Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

अन्नसुरक्षेसाठी कृषी संशोधन आणि अनुभवाधारित शिक्षणाला चालना देणे काळाची गरज – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे संशोधन प्रकल्पांची पाहणी विद्यार्थी, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांशी साधला संवाद अशोक गायकवाड रायगड- कर्जत :देशाची अर्थव्यवस्था आजही मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर आधारित असून देशाची अन्नसुरक्षा कायम राखण्यासाठी शेती आणि शेतकरी अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवाधारित शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीला शेतीशी जोडणे ही काळाची गरज असून राज्यातील शहरी भागातील प्रत्येक शाळेने वर्षातून किमान एकदा विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करावे, असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आयोजित शास्त्रज्ञ, शेतकरी व विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे तसेच डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशीद, कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय तोरणे, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी.डी.वाघमोडे, मालाडच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विजय लेले, मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे कार्याध्यक्ष स्वप्नील सावरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतासमोर अन्नसुरक्षेचे मोठे आव्हान होते. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे आज भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला असून इतर देशांनाही अन्नधान्य पुरवणारा देश म्हणून ओळख निर्माण केली आहे. हे यश केवळ शेतकऱ्यांच्या कष्टामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे देशाची अन्नसुरक्षा कायम राखण्यासाठी कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की,मालाडच्या उत्कर्ष मंदिर शाळेचे विशेष कौतुक करीत संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली कृषी अभ्यास सहल हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. पुस्तके, संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञान मिळत असले तरी प्रत्यक्ष अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन शेती, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहिल्यास त्यांचे ज्ञान अधिक समृद्ध होते. राज्यातील सर्व शहरी भागातील शाळांनी वर्षातून किमान एकदा विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून सन २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील शेतकरी संपन्न, सक्षम आणि समाधानी असणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रात विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना सर्वतोपरी मदत करणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करत अथक परिश्रमाने देशाला अन्न सुरक्षित ठेवत आहेत. त्यांच्या हितासाठी कृषी संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनाचा देशभरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून विद्यापीठाच्या विकासासाठी कोणत्याही बाबतीत कमतरता भासू दिली जाणार नाही. विद्यापीठाच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसमवेत भात लागवड दौऱ्यादरम्यान विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष शेतात भात लागवडीत सहभाग नोंदविला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शेतीविषयी प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याचे महत्त्व विशद केले, तर शेतकऱ्यांशी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि शाश्वत शेतीबाबत चर्चा करत कृषी क्षेत्रातील संशोधन आणि प्रत्यक्ष शेतातील अनुभव यांची सांगड घालणे,ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. तसेच भात जलद पैदास (स्पीड ब्रीडिंग) केंद्राची पाहणी करून आधुनिक संशोधन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. यांत्रिकी पद्धतीने भात लागवडीच्या प्रात्यक्षिकाला त्यांनी भेट दिली.     यावेळी शेतकरी प्रतिनिधी म्हणून ऍड.अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र मर्दाने यांनी केले. कार्यक्रमास प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ, विद्यापीठाचे उपसंचालक( बियाणे ) डॉ. अरुण माने, मंडळ अधिकारी चिचवली श्रीमती वैशाली पाटील, ग्राम महसूल अधिकारी आकाश काळे, भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे, भाजपचे उत्तर रायगड इंजिनियर सेल अध्यक्ष मंदार मेहंदळे यांच्यासह प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 विश्वचषक विजेत्या खो-खोपटूंना रोख पारितोषिक व शासकीय नोकरी द्या!

आमदार सतीश चव्हाण यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी – तातडीने कार्यवाहीचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश छत्रपती संभाजीनगर: पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना अद्यापही शासनाने जाहीर केलेली रोख पारितोषिकाची रक्कम मिळालेली नसल्याचा मुद्दा आता विधान भवनापर्यंत पोहोचला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन विश्वविजेत्या खेळाडूंना शासन निर्णयानुसार ₹२.२५ कोटींचे रोख पारितोषिक आणि शासकीय सेवेत नोकरी देण्याची ठाम मागणी केली. दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत झालेल्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्य सरकारने ₹१० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ७ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशिप / वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या सांघिक क्रीडा प्रकारातील खेळाडूंना ₹२.२५ कोटींचे रोख पारितोषिक देण्याची तरतूद असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून देशाला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना अद्यापही जाहीर केलेले पारितोषिक मिळालेले नाही. त्यामुळे शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून संबंधित खेळाडूंना रोख बक्षीस तसेच शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली. या मागणीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या विषयावर त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी दिली.

मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियममध्ये आयोजित “पल पल दिल के पास – म्युझिक फॉर अ कॉज” या संस्मरणीय संगीत मैफिलीत संगीत, आठवणी आणि संवेदनांचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला. दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर यांच्या उपस्थितीत, त्यांचे सुपुत्र अमित कुमार आणि सुमित कुमार, तसेच नात मुक्तिका गांगुली यांनी किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांचे सादरीकरण करत त्यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) आयोजित या कार्यक्रमातून वंचित कर्करोगग्रस्त कर्करुग्णांसाठी निधी उभारण्यात आला. संगीत, वारसा आणि मानवतेचा सुंदर संगम घडविणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

कागदी जीर्ण अवस्थेतील जातीच्या नोंदी डिजिटल करा

रमेश औताडे मुंबई: राज्यातील वंचित समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जीर्ण अवस्थेतील कागदी जातीच्या नोंदी डिजिटल स्वरूपात जतन करण्याची मागणी इतर मागासवर्ग कल्याण समितीचे प्रमुख आमदार सुरेश भोळे यांच्याकडे करण्यात आली आहे. या नोंदी कागदी स्वरूपात असून जीर्ण झाल्याने नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत. हा ऐतिहासिक अभिलेख कायमस्वरूपी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे  रिपब्लिकन सेनेचे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष विजय माने, जनसेवा कामगार संघटनेचे सरचिटणीस अमित साळुंखे, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष हर्षल पाटील, ॲड. सुमेश परमार, ॲड. श्याम शुक्ला, ॲड. मेघनाथ तेलावडे, राजेश शर्मा, अजय बरुचा, अश्विन पाटणे यांनी अभ्यासपूर्ण महत्वाची मागणी सरकारकडे केली आहे. १९५० ते १९६७ किंवा त्यापूर्वीच्या कालावधीतील नोंदी संबंधित अभिलेखांचे तातडीने स्कॅनिंग करून त्यांचे डिजिटल जतन करण्यासाठी राज्यस्तरीय सुरक्षित डिजिटल अभिलेखागार निर्माण करून या डिजिटल नोंदींना अधिकृत पुरावा म्हणून मान्यता द्यावी. यामुळे बनावट कागदपत्रे, जात घुसखोरी व गैरव्यवहाराला आळा बसेल असे अमित साळुंखे यांनी सांगितले.

 कर्जमाफीसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य!

ॲग्री स्टॅक वर तात्काळ नोंदणी करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन सिंधुदुर्ग : कर्जमाफीसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य असून त्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘फार्मर आयडी’ नसलेले१२०७ शेतकरी असून त्यांनी तातडीने ‘ॲग्रीस्टॅक ‘वर नोंदणी करून ‘फार्मर आयडी’ प्राप्त करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६, अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे ‘फार्मर आयडी’ नाही त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकलेले नाही त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आवाहन  केले आहे. कर्जमुक्ती योजनेच्या जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुट्टे जिल्हा सुकटे जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक प्रदीप मालगावे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण ६५०० कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे त्यापैकी शासनाकडून आतापर्यंत ३७०८ आधार प्रमाणीकरणासाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यापैकी २१४५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर १५६३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे यामध्ये १२०७ शेतकऱ्यांकडे ॲग्री स्टॅक/फार्मर आयडी नसल्याने त्यांच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया रखडलेली आहे अशी माहिती  जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आधार प्रमाणे करण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या ३७०८ शेतकऱ्यांचे याद्या संबंधित विकास सेवा संस्था, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय तसेच राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत जिल्हा उपनिबंधक तसेच तालुका सहाय्यक निबंधक या कार्यालयांमध्ये याद्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेत १एप्रिल २०१९ ते ३१,मार्च,२०२५ या कालावधीत वाटप केलेले अल्पमुदत पीक कर्ज, ३० सप्टेंबर,२०२५ रोजी थकीत आणि ३१,मार्च,२०२६ अखेर परतफेड न झाले असल्यास मुद्दल व व्याजासह अधिकतम दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे थकीत कर्जाची रक्कम दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास अतिरिक्त रक्कम संबंधित बँक किंवा संस्थेला परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता ओटीएस अंतर्गत २ लाख रुपये पर्यंत चा लाभ मिळणार आहे तसेच २०२२-२३,२०२३ -२४ आणि २०२४ -२५ यातील आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षात पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिली. ००००००००

आचार्य अत्रे रंगमंदिरात आशा भोसले, रफी आणि सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजलीपर गाणी

कल्याण :  येथील आचार्य अत्रे रंगमदिरात दिवंगत गायिका, आशा भोसले, गायक रफी आणि सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजलीपर तसेच आणि पाऊस या विषयावरील गाण्यांना श्रोत्यांचा अलोट प्रतिसाद लाभला. यावेळी २२ गायक, गायिका…

तर साडेतीन वर्षांत रिंग मेट्रो धावणार – श्रावण हर्डीकर

अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचे संपूर्ण भूसंपादन व इतर तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यास हा प्रकल्प अवघ्या साडेतीन वर्षात पूर्ण करू, अशी ग्वाही बैठकीत व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. अडीच वर्षांत पुणे मेट्रोचे वेगाने काम करण्यात आले. त्याच धर्तीवर ठाण्याचे काम पूर्ण करता येईल, अशी आशा हर्डिकर यांनी व्यक्त केली. त्याचे आमदार ॲड. माधवी नाईक यांनी स्वागत केले आहे. ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत ठाण्यातील सामान्य नागरिकांच्या शंका व भीती थेट नागरिकांबरोबर संवाद साधून दूर केली जाणार आहे. भाजपच्या आमदार ॲड. माधवी नाईक यांच्या सूचनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिंग मेट्रो मार्ग जाणाऱ्या विविध भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांबरोबर एकत्रपणे संवाद साधण्याच्या सूचना महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री विश्रामगृहात ठाणे शहरातील रिंग मेट्रो रेल्वेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार माधवी नाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार रवींद्र फाटक यांची उपस्थिती होती. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी बैठकीत लोकप्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली. ठाणे शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार रिंग मेट्रो प्रकल्प हा आवश्यक आहे. मात्र, या प्रकल्पाबाबत महामेट्रो, महापालिका किंवा कोणत्याही सरकारी आस्थापनांकडून सामान्य नागरिकांना कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे या प्रकल्पाबाबत ठाणे शहरात गैरसमज निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सामान्य नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अभ्यासू व्यक्तींबरोबर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या शंकांचे समाधान करण्याची आवश्यकता आहे. रिंग मेट्रोच्या कामामुळे नुकसान होणार नसून, ठाणेकरांना फायदा होईल. या प्रकल्पाबाबत ठाणेकरांमध्ये विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ठाण्यातील विविध भागात व नियोजित मेट्रोच्या स्थानकांच्या ठिकाणी परिसंवाद भरवावेत. त्यात महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी, अशी सूचना आमदार अॅड. माधवी नाईक यांनी केली. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. त्यानुसार लवकरच ठाणे शहरातील नागरिकांबरोबर थेट संवाद साधण्यासाठी परिसंवाद भरविले जाणार आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या काळातही महामेट्रोकडून रिंग मेट्रोबाबत फलक लावण्यात येणार आहेत.

मूग व उडीद पिकासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

अनिल ठाणेकर ठाणे, पिकस्पर्धेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचे हे प्रथमच वर्ष असल्यामुळे, “एक वेळची विशेष बाब” म्हणून मूग व उडीद पिकासाठी अर्ज करण्यास १० ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून नवनवीन प्रयोग करण्यात येतात व उत्पादनात भर घातली जाते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती व मनोबल वाढून ते आणखी उमेदीने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पीक स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आली आहे. कृषी एकविभागामार्फत राज्यस्तरावर खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून, सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेत सहभाग घेता येईल. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावरील उत्पादकता आधारभूत धरून तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विजेत्या शेतकऱ्यांची निवड केली जाईल. या स्पर्धेअंतर्गत खरीप हंगामातील एकूण ११ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार आहे. शासन निर्णयानुसार मूग व उडीद या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै ठरवण्यात आली होती. परंतु, पिकस्पर्धेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचे हे प्रथमच वर्ष असल्यामुळे, “एक वेळची विशेष बाब” म्हणून मूग व उडीद पिकासाठी अर्ज करण्यास १० ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेत खालीलप्रमाणे एकूण ११ पिकांचा समावेश असून त्यांच्या अर्ज करण्याची अंतिम मुदत खालीलप्रमाणे आहे: मूग व उडीद पीक : १० ऑगस्ट २०२६, भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल : ३१ ऑगस्ट २०२६ स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे बंधनकारक आहे. शेतकरी एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकतात. तसेच सहभागी शेतकऱ्यांच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे फार्मर आयडी, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याची चलन पावती, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), आणि बँक खाते चेक किंवा पासबुक डिटेल्स. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये आणि आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. बक्षीस तपशील तालुका पातळी: प्रथम ५,००० रुपये, द्वितीय ३,००० रुपये आणि तृतीय २,००० रुपये. जिल्हा पातळी: प्रथम १०,००० रुपये, द्वितीय ७,००० रुपये आणि तृतीय ५,००० रुपये. राज्य पातळी: प्रथम ५०,००० रुपये, द्वितीय ४०,००० रुपये आणि तृतीय ३०,००० रुपये. कृषी विभागामार्फत सर्व शेतकरी बंधू-भगिनींना जास्तीत जास्त संख्येने या पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इच्छूकांनी http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पिकस्पर्धा टॅबवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ००००

महात्मा गांधी विद्यालयात करपल्लवी गोंधळी लोककलेचा अनोखा सांस्कृतिक कलाविष्कार

कल्याण: श्रीकृष्ण कला फाऊंडेशनच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय, डोंबिवली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या करपल्लवी गोंधळी लोककलेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. पूर्वप्राथमिक विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर…

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दुर्मिळ ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे सर्जरी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी एका २० वर्षीय महिला रुग्णाच्या पोटातील सुमारे साडेआठ किलो वजनाचा दुर्मिळ ट्युमर यशस्वीरित्या शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला…