स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी यांचे मत
ठाणे : सॅटीस पुलावर एस. टी.च्या शिवशाही बसला आग लागल्यानंतर ठाणे अग्निशमन दलाच्या गाडीला पोचण्यासाठी किमान २० ते २५ मिनिटांचा अवधी लागला. मात्र, दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या आवारात तात्पुरत्या स्वरुपात अग्निशमन दलाची गाडी ठेवली असती. तर घटनास्थळी ५ ते १० मिनिटांत अग्निशमन दलाचे जवान पोचून शिवशाही बसची आग लवकर आटोक्यात येऊन बस खाक झाली नसती, असे मत भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी व्यक्त केले.
ठाणे तहसील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीच्या एकत्रित पुनर्विकासात अग्निशमन केंद्राची जागाही घेण्यात आली. त्यामुळे येथील केंद्र साकेत येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. ठाणे रेल्वे स्टेशन, होलसेल मार्केट, पोलिस आयुक्तालय, सिव्हील हॉस्पीटल अशी महत्त्वाची ठिकाणे असल्याच्या पार्श्वभूमीवर दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या आवारात तात्पुरत्या स्वरुपात अग्निशमन दलाची गाडी ठेवण्याची गरज आहे, याकडे नगरसेविका नम्रता कोळी यांनी महापालिकेचे लक्ष वेधले होते. मात्र, त्याची अग्निशमन दलाकडून दखल घेण्यात आली नव्हती. यापुढील काळात आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पोचण्यासाठी अग्निशमन दलाचा एक बंब ठेवण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली आहे.
