०००००००००००
अनिल ठाणेकर
ठाणे- गावदेवी मंडईत केवळ भाजी व फळे विक्रीचीच परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी आज लक्षवेधी सूचनेद्वारे केली. तसेच ठाणे अग्निशमन दलातील रिक्त पदे भरण्यासाठी तत्काळ प्रक्रिया सुरू करावी, अशी आग्रही मागणी नगरसेवक संजय वाघुले यांनी केली.
गावदेवी मंडई व परिसरातील अतिक्रमणांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमणांमध्ये वाढ होत गेली. मंडईच्या प्रवेशद्वारा बाहेर ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर मेहेरनजर करण्यात आली. मंडईच्या भोवती टपऱ्यांना परवानगी दिली गेली. त्यामुळे मंडईमध्ये आगीचा धोका निर्माण झाला होता. त्याबाबत सातत्याने इशारा देऊन प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप नगरसेवक संजय वाघुले यांनी केला.
गावदेवी मंडईच्या आग प्रकरणातून धडा घेऊन महापालिकेने मंडईची पुनर्उभारणी करताना अग्निप्रतिबंधक उपाय योजना कराव्यात, गावदेवी मंडईत व्हेंटिलेशन होण्यासाठी प्रवेशद्वारावरील बेकायदा फेरीवाले हटवावेत, मंडईच्या इमारतीलगत उभारलेल्या बेकायदा टपऱ्या व गाळे जमीनदोस्त करावेत, गावदेवी मंडईसह महापालिकेच्या आस्थापना, मॉल, शॉपिंग सेंटर येथे नियमित फायर ऑडिट करावे. अन्यथा, संबंधित आस्थापना तातडीने बंद कराव्यात, अशी मागणी संजय वाघुले यांनी केली.
नगरसेवक संजय वाघुले यांनी गावदेवी मंडईचा इतिहास लक्षवेधी सूचनेत मांडला. जुन्या ठाणे शहरातील महर्षी कर्वे रस्त्यावर १९७५ पर्यंत ८० ते ९० भाजीविक्रेते बसत होते. ठाण्याच्या नगराध्यक्षपदी स्व. सतीशजी प्रधान यांच्या कारकिर्दीत धर्मवीर आनंद दिघे, माजी आमदार मो. दा. जोशी साहेब यांनी पुढाकार घेऊन १९७८ ते १९८० च्या काळात आरक्षित उद्यानात मंडईसाठी जागा दिली. काही वर्षानंतर १९९९ च्या सुमारास महापालिकेने मंडईचा पुनर्विकास केल्यानंतर तेथे १५४ ओटले उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २००२ मध्ये मंडई तोडून नवा आराखडा तयार केल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये एकूण १५५ ओटले तयार करण्यात आले. काही वर्षानंतर गावदेवी मंडईत फळ व भाजीविक्रीऐवजी मोठ्या प्रमाणावर रेडिमेड कपडे विक्री करणारी दुकाने थाटली गेली, अशी माहिती देत यापुढील काळात केवळ भाजी व फळे विक्रीचीच परवानगी द्यावी, अशी मागणी संजय वाघुले यांनी केली.
