Category: मुंबई

Mumbai news

खळबळजनक

हेमंत करकरेंवर कसाबने नव्हे पोलिसांनीच गोळ्या झाडल्या  विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज खळबळजनक दावा केलाय. २६/११ हल्ल्यात शहीद झालेले आयपीएल अधिकारी हेमंत करकरे यांच्यावर कोणत्याही दहशतवाद्याने नाही, तर राष्ट्रीय…

भाजपचं इंजिन बंद पडल्यामुळेच मनसेचं इंजिन घेतलं- जयंत पाटील

मुंबई : भाजपचे इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं, अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. शरद पवारांचं आणि उध्दव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललं आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे…

कसाब बिर्याणीबाबत ॲड. निकम यांचा निर्लज्ज खोटेपणा – सुप्रिया श्रीनेत

मुंबईतील सहाही जागांवर मविआ आणि इंडिया आघाडीचाच विजय. मुंबई : ॲड उज्ज्वल निकम हा खोटारडा आणि निर्लज्ज माणूस आहे. कसाबच्या बिर्याणीबाबत त्यांचा खोटेपणा उघड झाला. खोटेपणाती त्यांनीच कबूली दिलेली आहे. आता पुन्हा हाच माणूस उलच्या उड्या मारतोय. एका मुलीला डावलून भाजपने ॲड. निकम यांना उमेदवारी दिलीय. आता कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना निवडून देत मतदार भाजपाला धडा शिकवतील, अशी घणाघाती टीका कॉंग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य (CWC), सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रमुख श्रीमती सुप्रिया श्रीनेत यांची विशेष पत्रकार परिषद मुंबई कॉंग्रेसच्या कार्यालयात झाली. यावेळी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याबाबत माहिती त्यांनी दिलीच पण ४०० ची घोषणा करणाऱ्या भाजपने कॉंग्रेसची सत्ता येतेय हे मान्य केलंय असंही सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितलं. मुंबईबाबतच्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, भाजपला बाहेरून उमेदवार आयात करावे सागले. एक धादांत खोटं बोलणारा आहे. तर दुसरे उमेदवार पियुष गोयल यांना भूमीपूत्र असलेल्या कोळी समाजाचा ते अवमान करतात. हे गरीबांच्या विरोधातील लोक आहेत. कोळी माणसाचा वासही सहन न होणाऱ्या गोयल यांना सामान्य माणसं धडा शिकवतील. कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय ही भाजपला गुंगवणारी चाल आहे. यामुळे भाजपची रणनिती उद्धस्त झाली. आता अमेठीत एक सक्रीय कार्यकर्ता भाजपच्या उमेदवारावर सहज मात करेल, असा दावाही सुप्रिया श्रीनेत यांनी केला. मुंबईत इंडिया आघाडीचे सहाही उमेदवार जिंकणारच. देशभरातलं वातावरण भाजप आणि मोदींच्या विरोधातील आहे. याची जाणीव भाजपला होतेय. म्हणूनच कॉंग्रेस सत्तेवर आल्यास काय करेल याच्या खोट्या वावड्या उठवतायत, असं ठामपणे सांगताना सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षात काहीच काम न झाल्याने ते मोदी आणि भाजपच्या नेत्यांना ते सांगता येत नाहीय. म्हणूनच भाजपनेते कॉंग्रेस आणि राहूल गांधी यांचाच जप करतायत.

मुंबईतला पहिला रोपवे मुलुंड ते एसजीएनपी होणार

पर्यटनमंत्र्यांनी विभागाला तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना SGNP ला धक्का न लावता रोपवे बांधला जाईल आणि नवीन पर्यटन स्थळ विकसित केले जाईल – कोटेचा मुंबई: लवकरच, मुंबईला एक नवीन पर्यटन स्थळ मिळणार असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जुन्या तीन मूर्ती मंदिरासाठी रोपवे (केबल कार) बांधण्यात येणार आहे. तसेच त्याच्या निसर्गरम्य सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी एक पर्यटन केंद्र विकसित केले जाणार आहे. मुलुंडचे आमदार आणि मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी तशी मागणी केली असून, सरकारने पर्यटन विभागाला त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितला आहे. कोटेचा यांनी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना लिहिलेल्या पत्रात मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या मुलुंड विधानसभा क्षेत्रालगत च्या संजय गांधी राष्ट्रीय उद्याना जवळच्या तीन मूर्ती मंदिरकरिता रोप वे ची सुविधा व पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी निधीची तरतूद करण्याबाबत मागणी केली आहे. पत्रामध्ये कोटीचा यांनी असे म्हटले आहे की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील संरक्षित क्षेत्र असून त्याची व्याप्ती साधारण 87 कीमी परिघात आहे. याच राष्ट्रीय उ‌द्यानाची पूर्वेकडील सीमा माझ्या मुलुंड मतदारसंघाला लागून आहे. मुलुंड मधील नागरीकांना आपल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत त्यामुळे मी मुलुंडकर नागरिकांच्या वतीने ही मागणी आपणांकडे करीत आहे. संजय गांधी उ‌द्यानाच्या च्या हद्दीत सुंदर असे डोंगर असून या डोंगर माथ्यावर फार जुने तीन मूर्ती मंदीर आहे या मंदिरात भाविकांना सहज रित्या येता यावे म्हणून तिथे रोप वे व्यवस्था तसेच पर्यटकांना viewing gallery केल्यास भाविकांची व पर्यटकां ची संख्या वाढेल. या सुविधा मुळे शासनास महसूल ही मिळेल. माझ्या ह्या मागणीचा सकारात्मक विचार करून या करीता निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली आहे. कोटेचा यांच्या पत्रानंतर महाजन यांनी पर्यटन विभागाला लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्यास करण्याचे आदेश दिले. एप्रिलमध्ये पर्यटन विभागाने प्रस्ताव तयार करण्यासाठी संचालक, पर्यटन विभागाकडून सविस्तर अहवाल मागवला होता.…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात शिष्यवृत्ती धारकांचे सादरीकरण

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गायन, वादन आणि  नृत्य, यांच्या प्रगत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जातात; आणि या  विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या अवलोकनासाठी दरवर्षी त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा कार्यक्रम शनिवार दिनांक ११ मे आणि रविवार दिनांक १२ मे रोजी सकाळी १० वाजता आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. यात सहभागी होणाऱ्या गायकांना केंद्राचे शिष्यवृत्तीधारक निनाद कुणकवळेकर तबल्याची साथ करणार असून हार्मोनियमची साथ ओमकार अग्निहोत्री यांची असेल. शनिवार दिनांक ११ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात समृद्धी शिंदे – भरतनाट्यम नृत्य ( गुरु – स्नेहल फाटक- कळमकर), कनिष्का पोवळे – गायन (गुरु – प्रतिमा टिळक), सिद्धी शितूत – गायन (गुरु- वरदा गोडबोले), आसावरी गोंधळी – गायन (गुरु – पं. अरुण कशाळकर) हे आपली कला सादर करतील तर रविवार दिनांक १२ मे रोजी सकाळी १० वाजता सावनी पारेकर ( गुरु – पल्लवी जोशी), अदिश्री पोटे (गुरु – पल्लवी पोटे), प्राजक्ता शेंद्रे (गुरु – पल्लवी जोशी), सावनी गोगटे (गुरु पं. शुभदा पराडकर) यांच्या गायनाचे सादरीकरण होईल. सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी मोठ्या संख्येने हजर राहून सर्व युवा कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

मद्यविक्रीचा बंदीचा आदेश मतदान काळ आणि मतदारसंघापुरता मर्यादित

उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती मुंबई : मद्यविक्रीचा बंदीचा आदेश मतदान काळ आणि मतदारसंघापुरता मर्यादित असल्याचे उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. तसेच, याबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात सुधारणा केली आहे. रायगड जिल्ह्यात रायगड आणि मावळ हे दोनच लोकसभा मतदारसंघ असून दोन्हींसाठी अनक्रमे ७ व १३ मे रोजी मतदान होणार आहे. ही बाब लक्षात घेता कायद्याने दोन्ही मतदारसंघात केवळ मतदानाच्या ४८ तासांच्या आधी आणि मतदान संपेपर्यंत मद्यविक्रीला बदी घालता येऊ शकते. दोन्ही मतदारसंघात वेगवेगळ्या दिवशी मतदान होणार असल्याने जिल्हाधिकारी संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अट लागू करू शकत नाहीत, असेही न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या याचिकेवर निर्णय देताना खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले. मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत आणि उरण या विधानसभा मतदारसंघाचा, तर रायगड लोकसभा मतदारसंघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. परंतु, लोकप्रतिनिधी कायद्याच्या संबंधित कलमाला बगल देऊन रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात मतदान काळात मद्यविक्रीवर बंदी घालणारा आदेश काढला आहे. औरंगाबाद खंडपीठाने यासंदर्भात दिलेल्या आदेशाचा दाखला याचिकाकर्त्यांनी आदेशात सुधारणा करण्याची मागणी करताना दिला होता. दुसरीकडे, लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १४२ नुसार जिल्हाधिकाऱ्यांना मद्यविक्रीवर बंदी घालण्याचे अधिकार असून त्यात हस्तक्षेप करता येऊ शकत नाही, असा दावा सरकारी वकिलांनी याचिकाकर्त्यांच्या याचिकेला विरोध करताना केला. तथापि, कायद्यानुसार बंदीचा आदेश हा केवळ मतदान क्षेत्रापुरता मर्यादित असून त्यापलीकडे तो लागू केला जाऊ शकत नाही. त्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांना मद्यविक्री बंदीचे आदेश लागू करण्याचा अधिकार असला तरी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या अधिकाराला मर्यादा आहेत, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देताना नमूद केले. शिवाय, मद्यविक्री बंदीचा आदेश हा केवळ मतदान काळापुरता मर्यादित असून त्यानंतर तो लागू होऊ शकत नाही, या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. तसेच, रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी लागू केलेल्या मद्यविक्रीच्या आदेशात सुधारणा केली. न्यायालयाच्या सुधारित आदेशानुसार, रायगड लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश हा ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ७ मे रोजी मतदान पूर्ण होईपर्यंत लागू असेल. त्यानंतर, ४ जून रोजी हा आदेश पुन्हा लागू होईल आणि तो निकाल जाहीर होईपर्यंत कायम राहील. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मद्यविक्री बंदीचा आदेश ११ मे रोजी सायंकाळी ५ वाजता लागू होऊन १३ मे रोजी मतदान पूर्ण होईपर्यंत कायम राहील. त्यानंतर, ४ जून रोजी हा आदेश पुन्हा लागू होईल आणि तो निकाल जाहीरपर्यंत कायम राहील.

पनवेल ते मडगाव, सावंतवाडी विशेष रेल्वेगाड्या धावणार

मुंबई : उन्हाळी हंगामात, सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११५८ मडगाव ते पनवेल विशेष रेल्वेगाडी ६ मे रोजी सकाळी ६ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी पनवेल येथे सायंकाळी ६.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५७ पनवेल – मडगाव विशेष रेल्वेगाडी पनवेल येथून ८ मे रोजी पहाटे ४ वाजता निघेल. ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीला करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, अडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा येथे थांबा आहे. या रेल्वेगाडीला २० एलएचबी डबे असून त्यातील १० शयनयान, ८ सामान्य आणि दोन एसएलआर डबे असतील. गाडी क्रमांक ०११५९ पनवेल – सावंतवाडी रोड विशेष रेल्वेगाडी ६ मे रोजी रात्री ८ वाजता पनवेल येथून निघेल. दुसऱ्या दिवशी ती गाडी सावंतवाडी रोडला सकाळी ६ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६० सावंतवाडी रोड – पनवेल विशेष गाडी ७ मे रोजी दुपारी ४ वाजता सावंतवाडी रोडवरून निघेल. दुसऱ्या दिवशी ही गाडी रात्री ३ वाजता पनवेलला पोहोचेल. या रेल्वेगाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबा असेल. या गाडीला २० एलएचबी डबे असून यामधील १० शयनयान, ८ सामान्य आणि दोन एसएलआर डबे असतील, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. शिमगा म्हणजेच होळीच्या आधीपासून कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची गर्दी वाढू लागते. त्यामुळे या कालावधीत विशेष गाड्या सोडल्या जातात. त्यानुसार यंदाही मार्चपासूनच कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या मार्गावर ६ जूनपर्यंत विशेष गाड्या धावतील. कोकण रेल्वे मार्गावर ब्लॉक दरम्यान, विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार असला तरी प्रवासाचा कालावधी वाढणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी, मंगळवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळावर परिणाम होणार आहे. ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.

पावसाळापूर्व कामे  वेळेत पूर्ण करण्याचे नमुंमपा आयुक्त शिंदे यांचे आढावा बैठकीत निर्देश

नवी मुंबई :नवी मुंबई शहरातील सर्व प्राधिकरणांमध्ये परस्पर समन्वय रहावा व पावसाळी कालावधीत कोणतीही अडचण उद्भवल्यास त्याचे तत्परतेने निराकरण व्हावे यादृष्टीने महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.कैलास शिंदे यांनी यापूर्वी सर्व प्राधिकरणांच्या संयुक्त बैठकीत सूचित केल्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत केल्या जाणा-या पावसाळापूर्व कामांचा विभागनिहाय व सुविधानिहाय आढावा विशेष बैठकीत घेतला. यामध्ये त्यांनी महापालिका क्षेत्रातील सुरु असलेल्या कामांची सद्यस्थिती शहर अभियंता तसेच आठही विभागांचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून विभागवार जाणून घेतली. सुरु असलेली कामे 15 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पावसाळा कालावधी लवकर सुरु होणार असून पावसाचे दिवस कमी असतील मात्र तीव्रता अधिक असेल हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने तयारीत रहावे असे आयुक्तांनी सूचित केले. बेलापूर ते दिघा अशा आठही विभागात सुरु असलेल्या रस्ते, चौक आदी कामांची सदयस्थिती जाणून घेतानाच होल्डिंग पाँड व त्यावरील फ्लॅप गेट बसविण्याची कामेही तातडीने पूर्ण करुन घ्यावीत असे आयुक्तांनी निर्देश दिले. गटारांची सफाई करताना काढला जाणारा गाळ हा दोन ते तीन दिवसांतच उचलण्याची कार्यवाही काटेकोरपणे केली जावी असेही आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले. काही ठिकाणी बंद गटारांवरील झाकणे तुटली असल्यास ती तत्परतेने बदलावीत तसेच झाकणांच्या अधिकच्या चाव्या बनवून घ्याव्यात असेही सूचित करण्यात आले. मोठे नाले सफाईची कामे सुरु झाली असून त्या कामांना वेग दयावा आणि ती लवकरात लवकर विहित वेळेत पूर्ण होतील याकडे कटाक्षाने लक्ष दयावे असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. या नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात कोणताही अडथळा राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे सूचित करतानाच काही ठिकाणी नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात झोपडया असल्यास त्या हटविण्याची कार्यवाही करावी असेही निेर्देश देण्यात आले. आठही विभागांचे सहा.आयुक्त तसेच स्वच्छता अधिकारी यांनी या बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष दयावे असे आयुक्तांनी सूचित केले. विभागवार सुरु असलेल्या पावसाळापूर्व कामांची सदयस्थिती काम निहाय लेखी स्वरुपात घेण्यात यावी तसेच 15 मे आणि 30 मे लाही त्या त्या वेळची स्थिती लेखी स्वरुपात आठही कार्यकारी अभियंत्यांकडून संकलित करावी व एकत्रित स्वरुपात सादर करावी असे निर्देश आयुक्तांनी शहर अभियंता यांना दिले. मोठया उधाण भरतीची वेळीच अतिवृष्टी झाल्यास शहरात काही ठिकाणी पाणी साचते अशा संभाव्य ठिकाणी पाणी उपसा पंपांची व जनरेटरची पुरेशा संख्येने व्यवस्था करुन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी झोपडया असल्यास त्या स्थलांतरित कराव्यात असेही सूचित करण्यात आले. या कालावधीत पिण्याचे पाणी शुध्द राहील याची विशेष दक्षता घेण्यात यावी तसेच पाणीपुरवठा व मलनि:स्सारण व्यवस्था सुस्थितीत कार्यान्वित राहील याचीही काळजी घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले. सोसायटयांच्या कुंपण भिंती पडून दूर्घटना होऊ नये याची पूर्वदक्षता घेऊन तशा प्रकारच्या धोकादायक कुंपण भिंती आढळल्यास त्या दुरुस्त करुन घेण्याच्या सूचना विभाग कार्यालयामार्फत सोसायटींना दयाव्यात असेही सूचित करण्यात आले. सायन-पनवेल हायवेवरील सबवे तसेच रेल्वे स्टेशन नजिकचे सबवे यांची स्वच्छता करुन घ्यावी व त्या ठिकाणी विदयुत व्यवस्था व सीसीटीव्ही व्यवस्था राहील याकडे लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. पावसाळा कालावधीत रस्त्यावरील दिवाबत्ती तसेच सिग्नल यंत्रणा सुस्थितीत राहील याची काळजी घेण्याच्या विदयुत विभागास सूचना देण्यात आल्या. शहरात बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी अपघात प्रतिबंधक सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत याची खात्री करुन घ्यावी तसेच महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची यादी घोषित करावी असेही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. अतिधोकादायक इमारतींच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यात आलेले आहेत याची खात्री करुन घ्यावी तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यादृष्टीने सदर इमारती रिक्त करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. पावसाळी कालावधीत साथीचे रोग उद्भवू नयेत यादृष्टीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात तसेच आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करुन ठेवण्यात यावा अशा सूचना देण्यासोबतच नमुंमपा रुग्णालयांमध्ये साथरोग वॉर्ड कार्यान्वित करण्याचेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. उदयान विभागामार्फत होणाऱ्या वृक्षछाटणीमध्ये धोकादायक व अडथळा आणणाऱ्याच फांदयांची छाटणी केली जावी तसेच छाटणीनंतर होणारा हरित कचरा उचलून नेण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाशी समन्वय राखून विनाविलंब कार्यवाही करावी असेही सूचित करण्यात आले. अग्निशमन दलाने उपलब्ध यंत्रसामग्रीची तपासणी करून घ्यावी तसेच मदतकार्याची सज्जता करून ठेवावी अशा सूचना देण्यात आल्या. पावसाळी कालावधीत मदतकार्य करण्यासाठी तत्पर असणारे विभाग कार्यालये व अग्निशमन केंद्र येथील आपत्कालीन नियंत्रण कक्ष 24×7 कार्यरत राहतील याचे नियोजन करावे व त्याठिकाणी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध करुन ठेवावी असे निर्देश देण्यात आले. तसेच आठही विभाग कार्यालय स्तरावर आपत्ती काळात अडचणीच्या प्रसंगी नागरिकांनी स्थलांतरित करावे लागल्यास तात्पुरत्या निवा-याच्या जागा निश्चित करुन ठेवून तेथे अन्नपदार्थांसह गरजेच्या वस्तू उपलब्ध राहतील याचे आत्तापासूनच नियोजन करुन ठेवावे अशाही सूचना देण्यात आल्या. पावसाळापूर्व नालेसफाई व गटारे सफाई या कामांना गती दयावी तसेच सुविधा कामांसाठी झालेले खोदकाम 15 मे पर्यंत पूर्ववत करुन घ्यावे असे सूचित करतानाच नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांनी आपापली जबाबदारी सुयोग्य रितीने पार पाडावी व सुसज्ज राहावे असे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी विविध विभागांनी करावयाच्या कामांचा बाबनिहाय आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. शिरिष आरदवाड, शहर अभियंता श्री. संजय देसाई, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त्‍ श्री. चंद्रकांत तायडे व इतर विभागप्रमुख तसेच आठही विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

पत्रकारितेत राजकारणाशिवाय दुसरे विषयही महत्वाचे – विजय कुवळेकर

रमेश औताडे मुंबई : राजकारणाशिवाय दुसरे इतर विषय ही महत्वाचे आहेत. प्राधान्य कशाला द्यावे याचे भान अपवाद वगळता काही मालक संपादक पत्रकार विसरत चालले आहेत. अनेक पत्रकारांना भूगोल, इतिहास, समाजशास्त्र इतर विषयाचे आकलन नाही. यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करून देण्याची गरज आहे.असे मत ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनी महाराष्ट्र संपादक परिषद ने आयोजित केलेल्या पत्रकारिता गौरव आदर्श साहित्य पत्रकारिता सन्मान पुरस्कार व विशेष पुरस्कार २०२३ सोहळ्यावेळी व्यक्त केले. शनिवार ४ मे रोजी मुंबईतील  दादर- माटुंगा कल्चरल सेंटर, जे. के. सावंत मार्ग, माटुंगा पश्चिम येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला. होता. महाराष्ट्र संपादक परिषदेचे संस्थापक स्व. यशवंत पाध्ये यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार श्यमाजी मालकर, प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ संपादक शविजय कुवळेकर आणि जेष्ठ नाटककार शसुरेश खरे उपस्थित होते. त्याचप्रमाणे दैनिक देशोन्नतीचे संपादक श प्रकाश पोहरे आणि जेष्ठ साहित्यिक रवींद्र आवटी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुसंवादिनी शिबानी जोशी यांनी केले.तर मुंबई आऊटलूक मीडिया हाऊस चे मुख्य संपादक व महाराष्ट्र संपादक परिषद चे अध्यक्षसंजय मलमे यांनी आभार मानले. पत्रकारिता साहित्य गौरव पुरस्कारासाठी झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक शकमलेश सुतार, दैनिक ठाणे वैभवचे संपादक  मिलिंद बल्लाळ, दैनिक संध्याकाळच्या संपादिका रोहिणी खाडिलकर, आयबीएन लोकमत चे प्रतिनिधी  महेश तिवारी, एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या पत्रकार ज्ञानदा कदम,  पुण्य नगरी – ठाणे चे निवासी संपादक हेमंत जुवेकर, महाराष्ट्र टाइम्स चे प्रतिनिधी  वैभव वझे, सीएनएन न्यूज १८ च्या ब्युरो चीफ विनया देशपांडे (पंडित), मराठवाडा साहित्य संमेलन २०२३ चे माजी अध्यक्ष महेश माळवे, साप्ताहिक लोकवृत्तान्त चे संपादक एकनाथ बिरवटकर यांना पुरस्कार देण्यात आले. पत्रकारिता साहित्य गौरव विशेष पुरस्कारासाठी जेष्ठ साहित्यिक रवींद्र आवटी, दैनिक नांदेड एकजूटच्या जेष्ठ संपादिका अनुराधा विष्णूपुरीकर, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील आनंदराव (दादा) माईगडे, लोककला शाहीर रुपचंद चव्हाण यांना पुरस्कार दिले. महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था कोणत्याही संघटनेशी समांतर किंवा स्पर्धात्मक कार्य न करता पत्रकारितेच्या उद्दिष्टांसाठी कार्यरत राहणारी संस्था आहे. ही संस्था म्हणजे संपादक-मालक प्रामुख्याने दैनिकांचे व त्यांनी नामनिर्देशित केलेले प्रतिनिधी यांची संघटना आहे. ही संस्था ध्येयासक्त, पारदर्शी आणि विश्वासार्ह आदर्श पत्रकारितेसाठी वचनबद्ध असेलेली संस्था आहे. ही संस्था मराठी भाषा, संस्कृती व अस्मितेशी वचनबद्ध असून, या संस्थेने वाचन संस्कृतीचे संवर्धन व ग्रंथालय चळवळीमध्ये सहभाग घेतला होता. विविध प्रसार माध्यमांशी अनुबंध निर्माण करून त्यांच्या सहयोगातून लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकजागृती यांसाठी सहभाग घेणे, पत्रकारांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविणे, पत्रकारिता आणि साहित्य यांचा अनुबंध राखणे आणि नैसर्गिक आणि आपदग्रस्त पत्रकारांसाठी साहाय्य करणे हे महाराष्ट्र संपादक परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट राहिलेले आहे. तसेच या संस्थेतर्फे दरवर्षी आदर्श पत्रकारिता गौरव पुरस्कार योजनेमधून राज्यस्तरीय मानवंत व गुणवंत पत्रकारांचा सन्मान केला जातो.

राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडला उपविजेतेपद 

मुंबई : महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन चे वतीने परळ येथे नुकतयाच आयोजित करण्यात आलेलया राज्य सब ज्युनिअर ज्युनिअर क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धत रायगडने  उपविजेतेपद मिळविले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून जवळ जवळ २२५ खेळाडूंनी (मुले व मुली)भाग घेतला होता. रायगडचे सब ज्युनिअर,ज्युनिअर मुला मुलींनी चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत 06 रौप्य आणि 05 कांस्य पदक एकुण  11 पदके रायगडने पटकावली. त्याचबरोबर सब ज्युनिअर मुलींच्या गटाचे सांघिक उपविजेतेपद रायगड जिल्ह्याला मिळाले आहे. उपविजेतेपदाचा चषक कार्यकारणी सदस्य संदीप कृष्णा पाटकर” यांनी  स्वीकारला. विजेतेपदाचा मान पुणे जिल्ह्याला मिळाला. रायगडच्या या यशाबाबत पॉवर लिफ्टिंग असोसिएशन रायगड”ने खेळाडुंचे खास अभिनंदन केले आहे. रायगडच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून यशवंत मोकल, सहाय्यक म्हणून संदीप पाटकर, सुभाष टेंबे आणि विक्रांत गायकवाड यांनी जबाबदारी पार पडली. पदक विजेते खेळाडू.. सब ज्युनिअर मुली– *१)आर्या भारती. (४३ किलो वजनी गट-रौप्य , आयर्न मेट जिम खोपोली.)*२)गार्गी मसुरकर (५२ किलो वजनी गट-रौप्य  आयर्न मेट जिम खोपोली.) ३) आर्या शिंदे (५७ किलो वजनी गट-रौप्य  जीव्हीआर जिम कर्जत) ज्युनिअर मुली– १) दिव्या महाडिक (४३ किलो वजनी गट- कांस्य, आयर्न मेट जिम खोपोली) २) अमृता भगत (४७किलो वजनी गट-रौप्य  पॉवर हाऊस क्लब खोपोली) ३) दिव्या शिंदे (७६ किलो वजनी गट-रौप्य , आयर्न मेट जिम खोपोली) सब ज्युनिअर मुले- १) विष्णू कल्ला(५९ किलो वजनी गट-कांस्य, संसारे फिटनेस पेण) २) संस्कार सरदार (६६ किलो वजनी गट-कांस्य, स्पार्टन जिम खालापूर) ज्युनिअर मुले– १) विनय पाटील (६६ किलो वजनी गट-कांस्य संसारे फिटनेस पेण) २) अथर्व लोधी (८३ किलो वजनी गट- रौप्य , संसारे फिटनेस पेण) ३) तन्मय पाटील (९३किलो वजनी गट-पदक, संसारे फिटनेस पेण)