दिल्लीत महाराष्ट्राचा डंका
करंडक आयुक्त दीपक सिंगला यांच्याकडे सुपूर्त
पुणे : भारतीय शालेय स्पर्धा महासंघाच्या शालेय क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाची हॅटट्रिकचा पराक्रम महाराष्ट्राने केला आहे. विजेतेपदकाचा करंडक क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त दीपक सिंगला यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.
नुकत्याच दिल्लीत संपन्न झालेल्या भारतीय शालेय स्पर्धा महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाराष्ट्राला विजेतेपदाच्या करंडकाने गौरविण्यात आले. शालेय खेळ महासंघाचे अध्यक्ष दिपक कुमार यांच्या हस्ते उपसंचालक संजय सबनीस, उपसंचालक उदय जोशी, सहाय्यक संचालक चंद्रशेखर साखरे व क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी राज्याचा वतीने विजेतेपदाचा करंडक स्वीकारला. याप्रसंगी देशभरातील राज्य प्रतिनिधी उपस्थित होते. याबरोबरच महाराष्ट्र राज्याने शालेय आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या निवड चाचणीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल ही राज्याचा गौरव करण्यात आला
गतविजेत्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करीत ६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतही महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपदाचा पराक्रम केला आहे. १८७ सुवर्ण, १६९ रौप्य, १९०कांस्य अशी एकूण ५४६ पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने अव्वल स्थानाचे शिखर सर केले आहे. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात विजेतेपदकाचा करंडक क्रीडा व युवक सेवा संचलनालय आयुक्त दीपक सिंगला यांच्याकडे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी यांनी सूपूर्त केला आहे. यावेळी उपसंचालक संजय सबनीस, क्रीडा अधिकारी अरुण पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या खेळाडूंचे अभिनंदन करून आयुक्त दिपक सिंगला म्हणाले की, वरिष्ठ, युवा गटाप्रमाणेच शालेय स्पर्धेतही महाराष्ट अव्वल आहे. या यशाचे खेळाडूंसह त्यांचे प्रशिक्षक, पालक, संघटक या सर्वांनीच कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी खेळाडूंच्या पाठी शासन खंबीरपणे उभे असेल.
हरियाणा ,दिल्ली या बलाढ्य संघांना मागे टाकून महाराष्टाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली आहे. हरियाणाने १२१ सुवर्ण, ९६ रौप्य, ९६ कांस्य पदकांसह एकूण ३१३ पदके जिंकून दुसरे स्थान प्राप्त केले. दिल्लीचा संघ १०७ सुवर्ण, ११६ रौप्य, ९४ कांस्य पदकांसह एकूण ३१७ पदके जिंकून तिसर्या स्थानावर राहिला. स्पर्धेत महाराष्ट्राचे २५२८ क्रीडापटू सहभागी झाले होते. ४२ खेळातील १५५ क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या यशाचा डंका देशभरात वाजला आहे.
शालेय गट, १८ वर्षांखालील युवा गट व वरिष्ठ गटात विजेतेपदाची हॅटट्रिक महराष्ट्राने केली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा,खेलो इंडिया युवा स्पर्धा प्रमाणेच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांना क्रीडा व युवक सेवा संचलनालकडून रोख बक्षिस देण्याची परंपरा आहे. सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना अनुक्रमे रू.११२५०, रू.८९५०, रू.६७५० तसेच सहभागी खेळाडूंनाही रू. ३७५० रूपयांचे रोख शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत आहे.
