ठाणे : विशेष मुलांना सामान्यांच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध संस्था, शाळा प्रयत्न करीत आहेत. या मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम देखील राबवले जात आहे. याचबरोबर सामान्य मुलांबरोबर या मुलांचा संवाद व्हावा, या विशेष मुलांना सामान्य मुलांनी समजून घ्यावे या उद्देशाने ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या `ज्ञानानंद’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट घेतली.
वसंत विहार येथे विशेष मुलांसाठी असलेल्या जिद्द शाळेतील विद्यार्थ्यांसबोतची भेट आणि संवाद असा कार्यक्रम आयोजित केला होता. दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते. ज्ञानानंद शाळेतील विद्यार्थी या विशेष मुलांना ज्यावेळी भेटले त्यावेळी त्यांच्याशी प्रथम हस्तांदोलन केले, मग त्यांनी एकमेकांशी ओळख केली. गप्पा गोष्टी करत न कळत ते एकमेकांचे मित्र मैत्रिणीही झाले. एकमेकांना टाळी देत होते. जिद्द शाळेतील एका विशेष विद्यार्थीनीने आपल्या अंगी असलेली नृत्य कला सादर केली. त्यावेळी उपस्थित ज्ञानानंद शाळेतील विद्यार्थ्यांनी तिच्या या कलेला टाळ्यांची दाद दिली. कुठे खेळ चालू होता तर कुठे एकमेकांशी गप्पा मारत एकमेकांना टाळी देत होते. ज्ञानानंद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि मुख्याध्यापिका अंजलि पाण्डेय यांच्यासह विशेष मुलांच्या शाळेला भेट आणि संवादाचा कार्यक्रम हसत खेळत पार पडला आणि हे अविस्मरणीय क्षण विद्यार्थ्यांनी आपल्या मनात जतन करुन ते बाहेर पडले, पुन्हा भेटू याचे आश्वासनही त्यांनी एकमेकांना दिले.