५ तालुक्यांमध्ये वीज यंत्रणा कोलमडली
हरिभाऊ लाखे
नाशिक : राज्यात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू असतानाच, नाशिकच्या ग्रामीण भागाला मान्सूनपूर्व वादळी पावसाने झोडपून काढले आहे. ३, ५ आणि ६ जून रोजी आलेल्या या वादळी पावसाने जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणेची अक्षरशः दैना उडवली आहे. वादळाचा सर्वाधिक फटका इगतपुरी, दिंडोरी, ओझर, सिन्नर आणि पेठ या पाच उपविभागांना बसला असून, यामुळे तब्बल चार हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या पायाभूत सुविधांचे अभूतपूर्व नुकसान झाले असून, यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
या संदर्भात महावितरणच्या नाशिक ग्रामीण विभागाकडून माहिती देण्यात आली. वाद‌ळ आणि मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसरात शेकडो वीज खांब उन्मळून पडले असून, अनेक किलोमीटर लांबीच्या ओव्हरहेड वीज वाहिन्या तुटल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, १५४ उच्च दाब खांब आणि ३२० लघु दाब खांब जमीनदोस्त झाले आहेत. या शिवाय, २४ किलोमीटर लांबीच्या उच्च दाबाच्या आणि ५५.५ किलोमीटरच्या लघु दाबाच्या ओव्हरहेड वाहिन्या तुटल्या आहेत.
या वादळामुळे ९ वितरण रोहित्र केंद्रे पूर्णपणे कोसळली असून तीन मोठ्या उपकेंद्रांमधील उपकरणांचे गंभीर नुकसान झाले आहे, ज्यामुळे प्रादेशिक वितरण नेटवर्क पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले. अनेक भागातील घरगुती आणि निवासी भागातील वीज पुरवठा यशस्वीरित्या पूर्ववत करण्यात आला असून, कोणतीही गावे आता अंधारात नसल्याचा दावाही केला जात आहे. सध्या केवळ शेती पंपांचा प्रलंबित वीज पुरवठा खंडित असून, तो देखील टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे.
सिन्नरला सर्वाधिक फटका
या आपत्तीचा सर्वाधिक फटका सिन्नर तालुक्याला बसला, जेथे तीन हजारांहून अधिक ग्राहकांना सलग दोन दिवस १४ तासांपेक्षा अधिक काळ विजेविना काढावा लागला. दुसरीकडे, पेठ उपविभागात उच्च दाबाच्या पायाभूत सुविधांचे सर्वाधिक नुकसान झाले असून ४६ उच्च दाबाचे खांब कोसळले आहेत, तर दिंडोरीमध्ये घरगुती वीज वितरण यंत्रणेला मोठा फटका बसून ९३ लघु दाबाचे खांब कोसळले.
वीज पुरवठा सुरळीत कधी होणार ?
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, सिन्नर आणि दिंडोरीमधील वीज पुरवठा येत्या एक-दोन दिवसांत पूर्णपणे सुरळीत होईल. मात्र, पेठ तालुक्यातील दुरुस्तीच्या कामात मोठे भौगोलिक अडथळे येत आहेत. येथील वीज यंत्रणा दुर्गम आणि डोंगरी भागात विखुरलेली असल्याने तेथे दुरुस्ती साहित्य वाहून नेणे आव्हानात्मक ठरत आहे, परिणामी तेथील काम पूर्ण होण्यास अधिक काळ लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *