Category: होम

तुकाराम मुंढे यांचा नाशिक जिल्ह्यात धडाका सुरुच

 चार ठिकाणी दूध संकलन केंद्र, प्रक्रिया केंद्रांवर छापे हरिभाऊ लाखे नाशिक: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांची आक्रमक आणि रोखठोक शैली विशेष चर्चेत आली आहे. संपूर्ण राज्यात त्यांनी अन्नातील भेसळीविरोधात रान उठविले असून नाशिक जिल्हाही त्यास अपवाद नाही. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सिन्नर तालुक्यातील चार गावांमध्ये दूध भेसळीच्या संशयावरून छापे टाकले. शनिवारी दिवसभर ही कारवाई सुरु होती. या छाप्यांमध्ये भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आल्याची माहिती पुढे आली असून, रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात येत होती. सिन्नर तालुक्यात दूध भेसळीविरोधात झालेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी ठिकठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सिन्नर तालक्यातील शहा, कारवाडी, पुतळेवाडी आणि विघनवाडी येथील दूध संकलन केंद्रे आणि प्रक्रिया केंदांवर छापे टाकले. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मंगेश माने यांच्या नेतृत्वाखाली हे छापे टाकण्यात आले. कारवाईपूर्वी सकाळपासून विभागातील १२ अधिकाऱ्यांच्या पथकाने छापे टाकण्यात येणाऱ्या केंद्रांवर गुप्तपणे लक्ष ठेवले होते. खात्री झाल्यानंतर स्वतंत्र पथकांव्दारे एकाचवेळी छापे टाकण्यात आले. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये पावडर किंवा इतर कोणत्या पदार्थांची भेसळ होत आहे काय, याची तपासणी करण्यात आली. या छाप्यांदरम्यान नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे तसेच काही साहित्यही जप्त करम्यात आल्याचे सांगितले जाते.यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली नाही. खबरदारी म्हणून छाप्यांवेळी वावी पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्तही घेण्यात आला होता. शहा गावात छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळताच किराणा दुकाने, पानटपऱ्या, खाद्यपदार्थांची दुकाने पटापट बंद झाली. ती सायंकाळपर्यंत बंदच राहिली. गोदामांचीही झडती घेण्यात आली. शहा येथील दोन, कारवाडी आणि विघनवाडी येथील प्रत्येकी एका दूध संकलन व प्रक्रिया केंद्रावर छापे टाकण्यात आले. दरम्यान, याआधी दोन दिवसांपूर्वी नाशिक विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील हॉटेल आणि खाद्यगृहांची तपासणी करण्यात आली. त्यात नऊ हॉटेलांचे परवाने निलंबित करण्यात आले. तर आवश्यक नोंदणी व परवाना नसल्याने चार हॉटेलांना व्यवसायास प्रतिबंध करण्यात आला. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने नाशिक विभागात दोन दिवसात २० हॉटेलांची तपासणी करण्यात आली. अन्न व सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हाॅटेलांवर कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान स्वयंपाकगृहातील गंभीर अस्वच्छता, निकृष्ट दर्जाची शीतकरण यंत्रणा, अस्वच्छतेत उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न, कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव तसेच संबंधित आस्थापनांकडे आवश्यक कागदपत्रांचा अभाव, कार्यरत कर्मचाऱ्यांची कुठलीही वैद्यकीय तपासणी न करणे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आणि त्या अंतर्गत विविध नियम व विनियमांचे उल्लंघन या कारणावरून संबंधित हॉटेल आणि आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातील चार, जळगाव येथील दोन तर नंदुरबार येथील एका हॉटेलचा समावेश आहे.

नौपाड्यात स्पा व मसाज सेंटरवर कारवाई करावी – संजय वाघुले

0000000000 अनिल ठाणेकर ठाणे, नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व स्पा व मसाज सेंटरची चौकशी करून गैरप्रकार करणारी सेंटर तत्काळ बंद करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक योगेश आव्हाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दादा पाटील वाडी येथील एका कॉम्प्लेक्समधील सदनिकेत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी नौपाडा पोलिसांना निवेदन दिले. या वेळी नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले, संतोष साळुंखे, प्रशांत कळंबटे, राजेश ठाकरे, सई कारुळकर, भाग्यश्री मुळे, राणी क्षीरसागर, भक्ती मोहिते, मनोज स्नेही, हिमांशू राजपूत आदी उपस्थित होते. यापूर्वी गेल्या वर्षी स्टेशनजीकच्या पॅराडाईज टॉवरमध्ये स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळीही पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच शांत, सुशिक्षित नौपाड्यात गैरप्रकार रोखण्यासाठी दाद मागण्यात आली होती. संबंधित स्पा सेंटरला घर भाड्याने देण्याबाबतचा करार नोंदणीकृत केला आहे का, पोलिस स्टेशनकडून व्हेरिफिकेशन केले आहे का, संबंधित मसाज सेंटरकडे मसाज सेंटर व्यवसाय नोंदणीचा परवाना आहे का, याची चौकशी करावी. नौपाड्यातील सर्व स्पा सेंटरचे चालक व जागा भाड्याने देणारे मालक यांच्या भाडेकराराची तपासणी करून पोलिस चौकशी करावी. तसेच परिसरातील नागरिकांकडून तोंडी वा फोनवर तक्रार आल्यास तत्काळ दखल घ्यावी, पोलिसांच्या गस्ती पथकाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवावी, स्पा सेंटर व मसाज सेंटरला जागा भाड्याने देणाऱ्या मालकांनी पोलिसांकडून व्हेरिफिकेशन सर्टीफिकेट घेतले नसल्यास संबंधित मालकाविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 00000000000

 प्रस्तावित कचरा संकलन केंद्राबाबत उच्च न्यायालयात सोमवारी अंतिम सुनावणी

अर्जदारांचेच याचिककडे दुर्लक्ष, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांचा आरोप. रमेश औताडे मुंबई : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या प्रस्तावित कचरा संकलन केंद्राविरोधात टाकळकरवाडी व जऊळके खुर्द ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट पिटीशनमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास स्थगिती आदेश मिळूनही सुरूवातीला असलेले स्वारस्य याचिकाकर्त्यांना राहिले नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी केला आहे.सोमवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी उच्च न्यायालयात आहे. राजु खंडीझोड यांनी कचरा संकलन केंद्राबाबत ग्रामस्थांना सहकार्य करावे असे सांगितल्याने टाव्हरे यांनी ॲड.वासिम सामलेवाले, ॲड. तेजपाल इंगळे यांच्या माध्यमातून रिट पिटीशन जुलै २०२५ मध्ये दाखल केली.त्यासाठीचे शासन निर्णय तसेच संबधित आदेश ही कागदपत्रे मंत्रालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथून तातडीने उपलब्ध करून दिली. उच्च न्यायालयाने प्रतिवादींना नोटीसा पाठवून १७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रकल्पस्थळी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई केली आहे. याचिकेतील अर्जदार ग्रामस्थ हे सुरूवातीला दोन-तीन सुनावण्यांना उपस्थित होते व नंतर क्वचित  सुभाष बोऱ्हाडे वगळता कोणीही सुनावणीसाठी उपस्थिती दाखविली नाही. अनेक सुनावण्यांना अशोकराव टाव्हरे हेच उपस्थित होते. टाव्हरे यांनी कोणतीही रक्कम प्रवास वा इतर कारणांसाठी  घेतली नाही,जिल्हाधिकारी पुणे व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विस्तृत प्रमाणपत्रे दाखल केल्याने त्यास उत्तर म्हणून प्रतिज्ञापत्रे दाखल करावी लागतात.याचिकेतील कागदपत्रांचे इंग्रजी भाषांतर व दोन विस्तृत प्रतिज्ञापत्रे यासाठी वकीलांनी वाढीव फी मागितली होती,परंतु ती देण्यास अर्जदारांपैकी कैलास टाकळकर यांनी नकार दिला. वाढीव फी देण्यास नकार दिल्याने ॲड.वासिम सामलेवाले यांनी यापुढे याचिकेचे कामकाज पाहणार नसल्याचे टाव्हरे यांना कळविले आहे.त्याबाबत टाव्हरे यांनी याचिकाकर्त्यांपैकी सुभाष बोऱ्हाडे यांना सांगितले असून  पदरमोड करून अंतिम सुनावणीसाठी एक  सिनियर कौन्सिल युक्तिवाद करणार असल्याचे टाव्हरे यांनी नमूद केले आहे. जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास भाग पडणे,बांधकामास स्थगिती आदेश मिळणे या महत्त्वपूर्ण घडामोडी घडूनही अर्जदारांना स्वारस्य नसणे हे गंभीर आहे,न्यायालय जो निर्णय देईल त्यास वकील वा मी स्वतः जबाबदार नसेल तर गुणवत्तेवर आदेश पारित होईल असे  टाव्हरे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे टनेल बोरिंग मशीनद्वारे विक्रोळी येथून उत्खननास सुरुवात  

मुंबई :    मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पहिले टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) आज, पाच जुलै 26  विक्रोळी शाफ्ट येथून बांधकामाधीन मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाच्या दिशेने बोगद्याच्या उत्खननाचे काम सुरू करणार आहे. एकूण 21 किमी लांबीच्या भूमिगत बोगद्यापैकी, मुंबईतील सावली (घणसोली) ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यानचा 16 किमी लांबीचा भाग टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने बांधण्यात येणार आहे.           उर्वरित 5 किमी लांबीच्या भागाचे बांधकाम एनएटीएम पद्धतीने आधीच पूर्ण झाले आहे. (Tunnel…

 नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने माहितीसंचाची उपलब्धता करा !

मुंबईच्या रस्त्यावरील मॅनर्स वर आलेखन करून जाळ्या बसवा शिवसेना नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांची आयुक्तांना सूचना मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील सिमेंट काँक्रीट टप्पा १ व २ प्रमाणे तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांवरील मॅनहोल्सवर आलेखन करून जाळ्या बसवाव्यात त्याचप्रमाणे नविन तंत्रज्ञान वापरुन मॅनहोल्सचा माहितीसंच उपलब्ध होईल अशी सुविधा करावी अशी सूचना प्रभाग क्रमांक ५४ चे शिवसेना (उबाठा) नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे मुंबईत शहर व उपनगरांत एकूण १०३९२६ मॅनहोल्स आहेत. यापैकी कितीतरी मॅनहोल्स वर सरंक्षक जाळ्या बसवल्या गेल्या नाहीत अश्या रस्त्यावरून चालताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दोन जुलै रोजी  दुर्दैवी घटनेची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असून, नागरिकांच्या सुरक्षेबाबत आता ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे प्रभाग क्रमांक 54 चे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट नगरसेवक आणखी सुनील प्रभू यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात सांगितले आहे . मुंबई शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीटीकरणाचे (CC Roads) रस्ते बनवले जात आहेत. मात्र, या रस्त्यांवर असणा-या मॅनहोल्सवर सरंक्षक जाळ्या बसविल्या गेल्या नाहीत त्याचबरोबर सदर मॅनहोल्सचा आलेखन  किंवा माहितीसंच तेथील संबंधित अधिका-यांना उपलब्ध झालेला नाही त्यामुळे असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे  नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांनी पत्रात म्हटले आहे काँक्रीट रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी आणि नियमित साफसफाई करतेवेळी झाकणे उघडली जातात, परंतु काम झाल्यानंतर ती बऱ्याचदा जागेवरून गायब असतात किंवा उघडीच ठेवली जातात, ब-याच मॅनहोल्सवर बसविलेल्या जाळ्या तुटलेल्या अवस्थेत असतात किंवा तिथून चोरीला गेलेल्या असतात. असे अंकित प्रभू यांनी आपल्या पत्रात नमूद केले असून त्यांनी पुढे म्हटले आहे की अशा उघड्या मॅनहोल्समध्ये पडून निष्पाप नागरिकांचा मृत्यू होणे ही अत्यंत संतापजनक बाब आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सर्व मॅनहोल्स सुरक्षित करणे तसेच त्यावर आलेखन करून जाळ्या बसवणे त्याचबरोबर तेथील मॅनहोल्सचा माहितीसंच उपलब्ध होईल अशी सुविधा करणे गरजेचे असल्याचे शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू यांनी म्हटले आहे की, या उघड्या गटारांवर संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम ३१ मे पूर्वी पूर्ण करणे प्रशासनाला बंधनकारक होते. असे असतानाही जुलै महिना उजाडला तरी अनेक ठिकाणी जाळ्या बसवण्याचे काम अपूर्ण का आहेत, याचे स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे आज मुंबईकर त्रस्त असल्याचे  अंकित प्रभू यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे ३१ मे ची डेडलाईन उलटूनही कामे अपूर्ण ठेवणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणाऱ्या संबंधित कंत्राटदार (Contractors) आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या गंभीर प्रकरणात प्रशासनाने त्वरित लक्ष घालून ठिकठिकाणी  आलेखन करून जाळ्या बसवण्याची उपाययोजना करावी व नविन तंत्रज्ञान वापरुन मॅनहोल्सचा माहितीसंच उपलब्ध होईल अशी सुविधा करणे गरजेचे असल्याचे नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांनी महापालिका आयुक्तांना  पत्राद्वारे सुचविले आहे. 00000

 दिव्याच्या साबेगावातील दत्त निवारा सोसायटीत जिना कोसळला

अग्निशमन दलाची तत्परता, पाच रहिवासी सुरक्षित दिवा, दि. ५ जुलै : दिव्यातील साबेगाव परिसरात असलेल्या दत्त निवारा सोसायटीच्या जिन्याचा स्लॅब रविवारी दुपारी अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणालाही दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाच रहिवाशांची सुखरूप सुटका केली. शीळ अग्निशमन केंद्राला दुपारी १२.५२ वाजता घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान एक फायर इंजिन व एक रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. ही घटना साबेगाव येथील वैभव धाब्याच्या मागे असलेल्या दोन मजली दत्त निवारा सोसायटीत घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इमारतीची पाहणी करून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.  तसेच इमारतीत अडकलेल्या प्रदीप मालुसरे (५०), प्राजक्ता मालुसरे (४२), चेतन मालुसरे (२१), गणेश राणे (४८) आणि आरोशी कुमडेकर (१४) या पाच रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित सुटका केली. 000000000

युद्धभूमीवरील गिर्यारोहणाचा थरार अनुभवण्याची संधी

२३वे गिरिमित्र संमेलन ११ व १२ जुलैला मुलुंडमध्ये; सियाचीन वीरांचे अनुभव ठरणार मुख्य आकर्षण मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गिर्यारोहण, साहसी क्रीडा आणि राष्ट्रसेवेचा संगम अनुभवण्याची संधी देणारे २३वे ‘गिरिमित्र संमेलन’ ११ व १२ जुलैला…

मागण्या मान्य करा अन्यथा १० ऑगस्टला राज्यभर जेलभरो

कामगार संयुक्त कृती समितीचा इशारा मुंबई, दि. ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने चार श्रम संहिता लागू करू नका व इतर मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर ३ जुलैला सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत  महाधरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भर पावसातही पाच हजार कामगारांनी सहभाग नोंदविला. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत ८ जुलैला कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती बरोबर चार श्रमसंहिता, त्यांचे नियम व कामगारांच्या अन्य मागण्यासाठी विस्तारित बैठक घेण्याचे आश्वासन मंत्रिमहोदयांनी दिले. त्यामुळे कृती समितीने महा धरणे आंदोलन स्थगित केले. मात्र महाराष्ट्र सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास १० ऑगस्टला राज्यभर जेलभरो आंदोलन केले जाईल,  असा स्पष्ट इशारा कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचे प्रमुख समन्वयक डॉ. डी . एल. कराड यांनी राज्य सरकारला दिला आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना दिलेल्या निवेदनात चार श्रमिक संहिता महाराष्ट्रात लागू करू नये,राज्य सरकारने कामगार संघटनांशी चर्चा करावी, किमान वेतन 30 हजार रुपये करावे, कंत्राटी हंगामी निश्चित कालीन कर्मचाऱ्यांना कायम करावे, योजना कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा  व त्यांना ई एसआय, प्रॉव्हिडंट फंड, रजा,बोनस इत्यादी फायदे लागू करावेत, असंघटित कामगारांसाठी  कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यांना निधीची व्यवस्था करावी व त्यामार्फत सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजना लागू कराव्यात. या व इतर मागण्या  यावेळी करण्यात आल्या. केंद्र सरकारने चार श्रमसंहिता तसेच नियमही लागू केले आहेत राज्य सरकारनेही नियम प्रस्तावित केले आहेत. या चार श्रमसंहिता व नियमांना कामगार संघटनांचा तीव्र विरोध आहे.  चार श्रमसंहिता व नियमांमुळे कामगारांचा युनियन करण्याचा अधिकार, संप करण्याचा अधिकार, नोकरीत कायम होण्याचा अधिकार  याच्यावर गदा येणार आहे. या श्रमसंहितांमध्ये  सर्वत्र कंत्राटीकरणाला परवानगी देण्यात आली आहे,निश्चित कालीन रोजगार,  शिकाऊ कामगार त्या माध्यमातून कामगार वर्गाचे प्रचंड शोषण सुरू आहे.असंघटित कामगारांसाठी कुठलीही योजना नाही. ऊसतोड कामगार,घर कामगार व  असंघटित कामगारांना सरकारने वाऱ्यावर  सोडले आहे. महागाई आणि बेरोजगारीमुळे कामगार वर्ग अधिच त्रस्त झाला आहे, त्यांचे उत्पन्न घटत चालले आहे. अशा परिस्थितीत कामगार वर्गाचे हिताचे रक्षण करण्यासाठी कामगार संघटनांशी चर्चा करून धोरण व  कायदे करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी या वेळेला कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने मंत्री महोदय कडे केली. शिष्टमंडळात कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे प्रमुख समन्वयक व  सीटूचे प्रदेशाध्यक्ष  डॉ. डी. एल.  कराड, एच. एम. एस. चे प्रदेशाध्यक्ष  निवृत्ती धुमाळ, इंटकचे प्रदेशाध्यक्ष  कैलास कदम, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, मुकेश  तिघोटे, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष चाळके,  आयटकचे ज्येष्ठ नेते सुकुमार दामले इत्यादींचा समावेश होता. आझाद मैदानावर  झालेल्या धरणे आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार,  कामगार नेते  विवेक मॉन्टेरो, निवृत्ती धुमाळ, संतोष चाळके, सुकुमार दामले, कैलास कदम, रवी जोशी, मिलिंद रानडे,मंगला ठोंबरे,महेश करकेरा, उदय भट, मारुती विश्वासराव,  त्रिशीला  कांबळे, स्नेहा सावंत, विजय जाधव, विजय तारमाळे,  बबली रावत, बजरंग चव्हाण, सईद अहमद  इत्यादींनी कामगारांना मार्गदर्शन केले. 000000000

मुसळधार पावसातही मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा सुरळीत

राजेंद्र साळसकर मुंबई- गेल्या ४८ तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये २८० मिमीपेक्षा जास्त अतिवृष्टी होऊनही, मध्य रेल्वेच्या मेन, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर लाईनवरील उपनगरीय सेवा सुरळीतपणे सुरू राहिल्या. मेन लाईनवर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सुमारे १५० मिमी, दादर – घाटकोपर पट्ट्यात १२० ते १५० मिमी आणि मुलुंड येथे १६० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. उपनगरीय भागात मुसळधार पाऊस झाला; यामध्ये ठाणे येथे २८४ मिमी आणि कळवा येथे २७० मिमी पावसाची नोंद झाली.हार्बर लाईनवरील वाशी ते पनवेल या पट्ट्यात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. मेन लाईनवरील आग्नेय विभागात (कल्याण ते कर्जत/खोपोली दरम्यान) सुमारे १५० मिमी पाऊस पडला तर मेन लाईनवरील ईशान्य विभागात (कल्याण ते कसारा दरम्यान) २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. मुसळधार पावसानंतरही मध्य रेल्वेची सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहिली, ज्यामुळे दररोज प्रवास करणारे लाखो प्रवासी सुरक्षितपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकले. हे मध्य रेल्वेच्या पावसाळ्यासाठीच्या सक्रिय नियोजनाचे यश दर्शवते. ही अखंड सेवा अभियांत्रिकी, परिचालन, विद्युत आणि सिग्नल व दूरसंचार विभागांमधील उत्तम आंतर-विभागीय समन्वय व सांघिक कार्य, तसेच महानगरपालिकांसोबतचा जवळचा समन्वय आणि पूर्वतयारीचे फलित आहे. पावसाळ्यात रेल्वे चालवण्याचे आव्हानात्मक काम हाताळण्यासाठी मध्य रेल्वेने पाणी साचण्यापासून प्रतिबंध करणे, जलनिस्सारण यंत्रणेचे बळकटीकरण आणि संवेदनशील ठिकाणांचे संरक्षण यांवर लक्ष केंद्रित करून व्यापक तयारी केली आहे. विभागातील पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ११७ ठिकाणांवर १२.५ एचपी ते १०० एचपी क्षमतेचे एकूण २१० ‘हेवी-ड्युटी’ पाण्याचा उपसा करणारे पंप तैनात करण्यात आले होते.शीव – कुर्ला, चुनाभट्टी – कुर्ला, विक्रोळी – कांजुरमार्ग रोड आणि कुर्ला – लोकमान्य टिळक टर्मिनस यांसारख्या पूरप्रवण प्रमुख ठिकाणांची निवड करून, तिथे तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी अभियांत्रिकी उपाययोजनांद्वारे विशेष कार्यवाही करण्यात आली. ठाणे मायक्रोटनेलिंग प्रकल्पामुळे ठाणे स्थानकावरील पाणी साचण्याची दीर्घकालीन समस्या प्रभावीपणे सोडवण्यात आली आहे; यापूर्वी मुसळधार पावसात येथे रेल्वे रुळांच्या पातळीपेक्षा वर पाणी साचत असे. तसेच, जलनिस्सारण यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी संपूर्ण नेटवर्कवर पुलांची दुरुस्ती आणि जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याची कामे हाती घेण्यात आली. पावसाळ्याच्या पूर्वतयारीच्या मोठ्या प्रमाणावरील कामांमध्ये अनेक मोऱ्यांची साफसफाई, बाजूच्या गटारांमधील आणि ‘कॅच-वॉटर ड्रेन्स’मधील गाळ काढणे, रुळांची देखभाल आणि संवेदनशील ठिकाणी रुळांची उंची वाढवणे, बोगद्यांची तपासणी, स्थानकांवरील प्लॅटफॉर्म व रेल्वे इमारतींची गळती रोखण्यासाठी उपाययोजना, तसेच संवेदनशील भागात पावसाळी गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, सोशल मीडियावर पावसाळ्याबाबत मिळणाऱ्या सततच्या अद्ययावत माहितीमुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत झाली. एकत्रित प्रयत्नांमुळे, या हंगामातील अत्यंत मुसळधार पावसाच्या कालावधीत ही मध्य रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे सेवा सुरक्षितपणे आणि विश्वासार्हतेने सुरू राहिली. शहराची जीवनवाहिनी अविरत सुरू ठेवण्यासाठी मुसळधार पावसात रात्रंदिवस काम करणाऱ्या आघाडीवरील कर्मचारी – जसे की रुळांची देखभाल करणारे कर्मचारी, गँगमेन, ‘परमनंट वे’ कर्मचारी, मोटरमन, ट्रेन मॅनेजर्स, अभियंते आणि सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांच्या अथक समर्पणाची दखल घेण्यात आली आहे. पावसाळ्यात उपनगरीय सेवा विनाखंडितपणे पुरवण्यासाठी त्यांचे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणचे प्रयत्न अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. 000000000

राजेंद्र साळसकर यांचा श्री छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान

मु़ंबई- अरिहंताणं रक्त सारथी संस्थान,राजस्थान आयोजित महाराष्ट्र गौरव सन्मान-२०२६ या सोहळ्यात जीवनदान ग्रुपचे संस्थापक राजेंद्र साळसकर यांना श्री छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान -२०२६ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात…