रमेश औताडे
मुंबई : आरक्षणाच्या उपवर्गीकरण विरोधात मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित सर्वपक्षीय मोर्चात आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा (आंरिमो) महाराष्ट्र प्रदेशने मोठ्या ताकदीने सहभाग नोंदविला. राज्याच्या विविध भागांतून हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाल्याने आझाद मैदान परिसर घोषणांनी दुमदुमून गेला.
मोर्चा पूर्वी आंरिमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवत, सामाजिक न्याय आणि संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा लढा असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी संभाजीनगर, अहमदनगर, शिर्डी, नाशिक, कसारा आणि इगतपुरी असा दौरा करत कार्यकर्त्यांना एकत्रित केले आणि त्यानंतर हजारोंच्या जथ्यासह आझाद मैदानावरील मोर्चात सहभाग घेतला.
या मोर्चात आंरिमोचे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चादरम्यान आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, संविधानातील आरक्षण व्यवस्थेला धक्का लावणारे कोणतेही धोरण स्वीकारले जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. तसेच सरकारने सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करून अनुसूचित जातींच्या आरक्षणात कोणताही बदल करू नये, अशी मागणी करण्यात आली.
000000000
