वनविभागाचा भोंगळ कारभार

 

 शहापूरात धक्कादायक वास्तव उजेडात

अविनाश उबाळे

ठाणे – शहापूर उपवनसंरक्षकांच्या कार्यक्षेत्रातील डोळखांब वनपरीक्षेत्र हद्दीतील कळभोंडे लाद्याचीवाडी येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात कृष्णा भागा आगीवले या १० वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक अशी घटना घडली.या घटनेमुळे शहापूर तालुक्यात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहापूर वनक्षेत्रा लगत ज्या गाव पाड्यांवर बिबट्याचा वावर दिसतो आहे. अशा लोकांच्या तक्रारी नंतरही जंगलात वनविभागाकडून वेळीच पिंजरे लावण्यात येत नाहीत परिणामी वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या अक्षम्य निष्काळजीपणा मुळे बिबट्याच्या हल्ल्यात एका निष्पाप बालकाचा जीव गेला आहे. जर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे वेळेवर पिंजरे लावले असते तर बालकावर हल्ला करणारा हा नरभक्षक बिबट्या वनविभागाला वेळीच जेरबंद करता आला असता पण लोकांच्या तक्रारी नंतरही याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.हे पिंजरे जंगलात वेळेवर लावण्यात येत नाहीत किंवा या लोखंडी पिंजऱ्यांचा पुरवठा देखील संबंधित वनपरिक्षेत्र कार्यालयांना न केल्याने हे लाखो रुपये खर्चून खरेदी केलेले शेकडो सरकारी लोखंडी पिंजरे चक्क आसनगाव काष्ट विक्री आगारात भंगारात पडून असल्याचे संतापजनक असे चित्र येथे दिसत आहे.हे पिंजरे संबंधित वनपरिक्षेत्र कार्यालयांना वेळेवर पुरविण्यात आलेले नाहीत अशी माहिती आता समोर येत आहे.संबधित जबाबदार सहाय्यक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या अक्षम्य निष्काळजीपणा मुळे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी लाखो रुपयांचा सरकारी निधी खर्च करुन आणलेले हे लोखंडी पिंजरे येथे अक्षरशः अस्ताव्यस्त अवस्थेत टाकून देण्यात आले आहेत.काही पिंजरे वाफे नर्सरी येथे देखील पडून आहेत.यामध्ये वनविभागाने यापूर्वी खरेदी केलेले पिंजरे देखील आहेत तर काही नव्याने खरेदी केलेले शेकडो पिंजरे येथे दिसून येत आहेत जुन्या लोखंडी पिंजऱ्यांची देखभाल न ठेवण्यात आल्याने या पिंजऱ्यांना गंज चढून त्यांची दुरावस्था झाल्याचे दिसत आहेत.जुने पिंजरे येथे असताना देखील मोठ्या प्रमाणावर नवीन पिंजऱ्यांची खरेदी करण्यात आलेली  दिसत आहे.नवीन खरेदी केलेले पिंजरे काष्ट विक्री आगारात भंगारात पडून असल्याचे संतापजनक चित्र पाहावयास मिळत आहे.या प्रकारामुळे वनविभागाचा भोंगळ कारभार समोर येत आहे.वनविभागाच्या प्रादेशीक विभागाच्या शहापूर उपवनसंरक्षक,कार्यालयाच्या,शहापूर,धसई,डोळखांब,वाशाळा,विहीगाव,खर्डी या सहा वनपरिक्षेत्रीतील जंगलात जर बिबट्याचा कुठे वावर जंगला शेजारील गाव वस्त्यांमध्ये आढळून आल्यास नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना म्हणून जंगलात सुरक्षितपणे बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी हे लोखंडी पिंजरे जंगलात बसविण्यात येतात यासाठी हे पिंजरे खरेदीसाठी वनविभागाकडून लाखो रुपयांचा निधी दरवर्षी खर्च करण्यात येतो परंतु हे पिंजरे फक्त शोभेसाठी खरेदी करून कंत्राटदार व व स्वतःच्या फायद्यासाठी शासनाच्या पैशांची ही उधळपट्टी केली जात आहे.असा आरोप नागरिकांकडून आता केला जातो आहे.खरेदी केलेल्या पिंजऱ्यांची योग्य अशी देखभाल ठेवली जात नाही पिंजऱ्यांची योग्य देखभाल न ठेवल्याने यातील अनेक लोखंडी पिंजऱ्यांना आता गंज चढून ते  भंगार जमा झाले आहेत.नवीन खरेदी केलेले पिंजरे देखील आसनगाव काष्ट विक्री आगारात पडून आहेत.शहापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अक्षरशःबेफिकिर व निष्काळजीपणामुळे हे शेकडो लोखंडी पिंजरे येथे भंगारात पडून असल्याचे धक्कादायक असे वास्तव दिसत आहे.याकडे प्रादेशिक वनविभागाने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे.

प्रतिक्रिया –

आसनगाव काष्ट विक्री आगारात आणलेले नवीन पिंजरे हे संबंधित वनपरिक्षेत्र कार्यालयांना पाठवण्यात आले आहेत.तसेच पिंजऱ्यां संदर्भात अधिक सविस्तर माहिती प्लॅन सेक्शन मधून घेऊन तुम्हाला या संदर्भात माहिती देतो.

अभिजीत पिंगळे सहाय्यक वनसंरक्षक वनविभाग,शहापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *