Category: ठाणे

Thane news

घरे नाहीत, भाडेही नाही; विकासकावर होणार कारवाई – संजय केळकर

घरे नाहीत, भाडेही नाही; विकासकावर होणार कारवाई – संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे: गेली दहा वर्षे रहिवाशांना हक्काची घरे आणि नियमित भाडे देण्यास असमर्थ ठरलेल्या कोपरी येथील विकासकावर कारवाई करण्याचे एसआरए विभागाने मान्य केले आहे. आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता तसेच एसआरए कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता. यावेळी माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, नगरसेवक दीपक जाधव, सुरेश कांबळे, राजेश गाडे, विशाल वाघ, उपस्थित होते. ठाणे पूर्वेत कोपरी येथे एसआरए प्रकल्प सुरू असून गेली दहा वर्षे येथील रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरे मिळालेली नाहीत, शिवाय सुमारे पाच कोटी रुपयांचे भाडेही विकासकाने थकवले आहे. विशेष म्हणजे विकासकाने सेल इमारतीमधील घरांची विक्रीही सुरू केली असून रहिवाशांना हक्काची घरे देण्यास टाळाटाळ करत आहे. या प्रकरणी केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. अखेर चार दिवसांत विकासकावर कारवाई न झाल्यास रहिवाशांचा मोर्चा एसआरए कार्यालयावर नेण्याचा इशारा  केळकर यांनी दिला. त्यामुळे विभागाच्या सीईओंनी विकासकावर कारवाई करण्याचे मान्य केल्याची माहिती केळकर यांनी दिली. ठाण्यात बाधितांना रेंटल इमारतीत तात्पुरती घरे देण्यात आली असून या घरांची दुरवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षे त्यांना बीएसयूपी योजनेत हक्काची घरे मिळालेली नसून आता रेंटल इमारतीतील घरेही खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. हा रहिवाशांवर अन्याय आहे. त्यामुळे किती कुटुंबे बाधित झालेली असून किती जणांना घरे मिळालेली आहेत, महापालिकेकडे किती घरे उपलब्ध असून किती जण प्रतीक्षा यादीत आहेत याचा एकत्रित आराखडा करण्याची गरज असून लवकरच याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली.जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात मुंबईतील आदर्श स्टॉलधारक संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. ब्रिटिशकालीन हजारो स्टॉल धारकांना फेरीवाला ठरवणारा अन्यायकारक निर्णय महापालिकेने घेतला असून हजारो कुटुंबे रस्त्यावर येण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबाबत आमदार केळकर यांनी सातत्याने महापालिकेशी पाठपुरावा करून अधिवेशनातही त्यांची बाजू मांडली. येत्या गुरुवारी मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहितीही केळकर यांनी दिली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही गेली दहा वर्षे विकासकाने रहिवाशांना घरे दिली नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली असून याबाबतही पाठपुरावा करणार असल्याचे केळकर म्हणाले. या कार्यक्रमात फायनान्स कंपन्यांनी केलेली फसवणूक आणि इतर अनेक समस्यांबाबत सुमारे ७०० लोकांनी उपस्थित राहून केळकर यांच्याकडे निवेदने दिली.

 पनवेलमध्ये कराओके गीत गायन स्पर्धेची सुरेल मेजवानी

 पनवेलमध्ये कराओके गीत गायन स्पर्धेची सुरेल मेजवानी  ६ एप्रिलला रंगणार नवोदितांना संधी राज भंडारी पनवेल : गायनाची आवड असूनही योग्य व्यासपीठ न मिळालेल्या नवोदित व हौशी गायक-गायिकांसाठी एस आर कराओके स्टुडिओच्या…

एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सहकार्य करण्याची राष्ट्रवादीची मागणी

एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सहकार्य करण्याची राष्ट्रवादीची मागणी वल्ली राजन यांनी घेतली तहसीलदारांची भेट कल्याण : सध्या एलपीजी गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी सिलेंडर बुकिंग करूनही वेळेत गॅस मिळत नाही, तसेच काही ठिकाणी काळाबाजार, अतिरिक्त पैसे आकारणी आणि जाणीवपूर्वक उशीर केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून सर्व गॅस एजन्सींनी सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन ग्राहकांना पूर्ण सहकार्य करावे, बुकिंगनुसार वेळेत सिलेंडर वितरण करावे, कोणत्याही प्रकारची अतिरिक्त पैसे आकारणी किंवा काळाबाजार करू नये अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे कार्यकर्ते वल्ली राजन यांनी कल्याणच्या तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन देत केली आहे. ग्राहकांनी बुकिंग केल्यानंतर ठराविक वेळेत गॅस पुरवठा करावा. होम डिलिव्हरीसाठी शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेऊ नयेत. कृत्रिम टंचाई निर्माण करू नये. सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्याने गॅस उपलब्ध करून द्यावा. या बाबींचे पालन न झाल्यास संबंधित गॅस एजन्सीविरोधात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल. तथापि, सद्य परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेता ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी नियमांचे पालन करून प्रशासन व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन वल्ली राजन यांनी सर्व गॅस एजन्सीच्या  व्यवस्थापकांना पत्राद्वारे केले आहे.

 महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धा

डॉली गुप्ता कास्य पदकाची मानकरी ठाणे :  हरिभाई देवाकरण प्रशाला, सिध्देश्वर पेठ, सोलापूर या ठिकाणी झालेल्या २०२६ च्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मीरा,भाईंदर येथील श्री गणेश आखाड्यातील युवा महिला कुस्तीपटू डॉली गुप्ताने चमकदार कामगिरी करताना ६२ किलो वजनी गटात कास्य पदक मिळवले. या स्पर्धेत तिला  पहिल्या  सामन्यात  कोल्हापूरच्या राधिका ढेरे सोबत  झालेल्या‌ लढतीत गुणांवर हार खावी लागली.  कुस्तीच्या नियमानुसार तिचा प्रतिस्पर्धी  फायनलमध्ये पोहोचल्यावर रीपॅच नियमा नुसार डॉली ला कास्य  पदकाच्या लढतीसाठी संधी मिळाली. या संधीचा तिने लाभ घेतला. या वेळी तिची दुसरी लढत रायगड च्या वैष्णवी कुंभार सोबत झाली. या सामन्यात डॉलीने  ही कुस्ती सहज जिंकली.मग  डॉली ची कास्य पदकाची लढत नाशिक शहर च्या संस्कृती शिरसाट सोबत झाली या सामन्यात डॉली ने आक्रमक खेळी करत संस्कृती ला चितपट करून कांस्य पदक आपल्या नावी केले. डॉली सध्या बाल-भारती का.एम.जे. पंचोलिया कॉलेज ऑफ कॉमर्स, कांदिवली (पश्चिम), येथे वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. डॉली गेली ५ वर्षांपेक्षा जास्त काळ विविध स्पर्धात सहभागी होत असुन तिने बऱ्यापेकी पदकांची कमाई देखील केली आहे.   तिला ‌वसंतराव पाटील व एन.आय.एस कुस्ती प्रशिक्षक पै.वैभव माने यांचे मार्गदर्शन मिळत आहे. 0000000

रस्ते अपघातात मयत व्यक्तीच्या अवयवदानाने ९ जणांना मिळाले जीवनदान – डॉ. रणवीर कोष्टी

रस्ते अपघातात मयत व्यक्तीच्या अवयवदानाने ९ जणांना मिळाले जीवनदान – डॉ. रणवीर कोष्टी अनिल ठाणेकर ठाणे- रस्ते अपघातात एका ३३ वर्षीय व्यक्तीचे ब्रेन डेड झाल्याने मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या सहमतीने अवयव दानाचा निर्णय ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलने घेतला. सदर व्यक्तीच्या अवयवदानाने मुंबईतील विविध रुग्णालयातील ९ जणांना अवयवदान करून जीवनदान देण्यात महावीर जैन हॉस्पिटलला यश आल्याचे हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. रणवीर कोष्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ठाण्यातील हाजुरी येथील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हॉस्पिटलचे विश्वस्त अजय आशर, महेश राजदेरकर आणि डॉक्टरची टीम उपस्थित होती. २९ मार्च ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये एक ३३ वर्षीय व्यक्तीचे रस्ते अपघातात ब्रेन डेड झाल्यानंतर नातेवाईकांना माहिती देत मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर मयत व्यक्तीच्या अवयवदानाचा निर्णय त्याच्या नातेवाईकांच्या सहमतीने घेण्यात आला. यामध्ये महावीर जैन हॉस्पिटलचे डॉक्टर रणवीर कोष्टी यांनी महत्वाची भूमिका बजावली. मुंबईतील विविध हॉस्पिटलच्या डॉक्टरांना संपर्क करून हदय, २ किडनी, लिव्हर, पॅक्ट्रिया, कॉर्निया, बोन ब्राईज असे पार्ट डोनेट करण्यासाठी संकलित करण्यात आले. यामध्ये लिव्हरचे दोन पार्ट करण्यात आले. त्याला स्प्लीट लिव्हर असे म्हणतात. केईम आणि अपोलो हॉस्पिटल असे दोन ठिकाणी पाठविण्यात आले. यात विशेष म्हणजे ९ वर्षाच्या पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लाट करण्यात यश आले. हार्ट, लिव्हर आणि किडनी हे २४ तासात ग्रीन कॉरिडॉरद्वारे रवाना करण्यात आले. त्यानंतर हे सर्व अववय ९ रुग्णांना तातडीने प्रत्यारोपण केल्याचे त्या त्या हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. ही सर्व प्रक्रिया ४० डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली. ब्रेन डेडबाबत डॉक्टरांनी सांगितले की १०० टक्के ब्रेन डेड जाहीर केल्यानंतर नातेवाईंकांकडून स्विकृती घेवूनच रुग्णाला मृत घोषित केले जाते. यामध्ये शासनाकडे पूर्ण माहिती देत त्यांच्या टीमकडून तपासणी केल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडते. सदर अवयव दान जाहीर झाल्यानंतर मुंबईतील एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल, मॅक्स नानावटी हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, सहीयारा बोन बँक येथे विविध अवयव पाठविण्यात आले. अवयव दानात सर्वाधिक मागणी किडणीला ट्रान्सपार्टला असून जवळजवळ ६० ते ७० हजार रुग्ण प्रतिक्षेत  आहेत. त्यानंतर लिव्हर आणि लंग्सचे पेशंट येतात. लाखो पेशंट हे अवयवासाठी प्रतिक्षेत असून त्यांना वेळेत अवयव पुरविण्यासाठी डॉक्टरांची टीम तत्पर असते. महावीर जैन हॉस्पिटलचे ट्रस्टी अजय आशर यांनी हॉस्पिटलच्या उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अगदी अल्प दरात उपचार आणि सुविधा पुरविण्यात येते. रुग्णांच्या सेवेसाठी आमचे रुग्णालय सज्ज आहे. आमच्या डॉक्टरांच्या टीमकडून खूप चांगले सहकार्य मिळत आहे. अवयव दान ही चळवळ असून ती अधिक वाढविण्यासाठी ठाणेकरांनी पुढे येणे गरजेचे आहे. आमच्या रुग्णालयाच्या माध्यमातून अत्यंत गरीब – गरजू रुग्णांना सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून जनतेने येथे येवून नक्कीच उपचार घ्यावेत आणि अवदान करून इतर रुग्णांचे प्राण वाचवावे, असा आमचा प्रयत्न आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेचा संतुलित अर्थसंकल्प सादर

मिरा-भाईंदर महापालिकेचा संतुलित अर्थसंकल्प सादर शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांवर मोठा भर महापालिकेतील कामाविषयी आमदारांचं पत्रकारांसमोर स्पष्टीकरण अरविंद जोशी मिरा-भाईंदर : शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिका कडून संतुलित अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून शिक्षण, आरोग्य, परिवहन व पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल घडवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पुढील एका वर्षात शहरात लक्षणीय बदल दिसून येतील,असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.अशी माहिती भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माननीय महापौर डिंपल मेहता, माननीय उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील व माननीय स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेत CBSE बोर्ड सुरू करण्याचा विचार पुढे आणण्यात आला आहे. तसेच एका वर्गात ५० टक्के खाजगी विद्यार्थी व ५० टक्के महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश करण्याचा अभिनव प्रयोग, यासोबतच शिक्षण संस्थांनी शाळा दत्तक घेण्याची संकल्पना, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस सेवा सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे.याच बरोबर क्रीडा विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपक्षण केंद्र, पशु चिकित्सक, अग्निशमन संगणक, मालमत्ता शोध मोहीम, जेष्ठ नागरिक, तलाव सुशोभीकरण, नवीन रस्ते, नाले, वैध्यकीय विभाग, औषध आरोग्य केंद्र, घणकचरा अश्या अनेक गोष्टीचा देखील अर्थ संकल्पात समावेश करण्यात आला आहे. 100 नवी शौचालय, विद्यमान शौचालयांची स्थिती सुधारली जाणार आहे. वाहतूक व बाजार व्यवस्थापनासाठी रामदेव पार्क आणि मिरारोड स्थानक परिसरात तळमजल्यावर फेरीवाल्यांसाठी व्यवस्था व त्यावर पार्किंग सुविधा उभारण्यात येणार आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचेही स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. तसेच १० एप्रिलपासून शहरातील रस्ते रुंदीकरणाच्या कामांना सुरुवात होणार आहे. पाणी व्यवस्थापनासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, परिवहन सेवेतही सुधारणा, आरोग्य क्षेत्रात मोठा निर्णय घेत शहरात MRI मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा पुरवठा आणि डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे. एकूणच, या अर्थसंकल्पातून मिरा-भाईंदर शहराच्या विकासाचा रोडमॅप स्पष्ट झाला असून आगामी काळात नागरिकांना अधिक सुविधा आणि सुधारित पायाभूत व्यवस्था मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्लेझन्ट पार्क परिसरात लागलेल्या आगीमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई देण्या संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे, तसेच यासंदर्भात आलेल्या प्रस्तानावर विचार चालू असल्याचे आमदार नरेंद्र मेहता म्हणाले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरं देत होते. आगी नंतरच्या केलेल्या पाहणीत आमदार तसेच महापौर आणि उपमहापौर यांनी लोकांना नुकसान भरपाईचं आश्वासन दिलं होतं.

४८व्या इंडियन मास्टर्स (व्हेटरन) राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याच्या ज्येष्ठांचा ‘पराक्रम’

जिद्द, अनुभव आणि खेळातील उत्कटतेची दोन कांस्य पदकांत झळाळी! गोवा येथे उत्साहात पार पडलेल्या योनेक्स-सनराईज ४८व्या इंडियन मास्टर्स (व्हेटरन) राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ मध्ये देशभरातील तब्बल २००७ खेळाडूंनी सहभाग नोंदवत स्पर्धेची प्रतिष्ठा अधिक उंचावली. या अत्यंत स्पर्धात्मक आणि उच्च दर्जाच्या राष्ट्रीय स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या ज्येष्ठ आणि अनुभवी खेळाडूंनी आपल्या जिद्दीच्या, चिकाटीच्या आणि खेळावरील निष्ठेच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करत दोन कांस्य पदकांची मानाची कमाई केली. अजिता रविंद्रन यांनी महिला एकेरी ५० वर्षांखालील गटात तर विनोद धराप यांनी पुरुष दुहेरी ७५ वर्षांवरील गटात चमकदार यश मिळवत ठाण्याच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत चालणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे हे दोन्ही खेळाडू केवळ ज्येष्ठच नव्हे तर तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि खेळावरील अपार प्रेम याच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. महिला एकेरी ५० वर्षांखालील गटात अजिता रविंद्रन यांनी अत्यंत प्रभावी आणि लढाऊ खेळाचे दर्शन घडवले. त्यांनी पहिल्याच फेरीत गुजरातच्या आरती महेश्वरी हिला २१-११, २१-१० अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत आत्मविश्वासपूर्ण सुरुवात केली. त्यानंतर दिल्लीच्या अंशू महाजन हिच्याविरुद्धचा सामना हा खऱ्या अर्थाने त्यांच्या जिद्दीची परीक्षा घेणारा ठरला. पहिला सेट गमावल्यानंतर त्यांनी जबरदस्त पुनरागमन करत २२-२० असा थरारक दुसरा सेट जिंकला आणि तिसऱ्या सेटमध्ये २१-९ अशी सरशी करत सामना आपल्या नावावर केला. पुढील फेरीत उत्तर प्रदेशच्या चौथ्या मानांकित सुषमा हिला २१-५, २१-४ अशा एकतर्फी सामन्यात सहज पराभूत करत त्यांनी आपली वर्चस्व सिद्ध केले. उपांत्यपूर्व फेरीत उर्वशी थापा विरुद्धच्या चुरशीच्या लढतीत त्यांनी संयम, कौशल्य आणि अनुभव यांचा उत्कृष्ट संगम साधत २१-१६, १६-२१, २१-१७ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत त्यांना बलाढ्य प्रतिस्पर्धी शालिनी शेट्टीविरुद्ध झुंज द्यावी लागली आणि अखेर पराभव पत्करावा लागला, मात्र त्यांच्या एकूण कामगिरीने सर्वांचे मन जिंकले. पुरुष दुहेरी ७५ वर्षांवरील गटात विनोद धराप यांनी त्यांच्या जोडीदार आनंद घाटे यांच्या समवेत उत्कृष्ट समन्वय आणि अनुभवाच्या जोरावर कांस्य पदकाची कमाई केली. त्यांनी तेलंगणाच्या रोमेश चंद्र ग्रोव्हर आणि कीर्ती मेहता या जोडीवर २१-१९, २१-१४ असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांच्या खेळात दिसलेली समज, टायमिंग आणि कोर्टवरील उपस्थिती यामुळे प्रेक्षकांनी त्यांचे विशेष कौतुक केले. उपांत्य फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला, मात्र त्यांनी दिलेली लढत अत्यंत उल्लेखनीय ठरली. या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी अत्यंत समाधान व्यक्त करत सांगितले की, “ज्येष्ठ वयोगटातही ठाण्याचे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर अशी सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करत आहेत, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांच्या जिद्दीमुळे आणि खेळावरील प्रेमामुळे ते केवळ पदके जिंकत नाहीत, तर संपूर्ण पिढीला प्रेरणा देत आहेत.” ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे यांनीही खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करत सांगितले की, “ज्येष्ठ खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश ठाण्याच्या क्रीडा संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यांच्या परिश्रम, सातत्य आणि खेळातील आवड यामुळे ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.” 00000000

धोरणात्मक बदलावर जोर द्या – प्रशांत जाधवर

धोरणात्मक बदलावर जोर द्या – प्रशांत जाधवर पार्किंग प्लाझा, ए आय, रोबोटिक्स तंत्रज्ञान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातली धोरणात्मक बदलांबाबत मांडले विचार ठाणे : ठाणे शहराला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि धोरणात्मक उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे ठाम प्रतिपादन ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक प्रशांत ( राजा) जाधवर यांनी केले. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होत जाधवर यांनी शहराच्या ठोस विकासाची गरज बोलून दाखवताना विकासाबरोबर पालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी काही उपायही सुचवले आहेत. ठाणे महापालिकेचा पुढील आर्थिक वर्षाचा ६२२१ कोटी १२ रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी नुकताच सादर केला. ठाणे महापालिकेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्रशांत (राजा) जाधवर यांनी अर्थसंकल्पावर सुरु असलेल्या चर्चेत वेगवेगळे मुद्दे, आर्थिक उपाय योजना आणि उत्पन्नाच्या स्त्रोताबाबत विचार मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेत राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा दाखला दिला. विकासाभिमुख प्रशासनाकरिता आर्थिक नीतीची अमंलबजावणी करण्यासाठी उत्तम प्रशासकाची आवश्यकता असल्याची यशवंतराव चव्हाणांच्या वाक्याची आठवण करुन दिली. प्रशासकीय सुधारणा आणि महसूलवाढी करता जाधवर यांनी पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी वाहनतळ सुरु करणे, परिवहन सेवेत नव्याने सामील होणाऱ्या दुमजली बसेस फिरते डिजिटल फलक लावणे, महापलिकेच्या शाळा शालेय वेळेनंतर नाममात्र दरात खासगी शिबिरे, कार्यक्रमांना भाड्याने देणे, करवसुली करण्यासाठी १०० टक्के कर भरणाऱ्या गृहनिर्माण संकुलनांना विशेष सवलत देणे, स्वछ व प्रमाणिक गृहनिर्माण संकुल स्पर्धा घेण्याची मागणी केली आहे. याशिवाय शहरातील वाढते प्रदूषण टाळण्यासाठी नवीन बांधकामांच्या जागी डास्ट कंट्रोल युनिट सक्तीचे करण्याची गरज जाधवर यांनी बोलून दाखविली. सुमारे एक कोटी रुपयांचे नगरसेवकांचे अभ्यास दौरे आयोजित करण्यापेक्षा शहरात राष्ट्रीय महापौर परिषद आयोजित करून त्यातून विकास कामाबाबत विचाराची देवघेव करण्याची सूचना जाधवर यांनी यावेळी मांडली. पालिकेच्या शाळांची रंगरंगोटी करण्यापेक्षा शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, रोबोटिक्स लॅब, परदेशी भाषांचे वर्ग सुरु करण्याची आग्रही मागणीही केली. स्वतः राष्ट्रीय कबड्डीपटू असल्याने दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये विविध खेळांचे हाय परफॉर्मन्स सेंटर सुरु करण्याची मागणी केली. महापालिकेच्या तिजोरीत वाढ होण्यासाठी कांदळवनाभोवती लोखंडी कुंपण लावण्याऐवजी त्याठिकाणी पर्यटन क्षेत्र तयार करताना लाकडी वॉकवेज, बोटिंग सुरू करण्याची मागणी जाधवर यांनी केली. शहरातील सुमारे ९५टक्के पाण्याचे मीटर्स चोरी झाले असल्याने, सरसकट पाण्याचे मीटर हटवून त्याऐवजी १५६० रुपयांनुसार पाण्याची देयके आकारण्याची सूचना केली. शहरातील नाल्यांची पक्की डागडुजी करणे, विठ्ठल क्रीडा मैदान आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या छत्रपती शिवजी महाराजांच्या स्मारक परिसराचे सुशोभिकरण करण्याची आवश्यकता असल्याची भावना जाधवर यांनी बोलून दाखवली. प्रशांत (राजा) जाधवर यांनी शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) तिकिटावर प्रथमच निवडणूक लढवून पहिल्याच प्रयत्नात प्रभाग क्रमांक सहामधून महापालिकेत प्रवेश केला आहे.

ठाण्यात भ्रष्टाचाराचे ‘गटार’ २५६० कोटींचा घोटाळा !

ठाण्यात भ्रष्टाचाराचे ‘गटार’ २५६० कोटींचा घोटाळा ! गटार पायवाटांमध्ये भ्रष्टाचाराचा भाजपाचाच आरोप  श्वेतपत्रिका काढण्याची मृणाल पेंडसे यांची मागणी सिद्धेश शिगवण ठाणे : भ्रष्ट्राचार करणाऱ्यांनी ‘गटाराला’ही सोडले नाही. गेल्या चार वर्षांत ठाणे महानगरपालिकेला राज्य सरकारकडून तब्बल…

पनवेलमध्ये २२ शाळा अनधिकृत

पनवेलमध्ये २२ शाळा अनधिकृत पनवेल – पनवेल तालुक्यामध्ये आतापर्यंत एकुण २२ शाळा अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ११ अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अजून उलवे येथील एका शाळेवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाची सुरू आहे. पनवेल तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी शाहू सतपाल यांनी पदभार स्विकारल्यापासून अनधिकृत शाळांविरोधात कठोर मोहीम हाती घेतली आहे. सतपाल यांनी पदभार स्विकारला त्यावेळेस १२ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक ते दोन अशा आतापर्यंत ११ अनधिकृत शाळा चालविणा-या शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापकावर सतपाल यांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात चार दिवसांपूर्वी (ता.२६ मार्च) शिक्षण विभागाच्या तक्रारीनंतर नेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थाचालक, अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गट शिक्षणाधिकारी सतपाल यांनी दिलेल्या तक्रारीत २०२३ पासून ही शाळा अनधिकृत चालविली जात होती. यामुळे पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या शाळेत पहिली ते आठवी या इयत्तेमधील ६९ मुले शिकत होती. पनवेल तालुक्यामध्ये अजून उलवे येथील एका अनधिकृत शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या व्यतिरीक्त तालुक्यामध्ये अजून १० शाळा अनधिकृत आहेत. गटशिक्षण अधिका-यांनी केंद्रप्रमुखांना अनधिकृत शाळेविषयी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये या १० शाळा अनधिकृत असल्याचे आढळले आहे.