एक पत्रकार रेल्वेत १५ तास बेशुद्ध तरीही कुणाला माहिती नाही
मुंबई / रमेश औताडे
तब्बल पंधरा तास एक पत्रकार बेशुद्धावस्थेत लोकल ट्रेनच्या डब्ब्यात पडून आहे आणि तरीही रेल्वे प्रशासन किंवा पोलिसांना याची खबरही नाही. असे एक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या रेल्वे पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच यापुढे अशा घटना घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी लोकांचे दोस्त संघटनेच्या वतीने मध्य रेल्वेच्या महा व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.
लोकांचे दोस्त संघटनेचे चे अध्यक्ष रवि भिलाणे यांनी मध्य रेल्वे महा व्यवस्थापक यांचे उपसचिव उमंग दुबे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच रेल्वेच्या सार्वजनिक तक्रार विभागात तक्रार नोंदवली.निवेदन देताना ज्योती बडेकर, संजीता मालणकर, प्रकाश महिपती कांबळे इतर संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पत्रकार संजय नागनाथ शिंदे (वय वर्षे ६०) हे मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये १५ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत जवळपास पंधरा तास बेशुद्ध अवस्थेत होते. शिंदे हे नेहमीप्रमाणे १५ एप्रिल २०२६ रोजी धारावी परिसरात वार्तांकन करत होते. ते दुपारी चार वाजेच्या सुमारास मध्य रेल्वेच्या सायन ( शीव ) रेल्वे स्थानकावर ट्रेन पकडण्यासाठी पोहोचले. मात्र, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
संजय शिंदे यांच्या मोबाईल ची रिंग वाजत होती. पण कोणीही फोन घेत नव्हते. त्यांची काळजी वाटल्याने त्यांच्या धारावी परिसरातील मित्रांनी संध्याकाळी उशिरा धारावी पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार दिली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या पत्नी सुषमा संजय शिंदे आणि मुलगा राहुल संजय शिंदे यांनी ते रहात असलेल्या डोंबिवली येथील स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार देऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
१६ तारखेला सकाळी सात वाजेच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी राहुल संजय शिंदे यास मोबाईल वरून कळविले की संजय शिंदे हे कल्याण रेल्वे स्थानकात आहेत. त्यानुसार कुटुंबियांनी तिकडे धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील खाजगी क्लिनिक मध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केल्याचे आढळून आले. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शिंदे हे सकाळी सहा साडेसहा च्या दरम्यान टिटवाळा रेल्वे स्थानकात, मुंबईकडे जाण्यासाठी यार्ड मधून आलेल्या लोकल ट्रेन मध्ये आढळून आले होते.
इतर प्रवाशांनी कळविल्यावरून पोलिसांनी त्यांना कल्याण रेल्वे स्थानकात उतरवून घेतले होते. पोलिसांनी त्यांना कल्याण स्थानकातील खासगी क्लिनिक मध्ये दाखल केल्यानंतर त्यांना दोन सलाईन लावली गेली. त्याचे चार हजार रुपये बिल घेऊन त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले. मात्र संजय शिंदे यांची प्रकृती अतिशय गंभीर व चिंताजनक झाली होती. ते बेशुद्धच होते. म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तिथूनच कल्याण पश्चिम येथील होली क्रॉस रुग्णालयात दाखल केले. तिथे आय सी यू मध्ये दोन दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तेव्हा त्यांची प्रकृती सुधारली. रुग्णालयाचे साठ हजार रुपये बिल भरून कुटुंबीयांनी त्यांना घरी आणले. अजूनही त्यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत.त्यांना गाडीतून उतरवताना पोलिसांनी मारहाण केल्याची आणि उर्मटपणे वागवल्याची शिंदे कुटुंबीयांची तक्रार आहे.
