Month: June 2026

जनकल्याण रहिवासी विकास समितीचा म्हाडा कार्यालयावर धडक मोर्चा

राजेंद्र साळसकर मुंबई- म्हाडा न्यू पीएमजीपी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मुलुंड (पूर्व) येथील १,३९९ सभासदांचा पुनर्विकास प्रकल्प सन २००७ पासून सुरू असून, तब्बल १९ वर्षे उलटूनही हा प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. आजही ६०६ सदनिका व ४७ दुकाने म्हाडा प्रशासनाकडून बांधून पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या प्रकल्पातील रहिवासी व सभासद गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या हालअपेष्टा सहन करीत आहेत. गेल्या वर्षभरापासून बाधित रहिवासी सभासदांनी म्हाडा मुख्यालय, बांद्रा येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व उपाध्यक्ष (VP) यांची वारंवार भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वेळ देण्यात येत नव्हती. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत जनकल्याण रहिवासी विकास समितीच्या वतीने ९ जून २०२६ रोजी म्हाडा मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सुमारे २५० हून अधिक बाधित रहिवासी सभासद सहभागी झाले होते. तसेच छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक  नामदेवराव जाधव  व समितीचे कायदेशीर सल्लागार यांनी या आंदोलनास मोलाचे सहकार्य केले. मोठ्या संख्येने नागरिक म्हाडा कार्यालयात दाखल झाल्याचे समजताच, नागरिकांच्या भेटीचा दिवस असतानाही संबंधित वरिष्ठ अधिकारी कार्यालयातून निघून गेले. तसेच प्रवेशद्वारावर उपस्थित असलेल्या नागरिकांना इमारतीमध्ये प्रवेश करण्यासही मज्जाव करण्यात आला. यानंतर नामदेवराव जाधव  यांच्या उपस्थितीत काही प्रतिनिधी सभासदांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष यांच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून बाधित रहिवासी सभासदांची बैठक लवकरात लवकर आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

मोठागाव रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या

आमदार राजेश मोरे यांची कल्याण डोंबिवली आयुक्तांकडे मागणी आरती परब डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथे दिवा- वसई रेल्वे मार्गावरील प्रस्तावित रेल्वे उड्डाण पुलाच्या (ROB) बांधकामासाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबवून कामाला गती द्यावी, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या उड्डाण पुलाला मंजुरी मिळाली आहे. मात्र मंजुरीनंतरही प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आमदार मोरे यांनी आयुक्त गोयल यांना निवेदन सादर करून निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम तसेच शहर अभियंता अनिता परदेशी उपस्थित होत्या. मोठागाव परिसरात मानकोली खाडी पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मोठागाव रेल्वे क्रॉसिंग परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून वाहन चालकांचा वेळ आणि इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. तसेच रेल्वे फाटक ओलांडताना अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बाबही समोर येत आहे. स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांना दररोज या समस्यांचा सामना करावा लागत असल्याने उड्डाण पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मंजुरी मिळूनही कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याबाबत आमदार मोरे यांनी आयुक्तांकडे विचारणा केली असता, संबंधित कामाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले. मोठागाव रेल्वे उड्डाण पूल साकार झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 भिसेगाव दिशेकडील तिकीट खिडकी आता दोन शिफ्टमध्ये सुरू

कमर्शियल चिफ इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांचे विशेष प्रयत्न कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश अशोक गायकवाड कर्जत : कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, भिसेगाव बाजूच्या तिकीट बुकिंग खिडकीचे कामकाज शनिवारपासून दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार असून, तिकीट काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून कर्जत रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनकडून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना लांबच लांब रांगा, वेळेचा अपव्यय आणि तिकीट मिळवण्यासाठी होणारा त्रास यामुळे ही मागणी अधिक जोर धरत होती. प्रवाशांची वाढती संख्या आणि वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अखेर सकारात्मक निर्णय घेतला आहे. यासाठी कमर्शियल चिफ इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवत विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले जात आहे. या नव्या व्यवस्थेमुळे भिसेगाव परिसरातील तसेच स्थानकाच्या त्या बाजूने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांसाठी ही सुविधा अधिक उपयुक्त ठरणार आहे. तिकीट बुकिंग खिडकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : पहिली शिफ्ट : सकाळी ६.३० ते दुपारी २.३० ️ जेवणाची वेळ : दुपारी १२.१५ ते १२.३५ हिशोबाची वेळ : दुपारी २.३० ते २.४५ ️ दुसरी शिफ्ट : दुपारी २.४५ ते रात्री १०.३० ️ जेवणाची वेळ : रात्री ८.४० ते ९.०० या निर्णयामुळे कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत केले जात आहे. ००००००००

ठाणे शहरातील काही भागात शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए मार्फत आनंदनगर ते साकेत पर्यत एलिव्हेटेड रोडचे कामादरम्यान इंदिरा नगर संपकडे जाणारी ८१३ मि.मी व्यासाची उर्ध्ववाहिनी बाधित होत असल्याने एमएमआरडीएकडून ९०० मि.मी व्यासाची जलवाहिनी…

अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात सभापतींवर कारवाई का नाही?

सय्यद आफरीन यांचा भाजपला प्रश्न मिरा -भाईंदर : काशीमिरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांचे सख्खे भाऊ राजेश चव्हाण यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या दुसऱ्या भावाचे नावही तक्रारीत समोर आले आहे. या गंभीर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मिरा -भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांनी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन म्हणाल्या की, “महिला आणि बालकांच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या समितीच्या सभापतींच्या निकटवर्तीयांवर अशा गंभीर स्वरूपाचे आरोप होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे महिला व बालकल्याण समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी आणि समितीची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी सभापतींनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा.” तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून पीडितेला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या सन्मान व सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांनी दिला आहे.

फुगाळे येथील २५ ते ३० कुटुंबे रेशन धान्यापासून वंचित असल्याची तक्रार

अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील फुगाळे येथील रास्त भाव दुकानाच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या असून दर महिन्याला सुमारे २५ ते ३० शिधापत्रिकाधारक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.विशेषतःमे आणि जून २०२६ या दोन महिन्यांचे धान्य अनेक लाभार्थ्यांना अद्याप मिळाले नसल्याची तक्रार संबंधित नागरिकांनी शहापूर तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात केली आहे. गावातील शिधापत्रिकाधारकांनी सांगितले की, शासनाकडून गरीब व गरजू कुटुंबांसाठी वितरित करण्यात येणारे धान्य हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र फुगाळे येथील रास्त भाव दुकानातून अनेक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नसल्याने त्यांना मोठ्या आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अनेक वेळा दुकानावर जाऊनही धान्य उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते किंवा विविध कारणे देऊन लाभार्थ्यांना परत पाठविले जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात गावातील काही रेशनधारकांनी प्रत्यक्ष धान्य मिळत नसल्याचा व्हिडिओ तयार करून संबंधित प्रशासनाकडे पाठविला आहे. या व्हिडिओमध्ये लाभार्थी आपली व्यथा मांडताना दिसत असून अनेक कुटुंबांना धान्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.सध्या पावसाळ्याची सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील अनेक मजूर कुटुंबांना नियमित रोजगार उपलब्ध झालेला नाही. शेतीची कामे अद्याप पूर्णपणे सुरू नसल्याने अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत आहेत.अशा परिस्थितीत शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य हेच अनेक कुटुंबांसाठी जगण्याचा आधार ठरत असते.मात्र हे धान्य वेळेवर मिळत नसल्याने संबंधित कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,फुगाळे येथील रास्त भाव दुकानाच्या कामकाजाची तातडीने चौकशी करण्यात यावी, मे व जून २०२६ चे थकीत धान्य त्वरित लाभार्थ्यांना वितरित करण्यात यावे आणि भविष्यात कोणतेही कुटुंब धान्यापासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्यात यावी. शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचावा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कायम राहावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ००००००००००० ००००००००

 शहापुरात बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

 २४ जण पोलिसांच्या ताब्यात, ५६  हजार ६५  रुपयांची रोकड जमा ठाणे :शहापूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जुगार अड्डे , मटके  आदी अवैद्य बाबींचा  सुळसुळाट वाढला असल्याचे दिसून येते. पोलीस अधीक्षक (ठाणे ग्रामीणचे) डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडे शहापुरातील  स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून शहापूर शहरातील सावंत विहार,कोकणी स्वाद हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये छापा टाकला असता त्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या २४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५६ हजार ६५ रुपये  रोख व जुगार खेळण्याचे साहित्य तसेच तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. शहापूर तालुक्यातील कसारा,किन्हवली,वाशिंद, शहापूर आदी पोलीस ठाण्याच्य हद्दीत बेकायदेशीर धंदे तसेच अवैध भंगार व्यवसाय देखील वाढले असल्याचे दिसून येत आहेत. जुगार व मटके यांना शालेय विद्यार्थी बळी पडत आहेत. या सर्व गोष्टींचा शालेय विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सदरच्या कारवाईत ठाणे पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉ. विनयकुमार राठोड,अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, पोलीस उपनिरीक्षक निरंजन पाटील, पोलीस शिपाई सचिन बोडके, एस.एस.गायकवाड, आर.टी.निवांगुने, आर. एस. मस्करे, एम.आर.तडवी, चालक पोलीस शिपाई ए.पी. हिलगुडे आदींच्या सहभाग होता. तालुक्यातील बेकायदेशीर धंदे कायमचे बंद करण्याचे काम पोलिसांनी हाती घ्यावे अशी जनतेची मागणी आहे.

मुंबई पोर्टमध्ये इंदिरा गोदीच्या खाजगीकरणाविरुद्ध कामगारांची तीव्र निदर्शने

मुंबई : केंद्र सरकारच्या मालकधार्जिण्या  खाजगीकरणाच्या धोरणानुसार मुंबई पोर्ट प्रशासनाने २१ जानेवारी २०२६ रोजी इंदिरा गोदीच्या खाजगीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा प्रस्ताव मंजूर केला. या प्रस्तावानुसार जून २०२६ पासून इंदिरा गोदीचे दोन…

 शिशिर रॉयसह अन्य बोगस डॉक्टरांवर गुन्हे

देवेंद्र सिंग मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई संयुक्त पथकाची लवकरच धडक दिवा : बारा वर्षीय देवेंद्र आशिष सिंग यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी करत धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. संस्थापक अमोल धनराज केंद्रे आणि मुंब्रा शहराध्यक्ष युसुफ जंगबारवाला यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनावर चर्चा करताना डॉ. प्रसाद पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली. देवेंद्र सिंग मृत्यूप्रकरणी बंगाली डॉक्टर शिशिर रॉय यांच्याविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी एका डॉक्टरवरही गुन्हा नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय ठाणे, मुंब्रा, कळवा, दिवा आणि माजिवडा परिसरात कार्यरत असलेल्या अन्य बोगस डॉक्टरांविरोधातही लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बोगस मेडिकल दुकाने तसेच अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवरही प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बोगस पॅथॉलॉजी लॅबविरोधातील कारवाईबाबत शासनाकडून आदेश अथवा पत्र प्राप्त होताच आरोग्य विभाग तातडीने पावले उचलेल, असे आश्वासनही डॉ. पाटील यांनी दिले. तसेच देवेंद्र सिंग यांच्या आई-वडिलांचे जबाब नोंदविल्यानंतर पोलीस तपास पूर्ण करून मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींवर योग्य ते गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन (एफडीए), आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबविण्यात येणार असून बोगस डॉक्टर, बोगस मेडिकल दुकाने आणि इतर अनधिकृत वैद्यकीय व्यवसायांवर धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने मृत देवेंद्र आशिष सिंग यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच आरोपी शिशिर रॉय यांची मालमत्ता जप्त करून ती रक्कम पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देवेंद्र सिंग यांच्या मृत्यूमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर आणि तातडीची कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. ०००००