मुंब्रा पोलिस स्टेशनमध्ये दिले निवेदन
दिवा- मनसे दिवा तर्फे शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याची मागणी करत मुंब्र्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. मनसेचे साबे विभाग अध्यक्ष प्रकाश दत्ता पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार, २० एप्रिल रोजी शेतकऱ्यांविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत कलम १५ व १७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्याच्या एफआईआरमध्ये काही शेतकऱ्यांची नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित शेतकरी हे प्रत्यक्षात निर्दोष असून काही भूमाफियांनी त्यांच्या जमिनींवर कब्जा करण्याच्या उद्देशाने त्यांना या प्रकरणात अडकवले आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी अनेक वेळा संबंधित कार्यालये व तहसील कार्यालयात तक्रारी देखील दिल्याचे सांगण्यात आले आहे. मनसेने पोलिस प्रशासनाला विनंती केली आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्पाप शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा व चुकीने दाखल झालेल्या गुन्ह्यातून त्यांची नावे वगळावीत. याप्रकरणी योग्य तो निर्णय न घेतल्यास पुढील काळात मनसेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
