Category: होम

‘झोपडीवासीयांना भाड्याची सद्यःस्थिती मोबाईलवरच कळणार’

प्राधिकरणाकडून स्वतंत्र अ‍ॅप लवकरच कार्यान्वित मुंबई : झोपडीवासीयांना आता विकासकांकडून मिळणाऱ्या भाड्याची सद्यःस्थिती काय आहे, भाडे कधी जमा होणार वा जमा झाले असल्याचा त्याचा तपशील आदी बाबी आता मोबाईलवर लवकरच कळू शकणार आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने याबाबत ‘भाडे व्यवस्थापन यंत्रणा’असे स्वतंत्र अ‍ॅप कार्यान्वित केले आहे. या अ‍ॅपवर झोपडीवासीयाला मोबाईल क्रमांक, ईमेल असा तपशील देऊन नोंदणी करता येणार आहे. त्याद्वारे त्याला भाडेविषयक संपूर्ण तपशील प्राधिकरणात खेटे न घालता पाहता येणार आहे. गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंग यांनी या अ‍ॅपला हिरवा कंदिल दाखविला आहे. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. कल्याणकर यांनी सूत्रे स्वीकारताच याबाबत तात्काळ कार्यवाही सुरू केली होती. हे अ‍ॅप लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे. यामुळे झोपडीवासीयांना भाड्याची निश्चित स्थिती कळू शकणार आहे. झोपडीवासीयांच्या भाड्याचा प्रश्न संवेदनाक्षम असून थकित भाड्यापोटी उच्च न्यायालयानेही प्राधिकरणाची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यानंतर प्राधिकरणाने २१० क्रमांकाचे परिपत्रक जारी केले. या परिपत्रकानुसार, झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यापूर्वी विकासकाने झोपडीवासीयांना दोन वर्षांचे आगाऊ भाडे आणि त्यानंतर पुढील वर्षभराचे धनादेश प्राधिकरणाकडे जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कुठलीही रखडलेली योजनाही पुन्हा सुरू करण्यासाठी विकासकाला या परिपत्रकाची अंमलबजावणी केल्याशिवाय काम सुरू करण्याचे पत्र दिले जात नाही. हे भाडे प्राधिकरणाकडून झोपडीवासीयांना दिले जाते. या परिपत्रकामुळे थकित भाड्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. आता एक पाऊल पुढे जात, प्राधिकरणाने भाडेविषयक कुठलीही तक्रार असल्यास अ‍ॅपवर नोंदविण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. या शिवाय आता प्रत्येक झोपडीवासीयाला आपल्या भाड्याची सद्यःस्थितीही कळू शकणार आहे. हजार कोटी रुपये भाड्यापोटी जमा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे आतापर्यंत हजार कोटी रुपये भाड्यांपोटी जमा झाले आहे. हे भाडे झोपडीवासीयांना प्रत्यक्षात देण्यासाठी प्राधिकरणाने सहायक निबंधक संध्या बावनकुळे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. याशिवाय आता अपवर कुठल्या योजनेत, कोणत्या विकासकाने भाडे दिलेले नाही आदी तपशील ॲपवर सहजगत्या उपलब्ध होणार आहे.

विद्यार्थी व नागरिक लोकसहभागातून स्वच्छता मोहीम

वाशी मिनी सी शोअर परिसरात नवी मुंबई :‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छताविषयक विविध उपक्रम विभाग पातळीवर राबविण्यात येत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभागावर भर दिला जात आहे.  या अंतर्गत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांचे नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी वाशी विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सागर मोरे तसेच स्वच्छता अधिकारी श्री.सूर्यकांत म्हात्रे यांच्यासह प्रत्यक्ष सहभागी होत विद्यार्थी व स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या सहयोगाने वाशी विभागात स्वच्छता मोहीम राबविली. वाशीतील टिळक महाविद्यालय आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामधील एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्र येत महानगरपालिकेच्या वाशी विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छतामित्रांसह एकत्र येत जुहूगाव चौपाटी, वाशीतील मिनी सी शोअर, सेक्टर-१० परिसरातील प्लास्टिक कचरा जमा केला तसेच परिसराची स्वच्छता केली. 78 विद्यार्थी व नागरिकांनी महापालिकेच्या कर्मचा-यांसह राबवलिलेल्या या स्वच्छता मोहीमेमध्ये ४० पोती प्लास्टिक कचरा तसेच १५ पोती काचेच्या बाटल्या जमा करण्यात आल्या. याप्रसंगी उपस्थितांनी ‘माझी वसुंधरा’ अभियानातील पर्यावरण जपणूकीची शपथ तसेच ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिक प्रतिबंधाची शपथ ग्रहण केली.

आदिवासी क्रांती सेनेच्या भिवंडी, पालघरमध्ये दहा शाखांचे अनावरण

ठाणे : आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी तरूणांनी संघटनेत प्रवेश केला असून भिवंडी आणि पालघर तालुक्यात सुमारे दहा शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी भिवंडी, वाडा आणि पालघर तालुक्यामध्ये आदिवासी क्रांती सेनेच्या वतीने मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी  वाडा येथे आयोजित मेळाव्यात  अनिल भांगले यांच्या नेतृत्वाखाली  वाडा तालुक्यातील अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी क्रांतीसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.  यावेळेस दयानंद हरळ यांची आदिवासी क्रांति सेना पालघर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली,  तसेच वैभव  सुरेश भोमटे यांची आदिवासी क्रांतिसेना  पालघर जिल्हा उपाध्यक्षपदी;   संतोष जांजर यांची पालघर जिल्हा आदिवासी क्रांती सेना पालघर जिल्हा सचिव पदी ;  प्रकाशजी हरळ यांची आदिवासी क्रांती सेना पालघर जिल्हा संघटक पदी;    अनंता सरडे  आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी अध्यक्ष पदी;  संदीप दळवी  आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी उपाध्यक्ष पदी;  संजय मोरगा   आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी संघटक पदी;   जगन मोरे  यांची आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी सचिव पदी;  संदेश वाघ  यांची आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी उपसचिव पदी;   सुनील हरल  यांची आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी संपर्क प्रमुख पदी; भिवंडी तालुकाध्यक्ष पदी संतोष पाडेकर; भिवंडी सचिवपदी बबलू पाटील, उपसचिव पदी गणेश हडल , दीपक धोदडे तर संघटनेच्या सल्लागार पदी सुनील भांगरे यांची निवड करण्यात आली.

नगरपरिषदेच्या ई रिक्षांचा वापर घनकचरा व्यवस्थापनसाठी करावा

स्थानिकांची मागणी माथेरान : सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सध्या इथे हातरीक्षा मालकांना एकूण वीस ई रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याची मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे अल्पावधीतच या वीस ई रिक्षा शालेय विद्यार्थी, दिव्यांग,जेष्ठ नागरिक, रुग्णांना त्याचप्रमाणे पर्यटकांना सेवा देण्यासाठी सज्ज राहणार आहेत. याअगोदर प्रायोगिक तत्त्वावर ठेकेदारामार्फत  सुरू असणाऱ्या नगरपरिषदेच्या मालकीच्या  सात ई रिक्षा बंद कराव्या लागण्याची शक्यता आहे.या सात ई रिक्षांची विक्री करण्याऐवजी त्या घनकचरा व्यवस्थापन कामी उपयोगात आणल्यास दरवर्षी लाखो रुपयांची उधळण ह्या ठेक्यासाठी केली जात आहे त्यावर मात करता येऊ शकते. याच माध्यमातून नगरपरिषदेच्या तिजोरीवर आर्थिक भार येणार नसून लाखो रुपयांची बचत यानिमित्ताने होऊ शकते. हीच आर्थिक गुंतवणूक गावातील अन्य विकास कामांसाठी उपयोगी पडू शकते. गावातील त्याचप्रमाणे पॉईंट्स भागातील कचऱ्याचे संकलन जलदगतीने करण्यासाठी मदत होऊ शकते. यामुळे माथेरान हे सुंदर पर्यटनस्थळ स्वच्छतेत अग्रेसर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सात ई रिक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची प्रवासी वाहतूक न करता घनकचरा व्यवस्थापन साठी उपयोगात आणल्यास हे शहर खऱ्या अर्थाने अस्वच्छतेवर मात करू शकते. या गावाचे हीत जोपासण्यासाठी नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाने,जिल्हाधिकारी रायगड यांनी सनियंत्रण समितीला विश्वासात घेऊन पाऊले उचलल्यास नक्कीच हे शहर प्लास्टिक कचरा मुक्त पर्यटनस्थळ बनेल अशी मागणी पुढे येत आहे. मॉनिटरिंग समितीकडे हा विषय मांडण्यात येईल.त्यानंतर पुढील आदेश प्राप्त झाल्यास निर्णय घेण्यात येईल. -राहुल इंगळे प्रशासक तथा मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद

निरंजन डावखरे यांना पाठिंबा

स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाचा ठाणे : महाराष्ट्र राज्य स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाने भाजपाचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या २०१८ च्या निवडणुकीप्रमाणेच स्वाभिमान शिक्षक संघाने या निवडणुकीतही निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिला. भाजपाचे मुरबाड येथील आमदार व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार निरंजन डावखरे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. तसेच कोकणातील प्रत्येक शिक्षक मतदारापर्यंत पोचून भाजपाला मतदानाचे आवाहन करणार असल्याची ग्वाही दिली. या वेळी संघटनेचे राज्याध्यक्ष यादव पवार, राज्य संपर्क प्रमुख राणू बनसोडे, ठाणे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटोळे, जिल्हा कोषाध्यक्ष विनायक जाधव, तालुका अध्यक्ष नारायण गोल्हे, भरत पांढरे, वसंत घावट, दिपक धूमाळ, रवींद्र घोडविंदे आदी उपस्थित होते. कोकणात डिजिटल शाळा, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, शिक्षकांचे प्रश्न, पेन्शन योजना मंजुरी आदींबाबत आमदार डावखरे यांच्याकडून केला जाणारा पाठपुरावा स्तुत्य आहे, अशा शब्दांत आमदार किसन कथोरे यांनी कौतुक केले. तसेच आमदार डावखरे यांना बहुमताने विजय मिळेल, असा विश्वास श्री. कथोरे यांनी व्यक्त केला.

कोकण पदवीधर मतदार संघातून गोकुळ पाटील रिंगणात

शिक्षकांचा पाठींबा ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघातून गोकुळ रामजी पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नसलेले सर्वसामान्य कुटुंबातील शिक्षकांच्या समस्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ रामजी पाटील यांना शिक्षकांच्या पाठिंब्यावर कोकण पदवीधर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.पदवीधर आमदार देखील शिक्षकच असला पाहिजे असे शिक्षकांचे म्हणणे आहे म्हणून त्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे गोकुळ पाटील म्हणाले. गोकुळ पाटील सर गेल्या 29 वर्षापासून सर्व शिक्षक शिक्षकेतर संस्थापक यांच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी माजी आमदार रामनाथ मोते सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर एल आर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. सातत्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी गोकुळ पाटील सर अग्रेसर असतात त्यामुळे शिक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे श्री पाटील यांनी कोकण पदवीधर मतदार उमेदवारी संघातून अर्ज भरला आहे.यामुळे कोकण पदवीधर मतदार संघात गोकुळ पाटील यांची उमेदवारी आव्हान ठरण्याचे चिन्ह आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने, महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महाराणा प्रताप यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने, त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

कामगारनेते गोविंदराव मोहिते एक बहुआयामी व्यक्तीमत्व

विशेष राजेंद्र साळसकर १९७० साली गिरणी उद्योग मुंबईत फार फोफावला होता.या काळात हा उद्योग अत्यंत भरभराटीला आला होता. एकंदरीतच सत्तर ते ऐंशी दशकाचा काळ हा टेक्सटाईल उद्योगाचा सुवर्ण काळच होता…

लोकशाहीचा विजय

विशेष श्याम ठाणेदार जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव अर्थात लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली आणि या लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर झाला. देशातील जवळपास…