Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांवर अध्यक्ष विराजमान

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समितींच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आज महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.…

 डॉ. विनय सांगळे यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुवर्ण कामगिरी

मलेशियातील हॉस्पेक्स मेडिकल क्रिकेट स्पर्धेत मुंबईला विजेतेपद अशोक गायकवाड रायगड- कर्जत : कर्जतचे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. विनय सांगळे यांनी मलेशिया येथे नुकत्याच पार पडलेल्या हॉस्पेक्स आंतरराष्ट्रीय मेडिकल क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाचे प्रतिनिधित्व करत शानदार कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कर्जतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कतार, बांगलादेश, मलेशिया तसेच भारतातील मुंबई, दिल्ली, केरळ आणि गोवा येथील नामांकित मेडिकल क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाने गोवा संघाचा पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयात डॉ. सांगळे यांचे योगदान मोलाचे ठरले. गेली १८ वर्षे कर्जतमधील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून रुग्णांची निस्वार्थपणे सेवा करणारे डॉ. विनय सांगळे यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायाबरोबरच क्रिकेटची आवडही सातत्याने जोपासली आहे. टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट या दोन्ही प्रकारांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. सांगळे यांनी यापूर्वी दुबई, श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धांबरोबरच पाँडिचेरी, बेंगळुरू, विशाखापट्टणम, चेन्नई, गोवा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, संभाजीनगर, हैदराबाद आणि नाशिक येथे झालेल्या अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सहा वेळा ‘राष्ट्रीय सर्वोत्तम गोलंदाज’ पुरस्कार डॉ. विनय सांगळे यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे त्यांनी तब्बल सहा वेळा ‘बेस्ट बॉलर’ (सर्वोत्तम गोलंदाज) हा राष्ट्रीय किताब पटकावला आहे. उदयपूर, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि नवी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी हा मान मिळवला असून, ही कामगिरी करणारे ते मेडिकल क्रिकेटमधील मोजक्या आणि अव्वल गोलंदाजांपैकी एक मानले जातात. ५६० विकेट्सचा विक्रम ‘डावखुरा जादुई फिरकी गोलंदाज’ अशी ओळख असलेल्या डॉ. सांगळे यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेडिकल क्रिकेट स्पर्धांमध्ये आतापर्यंत ५६० हून अधिक विकेट्स घेत फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकविण्याचा उल्लेखनीय पराक्रम केला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी गोलंदाजीमुळे ते मेडिकल क्रिकेट क्षेत्रातील एक विश्वासार्ह आणि धडाकेबाज खेळाडू म्हणून ओळखले जातात. वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी सांभाळत क्रिकेटसारख्या स्पर्धात्मक खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या डॉ. विनय सांगळे यांनी कर्जतचे नाव देश-विदेशात उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्र, क्रीडाविश्व तसेच कर्जत तालुक्यातील नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

 पोयसर जिमखान्याच्या धनुर्धरांनी ३५ पदके पटकावली

मुंबई महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड इंडोअर इनडोअर आर्चेरी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ मुंबई, ३ ऑगस्ट २०२६ – ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील शहाजी राजे भोसले क्रीडा…

दिवा- कोपर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या धडकेत तरुणी ठार

दिवा : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत रविवारी सकाळी एक सुन्न करणारी घटना घडली. अवघ्या १८ वर्षीय तरुणी कामावर जाते सांगत घराबाहेर पडली होती. दिवा- कोपर दरम्यान लोकलच्या धडकेत तिचा जागीच दुर्दैवी…

उलवेकरांचा पाणीप्रश्न लवकरच संपुष्टात येणार

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सचिन घरत, सचिन राजेंचा पाठपुरावा राज भंडारी उलवे :उलवे नोडमधील सेक्टर १५ ते १८ मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष येथील रहिवाशांना सतावत आहे. उलवेकरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागू नये म्हणून सचिन घरत आणि सचिन राजे येरुणकर यांनी पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे आता उलवेमधील पाणीप्रश्न संपुष्टात येणार असल्याचे अश्वासन आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर, सेक्टर १७, उलवे येथे भव्य जनता दरबाराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या जनता दरबारास गव्हण ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन घरत तसेच सचिन राजे येरुणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उलवे नोडमधील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जनता दरबारामध्ये महत्त्वाचा विषय उलवे नोडमधील पाणी टंचाई व पाणीपुरवठ्याची समस्या हा होता. यावेळी सचिन घरत आणि सचिन राजे येरुणकर यांनी सेक्टर १५, १६, १७ व १८ येथील रहिवाशांच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरात लवकर नवीन जलवाहिनी (पाईपलाईन) टाकण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. याशिवाय नागरिकांनी मांडलेल्या विविध नागरी समस्या व अडचणी संयमाने ऐकून घेत, संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासनही देण्यात आले. या जनता दरबारास सुमारे ६०० रहिवाशांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या. अनेक नागरिकांनी आपल्या प्रश्नांचे समाधान झाल्याची भावना व्यक्त करत कार्यक्रमाचे कौतुक केले. ००००

 रत्न व दागिने उद्योगाला महाराष्ट्र शासनाचा भक्कम पाठिंबा

ज्वेल ट्रेण्ड्झ जेम्स अँड ज्वेलरी शो इंडिया २०२६ मध्ये कुशल कारागिरांच्या कल्याणावर भर मुंबई, ३ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्र शासनाचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज मुंबईतील विलेपार्ले (पूर्व) येथील हॉटेल सहारा स्टार येथे ज्वेल ट्रेण्ड्झ जेम्स अँड ज्वेलरी शो इंडिया (JTGJS) २०२६ च्या २२ व्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले. ज्वेल ट्रेण्ड्झ आयोजित या सहा दिवसीय बी२बी प्रदर्शनात १५० हून अधिक आघाडीचे दागिने उत्पादक, १०० हून अधिक प्रदर्शक, तसेच १२ देशांतील ५,००० हून अधिक नोंदणीकृत किरकोळ विक्रेते आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी झाले असून, भारतीय रत्न व दागिने उद्योगासाठी हे प्रदर्शन देशातील अग्रगण्य व्यावसायिक व्यासपीठ म्हणून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यावेळी बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले, “रत्न व दागिने उद्योग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक रोजगारनिर्मिती करणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून देशाच्या निर्यातीत त्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कौशल्य विकास, नावीन्य आणि उद्योजकतेच्या माध्यमातून या उद्योगाला आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. शाश्वत विकास आणि जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या उद्योगामागे महाराष्ट्र शासन ठामपणे उभे आहे. लाखो कुशल कारागिरांचे कल्याण तितकेच महत्त्वाचे आहे. दागिने उद्योगातील कुशल कामगारांना आवश्यक आर्थिक सुरक्षा आणि संरक्षण मिळावे यासाठी सर्वसमावेशक विमा व सामाजिक सुरक्षा व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने शासन उद्योग संघटनांसोबत सकारात्मकरीत्या काम करेल. उद्योगाच्या समस्या सोडवून त्याची दीर्घकालीन स्पर्धात्मकता अधिक बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” ज्वेल ट्रेण्ड्झ जेम्स अँड ज्वेलरीचे  गोविंद वर्मा म्हणाले, “JTGJS हे केवळ व्यापार प्रदर्शन नसून भारतीय रत्न व दागिने उद्योगाची ताकद, नावीन्य आणि जागतिक स्पर्धात्मकता अधोरेखित करणारे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. यंदाच्या प्रदर्शनात देश-विदेशातील आघाडीचे प्रदर्शक सहभागी झाले असून सोने, हिरे, जडाऊ, टेंपल, अँटिक आणि फॅशन ज्वेलरी सह मौल्यवान रत्ने, अत्याधुनिक यंत्रसामग्री, नाविन्यपूर्ण पॅकेजिंग सोल्यूशन्स आणि आधुनिक दागिने उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात आले आहे.” ज्वेल मेकर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जीवनलाल शाह म्हणाले, “भारतातील लाखो कुशल कारागीर हे रत्न व दागिने उद्योगाचा कणा आहेत. त्यांना योग्य ओळख, कौशल्य विकास, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सक्षमीकरण मिळाल्यास भारताचे जागतिक नेतृत्व अधिक मजबूत होईल. व्यापारी, खरेदीदार आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा मोठ्या प्रमाणावर झालेला सहभाग नव्या व्यावसायिक संधी निर्माण करेल आणि मुंबईची ‘भारताची ज्वेलरी कॅपिटल’ म्हणून ओळख अधिक दृढ करेल. महाराष्ट्रातील मालाड, बोरिवली आणि दहिसर परिसरातील हिरे उद्योगांमधून सुमारे दोन लाख हिरे कारागीर, दोन लाख सुवर्णकार आणि सुमारे एक लाख अन्य कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आमची दृष्टी केवळ सोन्याच्या दागिन्यांपुरती मर्यादित नाही. चांदी, प्लॅटिनम आणि इतर मौल्यवान धातूंमधील आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे, कारागिरांचे सक्षमीकरण करणे आणि जागतिक रत्न व दागिने उद्योगात भारताचे नेतृत्व अधिक बळकट करणे हा आमचा संकल्प आहे.” पुढील सहा दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार असून उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते, निर्यातदार आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार यांना नेटवर्किंग, नव्या बाजारपेठांचा शोध आणि व्यावसायिक भागीदारीसाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. JTGJS २०२६ मुळे भारताचे जागतिक रत्न व दागिने व्यापारातील स्थान अधिक मजबूत होण्याबरोबरच मुंबईची ‘भारताची ज्वेलरी कॅपिटल’ म्हणून ओळख अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ००००

ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी स्मार्ट कार्ड व मोफत बस पास शिबिर उत्साहात संपन्न

औचित्य माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे मुंबई, दि. (प्रतिनिधी) :  ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार  संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड तसेच नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा मोफत बस पास काढून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक  सुनिल कुरकुटे,  नगरसेवक प्रभाग क्रमांक १९ यांच्या पुढाकारातून, भारत ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यंत आनंदमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात हे शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन नवी मुंबई परिवहन समितीचे सदस्य राजेश राय, नगरसेवक सुनिल कुरकुटे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष  मारुती विश्वासराव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले तसेच  संदीप नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. नगरसेवक  सुनिल कुरकुटे यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मध्य रेल्वेच्या बोर्डावर सल्लागार सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिकांना नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा मोफत बस पास मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल परिवहन समितीचे सदस्य  राजेश राय यांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ०००००

अभिनेता ऋषिकेश कानडे काळाच्या पडद्याआड

अवघ्या ३८‌व्या वर्षी घेतली ‘एक्झिट’ मुंबई : पुण्यातील एक हरहुन्नरी आणि अतुलनीय अभिनेता ऋषिकेश कानडे याचे आज पहाटे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्याचे वय अवघे ३८ वर्षांचे होते.  अजात शत्रु असलेला ऋषिकेश एक प्रगल्भ अभिनेता तर होताच पण देशप्रेमाने पूर्ण भारलेला होता. तो मुख्य भूमिका करत असलेल्या ‘मी भारतीय ‘ ह्या दिर्घांकाचे जवळपास ३०० प्रयोग करतांना  त्याच्या देशप्रेमाचे प्रत्यंतर यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्यान देताना तो महाराजमय होऊन जायचा. त्याने केलेल्या प्रत्येक भूमिका तो जगला, त्यामुळे प्रेक्षकांच्या ह्रदया पर्यंत पोहोचला. त्याला राज्य नाट्य स्पर्धेत दोन वर्ष अभिनयाच्या रौप्य पदकाने गौरवले होते. त्याच्या पश्चात आई-वडील, बहिण आणि पत्नी असा परिवार आहे. ३ ऑगस्टला संध्याकाळी ऋषिकेशवर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वत:चा ऑनलाईन फिटनेस क्लब चालवणाऱ्या ऋषिकेशच्या निधनाने पुण्याच्या रंगकर्मींमधे हळहळ व्यक्त होत आहे. ००००

 ‘लँड टायटलिंग’ कायदा अंमलात आणून प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविणार- चंद्रशेखर बावनकुळे

१५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवर  बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार…! कणकवली(प्रतिनिधी )–सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधुनिक पद्धतीने  ‘ड्रोन सर्वेक्षण’ करून प्रत्येक मालमत्तेला ‘प्रॉपर्टी कार्ड ‘देण्याची योजना राबविण्यात येणार.त्यासाठी दोनशे सर्व्हेअर्सना परवाने  देऊन हंगामी स्वरूपाची नियुक्ती करण्यात येणार आहे. भविष्यात लँड टायटलिंग कायदा  लागू करून शासनमान्य  मालकी हक्काचे कार्ड देण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच नोंदणीपूर्वी मोजणी आणि त्यानंतर फेरफार करण्याची नवी व्यवस्था कायद्याद्वारे लागू केली जाईल अशा घोषणा राज्याचे  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या. राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत ‘आयोजित महसूल समाधान शिबिराच्या निमित्ताने आटोजीत करण्यात आलेल्या समारंभात बावनकुळे बोलत होते. ३१ मार्च २०२७ पर्यंत जिल्ह्यातील सर्व शेत रस्त्यांचे सीमांकन, मोजणी, अतिक्रमण हटवून क्रमांक देण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये महसूल समाधान शिबिरे आयोजित करण्यात आली असून, शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याचे बावनकुळे म्हणाले. या शिबिरात प्राप्त झालेल्या नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. १ जानेवारी २०११ पूर्वीच्या सरकारी जागांवरील घरांचे सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना पट्टे देण्यात येणार असून, १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवरील ले-आउट मध्ये बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी  जाहीर केला. सिंधुदुर्गचे  पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करताना, जिल्ह्याची बदनामी करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. आवश्यक तेथे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, मात्र प्रामाणिक नागरिक व शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. जनतेच्या हिताचे निर्णय प्रत्यक्षात पोहोचविणारे मंत्री म्हणजे बावनकुळे अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बावनकुळे यांच्या कामाचे कौतुक केले. बावनकुळे यांच्या कार्यशैलीतून आम्ही शिकतो, तरुण मंत्र्यांसाठी ते आदर्श आहेत असे गौरवोदगार राणे यांनी काढले. बावनकुळे यांनी आपल्या भाषणात राणे  बंधूंचे तोंड भरून कौतुक केले. मत्स्य व्यवसाय आणि बंदर खात्याचे मंत्री म्हणून नितेश राणे हे अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहेत शिवाय हे खातं ते प्रभावीपणे सांभाळत आहेत अशा शब्दात त्यांनी नितेश राणे यांचा गौरव केला. आमदार निलेश राणे यांच्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, विधानसभेत ते महसूल विभागाशी संबंधित विषय अत्यंत अभ्यासपूर्ण, तळमळीने आणि जनहिताची भूमिका घेऊन मांडत आहेत. त्यांनी सिंधुदुर्गच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यांनी मांडलेल्या महसूल विभागाच्या सर्व विषयांवर निर्णय घेण्याचे मी वचन देतो, असे त्यांनी यावेळी  स्पष्ट केले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा माजी महसूल मंत्री नारायण राणे यांच्या कार्याचाही गौरव करत, महसूल मंत्री म्हणून नारायण राणे यांनी घेतलेल्या अनेक दूरदृष्टीच्या निर्णयांचा पाया आजही भक्कम आहे. त्या निर्णयांना पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. कोकण दौऱ्यावर येण्यापूर्वी मी त्यांचा आशीर्वाद घेतला, असेही त्यांनी सांगितले. कोकणात झालेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणांची महसूल विभागाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणांच्या चौकशीसाठी २० अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे ही समिती मागील दहा वर्षांच्या कागदपत्रांची चौकशी करणार आहे. या तपासात य चौकशीत जे कोणी अधिकारी कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री बावनकुळे यांनी काल रत्नागिरी येथे बोलताना केले शेतकऱ्यांना कर्ज देणे ही बँक आणि महसूल विभागाची जबाबदारी आहे. कोकणात सातबारावर अनेक नावे असतात.परंतु कर्ज देताना संमती पत्र मिळणं अवघड होऊन जातं त्यामुळे बँका कर्ज देत नाहीत तेव्हा हमीपत्रावर कर्ज देण्याबाबत शासन विचार करीत असून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

 २५ लाखांच्या भाड्यावरून वाद

महापालिकेकडे वाहने असूनही, खाजगी यंत्रसामग्री भाड्याने घेण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात मिरा -भाईंदर : शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी एका खाजगी कंपनीकडून अंदाजे २५ लाख रुपये खर्च करून दोन हायड्रॉलिक बूम लिफ्ट (मॅन लिफ्ट) भाड्याने घेण्याच्या महानगरपालिकेच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्ष आणि नागरिकांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. महानगरपालिका प्रशासनाचे म्हणणे आहे की, भारतीय हवामान विभाग आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या तात्काळ छाटण्याचे निर्देश देण्यात आले, ज्यामुळे अतिरिक्त यंत्रसामग्रीची गरज निर्माण झाली. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिकेकडे आधीपासूनच उपलब्ध असलेली दोन हायड्रॉलिक वाहने शहरभरातील काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी पुरेशी नव्हती. वेळखाऊ नियमित निविदा प्रक्रियेमुळे, ही तातडीची गरज भागवण्यासाठी विविध कंपन्यांकडून दरपत्रके मागवण्यात आली. सर्वात कमी दर देणाऱ्या कंपनीकडून चालक, ऑपरेटर आणि इंधनासह दोन यंत्रे भाड्याने घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कामासाठी अंदाजे २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाअंतर्गत नवीन हायड्रॉलिक यंत्रे खरेदी करण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला असून, त्यासाठी आर्थिक आणि प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तथापि, विरोधी पक्ष आणि नागरिक प्रश्न विचारत आहेत की, महानगरपालिकेकडे आधीपासूनच दोन हायड्रॉलिक वाहने आहेत आणि त्यांचा पूर्ण वापर का केला गेला नाही. शिवाय, कायमस्वरूपी उपाय म्हणून नवीन यंत्रे खरेदी करण्याऐवजी ती भाड्याने घेण्याचा निर्णय का घेण्यात आला आणि नियमित निविदा प्रक्रियेऐवजी तात्पुरती पद्धत का अवलंबण्यात आली. या प्रश्नांमुळे प्रशासनाच्या निर्णयावर वाद निर्माण झाला आहे. ०००००