Month: August 2026

 बालकामगार म्हणून नेलेल्या दोन आदिवासी मुलांचा काही तासांत शोध

श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे पोलिसांची तत्पर कारवाई योगेश चांदेकर पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील कोने गावातील एका पोल्ट्रीवर नेल्याची घटना समोर आली. श्रमजीवी संघटनेच्या तातडीच्या पाठपुराव्यामुळे आणि पोलिसांच्या जलद कारवाईमुळे दोन्ही मुलांचा काही तासांत शोध लागला असून त्यांना सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे. धारणहट्टी येथील राजा जाधव (वय १४) आणि रोहिदास सवरा (वय १२) हे दोघे अल्पवयीन मुलगे त्यांच्या आई-वडिलांच्या अनुपस्थितीत एका इसमाकडून वाडा तालुक्यातील कोने गावातील एका पोल्ट्रीवर कामासाठी नेण्यात आले. मुलांचे आई-वडील शेतीच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी परतल्यानंतर मुलं बेपत्ता असल्याचे लक्षात येताच त्यांनी जव्हार येथे सुरू असलेल्या बालसंजीवन छावणीत श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ यांची भेट घेतली. सीता घाटाळ यांनी तातडीने श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड तसेच जव्हार तालुका अध्यक्ष अजित गायकवाड यांना माहिती देऊन मुलांचा शोध सुरू केला. त्याचबरोबर जव्हारचे पोलीस निरीक्षक किरण पवार, समीर महेर, पोलीस उपअधीक्षक, जव्हार, तसेच राजेंद्र कदम, पोलीस निरीक्षक, वाडा यांना माहिती देण्यात आली. राजेंद्र कदम यांनी चेतन सोनावणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविली. दिवसभर वाडा तालुक्यातील विविध पोल्ट्री फार्मवर शोधमोहीम राबविल्यानंतर कोने गावातील एका पोल्ट्रीवर दोन्ही मुले आढळून आली. पोलिसांनी मुलांना सुरक्षित ताब्यात घेतले असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित, श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ, सरचिटणीस विजय जाधव आणि पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांचे तसेच या कारवाईत सहभागी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

 महसूल दिन व पालघर जिल्हा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांचे विशेष मार्गदर्शन अशोक गायकवाड पालघर : महसूल विभाग हा केवळ महसूल वसुली करणारा विभाग राहिलेला नसून नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विकासाला चालना देणारा विभाग म्हणून त्याचे स्वरूप बदलले आहे. शासनाच्या लोकाभिमुख धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले. महसूल दिन आणि पालघर जिल्ह्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, जव्हार प्रकल्प अधिकारी डॉ.अपूर्वा बासुर , अपर जिल्हाधिकारी दत्तात्रेय कवितके,भारतीय प्रशासन सेवेतील (प्रशिक्षणार्थी ) पी.व्ही अमल ,उपजिल्हाधिकारी रणजित देसाई, विजया जाधव, तेजस चव्हाण, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक नरेंद्र पाटील, तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड म्हणाल्या की, १ ऑगस्ट २००२ पासून महसूल दिन साजरा करण्यामागील संकल्पना म्हणजे महसूल विभाग अधिकाधिक नागरिकाभिमुख करणे. स्वातंत्र्यानंतर महसूल प्रशासनाची भूमिका बदलत गेली असून आज हा विभाग महसूल संकलनाबरोबरच विकास, जनकल्याण, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या वर्षभरात सातबारा उताऱ्यावरील हक्क सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी विशेष कौतुक केले. विशेषतः वनहक्क कायद्यांतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातबारा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया ही अनेक वर्षांच्या संघर्षानंतर प्रत्यक्षात येत असून हा महसूल विभागासाठी अभिमानास्पद टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. महसूल विभाग कृषी, ग्रामविकास, भूमी अभिलेख, मुद्रांक व नोंदणी यांसह विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधत असल्याचे सांगताना त्यांनी पालघर जिल्ह्यात सर्व विभाग एकाच प्रशासकीय इमारतीत कार्यरत असल्याने समन्वय अधिक परिणामकारक होत असल्याचे स्पष्ट केले. आपत्ती व्यवस्थापनात महसूल विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी अलीकडील अतिवृष्टीच्या काळात विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांपर्यंत तातडीने मदत पोहोचविण्यात प्रशासनाला यश आल्याचे नमूद केले. शासकीय जमिनींचे व्यवस्थापन, सर्वांसाठी घरे अभियान, २०११ पूर्वीच्या अतिक्रमणांचे नियमानुकूलकरण यांसारख्या निर्णयांमधून शासनाचा नागरिकाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी महसूल विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्देशून, शासनाच्या योजनांचा लाभ १०० टक्के पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. पालघर जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेचा उल्लेख करत, “पालघर हे भविष्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला. पुढील पाच ते दहा वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधांचा विस्तार होणार असून हा विकास सर्व समावेशक आणि शाश्वत राहील, यासाठी प्रशासन प्राधान्याने काम करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले. या कार्यक्रमामध्ये महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ०००००००००

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या संचालकपदी विकास पानसरे यांची नियुक्ती

अनिल ठाणेकर ठाणे- महाराष्ट्र शासनाने नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बदल्यांनुसार पर्यटन संचालनालयाच्या संचालक पदी भारतीय प्रशासकीय सेवेतील (भा.प्र.से.) नियुक्ती जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाने विकास पानसरे (भा.प्र.से.) यांची पर्यटन संचालनालयाचे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. गुरुवार, ३० जुलैपासून त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे (एमएसएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. विकास पानसरे यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. पर्यटन संचालनालयाच्या धोरणांची अंमलबजावणी, पर्यटन स्थळांचा प्रचार आणि प्रसिद्धी तसेच जगाच्या नकाशावर राज्याला एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून नव्याने ओळख मिळवून देण्याचे काम विकास पानसरे करणार आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील अनुभवाचा उपयोग राज्याच्या शाश्वत आणि पर्यटन विकासाला गती देण्यासाठी होईल, अशी खात्री आहे. यापूर्वी मंगेश जोशी (भा.प्र.से.) पर्यटन संचालक म्हणून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे काम पाहत होते. मंगेश जोशी यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे काम केले आहे. पायाभूत सुविधांचा विकास, राज्यातील पर्यटन स्थळांना प्रसिद्धी मिळवून देणे आणि पर्यटन क्षेत्रातील खासगी भागीदारी वाढवण्यावर त्यांनी अधिक भर दिला. यामुळे राज्याच्या पर्यटनाला देशपातळीवर तसेच जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली. मंगेश जोशी यांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पर्यटन संचालनालयाने त्यांचे आभार मानले. तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामध्ये विकास पानसरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विकास पानसरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या पर्यटनाला नवी उंची मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. ००००

– कावड यात्रेसाठी विशेष सुविधांची मागणी

शिवसेनेचे केडीएमसीला निवेदन कल्याण : श्रावण महिन्यात निघणारी कावड यात्रा सुरक्षित व सुव्यवस्थित पार पडावी यासाठी शिवसेना उत्तर भारतीय विभागाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडे विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शिवसेना कल्याण शहर (उत्तर भारतीय विभाग) प्रमुख सी. पी. मिश्रा यांनी महापौर ॲड. हर्षाली  चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांना निवेदन सादर केले. यावेळी शिवसेना कल्याण शहर प्रमुख निलेश शिंदे तसेच पदाधिकारी प्रशांत तिवारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिरातून हजारो शिवभक्त अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात जलाभिषेकासाठी कावड यात्रा काढतात. या यात्रेत युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सी. पी. मिश्रा यांनी यात्रा मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजविणे, संपूर्ण मार्गाची स्वच्छता करणे, विविध ठिकाणी मोबाईल शौचालयांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, कचरा व्यवस्थापन तसेच अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. बहुतांश कावड यात्रेकरू अनवाणी चालत असल्याने मार्ग स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. श्रद्धाळूंच्या भावनांचा सन्मान राखत महानगरपालिकेने या मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, जेणेकरून कावड यात्रा शांततापूर्ण, सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पडेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

केडीएमसीच्या सुका कचरा संकलन मोहिमेस नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर ऍड. हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास  कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन विभागाने शाश्वत शून्य कचरा मोहीम हाती घेतली…

ठाकरेंच्या शिवसेनेकडून राम मंदिरात महाआरती आणि रामरक्षा पठण करत चोरीच्या घटनेचा केला निषेध

कल्याण : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी व कथित दानचोरीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने रविवारी सायंकाळी डोंबिवली पूर्व येथील बाजीप्रभू चौकातील राम मंदिरात महाआरती करत आणि रामरक्षा पठण करत चोरीच्या घटनेचा जाहीर…

रायगड जिल्ह्यात महसूल प्रशासनाचे ऐतिहासिक निर्णय

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या कामगिरीचे महसूलमंत्र्यांकडून कौतुक अशोक गायकवाड रायगड-अलिबाग : रायगड जिल्ह्यात महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खासगी जमिनींवरील ‘वन’ शिक्के हटवून मालकी हक्क पूर्ववत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी होणार आहे. तसेच ७० हजार एकर जमिनीवरील कलम ३५ च्या नोटिसा रद्द करून नागरिकांना दिलासा देण्याची घोषणा करण्यात आली. कांदळवनाखाली गेलेल्या ११ हजार हेक्टर जमिनींच्या प्रश्नासाठी नवीन कायदा आणण्याचाही निर्णय घेण्यात आला. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने’अंतर्गत २ हजार ९५० शेतरस्त्यांचे मोजमाप करून ३१ मार्च २०२७ पर्यंत अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहे. उर्वरित शेतरस्त्यांचेही तीन महिन्यांत सीमांकन करण्यात येणार असून, रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी प्रति किलोमीटर १५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. १ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील व १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खासगी जमिनीवरील पात्र बांधकामधारकांना मालकी हक्काची कागदपत्रे देण्यात येणार आहेत. पोटहिस्सा नोंदणी २०० रुपयांत करण्याबाबत शासन सकारात्मक असून, “सलोखा” योजनेत कौटुंबिक वाटणी ५०० रुपयांच्या मुद्रांकावर नोंदविता येणार आहे. विकास न झालेल्या संपादित जमिनींचा फेरआढावा, शेती जमीन खरेदीवरील नियमांची काटेकोर अंमलबजावणी, आदिवासी लाभार्थ्यांना सातबारा व मालकी हक्क, कुळवहिवाट प्रकरणे, तुकडेबंदी पुनर्सर्व्हेक्षण, मोजणी अर्ज १५ दिवसांत निकाली काढणे, ‘गुरुचरण’ जमिनींची नोंद, महसूल सप्ताह, तसेच गंभीर त्रुटी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. जिल्ह्यात ५० एम-सँड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शासकीय बांधकामांमध्ये एम-सँडचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. ‘जिवंत सातबारा मोहीम’ आणि अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढण्यात रायगड जिल्ह्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे व संपूर्ण महसूल यंत्रणेचे विशेष कौतुक केले. हे बैठकीचे प्रमुख आकर्षण ठरले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील, रवीशेठ पाटील, प्रमोद जठार, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ००००

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुळे येथे पाणंद रस्त्याची केली पाहणी

रायगड-अलिबाग : (अशोक गायकवाड ) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मुळे या गावातील मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची पाहणी केली. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, सिंधुदुर्गचे आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद कृषी सभापती वैकुंठ पाटील, सदस्या मानसी दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील आदी उपस्थित होते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वर्षभर शेतापर्यंत सहज पोहोचता येणार असून, शेतीमालाची वाहतूक अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होणार आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी देत शेतकऱ्यांच्या विकासाला गती देणारी ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक सूचनाही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सरकारच्या विविध विकासकामांचा वेग वाढवून जिल्ह्यातील जनतेला अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही ते शेवटी म्हणाले. ००००००००

 शिक्षक आमदार होण्यासाठी मंगेश चिवटे यांनी कंबर कसली

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : एकेकाळी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पत्रकारितेत ठसा उमटवून नंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उतरलेले मंगेश चिवटे यांनी विधानपरिषदेत प्रवेश करण्याची जय्यत तयारी केली असल्याचे दिसून येते. पुणे शिक्षक…