०००००००००
ठाणे: वसईच्या ऐतिहासिक लढाईत पोर्तुगीजांचा पराभव करून मराठा साम्राज्याचा भगवा फडकविणारे थोर पराक्रमी योद्धा चिमाजी आप्पा यांच्या शौर्याचा गौरव व्हावा, यासाठी ठाण्यातील घोडबंदर रोडला त्यांचे नाव देऊन वसई विजय मोहिमेत योगदान देणाऱ्या सर्व मराठा योद्ध्यांच्या स्मरणार्थ भव्य “वसई विजय स्मारक” उभारावे, अशीही मागणी धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली आहे.या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ठाणे महानगरपालिकेच्या महापौरांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, इ.स. १७३९ मधील वसई विजय मोहिमेमुळे मराठा साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण पर्व निर्माण झाले. या मोहिमेचे नेतृत्व चिमाजी आप्पांनी केले असले तरी मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, मानाजी आंग्रे यांच्यासह अनेक मराठा सरदार आणि शूर सैनिकांचे योगदान मोलाचे होते.त्यामुळे घोडबंदर रोडला चिमाजी आप्पांचे नाव देण्याबरोबरच रस्त्याच्या प्रारंभ आणि समाप्तीच्या प्रमुख ठिकाणी “वसई विजय स्मारक” उभारून त्यावर मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व प्रमुख मराठा योद्ध्यांची नावे, त्यांचे योगदान आणि वसई विजयाचा इतिहास नमूद करावा, अशी मागणी धनगर प्रतिष्ठानने केली आहे.
धनगर प्रतिष्ठानच्या मते, अशा स्मारकामुळे नागरिकांसह युवा पिढीला मराठ्यांच्या शौर्यगाथेची माहिती मिळेल, इतिहासाबद्दल अभिमान निर्माण होईल आणि वसई विजय मोहिमेतील सर्व वीरांना योग्य आदरांजली वाहिली जाईल. त्यामुळे या मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *