Author: bittambatami.com

योगीधाम चौक ते सिटिपार्क रस्त्याच्या कामाची नगरसेविका अनघा देवळेकर यांनी केली पाहणी                                                

कल्याण :  कल्याण पश्चिमेतील योगीधाम चौक ते सिटी पार्क कडे जाणाऱ्या रस्त्याचे क्राँक्रटीकरणाचे काम सुरु असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी  या रस्त्याचे काम पुर्ण होण्यासाठी शिवसेना नगरसेविका अनघा  देवळेकर यांनी अधिकारी आणि,कार्यकर्ता सह पाहणी…

 ठाण्यातील बेवारस वाहनांवर पालिकेची मोठी कारवाई

खासगी एजन्सीद्वारे थेट लिलावाची मोहीम ठाणे : शहरातील रस्ते आणि मोकळ्या मैदानात वर्षानुवर्षे पडून असलेल्या बेवारस व नादुरुस्त वाहनांवर आता ठाणे महापालिकेने कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. खासगी एजन्सीच्या माध्यमातून वाहनमालकांचा शोध घेऊन नोटिसा बजावल्या जाणार असून, प्रतिसाद न मिळाल्यास संबंधित वाहनांचा थेट लिलाव करून विल्हेवाट लावण्यात येणार आहे. ठाणे शहराच्या रस्त्यावर आणि मोकळ्या मैदानात पडून असलेल्या नादुरुस्त वाहनांमुळे शहराचे विद्रूपीकरण होण्याबरोबरच वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठाणे महापालिकेने पुणे महापालिकेच्या धर्तीवर नियोजनबद्ध मोहीम हाती घेतली आहे. पालिकेकडून यापूर्वी नागरिकांना वारंवार आवाहन करूनही रस्त्यांवरील भंगार वाहनांचा प्रश्न कायम राहिला होता. त्यामुळे आता ‘मे. गंगामाता वाहन शोध संस्था’ या खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित संस्थेकडून वाहनांचा तपशील शोधणे, मालकांशी संपर्क साधणे, नोटिसा बजावणे, आरटीओकडून माहिती मिळवणे तसेच पुढील लिलाव प्रक्रिया राबवणे अशी संपूर्ण जबाबदारी पार पाडली जाणार आहे. सध्या ठाणे महापालिकेकडून उचलण्यात आलेली अनेक बेवारस वाहने पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरील बाटा कंपाऊंड, खारेगाव पारसिकनगर तसेच मुंब्रा अग्निशमन केंद्रामागील मोकळ्या जागेत ठेवण्यात आली आहेत. या वाहनांची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, वाहनांचे नंबर उपलब्ध नसल्यास इंजिन किंवा चेसिस क्रमांकावरून मूळ मालकांचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर वाहनमालकांना दोन वेळा नोटीस पाठवली जाईल. तरीही वाहन हटवले नाही, तर संबंधित वाहनांचा प्रादेशिक परिवहन विभागामार्फत दर ठरवून लिलाव करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी आवश्यक परवानग्या संबंधित संस्थेने घेतल्या असून, ठाणे महापालिका, आरटीओ आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून ही मोहीम राबवली जाणार आहे. वाहतूक व्यवस्थेला दिलासा पालिकेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ रस्त्यांवरीलच नव्हे तर विविध प्राधिकरणांकडून जप्त करून वर्षानुवर्षे पडून असलेल्या वाहनांचीदेखील याच माध्यमातून विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यामुळे शहरातील मोकळ्या जागा उपलब्ध होण्याबरोबरच वाहतूक व्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांना इशारा महापालिकेने नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, रस्त्यांच्या कडेला दीर्घकाळ नादुरुस्त अवस्थेत उभी असलेली वाहने संबंधित मालकांनी स्वतः हटवावीत. अन्यथा पालिका ती वाहने उचलून नेऊन त्यांचा लिलाव करणार आहे. काय असेल प्रक्रिया? वाहनांचे नंबर, इंजिन व चेसिस क्रमांकावरून मालकांचा शोध आरटीओकडून वाहनमालकांची माहिती संकलित वाहन मालकांना दोन वेळा नोटीस प्रतिसाद न मिळाल्यास वाहनांचा लिलाव लिलावातून मिळणाऱ्या रकमेतील हिस्सा पालिका, वाहनमालक आणि एजन्सीकडे जाणार ००००००

गावदेवी मार्केट पुनर्वसनासाठी पालिकेचे ‘मिशन क्लिनिंग’

१ जूनपूर्वी गाळेधारकांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे नियोजन ठाणे : गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका प्रशासनाने आता मार्केट परिसराच्या पुनर्वसनासाठी ‘मिशन क्लिनिंग’ मोहीम हाती घेतली आहे. यासाठी तब्बल ९० कामगार दोन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून युद्धपातळीवर राडारोडा हटविणे आणि साफसफाईचे काम सुरू असून १ जूनपर्यंत १५५ गाळेधारकांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. गुरुवारी पहाटे गावदेवी भाजी मार्केटला भीषण आग लागून संपूर्ण परिसर हादरला होता. या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे (४२) आणि सुरक्षा रक्षक काळू गाडेकर (५५) यांचा गुदमरून मृत्यू झाला, तर तीन अग्निशमन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान, अशा दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे. आपत्कालीन सेवा आणि अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षण रकमेत वाढ करण्याबाबतही पालिका लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच नुकसानग्रस्त गाळ्यांचे पंचनामे सुरू असून त्यानंतर नुकसान भरपाई प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सध्या गावदेवी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात साफसफाई सुरू आहे. त्यानंतर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि फायर ऑडिट करण्यात येणार आहे. ऑडिट अहवालानुसार आवश्यक दुरुस्ती, रंगरंगोटी आणि विद्युत यंत्रणेची कामे पूर्ण झाल्यानंतर गाळेधारकांना पुन्हा त्याच जागेवर स्थलांतरित करण्यात येणार आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले अग्निशमन केंद्र अधिकारी सुजीत पाष्टे (४०), सहाय्यक केंद्र अधिकारी प्रशांत मुथ्या (४३) आणि अग्निशमन प्रणेता समीर जाधव (४३) यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिघांची प्रकृती स्थिर असून सोमवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ०००००००

आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी अधिका-यांसमवेत सायकलवर केला नवी मुंबई पाहणी दौरा

नवी मुंबई 🙁 अशोक गायकवाड )—पंतप्रधान महोदयांनी पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने व त्यानुसार महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त “एक कृतार्थ संध्याकाळ” कार्यक्रमाचे आयोजन

अशोक गायकवाड पनवेल : कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हा आणि नवीन पनवेल शाखेच्यावतीने कोकण मराठी साहित्य परिषदेचे सल्लागार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त “एक कृतार्थ संध्याकाळ” या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार २६ मेला सायंकाळी ५.३० वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात “लोकनेता” या प्रतिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन, निमंत्रितांचे कवी संमेलन तसेच अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, लोकनेते रामशेठ ठाकूर, पानिपतकार ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ कवी व चित्रपट निर्माते दिग्दर्शक रामदास फुटाणे, सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, कोमसापचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ, ज्येष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे, युवा नेते नगरसेवक परेश ठाकूर, सुप्रसिद्ध गझलकार ए.के.शेख तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रा.एल.बी.पाटील, आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोमसापचे गणेश कोळी आणि संजय गुंजाळ यांनी केले आहे.

बल्याणीत पतीने केली पत्नीची हत्या               

पती पोलिसांच्या ताब्यात कल्याण : कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बल्याणी येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने अमानुष मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून सुरू झालेला वाद काही क्षणांत रक्तरंजित हत्येत बदलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश काळुराम वाघे उर्फ गुड्डू (वय २१) याला पत्नी सारिका उर्फ रुक्सार हिच्या चारित्र्यावर संशय होता. या कारणावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. शनिवारी पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात सतीश याने घरातील टीव्ही उचलून पत्नीच्या डोक्यात मारला. त्यानंतरही तो थांबला नाही. घरातील हंड्याने तिच्या डोक्यावर वारंवार प्रहार करत तिला गंभीर जखमी केले. या क्रूर मारहाणीत सारिका उर्फ रुक्सार हिचा जागीच मृत्यू झाला. घरातून आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. संशयाच्या विळख्यात अडकलेल्या संसाराचा असा भीषण अंत झाल्याने बल्याणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 एडिबल ऑईलच्या नावाखाली बेकायदेशीर डिझेलची वाहतूक करणारा टँकर जप्त

४६.५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत जिल्हाधिकाऱ्यांचे कडक कारवाईचे निर्देश ठाणे :मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ ठाणे शहर गुन्हे शाखा घटक-१ आणि शिधावाटप विभागाच्या संयुक्त पथकाने एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा एक मोठा टँकर या पथकाने जप्त केला असून या कारवाईत तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी संबंधित टँकरवर ‘ईडीबल ऑईल’ (खाद्यतेल) असे लिहिण्यात आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी चालकासह एकूण ८ जणांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा घटक-१ ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खारेगाव टोलनाक्याच्या अगोदर, मुंब्रा वळण रस्त्याजवळ सापळा रचण्यात आला होता. या ठिकाणी संशयास्पद टाटा कंपनीचा टँकर (क्रमांक MH-46-BB-7१३4) थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील द्रव पदार्थ आढळून आला. टँकर चालकाकडे या डिझेल सदृश पदार्थाची वाहतूक करण्याचा कोणताही परवाना, खरेदी बिल किंवा वैध कागदपत्रे नव्हती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपनियंत्रक शिधावाटप विभाग, ठाणे यांच्या आदेशानुसार शिधावाटप अधिकारी  सुभाष रामनाथ डुंबरे व त्यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या संयुक्त तपासणीत टँकरच्या ५ कप्प्यांमध्ये एकूण २५,००० लिटर बेकायदेशीर डिझेल सदृश पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये २४ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २५,००० लिटर डिझेल सदृश पेट्रोलियम पदार्थाचा आणि २२ लाख रुपये किमतीच्या टाटा टँकरचा समावेश आहे. नियमानुसार तपासणी अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून रासायनिक चाचणीसाठी नमुने गोळा केले असून, टँकर व इतर मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. प्राथमिक तपासणीत महत्वाची माहिती समोर आली असून सर्व आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून विरार खाडीच्या किनारी बोटीमधून आणलेले डिझेल टँकरमध्ये भरले होते आणि ते नाशिकच्या दिशेने घेऊन जाण्याचा त्यांचा बेत होता. पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करण्याचे कोणतेही वैध मापदंड न पाळता, सामान्य टँकरमधून अशी धोकादायक वाहतूक करून नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण करण्याचे कृत्य आरोपींनी केले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी चालक धर्मेंद्रकुमार श्यामलाल पटेल (वय ३७ वर्षे, रा. वाशी, नवी मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. तसेच टँकर मालक रितेश अभय नारायण सिंग (रा. दिवा, ठाणे) यांच्यासह पालघर व सुरत येथील रोशन शिरोडकर, नितीन कोली, राजू पंडित, दीपक पवार, सागर पाटील आणि अनिल सुरत या इतर ७ साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत. शिधावाटप अधिकारी  सुभाष रामनाथ डुंबरे यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५, मोटार स्पीरीट अँड हायस्पीड डिझेल ऑर्डर २००५ आणि बायोडिझेल धोरण २०२१ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक अशोक रावजी उतेकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. या मोठ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील जनतेला जाहीर आवाहन केले आहे की, जिल्ह्यात डिझेल व तत्सम इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. जनतेने कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त इंधन साठा करून ठेवू नये आणि इंधनाच्या तुटवड्याबाबत पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अवैध वाहतूक करणाऱ्याविरुद्ध प्रशासनाकडून अत्यंत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

भोंदू खरातच्या साथीदाराच्या खात्यातून १३.५० कोटी जप्त

हरिभाऊ लाखे नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक आणि फसवणूक खंडणी प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई करीत त्याच्या साथीदारांकडून तब्बल १३ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. यात १३.१२ कोटी रुपयांची रोख रक्कम, मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिन्यांचा समावेश असून, अशोक खरातच्या बँक खात्यातील २.२५ कोटी रुपयांच्या ठेवी गोठवण्यात आल्या आहेत. त्याच्या मालकीची आलिशान मर्सिडीज कारही ईडीने जप्त केल्याने या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी नाशिक शहर पोलिसांनी १८ मार्चला अशोक खरातला अटक केली. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. अटकेनंतर अवघ्या पाच दिवसांत या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आला. एसआयटीने जवळपास दीड महिना विविध पैलूंवर तपास करत अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या. त्यानंतर शिर्डी व नाशिक ग्रामीण पोलिसांनीही फसवणुकीच्या गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास सुरू केला. तपासादरम्यान अवतार पूजा, धार्मिक मार्गदर्शन आणि चमत्काराच्या नावाखाली लोकांकडून ५.६२ कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप समोर आला आहे. जगदंबा व समता पतसंस्थांमधील २०० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. ईडीकडून खरातच्या निकटवर्तीयांचीही कसून चौकशी सुरू असून, या चौकशीतून नवनवीन आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेचे धागेदोरे समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभर या तपासाकडे लक्ष लागले आहे.

मानवतेच्या पवित्र आध्यात्मिक नवीन युगाचा उत्सव

रमेश औताडे मुंबई: अत्यंत भक्ती, आध्यात्मिक आनंद आणि शांत आदराच्या वातावरणात, मुंबईतील बहाई समुदाय २३ मेला सायंकाळी बहाई केंद्रात बाब यांच्या घोषणेचा पवित्र उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमला होता. हा तो क्षण होता ज्याने मानवतेच्या आध्यात्मिक इतिहासात एका नवीन युगाच्या पहाटेची घोषणा केली. या कार्यक्रमात १८४४ सालच्या त्या ऐतिहासिक रात्रीचे स्मरण करण्यात आले, जेव्हा इराणमधील शिराझ येथील एक तरुण व्यापारी असलेल्या बाब यांनी आपले दिव्य कार्य घोषित केले आणि जगातील धर्मांच्या पवित्र ग्रंथांमध्ये सांगितलेले प्रतिज्ञात पुरुष, बहाउल्लाह यांच्या लवकरच होणाऱ्या आगमनाची घोषणा केली. तीव्र छळ, तुरुंगवास आणि अखेरच्या हौतात्म्यानंतरही, त्यांच्या शिकवणींनी मानवतेला बहाई धर्माचे संस्थापक बहाउल्लाह यांच्या आगमनासाठी तयार केले, ज्यांच्या दूरदृष्टीने मानवजातीच्या एकतेची आणि सार्वत्रिक शांततेच्या स्थापनेची मागणी केली. स्त्री-पुरुषांची समानता, विज्ञान आणि धर्माचा सुसंवाद, पूर्वग्रहांचे निर्मूलन, सार्वत्रिक शिक्षण, न्याय आणि सर्व लोक व राष्ट्रांची मूलभूत एकता. सहभागींनी आशा व्यक्त केली की हे आदर्श आजच्या समाजात अधिक सामंजस्य, करुणा आणि सामूहिक कृतीसाठी प्रेरणा देऊ शकतील. जगभरातील बहाईंसाठी, बाब यांची घोषणा ही बहाई दिनदर्शिकेतील नऊ पवित्र दिवसांपैकी एक आहे आणि मानवजातीच्या आध्यात्मिक व सामाजिक उन्नतीसाठी समर्पित असलेल्या जागतिक चळवळीची सुरुवात म्हणून याला गहन आध्यात्मिक महत्त्व आहे. मुंबई बहाई समुदाय बहाई केंद्र मुंबई यांच्या वतीने सांगण्यात आले.