Month: July 2026

अंबरनाथ नगरपालिकेत ६ विषय समिती सभापती पदाची निवड बिनविरोध

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तब्बल सात महिन्यानंतर विषय समित्या आणि सभापती पदाची निवड अखेर बिनविरोध झाली. १७ सदस्यांच्या समितीत भाजपा गटबंधन ८ तर शिवसेना गटबंधन ९ अशा सदस्य…

नगरसेवक रमेश म्हात्रेंवर अद्यापही पक्षांतर्गत कारवाई नाहीच

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे. या मारहाणीचा…

कल्याण न्यायालयात वकिलांचे पोलिसांविरोधात आंदोलन

 लाल फित बांधून कल्याण बार असोसिएशनचा निषेध कल्याण : डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या रिमांड सुनावणीदरम्यान पोलिसांनी वकिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत कल्याणमधील वकिलांनी आज अनोखे आंदोलन छेडले. न्यायालयीन कामकाज सुरू ठेवत वकिलांनी लाल फित बांधून पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदवला. या आंदोलनामुळे न्यायालय परिसरात चर्चांना उधाण आले आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे, यांच्या रिमांड सुनावणीवेळी काही पोलिस अधिकाऱ्यांनी वकिलांना धमकावल्याचा आणि गैरवर्तन केल्याचा आरोप कल्याण बार असोसिएशनकडून करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज कल्याण न्यायालयातील वकिलांनी लाल फित बांधून कामकाज सुरू ठेवले. न्यायालयीन प्रक्रियेत वकिलांचा सन्मान राखला जावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या अनोख्या आंदोलनामुळे पोलिस आणि वकील यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. शुक्रवारी सुनावणीसाठी आणलेल्या एका  राजकीय आरोपीला पोलिसांनी विशेष सुरक्षा पुरवली होती. यावेळी सर्व पोलीस हे त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक असल्याप्रमाणे वावरत होते यावेळी पोलिसांनी वकिलांना धक्काबुक्की करत गुन्हा दाखल करू अशी धमकी देत विनापरवानगी वकिलांचे चित्रीकरण केले. याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून याबाबत लेखी तक्रार न्यायाधीशांकडे करण्यात आली असून उच्चन्यायालयात देखील हि बाब नेणार असल्याचे  ऍड श्रद्धा शिवमते जोशी यांनी सांगितले. तर याआधी कधीही अशाप्रकारे लाल फीत लावून काम करण्याची आवश्यकता वाटली नाही. मात्र वकिलांवर अन्याय झाल्याने हे लालफीत लावून आंदोलन केले आहे. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली असून जोपर्यत पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत लालफीत लावून आंदोलन करणार असल्याची  प्रतिक्रिया ऍड प्रदीप बावस्कर यांनी दिली.

आशियाई जलतरण स्पर्धा

स्वराज लाड, गीतिका सालियन तर प्रशिक्षक तुषार गीतये यांची भारतीय संघात निवड मुंबई, प्रतिनिधी : थायलंडमधील बँकॉक येथे होणाऱ्या १२व्या आशियाई वयोगट जलतरण (अॅक्वॅटिक) अजिंक्यपद स्पर्धा २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून,ही स्पर्धा १६ ते २१ जुलै या कालावधीत बँकॉक (थायलंड) येथे होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील चार डायव्हर्स पैकी मुंबईतील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील दोन डायव्हर्स आणि एका प्रशिक्षकाची निवड झाली आहे. स्वराज राजेंद्र लाड याची १८ वर्षांखालील मुलांच्या गटातील ३ मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग प्रकारासाठी, तर गीतिका सालियन हिची १५ वर्षांखालील मुलींच्या गटातील प्लॅटफॉर्म डायव्हिंग प्रकारासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तसेच, विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील प्रशिक्षक तुषार गितये यांची या स्पर्धेसाठी भारतीय डायव्हिंग संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत स्वराज लाड आणि गीतिका सालियन भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, प्रशिक्षक म्हणून तुषार गितये संघास मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. -000000

जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरुपी भगवा फडकवणारच-  संजय केळकर

0000000 अनिल ठाणेकर ठाणे,जंजिरा किल्ल्यावर कोणी मालकी सांगणार असेल तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ. हे किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, त्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आंदोलन सुरूच ठेवून कायमस्वरूपी भगवा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला. जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकविण्यास परवानगी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गुरुवारी सायन येथील केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने दुर्गसेवक मुंबईत दाखल झाले होते. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता, जतन व ऐतिहासिक वारसा जपण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकविण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे करण्यात आली होती. मात्र ही मागणी विभागाकडून नाकारण्यात आल्याने महाराष्ट्रातील दुर्गसेवक आणि हिंदूप्रिय नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी आपली परखड भूमिका स्पष्ट केली. स्वातंत्र्यानंतर सर्व किल्ले हे देशाच्या मालकीचे झाले आहेत. त्यामुळे कोणी यावर मालकी सांगू नये. अन्यथा जशास तसे उत्तर देऊ. किल्ल्यात कायमस्वरूपी भगवा झेंडा फडकवणे का अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठान येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन करेल. आम्ही केंद्रीय पुरातत्व खात्याला विनंती केली असून जोपर्यंत जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा झेंडा फडकत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार श्री. केळकर यांनी व्यक्त केला. 00000000

मुलाच्या बेकायदा इमारतीवरून रमेश म्हात्रेंचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी

सात महिन्यापासून निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा कल्याण : सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या मुलाने प्रभागातील जुनी डोंबिवली भागात एक बेकायदा इमारत उभारली आहे. या इमारतीला पालिकेच्या बांधकाम परवानग्या नाहीत. पालिकेच्या ह प्रभागाने ही इमारत अनधिकृत घोषित केली आहे. रक्ताच्या नात्यामधील कोणीही बेकायदा बांधकाम केले असेल तर संबंधित नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द होते. त्यामुळे नगरसेवक म्हात्रे यांच्या मुलाने केलेल्या बेकायदा बांधकामांशी रक्ताच्या नात्याने रमेश म्हात्रेचा थेट संबंध येत आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करा, अशी तक्रार तक्रारदार कल्पेश जोशी यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त, नगरविकास प्रधान सचिव, कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे गेल्या सहा महिन्यापूर्वी केली आहे. या तक्रारीच्या प्रती कोकण विभागीय आयुक्त, ठाणे जिल्हाधिकरी, कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त यांना देऊनही या गंभीर तक्रारीविषयी शासन दखल घेत नाही. यामागे राजकीय दबाव हेच मुख्य कारण आहे, असे तक्रारदार कल्पेश जोशी यांनी सांगितले. गेल्या सात महिन्यापूर्वी झालेल्या कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्यावेळी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सत्यप्रतिज्ञा पत्रावर मी, माझ्यावरील अवलंबित्व (पत्नी, मुले) यांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केलेले नाही असे लिहून दिले आहे. अशाप्रकारचे अनधिकृत बांधकाम केल्याचे सिध्द झाल्यास मी नगरसेवक राहण्यास अपात्र ठरेन याची मला जाणीव आहे, असे म्हटले आहे. रमेश म्हात्रेवरील अवलिंबत्व असलेल्या त्यांच्या मुलाने अनधिकृत बांधकाम केले असल्याचे सिध्द झाल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी तक्रारदाराची मागणी आहे. या मागणीसाठी पालिका आयुक्त ते ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांकडे पाठपुरावा करूनही त्यांनी रमेश म्हात्रेच्या आक्रमक स्वभावामुळे त्यांच्या मुलाच्या बेकायदा इमारतींवर कारवाई केली नाही. तसेच म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे तक्रारदाराने सांगितले. राजकीय दबावामुळे आपल्या अर्जावर शासन, पालिकास्तरावर कारवाई होत नाही. याप्रकरणात शासन, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लक्ष घालून म्हात्रे यांचे नगरसेवक पद करण्यासाठी आणि आपणास न्याय देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. 000000000

आयडियल १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा १८ जुलैला

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे दि न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेड सहप्रायोजित १४ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या ६ वयोगटामध्ये बुध्दिबळ स्पर्धा १८ जुलै रोजी आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे.…

शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड निर्माण करावा– देवेंद्र फडणवीस

शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी हे अभियान अभिनव ठरेल मुंबई : शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचे केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ निवासस्थानी नगर विकास विभागाच्या आढावा बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करताना महाराष्ट्राने या दृष्टीने पावले टाकली असून यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर निधी उभारणी करून पाणी पुरवठा व स्वच्छता यासाठी निधी उभारले आहेत. या महानगरपालिकांच्या निधी उभारणीसाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची (एनएसी) मंजुरी देखील मिळाली आहे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिका येथील काही प्रकल्पांना या पद्धतीने निधी उपलब्ध होणार आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानाधारित शहरी योजनांसोबत शहरांच्या संस्थात्मक, आर्थिक व प्रशासकीय मर्यादांमुळे पायाभूत प्रकल्पांच्या अंमलबजावणीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंड महत्त्वपूर्ण ठरेल, यासाठी कर्ज रोखे आणि खासगी सार्वजनिक भागीदारीतून निधी उभारणी करणे शक्य होईल असे नमूद करण्यात आले. या अभियानांतर्गत सुमारे २२ प्रमुख घटकांचा समावेश करण्यात येणार असून त्यामध्ये डिजिटल प्रशासन, मुख्य नागरी पायाभूत सुविधांचा विकास, चक्रीय अर्थव्यवस्था (Circularity), वाहतूक कोंडी कमी करणारे प्रकल्प, शेवटच्या टप्प्यातील जोडणी, ५ ते २० चौ.कि.मी. क्षेत्रातील शहर भागांचे पुनरुज्जीवन, लहान व मध्यम शहरे हे विकासाची केंद्र, परपेठांचे पुनर्विकास, पायी चालणारे व सायकलस्नेही वाहतूक प्रकल्प, निदर्शक (Demonstration) प्रकल्प, ट्रान्झिट हब उन्नतीकरण, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट पायाभूत सुविधा विकास, शहर-विकास केंद्र, शहरांचे सृजनशील पुनर्विकास तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता प्रकल्पांचा समावेश आहे. अर्बन चॅलेंज फंडासाठीच्या वित्तीय आकृतीबंधाबाबत चर्चा करण्यात आली. अभियानात ₹९० हजार कोटींचा प्रकल्प निधी प्रस्तावित आहे. महाराष्ट्रासाठी केंद्र शासनाचा ₹११,२०० कोटी, राज्य शासनाचा ₹११,२०० कोटी आणि बाजाराधारित स्रोतांतून ₹२२,४०० कोटी असा एकूण ₹४४,८०० कोटींच्या प्रकल्पांना चालना मिळू शकते, अशी माहिती देण्यात आली.

स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा असल्याचा खोटा आरोप

 ग्राहक प्रतिनिधीसह यूट्यूब संपादकाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल मुंबई: महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा आरोप करून आणि सोशल मीडियाद्वारे त्याचा हेतुपुरस्सर प्रसार करीत नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहक संघटनेचे नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर व ‘कोकणसाद’ यूट्यूब न्यूज चॅनेलचे संपादक सागर चव्हाण यांच्याविरुद्ध सावंतवाडी (जि. सिंधुदूर्ग) पोलीस ठाण्यात रविवारी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. या खोट्या आरोप प्रकरणी महावितरणकडून गंभीर दखल घेण्यात आली. स्मार्ट मीटरबाबत कपोलकल्पित तसेच नागरिकांमध्ये भीती व दहशत निर्माण होईल असे जाहीर व रेकॉर्डेड वक्तव्य केल्याप्रकरणी नंदन वेंगुर्लेकर आणि केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ही खोटी माहिती सर्व सोशल मीडियाच्या खात्यांवरून प्रसारित केल्याप्रकरणी यूट्यूबचे संपादक सागर चव्हाण याच्याविरुद्ध जनतेत भीती निर्माण करून गुन्ह्यास चिथावणी देणे, गुन्हेगारी पद्धतीने धमकावणे, शांततेचा भंग करण्यासाठी जाणीवपूर्वक अपमान करणे, बदनामी करणेबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार कलम ३५३ (१) (बी), ३५१ (३), ३५२ व ३५६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस पुढील तपास करीत आहे. स्मार्ट मीटर हे पूर्णपणे सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यात कोणताही ‘कॅमेरा’ किंवा गोपनीयतेचा भंग करणारी यंत्रणा नाही. वीजग्राहकांनी स्मार्ट मीटरबाबत पूर्णतः निश्चिंत राहावे. कोणत्याही कपोलकल्पित माहिती व खोटारड्या आरोपांना बळी पडू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. स्मार्ट मीटरबाबत अत्यंत खोटी व काल्पनिक माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात येत असल्याचे देखील महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले. याबाबत माहिती अशी की, सावंतवाडी (जि. सिंधुदूर्ग) येथे कोकणसाद यूट्यूब न्यूज चॅनेलमध्ये स्मार्ट मीटर संदर्भात चर्चासत्र ठेवण्यात आले. त्यांचे रेकॉर्डिंग शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले. या चर्चासत्रामध्ये महावितरणकडून उपकार्यकारी अभियंता योगेंद्र वाघ, ग्राहक संघटनेचे नंदन वेंगुर्लेकर तसेच दीपक पटेकर सहभागी झाले होते. यामध्ये महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत विविध फायद्यांची माहिती देण्यात आली तसेच विविध आरोपांचे सर्मपक खुलासे करण्यात आले. तथापि, या चर्चासत्रामध्ये नंदन वेंगुर्लेकर यांनी स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा धादांत खोटा आरोप केला. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांच्या खाजगी आयुष्यावर पाळत ठेवली जात असल्याचा अत्यंत हास्यास्पद दावा त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला. याबाबत महावितरणचे श्री. वाघ यांनी त्याचवेळी स्पष्टीकरण दिले. तरीसुद्धा कोकणसाद यूट्यूब न्यूज चॅनेलने त्यांच्या इतर सोशल मीडियाच्या खात्यांवरून स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याची खोटी जाहिरात केली आणि या चर्चासत्रातील संदर्भ वगळून दिशाभूल करणारा २ ते ३ मिनिटांचा भाग ‘स्मार्ट मीटरची चिरफाड’ या मथळ्याखाली रिलच्या माध्यमातून हेतुपुरस्सरपणे प्रसारित केला. त्यात महावितरणकडून करण्यात आलेला खुलासा देखील वगळण्यात आला. 0000000000

 विशाखापट्टणममध्ये नैशा निशित मेहताची सुवर्ण झेप

आरएसएफआय राष्ट्रीय रँकिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक विशाखापट्टणम: युवा रोलर स्केटिंगपटू नैशा निशित मेहता हिने रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (RSFI) आयोजित आर्टिस्टिक रोलर स्केटिंग नॅशनल रँकिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये शानदार कामगिरी करत १०–१२ वर्षे वयोगटातील आर्टिस्टिक रोलर स्केटिंग सोलो डान्स प्रकारात सुवर्णपदक पटकावले. ही प्रतिष्ठेची राष्ट्रीय स्पर्धा ३ ते ५ जुलै २०२६ दरम्यान विशाखापट्टणम येथे पार पडली. देशभरातील गुणवंत स्केटर्सनी या स्पर्धेत सहभाग घेत राष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. नैशाने उत्कृष्ट सादरीकरण करत सुवर्णपदकावर नाव कोरले. तिच्या या यशामागे अथक मेहनत, शिस्त, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्द यांचा मोठा वाटा आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिचे कुटुंबीय, प्रशिक्षक आणि समर्थक यांच्यात आनंदाचे वातावरण असून तिच्या स्केटिंग कारकिर्दीतील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. नैशा निशित मेहता हिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.