सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल वसुलीची निविदा प्रसिद्ध…!

 स्थानिकांना सवलत, सूट नाही..!

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )–गेली अनेक वर्ष रखडलेला मुंबई -गोवा राष्ट्रीय  महामार्गाचे चौपदरीकरण (एनएच -६६) येत्या मे, २६ अखेरपर्यंत पूर्ण  करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली असतानाच आता या महामार्गावरील टोल वसुलीच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि कसाल  यांच्यामध्ये असलेल्या ओसरगाव टोल नाक्यावर लवकरच टोल वसुलीला सुरुवात होणार आहे.

या टोल नाक्यावर वसुलीसाठी यापूर्वी एका एजन्सीला  नियुक्ती देण्यात आली होती.मात्र १४ जून २०२३ रोजी वसुलीला सुरुवात होताच सर्व राजकीय पक्ष  आणि टोल विरोधी कृती समितीच्या झेंड्याखाली एकत्र झालेल्या सिंधुदुर्गवासीयांनी वसुली बंद पाडली होती. त्यानंतर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत गेली तीन वर्षे टोल नाका सुरू करून वसुली करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. मात्र आता याबाबतच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या असून १७ एप्रिल ला या संदर्भात ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

२०१२ सालापासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले असून येत्या मे, २६ अखेर ते पूर्णत्वास जाईल अशी घोषणा गडकरी यांनी १० एप्रिल रोजी खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आयोजित करण्यात आलेल्या समारंभात बोलताना केली होती.  त्यानंतर आठवड्याभरातच टोल वसुलीची निविदा काढण्यात आली आहे. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या निविदेमध्ये कणकवली शहराजवळचा जानवली पूल ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग- गोवा सीमा) या ६० किलोमीटरच्या लांबीच्या महामार्गासाठी दुचाकी आणि तीन आसनी वाहने वगळता उर्वरित सर्व वाहनांच्या टोल वसुलीसाठी संस्था निश्चित केली जाणार आहे.दरवर्षी या वाहनांकडून टोलच्या स्वरूपात  स्वरूपात ५८ कोटी रुपयांचा महसूल   मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

ओसरगाव टोल नाक्यावरील  टोल वसुलीला सुरुवात झाल्यानंतर जून महिन्यापासून महामार्गावरील सर्व टोल नाके सुरू करण्याची प्रक्रिया महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. या टोल वसुलीतून स्थानिक वाहनांना वगळण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते मात्र निविदेमध्ये स्थानिक वाहनांना टोल करातून वगळण्याबाबत कोणताही उल्लेख नाही मात्र इतर वाहनांपेक्षा स्थानिक वाहनांना काही प्रमाणात सवलत देण्यात आल्याचे निविदे वरून स्पष्ट होत आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मोटार गाड्या जीप आणि व्हॅन यासारखी हलकी वाहने जाण्याचे प्रमाण वाहतुकीचे प्रमाण हलक्या वाहनांचे वाहतुकीचे प्रमाण ४९ टक्के आहे बस आणि ट्रक दोन ऍक्सल वाहनांचे प्रमाण २७% मल्टी ऍक्सल वाहनांचे प्रमाण १९% असल्याचे नियोजित निविदेत निविदेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *