Month: June 2026

फुगाळे येथील २५ ते ३० कुटुंबे रेशन धान्यापासून वंचित असल्याची तक्रार

अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील फुगाळे येथील रास्त भाव दुकानाच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या असून दर महिन्याला सुमारे २५ ते ३० शिधापत्रिकाधारक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.विशेषतःमे आणि जून २०२६ या दोन महिन्यांचे धान्य अनेक लाभार्थ्यांना अद्याप मिळाले नसल्याची तक्रार संबंधित नागरिकांनी शहापूर तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात केली आहे. गावातील शिधापत्रिकाधारकांनी सांगितले की, शासनाकडून गरीब व गरजू कुटुंबांसाठी वितरित करण्यात येणारे धान्य हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र फुगाळे येथील रास्त भाव दुकानातून अनेक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नसल्याने त्यांना मोठ्या आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अनेक वेळा दुकानावर जाऊनही धान्य उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते किंवा विविध कारणे देऊन लाभार्थ्यांना परत पाठविले जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात गावातील काही रेशनधारकांनी प्रत्यक्ष धान्य मिळत नसल्याचा व्हिडिओ तयार करून संबंधित प्रशासनाकडे पाठविला आहे. या व्हिडिओमध्ये लाभार्थी आपली व्यथा मांडताना दिसत असून अनेक कुटुंबांना धान्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.सध्या पावसाळ्याची सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील अनेक मजूर कुटुंबांना नियमित रोजगार उपलब्ध झालेला नाही. शेतीची कामे अद्याप पूर्णपणे सुरू नसल्याने अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत आहेत.अशा परिस्थितीत शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य हेच अनेक कुटुंबांसाठी जगण्याचा आधार ठरत असते.मात्र हे धान्य वेळेवर मिळत नसल्याने संबंधित कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,फुगाळे येथील रास्त भाव दुकानाच्या कामकाजाची तातडीने चौकशी करण्यात यावी, मे व जून २०२६ चे थकीत धान्य त्वरित लाभार्थ्यांना वितरित करण्यात यावे आणि भविष्यात कोणतेही कुटुंब धान्यापासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्यात यावी. शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचावा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कायम राहावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी श्री पुष्टीपती गणेश मंदिरात महाआरती

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपद भूषविण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मागाठाणे विधानसभेतर्फे श्री पुष्टीपती गणेश मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले…

– सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचा ‘एम बीबीएस’चा ९८.९४ टक्के निकाल….!

९५ पैकी ९४ विद्यार्थी उत्तीर्ण …! सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची एम बी बी एसची पहिली बॅच आता आरोग्य सेवेसाठी सज्ज झाली असून महाविद्यालयातील ९५ पैकी ९४ विद्यार्थी  उत्तीर्ण झाले असून ९८.९४ टक्के निकाल लागला आहे. २०२१ साली सेना -भाजपा युती सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या सिंधुदुर्गनगरीत,जिल्हा रुंग्णालयाच्या भव्य संकुलात हे महाविद्यालय सुरु झाले. महाविद्यालय सुरु झाले तेव्हा कसल्याच सोयी सुविधा नाहीत.स्वतःचे म्हणून असे काहीच नाही. जिल्हा रुंग्णालयाच्या  इमा तींमध्ये आपला संसार थाटला. कोणत्याही मूलभूत, पायाभूत सोयीसुविधा नाहीत.त्यातच जुन्या इमारतींची  पाडापाडी, वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुंग्णालय या दोघांचा संसार एकाच संकुलात सुरु झाला. महाराष्ट्र वैद्यकीय विदयापीठाचा काल निकाल आल्यानंतर अधिष्ठाता डॉ. अनंत दवांगे, त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक,अधिकारी, कर्मचारी वर्ग या सर्वांनी आनंद व्यक्त केला. नव्याने सुरू झालेल्या या महाविद्यालयात सुरुवातीची दोन -तीन वर्ष परिस्थिती अत्यंत प्रतिकुल होती.अनेक अडचणी होत्या, साधनांची कमतरता, पूर्णपणे तयार नसलेली व्यवस्था आणि नवीन वातावरण. सुरुवातीला सगळ्यांनाच जुळवून घ्यावे लागले. विभाग तयार होत होते, आणि शिकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती. महाविद्यालयात वरिष्ठ विद्यार्थी नसल्यामुळे त्यांचेही  मार्गदर्शन नव्हते. त्यामुळे ही पहिली ‘बॅच’ खऱ्या अर्थाने ‘पायोनियर’ ठरली अशी प्रतिक्रिया सहाय्यक प्राध्यापक (मेडिसिन )डॉ. गौरव घुर्ये यांनी व्यक्त केली आहे. या सगळ्या अडचणी असूनही विद्यार्थ्यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतः अभ्यास केला, एकमेकांना मदत केली आणि उपलब्ध संधींचा योग्य उपयोग केला. शिक्षकांनीही खूप सहकार्य केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चार-साडेचार वर्षांच्या प्रवासात हे विद्यार्थी खूप काही शिकले.फक्त अभ्यासच नाही तर परिस्थितीशी जुळवून घेणे, आत्मविश्वासाने काम करणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे. त्यांचा प्रवास सोपा नव्हता, पण त्यांनी मेहनतीने तो पूर्ण केला. ‘एमबीबीएस’ पूर्ण केल्याने   ते डॉक्टर झालेच पण त्यांचे यश हे या महाविद्यालयाची मजबूत पायाभरणी ठरली आहे.  अडचणी असल्या तरी मेहनत आणि जिद्दीने यश मिळवता येते.हे त्यांच्या यशामुळे सिद्ध झाले आहे. भविष्यात हे महाविद्यालय विस्तीर्ण होईल आणि प्रगतीचे नवीन टप्पे गाठेल यात शंका नाही. सिंधुदुर्ग वासियांसाठी आरोग्याच्या सुविधा टप्प्याटप्प्याने अत्युच्च दर्जाच्या  होतील असा विश्वास डॉ.घुर्ये यांनी व्यक्त केला आहे. या यशाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे,शिंदे सेनेचे स्थानिक आमदार डॉ.निलेश राणे, उबा ठा चे माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थी,महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनंत दवांगे,सर्व प्राध्यापक वर्ग ,अधिकारी ,कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. प्रथम क्रमांक- गायत्री शिवराम शिर्के ७४.२२% व्दितीय क्रमांक- मिथ जयेश जोशी ७३.२२% तृतीय क्रमांक- सानिका भाऊसाहेब चौगुले ७१.५०% 00000000

 भांडुपकरांची पाण्यासाठी वणवण

– पालिकेच्या निष्काळजीपणाविरोधात जल अभियंत्यांकडे धाव  डोंगराळ भागातील नागरिकांचा संताप उफाळला! मुंबई : भांडुप विधानसभा क्षेत्रात पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, विशेषतः डोंगराळ भागातील रहिवाशांना अपुऱ्या व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी नळांना अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने ते डोंगराळ भागात पोहोचत नाही. परिणामी नागरिकांना पिण्याचे व दैनंदिन वापराचे पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर भांडुपमधील पाणीपुरवठा व प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज वरळी येथे जल अभियंता दिलीप पाटील यांच्या दालनात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगरसेवक सुरेश शिंदे,  नगरसेविका दिपमाला बडे, राजोल संजय पाटील, शाखाप्रमुख राजेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत भांडुपमधील डोंगराळ भागात पाणी पुरेशा दाबाने पोहोचत नसल्याचा मुद्दा अत्यंत ठामपणे मांडण्यात आला. अनेक वर्षांपासून नागरिक या समस्येला सामोरे जात असताना पालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली. विशेषतः उंच भागातील वस्त्यांमध्ये नळांना पाणीच न येणे किंवा अत्यल्प दाबाने येणे ही बाब प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे द्योतक असल्याचा आरोप करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जल अभियंत्यांकडे डोंगराळ भागात पाणी वरपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पंपिंग व्यवस्था, जलवाहिन्यांचे सक्षमीकरण तसेच कमी दाबाच्या भागांसाठी विशेष तांत्रिक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली. तसेच खालच्या भागातही जास्तीत जास्त आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी सांगितले. दरम्यान, भांडुपकरांना मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना पालिका प्रशासन मात्र केवळ बैठका व आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. उन्हाळ्यात आणि वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. बैठकीत नागरिकांच्या पाणीप्रश्नावर तातडीने कार्यवाही करून डोंगराळ भागातील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. आता पालिका प्रशासन प्रत्यक्ष कृती करून भांडुपकरांचा पाणीप्रश्न सोडवते की पुन्हा एकदा आश्वासनांचीच मालिका सुरू राहते, याकडे संपूर्ण भांडुपकरांचे लक्ष लागले आहे.

स्वीकाराचा संवेदनशील प्रवास मांडणारा ‘बाप्या’

मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच सामाजिक वास्तवाशी निगडित विषयांना प्राधान्य दिले आहे. दिग्दर्शक समीर तिवारी यांचा ‘बाप्या’ हा चित्रपट ट्रान्स-मेनच्या अस्तित्वाचा विषय अत्यंत संवेदनशील आणि समजूतदारपणे पडद्यावर आणतो. कोकणातील एका छोट्याशा गावात…

शिक्षण धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

प्रति शिक्षणमंत्र्याला चपलांचा हार ठाणे-देशभरात नीट पेपर फुटी प्रकरण चांगलेच गाजले आहे या पाठोपाठच सीबीएससी पेपर घोटाळा देखील उघडकीस आला असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे यात काही…

 स्कॉर्पिओला कट मारण्याच्या वादातून गोळीबार

 भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला लागली गोळी दोन गटांतील सहा जण अटकेत कल्याण : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी येथील तुलसा पार्क इमारतीसमोर स्कॉर्पिओला स्कुटीने कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर झाले. दोन गटांतील हाणामारीदरम्यान झालेल्या गोळीबारात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला गोळी लागली. जखमीवर डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून, कोळसेवाडी पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या तक्रारीवरून स्वतंत्र गुन्हे दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे. तसेच दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास प्रेम अजय सिंह उर्फ गुंडा यांच्या स्कॉर्पिओला सुदर्शन संजीव निकाळे उर्फ बुंदी यांच्या स्कुटीने कट मारल्याने दोन्ही गटांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन तुलसा पार्क इमारतीसमोर दोन्ही गट आमनेसामने येत हाणामारी सुरू झाली. यावेळी प्रेम सिंहच्या गटातील ज्ञानेश्वर उर्फ ज्ञानू रमेश राठोड याने कथितरित्या देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला. भांडण सोडवण्यासाठी गेलेले चक्की नाका येथील राहुल अशोक वर्मा यांच्या कमरेखाली गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदर्शन निकाळे यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात प्रेम अजय सिंह उर्फ गुंडा आणि ओंकार धोंडीराम जगदाळे यांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. एका आरोपीवर सेंट्रल रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळावरून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. दरम्यान, सनी किरण कटारे यांच्या तक्रारीवरून दाखल दुसऱ्या गुन्ह्यात सुदर्शन संजीव निकाळे उर्फ बुंदी, संजय शर्मा, कार्तिक पवार आणि पवन चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-३) अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने हे तपासावर लक्ष ठेवून आहेत. 000000000

रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला ओला चालकाने मारहाण केल्याची घटना ज्युपिटर रुग्णालयाजवळ घडली. या दुर्घटनेत जखमी झालेले ७० वर्षीय सरोश दस्तुर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ ज्युपिटर रुग्णालयात…

 कल्याण पूर्वेतील यु टाईप रस्ता बाधितांचे केडीएमसी मुख्यालयासमोर धरणे आंदोलन

– पुनर्वसनाबाबत ठोस भूमिका जाहीर करण्याची केली मागणी कलम २६० च्या नोटिसा स्थगित; पुनर्वसन क्लस्टर योजनेद्वारे त्याच ठिकाणी होणार कल्याण : कल्याण पूर्वेतील यू-टाईप रस्त्याच्या रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुनर्वसन कृती समितीच्या वतीने गुरुवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाकडे पुनर्वसनाबाबत ठोस भूमिका जाहीर करण्याची मागणी केली. कल्याण पूर्व भागातील काटेमानीवली नाका ते तिसगाव नाका या यू-टाईप रस्त्यावरील बाधित नागरिकांच्या पुनर्वसन कृती समितीने गुरुवारी दिलेल्या आवाहनानुसार संपूर्ण कल्याण पूर्व बाजारपेठ बंद ठेवून पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रचंड उन्हात मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक व दुकानदार उपस्थित होते. जवळ पास १८०० लोक यात बाधित होणार आहे. त्यात ८०० च्या वर रहिवासी व इतर छोटे मोठे दुकानदार आहेत. आयुक्तांनी चर्चेसाठी बोलावल्यावर शिष्टमंडळ मिटींगसाठी गेले. मात्र यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांनी काही महिला पदाधिकारी व वरिष्ठ नागरिकांना नाहक धक्काबुक्की करून आंदोलन खराब करण्याचा प्रयत्न केला. फक्त पाच लोक सोडू म्हणत पुनर्वसन कृती समितीचे अध्यक्ष उदय रसाळ यांना ही त्यांनी धक्का बुक्की करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. आयुक्तांसोबत झालेल्या दीर्घ चर्चेत प्रशासनाने  दिलेल्या सर्व कलम २६० च्या नोटिसा तात्काळ स्थगित करण्यात येणार. बाधित नागरिकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेद्वारे करण्यात येईल. कोणालाही अनधिकृत ठरवून हटवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही अशी आश्वासने दिली. या आंदोलनास काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नवीन सिंग यांनी पाठिंबा दिला. क्लस्टर योजनेचे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी मुद्देसूद मांडणी केली. तर समितीचे अध्यक्ष उदय रसाळ, उपाध्यक्ष विष्णु जाधव, सचिव दुर्गेश फडोल व ज्ञानेश डुंबरे यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहून चर्चा केली.

वनार्टीच्या जागावाटपात धनगर समाजावर अन्याय

 ८ जूनची परिपत्रके रद्द करा – बिरू कोळेकर ठाणे,  वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) यांनी ८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या विविध विद्यार्थी योजना परिपत्रकांमधील VJNT प्रवर्गाच्या जागावाटपात धनगर समाजावर (NT-C प्रवर्ग) अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे राज्य संघटक, मुख्य प्रवक्ता तथा आयटी व मीडिया प्रमुख बिरू कोळेकर यांनी याबाबत इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदन सादर करून सर्व परिपत्रके तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. कोळेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्र शासनाच्या मूळ आरक्षण रचनेनुसार VJ-A – ३ टक्के, NT-B – २.५० टक्के, NT-C – ३.५० टक्के आणि NT-D – २ टक्के असे आरक्षणाचे प्रमाण आहे. या प्रमाणाचे १०० टक्क्यांमध्ये रूपांतर केल्यास VJ-A – २७ टक्के, NT-B – २३ टक्के, NT-C – ३२ टक्के आणि NT-D – १८ टक्के असे वाटप होणे अपेक्षित आहे. मात्र वनार्टीच्या परिपत्रकांमध्ये VJ-A – ४० टक्के, NT-B – २२.५० टक्के, NT-C – २२.५० टक्के आणि NT-D – १५ टक्के असे वाटप करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.शासनाच्या मूळ आरक्षण रचनेनुसार धनगर समाजाचा समावेश असलेल्या NT-C प्रवर्गाचा वाटा सर्वाधिक असताना त्याला केवळ २२.५० टक्के वाटा देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये, स्पर्धा परीक्षा उमेदवारांमध्ये आणि युवकांमध्ये नाराजी निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून वनार्टीने कोणत्या शासन निर्णय, कायदेशीर तरतूद अथवा धोरणाच्या आधारे हे वाटप केले, याची माहिती सार्वजनिक करावी. तसेच ८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली सर्व परिपत्रके रद्द करून महाराष्ट्र शासनाच्या मूळ आरक्षण टक्केवारीनुसार नव्याने व न्याय्य पद्धतीने जागावाटप करावे, अशी मागणी बिरू कोळेकर यांनी केली आहे.दरम्यान, या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास धनगर समाजासह VJNT प्रवर्गातील विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघटनांच्या वतीने राज्यव्यापी लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही बिरू कोळेकर यांनी दिला आहे.