अनिल ठाणेकर
ठाणे : हिरानंदानी-वाघबीळ परिसरासह ठाणे शहरातील इतर ठिकाणी असलेले आरएमसी प्लांट, त्वरित बंद करण्यात येऊन, नवीन आरएमसी प्लांट उभारण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी करुन, याप्रकरणी राज्य शासन आणि ठाणे महापालिका प्रशासनाने ठोस पाऊले न उचलल्यास, ‘धर्मराज्य पक्ष’ तीव्र जनआंदोलन उभारेल, असा इशारा महेशसिंग ठाकूर आणि नरेंद्र पंडित यांनी दिला आहे.
गेल्या काही कालावधीपासून ठाणे शहरातील वातावरण प्रदूषित झालेले असून, शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा मेट्रो प्रकल्प आणि ठिकठिकाणी सुरु असलेली निवासी प्रकल्पांची बांधकामे, यामुळे ठाण्याची हवा दुषित होऊन, हवेचा स्तर पूर्णपणे घसरलेला दिसून येत आहे. परिणामी, खोकला आणि दम्याच्या आजारात मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे. मुंबईचे धाकटे भावंडं, अशी ठाणे शहराची ओळख गेल्या काही वर्षांत निर्माण झालेली असतानाच, ठाण्याचे नागरीकीकरणही तेवढ्याच प्रचंड प्रमाणात झालेले आहे. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या ही, वाढत्या वाहतूक कोंडीलादेखील कारणीभूत ठरत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे, आधीच वायुप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषणामुळे ठाणेकर नागरिक त्रासलेले असतानाच, सध्या ठाणे शहरात मोठ्याप्रमाणात सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे, एकेकाळी “तलावांचे शहर” अशी ओळख असणाऱ्या ठाण्याची ओळख आता, ‘प्रदूषित शहर’ अशी निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत ठाणे शहरातील हवेचा दर्जा पूर्णपणे घसरलेला असल्याचे, प्रसिद्धीमाध्यमांतील बातम्यांच्या माध्यमातून स्पष्ट झालेले आहे. गेल्या काही वर्षांत, घोडबंदर महामार्गालगत अनेक निवासी संकुले उभी राहिली आहेत आणि आजही मोठमोठ्या निवासी संकुलांची/प्रकल्पांची बांधकामे सुरु आहेत. परिणामी, घोडबंदरचे आता धूळबंदर असे नामांतर झाल्यास, आश्चर्य वाटायला नको. याच पार्श्वभूमीवर, वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या, घोडबंदर महामार्गावरील प्रस्तावित आरएमसी प्लांटवर त्वरित बंदी घालण्याची मागणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, हिरानंदानी-वाघबीळ याठिकाणी, गेल्या काही महिन्यांपासून एका मोठ्या गृह प्रकल्पाचे खोदकाम सुरु असून, अनेक जेसीबी मशिन्सच्या माध्यमातून हे काम दिवस-रात्र सुरु असते. या खोदकामामुळे मोठ्याप्रमाणात धुरळा उडून, परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे. असे असतानाही, ठाणे शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, महापालिका प्रशासनाकडून याबाबत कोणतीही दखल घेतली जात नाही. याच अनुषंगाने, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर आणि पक्षाचे सचिव नरेंद्र पंडित यांनी, राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच, पर्यावरणमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पत्र लिहून, आरएमसी प्लांटवर त्वरित बंदी घालण्याची मागणी मागणी केली आहे. मुंबईच्या हवेचा स्तर वाईट झालेला असल्याकारणाने, तसेच बोरीवली पूर्व आणि भायखळा या परिसरांतील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत गेल्याने, तेथील सर्व बांधकामे बंद करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे. ज्या विभागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक २००च्या वर जाईल, त्या विभागातील सर्वच बांधकामे बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांद्वारे स्पष्ट झालेले आहे. यासंदर्भात, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य-सचिव अविनाश ढाकणे आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने १ जानेवारी रोजी, पत्र पाठवून (संदर्भ क्र. धराप/सस-मराप्रनिमंमुं/ मनपाआ-ठामपा/२०२४/७७) वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या, ठाणे शहरातील बांधकाम प्रकल्पांवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र, प्रशासनाकडून त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तसेच, याअगोदर घोडबंदर महामार्गावरील वृक्षतोडीसंदर्भातही हिरानंदानी या व्यवसायिकाच्या विरोधात लिखित तक्रार करण्यात येऊनही, महापालिका प्रशासनाने आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांनी त्याकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले होते. याच पार्श्वभूमीवर, महेशसिंग ठाकूर आणि नरेंद्र पंडित यांनी पाठविलेल्या पत्रात प्रशासनाला सूचित केले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर, ठाणे शहरातील वायुप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या किंवा ठरु पाहणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर कठोर निर्बंध घालण्याबरोबरच, ठाणे शहरातील घोडबंदर महामार्गाच्या हिरानंदानी-वाघबीळ परिसरात, एका आरएमसी प्लांटचे काम प्रस्तावित असून, त्यावर त्वरित बंदी घालण्यात यावी. आरएमसी प्लांटच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती प्रणाली उभारणे, उत्सर्जन कमी होण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणे, प्लांटमधून ये-जा करणाऱ्या वाहनांची चाके धुण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारणे, कच्च्या मालाच्या हस्तांतरणाचे क्षेत्र बंदिस्त ठेवणे, अशा बाबींचा समावेश करावा. दरम्यान, हा प्लांट उभारला गेल्यास, इथल्या निवासीक्षेत्राला, सिमेंट निर्मितीद्वारे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा मोठ्याप्रमाणात त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो, असे धर्मराज्य पक्षाचे महेशसिंग ठाकूर आणि नरेंद्र पंडित यांनी म्हटले आहे.