Category: होम

अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक कॅरम स्पर्धा

भव्या सोळंकी विजेता मुंबई : अमृत महोत्सवी गोविंदराव माहिते चषक १९ वर्षाखालील मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे विजेतेपद विवा कॉलेज-विरारचा राष्ट्रीय ज्युनियर कॅरमपटू भव्या सोळंकीने पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात प्रथमपासून अचूक फटकेबाजीसह आघाडी घेत भव्याने त्याचाच कॉलेज सहकारी जोनाथन बोनालचा ८-२ असा पराभव केला. परिणामी मुंबई उपनगरचा सबज्युनियर विजेता पार्ले टिळक हायस्कूलचा सार्थक केरकर व राष्ट्रीय सबज्युनियर कॅरमपटू डॉ. दासिल्व्हा हायस्कूलचा ध्रुव भालेकर यांना सहज हरवून विजयीदौड करणाऱ्या जोनाथनला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गौरवमूर्ती क्रीडापटू गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते संपन्न झाला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित परेल येथे झालेल्या उपांत्य फेरीत भव्या सोळंकीने मयुरेश पवारला १४-१० असे तर जोनाथन बोनालने सार्थक केरकरला १४-२ असे नमविले. उपांत्यपूर्व उपविजेतेपदाचे मानकरी कौस्तुभ जागुष्टे, प्रसन्ना गोळे, ध्रुव भालेराव व मिहीर शेख ठरले. उपउपांत्यपूर्व उपविजेतेपद समीर खान, अथर्व म्हात्रे, अमेय जंगम, निधी सावंत, तन्वी परब, पृथ्वी बडेकर, रुची माचीवले, नेहाल उस्मानी यांनी मिळविले. याप्रसंगी छबिलदास हायस्कूलचे माजी प्राचार्य सतीश इनामदार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण व मीनानाथ धानजी, क्रीडा शिक्षक प्रॉमिस सैतवडेकर व सुनील खोपकर आदी उपस्थित होते. कॅरमपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रशिक्षक सचिन शिंदे, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक व क्रीडापटू ओमकार चव्हाण यांनी पंचाचे कामकाज केले.

ठाणे शहरात १० टक्के पाणी कपात लागू

ठाणे : मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात लागू झाल्याने मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे शहरातील काही भागातही, ०५ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू झाली होती. ठाणे महापालिका क्षेत्रात मुंबई महापालिकेच्या स्रोतांतून ८५ एमएलडी पाणी मिळते. या पाणी साठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर १, किसन नगर नं १, किसन नगर नं २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं १, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या परिसरात पाणी पुरवठा केला जातो. याच भागात आता १० टक्के पाणी कपात लागू झाली आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

विकलांगाच्या बचावासाठी गेलेल्या इसमावर प्राणघातक हल्ला

भर रस्त्यात गुंडागर्दी उल्हासनगर : विकलांग व्यक्तीला एक स्थानिक गुंड मारहाण करीत असताना त्याच्या बचावासाठी गेलेल्या इसमाला सदर गुंडाने बेदम मारहाण केली.यावेळी आरोपीने आरडाओरड करून रस्त्यात दहशत माजवली त्यामुळे घाबरून दुकानदारांनी दुकाने बंद केली होती.  याप्रकरणी मारहाण करणाऱ्या गुंडाच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उल्हासनगर -3 येथील कल्याण – कर्जत महामार्गावर असलेल्या फालवर लाईन परिसरात शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास संजय गजानन जाधव ( 42 ) हा व्यक्ती जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आलेला होता. यावेळी ताडी माडी केंद्र जवळ यश जजवंशी उर्फ गोल्या हा गुंड प्रवृत्तीचा इसम एका विकलांग व्यक्तीला मारहाण करीत होतो. हा प्रकार बघितल्यानंतर संजय जाधव विकलांगाच्या मदतीसाठी मोटरसायकल वरून खाली उतरला आणि त्याने मध्यस्थी करून विकलांग व्यक्तीला कशाला मारहाण करतोस असे बोलून यश याला बाजूला केले. यानंतर संजय जाधव मोटरसायकलने जात असताना काही अंतरावरच अशोक अनिल थिएटर जवळ यश याने त्याची मोटारसायकल थांबवली आणि शिवीगाळ करून हातातील दगडाने संजयच्या नाकातोंडावर दगडाने प्रहार केला यामुळे संजयच्या नाका तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्याचा एक दात पडला. दरम्यान हा प्रकार होत असतांना यश हा भर रस्त्यावर आरडाओरड करून मी इथला भाई आहे कोणी मध्ये येऊ नका असे म्हणून तेथे दहशत माजवली, यामुळे घाबरून आजूबाजूच्या दुकानदारांनी दुकाने बंद केली तर फेरीवाले देखील घाबरून पळून गेले. या प्रकरणी फिर्यादी  संजय जाधव यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी आरोपी यश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय आव्हाड हे करीत आहेत.

राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान

अशोक गायकवाड मुंबई :राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ६) पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली. तीस (३०) पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले, तर ७ पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आली. अठ्ठयात्तर (७८) पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली. पोलीस अलंकरण समारोहाला अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. विनय कारगांवकर, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक, वाहतूक मुंबई, आशुतोष डुंबरे, आयुक्त ठाणे शहर, अशोक अहिरे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, नाशिक ग्रामीण, विनोदकुमार तिवारी, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, चंद्रपूर जिल्हा, प्रल्हाद खाडे, सेवानिवृत्त समादेशक, रा रा पो बल गट क्र. ६, धुळे, चंद्रकांत गुंडगे, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज, दौंड व मिर्झा अन्वर बेग इब्राहिम बेग, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, नांदेड यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.

तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई : आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. ७ जून च्या रात्री तुर्भे विभागात सेव्हन स्काय बार अँड लोंज, पाम बीच गॅलरीया मॉल सेक्टर १९ डी, टीप्सीब्रो बारअँड लोंज पाम बीच गॅलरीया मॉल सेक्टर १९ डी, करिश्मा बार सेक्टर १९ सी. असे एकूण ०३ बार यांनी केलेल्या अनधिकृत बाधकामाविरूद्ध कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई स्थानिक पोलीस स्थानक व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार डॉ राहुल गेठे उप आयुक्त (अतिक्रमण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर मोहिमेसाठी भरत धांडे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तुर्भे,डॉ अमोल पालवे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी,नेरूळ आणि तुर्भे विभागातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी,अतिक्रमण मुख्यालय पोलीस पथकथातील अधिकारी/कर्मचारी यांचासह करण्यात आली. सदर कारवाई पोटी २,५०,०००/- इतके दंडात्मक शुल्क वसूल करण्यात आले असून यापुढे अशीच कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ठाणे : महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अव्वल कारकून संदीप पवार व इतर कर्मचारी उपस्थित होते.

घाटकोपरमध्ये दुर्गंधीमुक्तीसाठी भूमिगत कचरा पेट्या

मुंबईः आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात दररोज हजारो मेट्रिक टन कचरा निर्माण होत असतो. झोपडपट्टी परिसर असलेल्या भागात कचरा मोठ्या प्रमाणात साठत असल्याने दुर्गंधीचा आरोग्यावर परिणाम होतो. रस्त्यावर टाकण्यात येणारा कचरा भटकी जनावरे आणि कचरा वेचणाऱ्यांकडून इतरत्र पसरत असल्याने परिसरात अस्वच्छता देखील निर्माण होत आहे. त्यामुळे भूमिगत कचरा पेट्या बसवण्यावर पालिकेने भर दिला आहे. येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल, असे घन कचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक अभियंता सूर्यकांत सातपुते यांनी सांगितले. हा परिसर दुर्गंधीमुक्त आणि कचरा मुक्त होणार असल्याने स्थानिकांकडून पालिकेच्या या धोरणाचे कौतुक होत आहे. स्थानिक आमदार राम कदम यांनी पालिकेकडे याबाबत पाठपुरावा केला होता. जगदुशा नगर येथे महादेव मंदिर, तसेच खेळाचे मैदान असल्याने लोकांची मोठी वर्दळ असते. अशात झोपडपट्टीतून जमा होणारा कचरा मंदिरासमोरील रस्त्यावर टाकला जात असत. त्यामुळे भटकी जनावरे आणि कचरा वेचणाऱ्यांकडून इतरत्र कचरा पसरत होता. परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने अखेर इथे भूमिगत कचरा पेट्या बसवण्यात येत असल्याने नागरिकांनी पालिका प्रशासनाने आभार मानले.

नितीन कंपनी पूलाखालील उद्यान आता कचराभूमी

चालण्यासाठी उद्यानात येणारे नागरिक हैराण ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी पुलाखाली बेकायदा वाहने उभी राहू नये. तसेच नागरिकांना चालणे, व्यायामासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी सुमारे सात वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेने नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शन पर्यंत उद्यान उभारले आहे. या उद्यानामुळे परिसरातील जेष्ठ नागरिक, क्रीडापटू येत असत. परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे आता हे उद्यान ‘डम्पिंग’चा भाग झाल्याचे चित्र आहे. मार्गरोधक, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा, कारवाई केलेले फलक अशा विविध वस्तू येथे साठविल्या जात आहे. भंगार वाहने, महापालिकेची वाहने देखील येथेच उभी असतात. त्यामुळे एकेकाळी हिरवाईने नटलेला हा परिसर आता कचराभूमी ठरू लागल्याचे चित्र आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनी उड्डाणपूलाखाली पूर्वी अनधिकृतरित्या शेकडो दुचाकी, कार, अवजड वाहने उभी करण्यात येत होती. तसेच या वाहनांच्या मागे गर्दुल्ले दारू किंवा अमली पदार्थांची नशा करत होते. त्यामुळे परिसराची रया निघून गेली होती. तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता. हा प्रकार रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने २०१७ मध्ये ‘पीपीपी’ तत्त्वावर या भागाचा विकास करण्यास सुरुवात केली होती. महापालिकेने या पूलाखाली सायकल ट्रॅक, चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य, दोन्ही बाजूंनी रोपांची हिरवळ अशा सुविधा निर्माण केल्या होत्या. त्यामुळे या परिसराचा अक्षरश: कायापालट झाला होता. पाचपाखाडी, नितीन कंपनी, कॅडबरी, खोपट भागात वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी विरंगुळ्यासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली होती. येथे जवळपास कुठेही उद्यान अथवा मोठी बाग नव्हती. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात होते. उड्डाण पुलाच्या प्रत्येक खांबावर निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाविषयी सुविचार आणि घोषवाक्ये लिहिलेली होती. रात्रीच्या वेळी विविध रंगांची रोषणाई केली जात होती. त्यामुळे या रंगातून हा परिसर उजळून निघत होता. परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या उद्यानाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पुलाखाली महापालिकेने बिघाड झालेल्या सिग्नल यंत्रणा ठेवल्या आहेत. उद्यानाखालील सायकल ट्रॅक देखील तोडण्यात आले आहे. उद्यानाखाली काही पत्र्यांचे निवारे बांधण्यात आले आहे. त्यामुळे उद्यानात चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची अडवणूक होत आहे. तसेच महापालिकेने कारवाई केलेल्या जाहिरातींचे फलक, प्लास्टिकचे तुटलेल्या अवस्थेतील मार्गावरोधक, भंगात दुचाकी आणि मोटारी ठेवल्या आहेत. लाकडी बांबूचा खच पडलेला आहे. काही उद्योग देखील या उद्यानात सुरू झाले आहे. जाहिरात फलकांना लावले जाणारे लोखंडी खांब येथे जोडले जात आहेत. त्यामुळे उद्यानाचा वापर खासगी कंपन्यांकडूनही बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे चित्र आहे. या उद्यानाची अवस्था वाईट झाल्याने चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उद्यानाचे बकालीकरण रोखा अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत ठाणे महापालिकेचे वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार जाधव यांना संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेच्या छोट्या रोपट्याचा आता वटवृक्ष – श्रीकृष्ण वाडेकर

अनिल ठाणेकर ठाणे : बल्लाळेश्वर सहकारी  पतसंस्थेच्या छोट्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे.सहकारी संस्थांमध्ये काम करताना कार्यकर्त्यांनी काळजी घेतली पाहिजे. चुकीचे काम करता कामा नये. आम्ही  नेहमी चांगले मार्गदर्शन करतो. त्याचप्रमाणे आर्थिक साक्षरतेचे वर्ग घेतो.  काय चुकलं तर आम्हाला सांगत जा,  असे हिमतीने सांगणारे  संचालक आपल्या संस्थेमध्ये आहेत. याचा अर्थ आपला कारभार चांगला चालला आहे.  याचा मला  निश्चित अभिमान वाटतो, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थाचे वरिष्ठ निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात  २० हजार सहकारी पतसंस्था असून ९० हजार  कोटीच्या ठेवी आहेत. या संस्थांमधून सभासदांनी २२ हजार कोटी कर्ज घेतले आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १२  कोटी असून  त्यापैकी ३  कोटी या संस्थांचे सभासद आहेत. याचाच अर्थ  २५ टक्के सभासद सहकार चळवळीशी जोडलेले आहेत.  त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळ  फार मोठी आहे. बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेसारख्या अनेक पतसंस्थांचे कार्य खूप चांगले आहे.  असे स्पष्ट उद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थाचे वरिष्ठ निबंधक  श्रीकृष्ण वाडेकर यांनी काढले. बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई या संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा ६ जून २०२४ रोजी संस्थेचे अध्यक्ष आनंद गावडे यांच्या अध्यक्षतेखाली  वाशी येथील  विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाप्रसंगी  श्रीकृष्ण वाडेकर यांच्या शुभहस्ते रौप्य महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यात स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे  संचालक व कुलस्वामी को ऑप क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे,  साईप्रेरणा को. ऑप. क्रेडीट सोसायटीचे संस्थापकीय अध्यक्ष  देवदास  डोंगरे, बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आनंद गावडे, संचालक व स्मरणिकेचे संपादक वसंत गावडे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.  याप्रसंगी  विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक व अधिकारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आनंद गावडे, उपाध्यक्ष  भगवान शेटे, संचालक सुरेश गावडे, बाबुरावशेठ डोंगरे,  वसंत गावडे, मनोहरशेठ डोंगरे, दामाजी डोंगरे, रमेश धुमाळ,  शरद डोंगरे,  नरेंद्र तांबोळी, जगन्नाथ दाते, उमेश डोंगरे,  दैवत डोंगरे, बाळासाहेब डोंगरे,  प्रदिप नवले, संचालिका सौ. निता गावडे, सौ. सुनिताताई डोंगरे, संचालक खंडूशेठ आहेर, संचालक हर्षल आहेर व सरव्यवस्थापक  संजय घोगरे व संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.  सदर कार्यक्रमाला मुंबई, नवी मुंबई व ठाणे विभागातील हजारोंच्या संख्येने सभासद उपस्थित होते. संस्थेचे सभासदानी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल  ज्येष्ठ पत्रकार रवि आमले,  उद्योजक गणपत कोरडे, हनुमंत रांजणे, लावणी सम्राट  आशीमिक कामठे अशा भूमिपुत्रांचा शाल,  पुष्पगुच्छ व  स्मृतीचिन्ह देऊन  सन्मान केला. सदर कार्यक्रमानिमित्त “कमलआनंद कलामंच प्रस्तुत वारसा माझ्या महाराष्ट्राचा” “बालगंधर्व पुरस्कार विजेते, नवी मुंबई लावणीसम्राट  आशीमिक आनंद कामठे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा बहुसंख्य सभासदांनी उपस्थित राहून आनंद घेतला. बल्लाळेश्वर पतसंस्थेचे २४ हजार  सभासद आहेत. संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात रु. १५१ कोटी खेळत्या भांडवलाचा टप्पा पार केला आहे. तर  ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेने रु. २२१ कोटींचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला आहे. बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्थेच्या आज  १४ शाखा असून,  संस्था मुंबई, नवी मुंबई व पुणे ग्रामीण या तीन विभागनिहाय कार्यरत  आहेत. संस्थेच्या सर्व शाखा कोअर बँकिंग संगणक प्रणालीमुळे एकमेकांशी ऑनलाईन पद्धतीने जोडल्या गेल्या आहेत. बल्लाळेश्वर पतसंस्थेचे सुविद्य संचालक मंडळ, कार्यतत्पर व कुशल कर्मचारी वर्ग व दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांनी एकत्रितपणे केलेल्या  कार्यामुळे संस्थेच्या क्वालिटी बैंकिंगला शासकीय लेखापरीक्षकांनी सातत्याने संस्थेस अ वर्ग प्रदान केलेला आहे. बल्लाळेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून जवळपास १०० कुटुंबाना रोजगार उपलब्ध झालेला आहे. बल्लाळेश्वर पतसंस्थेने फक्त आर्थीक व्यवहार न पाहता सामाजिक बांधिलकी देखील जोपासली आहे. संस्था सभासद व त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि समाजासाठी वेगवेगळी उपक्रम सदैव राबवीत असते. संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, वह्या वाटप, शालेय बंग वाटप असे अनेक उपक्रम संस्था सदैव राबवित असते. तसेच वृद्धाश्रमात राहणाऱ्या वयस्कर वृद्धांसाठी कायमस्वरूपी गरम पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सौर पॅनलची व्यवस्था संस्थेने करून दिली आहे तसेच शिक्षण संस्थेस संगणक वाटप देखील केलेले आहे. प्रत्येक वर्षी उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. बल्लाळेश्वर हि पतसंस्था नाही तर हे एक बल्लाळेश्वर कुटुंब असल्याची जाणीव सभासदांमध्ये निर्माण झाली आहे. संस्थेने वैद्यकीय शिक्षण स्मृती ठेव योजना व सभासद कल्याणनिधी योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत अनेक सभासद यांच्या वैद्यकीय उपचारासाठी लाखो रुपयांची मदत संस्थेने केलेली आहे. महाराष्ट्रातील उत्कृष्ट पतसंस्थांना सहकार क्षेत्रातील मानला जाणारा बैंको पतसंस्था पुरस्कार दरवर्षी जाहीर केला जातो. रौप्य महोत्सवी वर्षात संस्थेच्या चांगल्या कार्यामुळे सन २०२३ चा बँको पुरस्कार बल्लाळेश्वर पतसंस्थेला प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री श्री. दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संस्थेला आदर्श सहकारी पतसंस्था पुरस्कार २०२३ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. शेवटी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष  आनंद सबाजी गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुढील काळात जास्तीत जास्त शाखा विस्तार करणार असून उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे व सन्माननीय सभासदांचे आभार व्यक्त केले.

राज्यसभेच्या दोन जागा भाजप राष्ट्रवादीसाठी सोडणार का?

मुंबई : पियूष गोयल आणि उदयनराजे भोसले या राज्यसभा सदस्यांची लोकसभेवर निवड झाल्याने या रिक्त झालेल्या दोन्ही जागा भाजप स्वत:कडे कायम ठेवणार की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दावा केल्याप्रमाणे एक जागा या पक्षाला सोडणार याची उत्सुकता आहे. राज्यसभेचा सदस्य लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यास त्याचे सदस्यत्वपद आपोआपच रद्द होते. राज्यातून राज्यसभेवर प्रतिनिधीत्व करणारे पियूष गोयल आणि उदयनाराजे भोसले यांची अनुक्रमे उत्तर मुंबई व सातारा मतदारसंघांमधून लोकसभेवर निवड झाली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार गोयल आणि भोसले या दोघांचे राज्यसभेचे सदस्यत्वपद आपोआपच रद्द झाले आहे. लोकसभेच्या जागावाटपात महायुतीमध्ये अजित पवार गटाला चारच जागा वाट्याला आल्या होत्या. गोयल यांची रिक्त होणारी जागा आम्हाला देण्याचा शब्द भाजप नेतृत्वाने दिला असल्याचा दावा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. यानुसार भाजप ही जागा राष्ट्रवादीला देणार का, हा प्रश्न आहे. अजित पवार गटाचा दारुण पराभव झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीला फारसे महत्त्व देण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. यामुळेच आणखी चार वर्षे मुदत असलेली गोयल यांची जागा भाजप राष्ट्रवादीला सोडण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. राज्यसभेच्या दोन्ही रिक्त जागांबाबत दिल्लीच्या पातळीवरच निर्णय होईल, असे भाजपच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले. नियम काय सांगतो ? विधानसभा आमदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यास भारताच्या राजपत्रात नावे प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या मुदतीत आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. या मुदतीत राजीनामा न दिल्यास त्याची लोकसभेची जागा आपोआपच रिक्त होते. १९९९ मध्ये पंजाबमध्ये विधानसभा सदस्य गुरुचरणसिंग तोहरा यांनी लोकसभेवर निवडून येऊनही १४ दिवसांत राजीनामा दिला नव्हता. परिणामी त्यांची लोकसभेची जागा रिक्त झाली होती. राज्यसभा किंवा विधान परिषद सदस्य लोकसभा वा विधानसभेवर निवडून आल्यास सदस्यत्व आपोआपच रद्द होते. लोकसभेत निवडून आलेले विद्यामान लोकप्रतिनिधी पियूष गोयल (भाजप) – राज्यसभा उदयनराजे भोसले (भाजप ) – राज्यसभा लोकसभेवर निवडून गेलेले आमदार बळवंत वानखडे (अमरावती, काँग्रेस), प्रणिती शिंदे (सोलापूर, काँग्रेस), संदिपान भूमरे (औरंगाबाद, शिवसेना शिंदे गट), रविंद्र वायकर (वायव्य मुंबई, शिवसेना शिंदे गट), वर्षा गायकवाड (उत्तर मध्य मुंबई काँग्रेस), प्रतिभा धानोकर (चंद्रपूर, काँग्रेस)