0000000000
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सहा खासदारांनी सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. सत्तेसाठी लाचार झालेल्या खासदारांनी लोकशाही, जनमत आणि जनतेशी गद्दारी केली असून विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपाचा हा सुनियोजित खेळ असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या १२ वर्षांत लोकशाही आणि संविधान कमकुवत करण्याचे काम केले आहे. देशात सक्षम विरोधी पक्ष राहू नये, ही मानसिकता भाजपामध्ये वाढीस लागली असून त्यातूनच विविध पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला गेले असून त्यांनी केवळ पक्षाशीच नव्हे तर जनतेने दिलेल्या कौलाशीही विश्वासघात केला आहे, असे त्या म्हणाल्या.
भाजप विरोधकांना संपवण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या सर्व नीतींचा वापर करत असल्याचा आरोप करताना गायकवाड म्हणाल्या की, इतर पक्षांतील आमदार आणि खासदारांना फोडणे हा भाजपाचा राजकीय उद्योग बनला आहे. यापूर्वी राज्यात ‘५० खोके, एकदम ओके’ हा प्रकार चर्चेत आला होता. आता या सहा खासदारांची बोली किती कोटींना लागली, हेही लवकरच जनतेसमोर येईल, असा टोला त्यांनी लगावला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीने भाजपाविरोधात एकजुटीने लढा दिला होता. जनतेनेही भाजपाविरोधात कौल दिला होता. मात्र, ज्यांच्यासाठी महाविकास आघाडीने दिवस-रात्र प्रचार केला, त्याच काही लोकांनी सत्तेसाठी भूमिका बदलली, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे त्या म्हणाल्या.
“सत्तेच्या मोहापोटी लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका बदलणे ही लोकशाहीसाठी धोक्याची बाब आहे. पैशाने विकले जाणाऱ्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी,” अशा शब्दांत वर्षा गायकवाड यांनी संबंधित खासदारांवर निशाणा साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *