जाळीच्या कंपाऊंडमुळे वन्यजीव अडचणीत; प्राणीमित्र संतप्त

मुकुंद रांजाणे ( माथेरान )

माथेरानच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर डोंगरदऱ्यांनी  व्यापलेला असून घनदाट वनराई अशी ख्याती असलेल्या माथेरान मध्ये पूर्वीपासून जंगलात मुक्या प्राण्यांचा वावर होता तो आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.परंतु सद्यस्थितीत येथील जुन्या बंगल्यांची विक्री होत गेल्याने काही नवीन मालकांनी बंगल्याच्या भोवती संपूर्ण भागात जाळीचे कंपाऊंड टाकण्यास सुरुवात केल्यामुळे जंगल भागातील मुक्या प्राण्यांच्या अधिवासावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे साहजिकच आगामी काळात ह्या प्राण्यांच्या संख्येत घट होणार असून त्यांचा मुक्तसंचार लुप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

येथील एल्फिन्स्टन बंगल्याच्या नवीन मालकाने जवळपास ३६ एकरांवर असणाऱ्या या बंगल्याच्या सभोवताली जाळीचे कंपाऊंड करत असल्याने हे केलेले कंपाउंड योग्य नसून मुक्या प्राण्यांच्या मुक्तसंचारावर गदा येत आहे.या बंगल्याच्या जवळच मंकी पॉईंट आणि मॅलेट स्प्रिंग हे पाण्याचे स्त्रोत असल्याने याठिकाणी जंगली प्राणी आपली पाण्याची तहान भागवत असतात. परंतु येथील घनदाट जंगलात असणाऱ्या एल्फिन्स्टन बंगल्याच्या नवीन मालकाने बंगल्याच्या सभोवताली तारेचे कंपाउंड केल्याने मुक्या प्राण्यांच्या अधिवासावर गदा आली आहे. यासाठी हे कंपाऊंड ताबडतोब काढून टाकण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी अनेक दिवसांपासून केलेली असून  याबाबत  लेखी पत्र व्यवहार संबंधित विभागाकडे केलेला असताना देखील अद्यापही याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी एक दिवस या भागात येऊन हे कंपाऊंड काढायला हवे असा दिखावा केला होता परंतु काहीच योग्य कारवाई करण्यात आलेली नाही. वनखात्याचे वनपाल यांनीही फक्त एक दिवस नाममात्र पाहणी केली होती.त्यानंतर याभागात कुणीही प्रशासकीय अधिकारी वर्ग फिरकलेले नाहीत त्यामुळे निश्चितच यामागे राजकीय वरदहस्ताने मोठे अर्थकारण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

————————————

माथेरान स्थळासाठी वेगळी नियमावली असून जंगल भाग असल्याने मुक्या प्राण्यांच्या अधिवासाकरिता कोणत्याही वास्तूला कंपाऊंड करता येत नाही.आम्ही लेखी निवेदने देऊनही नाममात्र चार ते पाच जाळ्या काढण्याचा दिखावा नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी केलेला आहे.बाकी सर्व जाळ्या आजही तशाच आहेत. वनखात्याचे अधिकारी सुध्दा मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांनाही आपल्या कर्तव्याची जाण नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

संतोष शिंदे—उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *