उल्हासनगर–अंबरनाथ–बदलापूरपर्यंत विस्ताराचा मार्ग मोकळा

कल्याण :मेट्रो-५ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या विस्तारित मार्गिकेसाठी तब्बल १८ हजार १३० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे कल्याण ते उल्हासनगरदरम्यान मेट्रो सेवा लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून पुढे अंबरनाथ–बदलापूरपर्यंत विस्ताराचीही शक्यता निर्माण झाली आहे.

या विस्तारित मार्गिकेत मेट्रो-५ धामणकर नाका ते दुर्गाडी तसेच कल्याण रेल्वे स्थानकापासून खडकपाडा मार्गे उल्हासनगर पर्यंत धावणार आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर येथील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुलभ आणि वेळ वाचवणारा ठरणार आहे. विशेषतः उल्हासनगर आणि कल्याणमधील नागरिकांना थेट ठाण्याशी जोडणी मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.

या प्रकल्पासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनी याबाबत राज्याचे एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले.

दरम्यान, या विस्तारित मार्गिकेची एकूण लांबी ३४.२१ किमी असून त्यामध्ये १९ स्थानकांचा समावेश आहे. प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण होणार असून पहिल्या टप्प्यात कापूरबावडी ते धामणकर नाका, तर दुसऱ्या टप्प्यात धामणकर नाका ते दुर्गाडी असा मार्ग असेल. पुढे ‘५अ’ मार्गिकेद्वारे दुर्गाडी–कल्याण–उल्हासनगर असा विस्तार करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर परिसरातील सुमारे ६९ लाख नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. सध्याच्या तुलनेत प्रवासाच्या वेळेत ४० ते ५० टक्क्यांपर्यंत बचत होणार असून वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

प्रकल्पासाठी आवश्यक केंद्र आणि इतर विभागांच्या मंजुरी प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. एकूणच, मेट्रो-५च्या विस्तारामुळे ठाणे जिल्ह्यातील उपनगरांमधील कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार असून भविष्यातील नागरी विकासाला गती मिळणार आहे.

०००००००००००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *