००००००००
मिरा-भाईंदर, परिवहन मंत्र्यांचा अवमान करणा-या मिरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्त, सहाय्यक आयुक्त, नगर अभियंतावर ‘शिस्तभंगाची’ कुऱ्हाड चालविली गेली आहे.मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे आणि राजशिष्टाचाराच्या गंभीर उल्लंघनामुळे अखेर पालिका प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार आली आहे.
१५ एप्रिल २०२६ रोजी मिरा-भाईंदर (पश्चिम) येथील क्रीडा संकुल व सभागृह इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला होता. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेचा मसुदा तयार करताना स्थानिक पालिका प्रशासनाने राज शिष्टाचाराचे नियम धाब्यावर बसवले. सदर पत्रिकेत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे नाव प्रोटोकॉलनुसार सन्मानपूर्वक समाविष्ट करण्यात आले नव्हते. या संदर्भात मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत राज्य शासनाचा प्रोटोकॉल पाळला जात नसल्याची तक्रार *महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री  प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. याच संदर्भात राजशिष्टाचाराच्या अधिकाऱ्यांमार्फत केलेल्या तपासात गेल्या १५ एप्रिल रोजी पार पडलेल्या क्रीडा संकुल आणि सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यात राज्याचे माननीय परिवहन मंत्री यांच्या नावाचा राजशिष्टाचारानुसार निमंत्रण पत्रिकेत समावेश न केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, मुख्य राजशिष्टाचार अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गंभीर ताशेरे ओढले आहेत.
लोकप्रतिनिधींचा आणि पर्यायाने कॅबिनेट मंत्र्यांचा झालेला हा अवमान गंभीर दखलपात्र मानून संबंधित मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि नगर अभियंता यांच्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली होती. या तक्रारीनंतर राजशिष्टाचार विभागाने ठाणे जिल्हाधिकारी आणि मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवला होता. या चौकशीअंती समोर आलेली तथ्ये धक्कादायक आहेत.
सदर कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेचा मसुदा निवासी उपजिल्हाधिकार्‍यांकडून तपासून व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असताना, तसे न करताच ती थेट छापण्यात आली आणि निमंत्रण पत्रिकेत लोकप्रतिनिधींची व मंत्र्यांची नावे राजशिष्टाचारानुसार न छापल्यामुळे ‘प्रोटोकॉलचा भंग’ झाल्याचे राजशिष्टाचार विभागाच्या अभिप्रायात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिका ही नगरविकास विभागाच्या अधिपत्याखाली येत असल्याने, राजशिष्टाचार विभागाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांनी नगर विकास विभागाला थेट कारवाईचे निर्देश दिले आहेत. राजशिष्टाचाराचा भंग केल्याप्रकरणी आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि नगर अभियंता यांच्यावर तात्काळ शिस्तभंगविषयक कारवाई करणे आवश्यक असल्याचा स्पष्ट अभिप्राय या पत्रात नोंदवण्यात आला आहे.
या धक्कादायक अहवालामुळे आता मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नगर विकास विभाग यावर काय आणि कधी कारवाई करणार, याकडे संपूर्ण राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *