गरिबांच्या अन्नावर घाला
मिरा -भाईंदर : मिरा-ईंदर शहरातील हजारो रेशनकार्डधारकांना नावावर अचानक ऑनलाइन प्रणालीतून गंडांतर आले असून, गेल्या ८ ते १० महिन्यांपासून केशरी आणि पिवळ्या रेशनकार्डमधील हजारो नावे गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी गरीब आणि गरजू कुटुंबांना सरकारी अन्नधान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
भाईंदर पूर्व येथील स्व. इंदिरा गांधी उड्डाणपुलाखाली असलेल्या एकमेव रेशनिंग कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रेशनकार्डवर नावे दिसत असली तरी ऑनलाइन प्रणालीमध्ये ती नावे गायब असल्याचे सांगून नागरिकांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी अर्ज केल्यानंतर “६० दिवस प्रतीक्षा करा” असे सांगितले जाते. मात्र ६० दिवस उलटल्यानंतरही नावे अपडेट होत नसल्याने नागरिकांना पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागते. या दिरंगाईमुळे हजारो कुटुंबांचे रेशन महिनोनमहिने बंद झाले आहे.
१० महिन्यांपासून रेशन बंद
अनेक गृहिणींनी सांगितले की, रेशन घेण्यासाठी गेल्यानंतर कळले की, घरातल्यांची नावे प्रणालीतून गायब झाली आहेत. तेव्हापासून सतत पाठपुरावा करूनही अद्याप नावे अपडेट झालेली नाहीत. त्यामुळे जवळपास वर्षभर कुटुंब रेशनपासून वंचित राहिले आहे.
स्थानिकांच्या आरोपानुसार, कार्यालयात कामे वेळेत होत नसल्याने दलालांचे जाळे सक्रिय असून सर्वसामान्य नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक तक्रारी आणि लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महागाईच्या झळा सोसत असलेल्या गरीब कुटुंबांना आता बाजारभावाने धान्य खरेदी करण्याची वेळ आली असून प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
रेशनकार्ड धारकांची नावे ऑनलाइन प्रणालीतून गायब होण्यामागचे नेमके कारण काय, याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने संभ्रम वाढला आहे. हजारो गरीब कुटुंबाच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने या गंभीर प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून तातडीने नावे पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *