श्री मावळी मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त
विभागीय पुरुष व महिला गटातील दिग्गज संघांची रंगतदार लढत

 

ठाणे : श्री मावळी मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच विभागीय पुरुष आणि महिला गटातील भव्य खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही रोमांचक स्पर्धा ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. स्पर्धेतील सामने सकाळी ८:०० ते ११:०० आणि संध्याकाळी ४:०० ते ९:०० या दोन सत्रांमध्ये रंगणार आहेत.
शतक महोत्सवी वर्षात ऐतिहासिक आयोजन
या ऐतिहासिक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन ३१ जानेवारी रोजी सकाळी ८:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तर बक्षीस समारोप सोहळा १ फेब्रुवारी रोजी रात्री ९:०० वाजता उमेश साळवी (सेवानिवृत्त – मुंबई उच्च न्यायालय) यांच्या हस्ते होईल.
मुंबई, उपनगर व ठाण्यातील नामवंत संघांची मोठी उपस्थिती
या स्पर्धेत पुरुष गटात १६ आणि महिला गटात १२ असे एकूण २८ संघ भाग घेणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील श्री मावळी मंडळ, श्री आनंद भारती समाज, ग्रिफीन जिमखाना, विहंग क्रीडा केंद्र, राज क्रीडा मंडळ, धी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ज्ञानविकास फाउंडेशन, वायूदूत क्रीडा केंद्र, शिवभक्त क्रीडा केंद्र, युवक क्रीडा केंद्र आणि न्यू बॉम्बे हायस्कूल हे संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
मुंबई जिल्ह्यातून सरस्वती स्पोर्ट्स, अमर हिंद मंडळ, विद्यार्थी क्रीडा केंद्र, श्री समर्थ व्यायाम मंदिर आणि ओम साईश्वर सेवा मंडळ यांसारख्या मातब्बर संघांनी आपली हजेरी लावली आहे. तसेच, मुंबई उपनगरातील श्री सह्याद्री संघ, महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी आणि युवा स्पोर्ट्स क्लब हे नामवंत संघही या स्पर्धेत भाग घेत आहेत.
१,००,०००/- च्या पारितोषिकांसाठी संघांमध्ये चुरस
या भव्य स्पर्धेसाठी तब्बल ₹१,००,०००/- ची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. त्यामुळेच या स्पर्धेत अंतिम विजयासाठी संघांमध्ये अटीतटीच्या लढती पाहायला मिळतील. खो-खो क्रीडाप्रेमींसाठी ही एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.
श्री मावळी मंडळाचे शतक महोत्सव वर्ष आणि या ऐतिहासिक स्पर्धेचे रोमांचक क्षण अनुभवण्यासाठी क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्पर्धा संयोजकांनी केले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *