शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या चांगलेच खवळलेले दिसत आहेत. काल शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान दिले. आता महाराष्ट्रात एक तर तू राहशील किंवा मग मी तरी राहील अशी एकेरी धमकी देऊन ठाकरे मोकळे झाले आहेत. याशिवाय आपल्या भाषणात ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना एकनाथ शिंदे गट, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
२० जून २०२२ रोजी शिवसेनेत मोठे बंड झाले. परिणामी महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. उद्धव ठाकरे यांना देवा देवा करत मिळालेले मुख्यमंत्रीपद देखील सोडावे लागले. तेव्हापासून स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांचे निकटचे सहकारी संजय राऊत, सुपुत्र आदित्य ठाकरे आणि इतर काही सहकारी अक्षरशः पिसाळल्यासारखे बोलत सुटलेले आहेत. ते तोंडाला येईल तसे आरोप विरोधकांवर करत असतात. त्यातही त्यांचा विशेष राग देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे. त्या खालोखाल ते एकनाथ शिंदेंवरही आग पाखड करत असतात. मात्र हे सर्व करताना उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी एक गोष्ट विसरतात की आपण जेव्हा एका व्यक्तीकडे एक बोट दाखवतो त्यावेळी आपल्या हाताची तीन बोटे आपल्याकडे असतात. उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाचे सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे अशी टीका वारंवार केलेली आहे. मात्र आपण जे सरकार स्थापन केले ते खरोखरी घटनेच्या चौकटीत होते काय, याचा विचार ते कधीच करत नाहीत. त्यांच्यामते त्यांनी केलेले सर्व काही बरोबरच असते. त्यामुळे ते तुफान आरोप करत सुटलेले आहेत.
कालच्या भाषणात त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्याचा संदर्भ देत फडणवीस मला आणि आदित्यला तुरुंगात टाकायला निघाले होते आणि ते आता आम्हाला बरबाद करू बघत आहेत अशा आशयाचे आरोप केले होते. इथे ठाकरे एक विसरतात की ते मुख्यमंत्री असताना त्यांनी किती जणांना कारण तुरुंगात डांबले होते. आज ती सर्व नावे सांगायची झाली तर यादी बरीच मोठी होईल. उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे शिंदे सरकार हे खोके सरकार म्हणून हिणवतात. मात्र मुंबई महापालिकेत किंवा १९९५ ते १९९९ या काळात शिवसेनेकडे विशेषतः ठाकरेंकडे केव्हा केव्हा किती किती खोके येत होते याबाबत ते कधीच सांगत नाहीत. अर्थात ते सांगणारही नाहीत, कारण त्यामुळे ते अडचणीत येणार आहेत.
आज उद्धव ठाकरे भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला गद्दार म्हणतात. मात्र एकाशी मैत्री करून त्याच्या नावावर निवडून यायचे आणि मग दुसऱ्या सोबत घरठाव करत मुख्यमंत्रीपद मिळवायचे हे काय साधनशुचितेचे आणि नैतीकतेचे लक्षण म्हणायचे का? इथे तुम्ही देखील तुमच्या मतदारांशी गद्दारी केली आहे. मतदारांनी तुम्हाला भाजपसोबत युती करून भाजपसोबतच पाच वर्ष सरकार चालवण्यासाठी २०१९ मध्ये विजयी केले होते. निकाल लागताच तुम्ही टोपी फिरवली. आणि बाळासाहेबांच्या खोलीत दिलेल्या कथित शब्दाचा मुद्दा पुढे करत युती तोडली. मुळात बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहा यांनी कोणता शब्द दिला होता याला कोणताही पुरावा नाही. मात्र मी कधीच खोटे बोलत नाही आणि दिलेला शब्द फिरवत नाही असा दावा करत उद्धव ठाकरेंनी माझेच खरे असा कांगावा करत जनतेशी गद्दारी केली आहे.
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेले शब्द केव्हा केव्हा आणि कसे कसे फिरवले ते सांगायचे झाले तर मोठी यादी तयार होईल. १९९५ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात त्यांनी मुंबईतील ४० लाख झोपडपट्टी धारकांना पक्की घरे देण्याचा शब्द दिला होता. अजूनही झोपडपट्ट्यांचा विकास अनुत्तरीतच आहे. त्यातही महायुती सरकारने धारावी विकास प्रकल्प पुढे रेटण्यासाठी निविदा नक्की केल्या त्या देखील फाडून टाकण्याच्या गोष्टी ते करत आहेत. त्यांनी १९९५ मध्येच महाराष्ट्रात ४० लाख बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. आज ती संख्या कितीतरी प्रमाणात वाढलेली आहे. १९९६ च्या नोव्हेंबर महिन्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी रामटेकच्या सभेत दोन वर्षात विदर्भाचा अनुशेष संपला नाही तर वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाचे नेतृत्व मी करीन असा शब्द वैदर्भीयांना दिला होता. हा शब्द देऊन आणि दोन वर्षांची मुदत संपून २८ वर्ष लोटलेली आहेत. विदर्भाचा अनुशेष कुठेही कमी झालेला नाही आणि इतक्या वर्षात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीही कधीच अनुशेष कमी करण्यासाठी तरी वेगळा विदर्भाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला नाही. आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा वारसा चालवणारे उद्धव ठाकरे यांनी देखील कधीच त्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. अशा उद्धव ठाकरेंच्या शब्दावर मग कोण कसा विश्वास ठेवणार?
आज उद्धव ठाकरे यांचे पपेट म्हणून ओळखले जाणारे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस हे अनैतिक असंस्कृत भ्रष्ट नेते आहेत असा आरोप केला आहे. जर फडणवीस राऊत लावतात त्या विशेषणांचे धनी असते तर महाराष्ट्रातील जनतेला ते चालले असते काय? जनतेने आतापर्यंत पाच वेळा विधानसभेत निवडून पाठवले आहे. त्यापूर्वी ते दोनदा नागपूर महापालिकेतही नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नागपूरचे महापौर म्हणूनही ते विजयी झाले होते. फडणवीसांवर असा अनैतिक असंस्कृत असल्याचा आरोप करणारे संजय राऊत कधीतरी एखाद्या ग्रामपंचायतीतून तरी निवडून आले आहेत काय याचा खुलासा त्यांनी महाराष्ट्रातील जनतेसमोर करावा. शिवसेनाप्रमुखांचे चांगले संबंध जपून तिथे लांगूलचालन करून ते राज्यसभेत खासदार म्हणून जात आहेत. त्यांची काय क्षमता आहे हे कधीतरी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दाखवावे आणि मगच इतरांवर टीका करावी असा त्यांना आमचा आपुलकीचा सल्ला आहे.
संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार टीका केली आहे. संघ भ्रष्ट गद्दारांना पाठीशी घालत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. आम्हाला संघ चालत होता तो बाळासाहेब देवरासांच्या काळातला असेही ते म्हणतात. मात्र भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी पलटवार करताना संघाला राऊत यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही असे ठणकावले आहे. तेच खरे आहे. आज या देशातील जवळजवळ अर्धी लोकसंख्या ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या संघाच्या संपर्कात आलेली आहे. आणि या सर्वांना संघकार्याबद्दल सहानुभूती देखील आहे. आज संघ ऑक्टोबर २०२५ मध्ये शंभर वर्षाचा होतो आहे. या काळात संघाने संपूर्ण देशात आणि परदेशातही आपले स्थान निर्माण केले आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येत सक्रिय झालेले आहेत. आज देशाचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती देखील संघ विचारांचाच माणूस बसला आहे. अशा परिस्थितीत राऊत यांचा संघावरील आरोप जनता कितपत गांभीर्याने घेईल याचा विचार दस्तुरखुद्द संजय राऊत यांनीच करावा. कदाचित त्यांना वास्तवाचे भान येईलही. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला देखील ५८ वर्षे झालेली आहेत. इतक्या वर्षात शिवसेना महाराष्ट्रात किती दूर पोहोचली याचा वस्तुनिष्ठ अभ्यास केला तर नेमके वास्तव काय हे ठाकरे आणि राऊत यांना लक्षात येईल. आज शिवसेनेने महाराष्ट्रात आपले जाळे उभारले ते मराठी माणसाचे हित जपण्यासाठी. मात्र किती मराठी माणसांचे तुम्ही भले केले याचे उत्तर तुम्ही कधीच देत नाही. त्यानंतर शिवसेना हिंदुत्वाकडे वळली. मात्र तीच शिवसेना आज सत्तेसाठी मुस्लिम आणि ख्रिस्ती मतांसाठी पाय चाटत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम काँग्रेसशी उभे वैरच धरले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी ज्या सोनियांना बाळासाहेबांनी परदेशी बाई म्हणून हिणवले होते त्यांचेच पाय धरायला जावे लागले होते. शरद पवारांना देखील बाळासाहेबांनी काय काय दुषणे दिली हे उभा महाराष्ट्र जाणतो. मात्र आज त्याच पवारांच्या ओंजळीने उद्धव ठाकरे यांना पाणी प्यावे लागते आहे हे त्यांचे दुर्दैवच नाही का? कदाचित स्वर्गीय बाळासाहेबही आज स्वर्गात ढसाढसा रडत असतील.

आज देशातील विविध राज्यांमध्ये विविध प्रादेशिक पक्ष पुढे आले. त्यातील अनेकांनी स्वबळावर राज्यात सत्ता मिळवली आणि आपल्या ताकदीवर केंद्रात सुद्धा आपली बार्गेनिंग पॉवर तयार केली. मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना एकदाही महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवू शकलेली नाही हे वास्तव आजही उद्धव ठाकरे का स्वीकारत नाहीत?

या सर्वच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सर्व बोलक्या बाहुल्यांनी आता कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या नरेंद्र मोदींना ते शिव्या घालतात त्या नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये देशात एक हाती सत्ता मिळवली होती हे विसरून चालणार नाही
त्यानंतरही २०१९ मध्ये त्यांचा आलेख उंचावणाराच होता हेही ठाकरेंनी लक्षात घ्यायला हवे.

आपल्या आयुष्यात काहीही मनाविरुद्ध झाले की माणूस नाराज होतोच. सहजगत्या हाती आलेली सत्ता अचानक आपल्याच माणसांनी बंड केल्यामुळे हातून गेली याचे उद्धव ठाकरे यांना दुःख होणे सहाजिक आहे मात्र त्या दुःखाच्या फेऱ्यातून त्यांनी वेळी बाहेर यायला हवे.आज अजूनही महाराष्ट्रातील थोडीफार का होईना पण जनता त्यांच्या बाजूने आहे. आज महाराष्ट्रातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार हे देखील फडणवीसांवरील रागापोटी का होईना पण ठाकरेंना पाठिंबा देत आहेत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी भानावर येऊन पुढची रणनीती आखावी आणि आपली राजकीय वाटचाल निश्चित करावी असा आमचा त्यांना आपुलकीचा सल्ला आहे. जर त्यांनी वेळीच भानावर येऊन पाऊले उचलली तर त्यांचे भवितव्य बदलू शकते. अन्यथा सर्वकाही कठीणच म्हणावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *