्छेने पक्षत्याग केल्याचा मुद्दा मांडला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणात पुढे कायदेशीर पातळीवर निर्णय होण्याची शक्यता असून, संबंधित नगरसेवकाच्या पदाबाबत अंतिम निर्णय प्राधिकृत अधिकारी किंवा न्यायालयाच्या प्रक्रियेनंतर निश्चित होऊ शकतो.

राज्यातील कार्यरत शिक्षकांना टीईटी परीक्षेत ६० गुणाची सवलत द्या-संजय केळकर

राज्यातील कार्यरत शिक्षकांना टीईटी परीक्षेत ६० गुणाची सवलत द्या-संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची शिक्षक परिषदेचे संस्थापक तथा जनसेक ठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय केळकर व  शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष  राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन  तामिळनाडू सरकारने घेतलेल्या टीईटी बाबतच्या निर्णयानुसार आपल्याही राज्यात  तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दोन वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यानंतर. राज्यात शिक्षक संवर्गातून पदोन्नतीने पदे भरण्याच्या प्रक्रियेत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यातील पहिली ते आठवीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शासकीय निमशासकीय  असंख्य शिक्षकांना टीईटी, सिटीईटी परीक्षा दोन वर्षात उत्तीर्ण होणे बंधनकारक केली आहे. राज्यातील पहिली ते आठवीच्या वर्गाला अध्यापन करणारे अनेक  सेवाजेष्ठ शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत अशा सेवाजेष्ठ शिक्षकांना पदोन्नतीने पदोन्नती मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, केंद्र समन्वय, विस्तार अधिकारी, वीषय शिक्षक पदांना सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थातील शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटी टीईटी घेण्यात येते. सदर परीक्षा उत्तीर्ण होण्याकरता अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व दिव्यांग यांच्यासाठी पाच टक्के गुणाची सवलत म्हणजेच उत्तीर्ण होण्यासाठी ५५% गुण असणे आवश्यक आहे तसेच माजी सैनिक, शहीद सैनिकाच्या पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना १५ टक्के गुणाची सवलत देण्यात येते म्हणजेच उत्तीर्ण होण्यासाठी ४५ टक्के गुणाची आवश्यकता आहे.याप्रमाणेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्था मधील ज्या शिक्षकांचे सेवा १५ वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेली आहे अशा सेवा जेष्ठ शिक्षकांच्या वयाचा, मानसिकतेचा, अभ्यासक्रमाचा विचार करून उत्तीर्ण होण्यास १५ टक्के गुणाची सवलत देण्यात यावी म्हणजे सीटीईटी, टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यास किमान ४५ टक्के गुण करण्यात यावी अशी सवलत दिल्यास कार्यरत शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतील. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन समन्वयक (केंद्रप्रमुख), व विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदावर पदोन्नती देताना शिक्षक प्रवेश पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आलेली आहे. पदोन्नती प्रक्रिया राबवण्याबाबत विविध शिक्षक संघटना यांनी नाराजी व्यक्त करून  (TET/CTET) परीक्षेतून पदोन्नतीस पात्र शिक्षकांना   परीक्षेतून सुट द्यावी अशी विनंती केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या  निर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही संबंधी शासनामार्फत  राष्ट्रीय शिक्षण परिषदेकडे तसेच केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडे आपल्या (राज्य शासनाकडून) कार्यालयामार्फत मार्गदर्शन मागवण्यात आलेले असून याबाबत सुस्पष्ट अभिप्राय प्राप्त झालेला नाही.आपण जे  शिक्षक प्रवेश पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण  झाले आहेत, अशाच  शिक्षकांना पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन समन्वयक (केंद्रप्रमुख), व विस्तार अधिकारी (शिक्षण)पदावर पदोन्नती द्यावी  असे आपण निर्देश राज्यातील सर्व जिल्हा परिषदेना दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या १ सप्टेंबर २०२५ च्या न्यायप्रकरणात  शिक्षकांनी दोन वर्षात टीईटी / सिटीईटी  उत्तीर्ण होणे गरजेचे आहे असे स्पष्ट निर्देशित केलेले असताना शासनाने दोन वर्षाची संधी देणे अपेक्षित आहे.मात्र  आपण जे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत त्यांना दोन वर्षाची संधी मिळणे आवश्यक आहे .मात्र आपण जे शिक्षक (TET/CTET) उत्तीर्ण आहेत  अथवा सेवेत लागण्यापूर्वी (TET/CTET) उत्तीर्ण आहेत त्यांनाच आपण संधी देत आहात यामुळे पदोन्नतीस पात्र सेवा जेष्ठ शिक्षकांवरती फार मोठा अन्याय होणार आहे.तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्यातील / देशातील अनेक शिक्षक संघटना तसेच अनेक राज्यांनी  मा. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे. अजून त्यांचा कोणताही निर्णय लागलेला नाही .तथापि  माननीय सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षाची मुदत दिल्याने येत्या दोन वर्षांच्या कालावधीत किमान सहा परीक्षा होणे बाकी आहे. त्यामुळे जे पदवीधर धारक शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत अशा शिक्षकांना केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात यावी.  पदोन्नती दिलेल्या शिक्षकांना  (TET/CTET) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाची संधी मिळावी.दोन वर्षांमध्ये  ज्यांनी पदोन्नती घेतलेली आहे असे शिक्षक (TET/CTET) उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांना दिलेले पदोन्नती रद्द करावी तसेच त्यांना पदोन्नती नंतर देण्यात आलेले अधिकचे वेतन , इतर भत्ते  त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याशी  शिष्टमंडळाने सविस्तर अशी चर्चा केली मंत्री महोदय यांनी याविषयी सकारात्मकता दर्शवली आहे.

‘सरस प्रदर्शनात’ ग्रामीण महिलांच्या उत्पादनांची ५१.१७ विक्रमी विक्री,

‘सरस प्रदर्शनात’ ग्रामीण महिलांच्या उत्पादनांची ५१.१७ विक्रमी विक्री, १२ हजारांहून अधिक नागरिकांचा प्रतिसाद अनिल ठाणेकर ठाणे, ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या “जिल्हास्तरीय सरस व मिनी सरस विक्री प्रदर्शनाला” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ५१.१७ लाख रुपयांची विक्रमी विक्री झाली आहे. जिल्हास्तरीय सरस व मिनी सरस विक्री प्रदर्शनात उत्तम कामगिरी करणाऱ्या बचत गटातील महिलांचा सन्मान १६ मार्चला बी.जे. हायस्कुल, ठाणे येथे करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) यांच्या संयुक्त विद्यमाने वज्रेश्वरी महोत्सवाअंतर्गत हे प्रदर्शन १० ते १४ मार्च दरम्यान यशवंतराव चव्हाण मैदान (मॅक्सी ग्राऊंड), कर्णिक रोड, कल्याण (प) येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये स्वयं सहाय्यता समूहातील महिलांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, वस्त्रनिर्मिती उत्पादने आणि घरगुती वापराच्या वस्तूंचे एकूण १०० स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये १० खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच ९० हस्तकला, कपडे व घरगुती वस्तूंचे स्टॉल्स समाविष्ट होते. या प्रदर्शनात २१० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला.सया प्रदर्शनास कल्याण, ठाणे तसेच इतर जिल्ह्यांमधील सुमारे १२,००० नागरिकांनी भेट दिली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करत महिलांच्या उत्पादनांना भरभरून प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, अनेक स्वयं सहाय्यता समूहांना प्रदर्शनादरम्यान इतर ग्राहकांकडून पुढील ऑर्डर्सही प्राप्त झाल्या, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायवृद्धीस नवे दालन खुले झाले आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले की, “ग्रामीण महिलांनी अत्यंत गुणवत्ता व कल्पकतेने तयार केलेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळाल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, हे या प्रदर्शनातून स्पष्ट झाले आहे. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहेत. भविष्यातही अशा अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.” तसेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अजिंक्य पवार म्हणाले की, “सरस विक्री प्रदर्शनाला नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. ५१.१७ लाख रुपयांची विक्री ही महिलांच्या मेहनतीची आणि गुणवत्तेची साक्ष आहे. या माध्यमातून महिला बचत गटांना केवळ बाजारपेठच नव्हे तर व्यवसायवृद्धीसाठी नवे मार्गही उपलब्ध झाले आहेत. पुढील काळात अशा प्रदर्शनांचे अधिक प्रभावी नियोजन करून महिलांना अधिक संधी देण्यात येतील.” या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना थेट ग्राहकांशी संवाद साधण्याची संधी, उत्पादनांची गुणवत्ता सादर करण्याची संधी आणि डिजिटल तसेच प्रत्यक्ष बाजारपेठेत प्रवेश मिळाला आहे. यामुळे महिला बचत गटांचे सक्षमीकरण अधिक बळकट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत असून त्यातून महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत.

 आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास २५ मार्चपर्यंत मुदतवाढ

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास २५ मार्चपर्यंत मुदतवाढ आता ३ ते ५ किमी अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची संधी अनिल ठाणेकर ठाणे, शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता २५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच पालकांना आता ३ ते ५ किलोमीटर अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतरासंबंधीची १ किलोमीटरची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी केवळ १ किमी अंतरातील शाळा निवडण्याची मर्यादा असताना आता पालकांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामुळे अधिकाधिक पात्र बालकांना इच्छित शाळांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, १६ मार्चपर्यंत ज्या पालकांनी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत, त्यांना अर्जामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी ‘अनकन्फर्म’ करून पुन्हा ‘कन्फर्म’ करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित पालकांना पोर्टलवर पॉप-अप विंडोच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद ठाणे बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले की, “आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत अधिकाधिक पात्र बालकांचा समावेश व्हावा, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार अर्ज भरण्याची मुदत २५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच शाळांच्या अंतराची अट शिथिल केल्यामुळे पालकांना अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सर्व पात्र पालकांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत.” तरी सर्व संबंधित पालकांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन अर्जामध्ये आवश्यक दुरुस्ती करून अथवा नवीन अर्ज सादर करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व शाळांनी ही माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

धर्मराज फाऊंडेशन आयोजित निळजे लोढा पलावा महोत्सव उत्साहात संपन्न

धर्मराज फाऊंडेशन आयोजित निळजे लोढा पलावा महोत्सव उत्साहात संपन्न दिवा: धर्मराज फाउंडेशनच्या वतीने निळजे लोढा पलावा येथे आयोजित करण्यात आलेला ‘निळजे लोढा पलावा महोत्सव’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या महोत्सवात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा आनंद घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, निळजे येथे २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत दररोज सायंकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात उदघाटन समारंभासह सांस्कृतिक कार्यक्रम, लोकगीतांचे कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, ब्युटी मेकअप स्पर्धा, फॅशन शो तसेच महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम असे विविध उपक्रम पार पडले. विशेष म्हणजे महिला दिनानिमित्त महिलांसाठी मार्गदर्शन व खेळ पैठणी यांसारख्या कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच “एक शाम बुजुर्गों के नाम” या कार्यक्रमातून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या महोत्सवाच्या आयोजनासाठी धर्मराज फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र धर्मराज पाटील तसेच सर्व कमिटी सदस्य, महिला कमिटी आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. महोत्सवामुळे परिसरात सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व मान्यवर, सहकारी व उपस्थित नागरिकांचे आभार मानले.

शाहीर सिताराम शिंदे व लेखिका दीपा पवार यांना महा. अनिसचा ‘समता सन्मान पुरस्कार’ बहाल

शाहीर सिताराम शिंदे व लेखिका दीपा पवार यांना महा. अनिसचा ‘समता सन्मान पुरस्कार’ बहाल अनिल ठाणेकर ठाणे, विवेक जागर संस्था अंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुंबई जिल्हा यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘समता सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, गीतकार व गायक शाहीर सिताराम शिंदे तसेच लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या दीपा पवार यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम जनता केंद्र, ताडदेव, मुंबई सेंट्रल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंनिसचे राज्य पदाधिकारी विजय परब, नंदकिशोर तळाशीलकर, पत्रकार अमेय तिरोडकर, व्हिजन फाउंडेशनचे प्रतिनिधी तसेच मुंबई जिल्ह्यातील विविध शाखांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर शिंदे यांनी अंनिससाठी लिहिलेल्या गीतांनी झाली. घाटकोपर शाखेच्या निर्मला माने यांनीही स्वरचित गीत सादर केले. ‘Give to Gain’ या महिला दिनाच्या थीमवर आधारित सत्रातून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष यश यांनी प्रास्ताविक करत स्त्री-पुरुष समानतेविषयी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मान्यवरांचे व्हिडिओ प्रदर्शित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तुषार शिंदे यांनी दीपा पवार यांची, तर संदेश बालगुडे यांनी शाहीर सिताराम शिंदे यांची मुलाखत घेतली. दीपा पवार यांनी आपल्या खडतर आणि अंगावर काटा आणणाऱ्या जीवनप्रवासाविषयी सांगताना भारतातील सुमारे ११ टक्के म्हणजे जवळपास १५ कोटी लोक नोंद नसलेल्या श्रेणीत जगत असल्याचे वास्तव मांडले.पालावरच्या जीवनातून आंतरराष्ट्रीय परिषदांपर्यंतचा प्रवास ‘माझ्या समस्या मीच मांडेन’ या प्रेरणेने घडल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील वंचित घटकांच्या समस्या जगासमोर मांडत राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. शाहीर सिताराम शिंदे यांनी पत्रिकेतील भाकितामुळे परिचित कुटुंबातील लग्न मोडल्याची घटना पाहिल्यानंतर अशा अंधश्रद्धांविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्र अंनिसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. महिलांच्या प्रश्नांवर भाष्य करणारी आशयसंपन्न गाणी त्यांनी लिहिली असून ती महाराष्ट्रभर पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले. “मला सत्कार करून निवृत्त करू नका; तुमच्यासोबत काम करत राहायचे आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना पत्रकार अमेय तिरोडकर म्हणाले की, सध्याच्या पत्रकारितेवर भाष्य करत समाजात प्रश्न निर्माण करणारी पत्रकारिता आवश्यक आहे. दीपा पवार व शाहीर शिंदे यांच्या उल्लेखनीय कार्याचे त्यांनी कौतुक केले. ‘समता सन्मान’ हा केवळ सोहळा नसून विचार पुढे नेणारा उपक्रम आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका सवाखंडे यांनी केले. शेवटी ‘हम होंगे कामयाब’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा, जय हनुमान-काल्हेर यांची उपांत्य फेरीत धडक दिली.

ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी कबड्डी स्पर्धा – २०२६ शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा, जय हनुमान-काल्हेर यांची उपांत्य फेरीत धडक दिली. ठाणे :- शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा, जय हनुमान-काल्हेर यांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी स्पर्धेत उपांत्या फेरीत धडक दिली. कळवा, खारेगाव, ठाणे(प.) येथील  खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कुलच्या समोरील मैदानात सुरु असलेल्या प्रथम श्रेणी पुरुषांच्या उपांत्यापूर्व फेरीत कल्याणच्या शिवशंकर मंडळाने विजय क्रीडा मंडळाचा प्रतिकार ४१-३१ असा मोडून काढत उपांत्या फेरी गाठली. पूर्वार्धात लोण देत २३-१६ अशी आघाडी घेणाऱ्या शिवशंकरने उत्तरार्धात आणखी एक लोण देत १० गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला. मंगेश सोनावणे, सुमित साळुंखे यांच्या धारदार चढयांना तुषार भोईर याची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हे शक्य झाले. विघ्नेश चौधरी, रोनक पाटील यांचा चढाई पकडीचा खेळ विजय मंडळाचा पराभव टाळण्यास दुसऱ्या सामन्यात जय बजरंग-वाशिंद संघाने श्री समर्थ मंडळावर ४१-१९ अशी सहज मात केली. आक्रमक खेळ करीत जय बजरंगने पहिल्या डावात २ लोण देत २५-०८ अशी आघाडी घेत आपला विजयाचा पाया रचला. दुसऱ्या डावात सावध खेळ करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. राजू कथोरे, दर्शन पवार यांच्या झंझावाती चढयांना अतुल देसलेची मिळालेली पकडीची साथ यामुळे जय बजरंगने सहज विजय मिळविला. श्री समर्थच्या ओमकार म्हात्रेचा या सामन्यात प्रभाव पडला नाही. मोरया मंडळाने जय बजरंग-खारेगाव संघाचा ५०-२४ असा पाडाव करीत उपांत्या फेरी गाठली. विश्रांतीपर्यंत ३लोण देत ३०-१० अशी आघाडी घेत मोरयाने आपला विजय आधीच  निश्चित केला होता. विश्रांतीनंतर औपचारिकता पूर्ण करीत आणखी एक लोण देत सामना आपल्या खिशात टाकला. परेश हरड, धीरज तरे, अजय पाटील यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. जय बजरंगच्या सोहम मोरे, आर्यन पाटील यांची या सामन्यात मात्र चालली नाही. शेवटच्या सामन्यात जय हनुमान-काल्हेर संघाने हुतात्मा शांतराम संघावर ३७-०८ असा सहज विजय मिळविला. गौरव पाटील, हर्ष भोईर, वैभव पाटील यांच्या तुफानी खेळाने हा विजय सोपा केला.

विश्वास सामाजिक संस्थेतर्फे २८ मार्च रोजी ‘मर्मबंधातली ठेव’

विश्वास सामाजिक संस्थेतर्फे २८ मार्च रोजी ‘मर्मबंधातली ठेव’ पंडित प्रभाकर कारेकर यांच्या स्मृत्यर्थ विशेष कार्यक्रम ठाणे : पंडित प्रभाकर कारेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात २८ मार्च रोजी दुपारी `मर्मबंधातली ठेव’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी रसिकांना मोफत प्रवेश असून, कार्यक्रमाच्या प्रवेशिका ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांचे दादा पाटील वाडी येथील जनसंपर्क कार्यालय व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले-भोसले आणि विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमित वाघचौरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात आपल्या गायकीचा ठसा रसिकमनांवर गेली अनेक वर्षे उमटविणारे अलौकिक स्वरप्रतिभा, कसदार आणि भारदस्त आवाज लाभलेले तसेच दाणेदार आकर्षक तानांसाठी ओळखले जाणारे गुरुतुल्य गायक आणि गोमंतकीय रत्न, पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर अर्थात सर्वांचे लाडके कारेकर बुवा होत. शास्त्रीय गायनाव्यतिरिक्त त्यांनी अभंग, नाट्यसंगीतात आपली विशेष छाप पाडली आणि नाट्यसंगीताचे वेड असलेल्या रसिकमनावर अधिराज्य गाजवले. बऱ्याच संगीत नाटकातील प्रसिद्ध नाट्यपदं तसेच अभंग,भावगीतं कारेकर बुवांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली, त्यांच्या नावावर कोरली गेली आणि लोकप्रिय झाली. प्रिये पहा, चंद्रिका ही जणू, सुकांत चंद्रानना, धन्य आनंद दिन, शतजन्म शोधिताना, बोलावा विठ्ठल, करिता विचार सापडले वर्म, ही त्यातील काही निवडक गाजलेली गीते आहेत. कारेकर बुवांच्या याच गाजलेल्या, आणि काही निवडक रचनांचा “मर्मबंधातली ठेव” हा कार्यक्रम होणार आहे. गायक श्रीरंग भावे, ओंकार प्रभुघाटे, केतकी भावे जोशी, गोव्यातील संदेश खेडेकर आणि कारेकर बुवांचे जेष्ठ शिष्य आणि ठाण्यातील नामवंत गायक पंडित सुरेश बापट हे कारेकर बुवांना सांगीतिक मानवंदना देतील. नीला सोहनी, हर्षल काटदरे, सुहास चितळे, गणेश मेस्त्री आणि धनंजय पुराणिक या प्रतिथयश वादकांची समर्पक साथ लाभणार आहे. तसेच अनघा मोडक या निवेदनाची धुरा सांभाळतील.

एकनाथ शिंदेंकडून आमदार मंदा म्हात्रे यांच्या तब्बेतीची व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस

एकनाथ शिंदेंकडून आमदार मंदा म्हात्रे यांच्या तब्बेतीची व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस अनिल ठाणेकर ठाणे, बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांची विचारपूस केली. मंदा म्हात्रे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मंदा म्हात्रे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी त्यांना धीर देत, “आपण तब्येतीची पूर्ण काळजी घ्या. मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आपण लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेसाठी कार्यरत व्हाल,” असे सांगितले. या घटनेनंतर बेलापूर मतदारसंघातील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे. मंदा म्हात्रे या बेलापूर मतदारसंघातील सक्रिय आणि जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणाऱ्या नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या प्रकृतीबाबतची बातमी समजताच अनेकांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.