Month: September 2026

आश्रमशाळा-वसतिगृहांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा महामंडळाचे रक्षक नेमा — विवेक पंडित

 मुलींच्या निवासी परिसरात प्रशिक्षित तृतीयपंथीय सुरक्षा रक्षकांना संधी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी योगेश चांदेकर पालघर: राज्यातील शासकीय आश्रमशाळा आणि आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे प्रशिक्षित सुरक्षा रक्षक २४ तास तैनात करावेत आणि मुलींच्या निवासी परिसरात विशेष बाब म्हणून पात्र व प्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तींना सुरक्षा रक्षक म्हणून रोजगाराची संधी द्यावी, अशी मागणी आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनी कुटुंबापासून दूर निवासी स्वरूपात राहत असल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळे सर्व शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांचे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत सुरक्षा लेखापरीक्षण (Security Audit) करून विद्यार्थी संख्या, इमारती, प्रवेशद्वारे व परिसराची संवेदनशीलता लक्षात घेऊन आवश्यक सुरक्षा मनुष्यबळ निश्चित करावे, असे पंडित यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. मुलांच्या आश्रमशाळा व वसतिगृहांत पुरुष सुरक्षा रक्षक तैनात करावेत. मुलींच्या निवासी परिसरासाठी विशेष बाब म्हणून इच्छुक व पात्र तृतीयपंथीय व्यक्तींची निवड करून त्यांना प्रशिक्षण, चारित्र्य पडताळणी, समान वेतन व सेवाशर्तींसह सुरक्षा रक्षक म्हणून संधी द्यावी, अशी अभिनव सूचना पंडित यांनी केली आहे. “यातून आदिवासी विद्यार्थिनींची सुरक्षा अधिक सक्षम करण्याबरोबरच तृतीयपंथीय समुदायाला सन्मानजनक व नियमित रोजगाराची संधी उपलब्ध होईल,” असे पंडित यांनी म्हटले आहे. सर्व आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी आवश्यक सुरक्षा रक्षकांची संख्या, शिफ्टनिहाय गरज आणि वार्षिक आर्थिक भाराचा प्रस्ताव १५ दिवसांत तयार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 0000

८१ वर्षांच्या वृद्धाची स्वतःच्या जमिनीच्या हक्कासाठी थेट पंतप्रधानांकडे धाव

 मिरा-भाईंदर मनपा नगररचना विभागाचा भोंगळ कारभार उघड! मिरा-भाईंदर मिरा-भाईंदर महानगरपालिका आणि स्थानिक नगररचना विभागातील भ्रष्ट कारभाराचा आणि भू-माफियांच्या साखळीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीची ‘सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स’ आणि ‘स्वयम बिल्डर्स’ यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे मिरा-भाईंदरमधील एका ८१ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला आपली हक्काची जमीन वाचवण्यासाठी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धाव घ्यावी लागली आहे. ८१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक असगरअली व्होरा यांना आपल्या हक्काच्या जमिनीसाठी तब्बल ४० वर्षे संघर्ष करावा लागत आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी न्याय शोधणारे तक्रारदार यांनी नुकतीच पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना पत्र सादर केले आहे. या पत्रातील गंभीर आरोपांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तक्रारदाराने १९८९ मध्ये नवघर रोड, भाईंदर (पूर्व) येथील जुना सर्व्हे क्र. २४० (नवा सर्व्हे क्र. १८५), हिस्सा क्र. ६ मधील सुमारे २,८१० चौ.मी. जागा रीतसर नोंदणीकृत कराराद्वारे खरेदी केली होती. ही जमीन त्यांनी कधीही कोणालाही विकलेली अथवा हस्तांतरित केलेली नाही. असे त्यांनी पत्रात नमूद केलेले आहे. २०११ च्या सुमारास ‘स्वयम बिल्डर्स’च्या संगनमताने या जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले. याप्रकरणी २०१५ मध्ये एफआयआर दाखल झाला; मात्र तब्बल ११ वर्षांनंतर, म्हणजेच २०२६ मध्ये याचा सीआयडी अहवाल प्राप्त झाला. या विलंबामागे पालिकेतील आणि महसूल विभागातील कोणत्या अदृश्य शक्तींचा हात होता, असा सवाल ८१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक असगरअली व्होरा यांनी उपस्थित केला आहे. मूळ मालकाला अंधारात ठेवून या जमिनीचे दोन भाग करण्यात आले, ज्यातील एका भागावर ‘स्वयम बिल्डर्स’ आणि दुसऱ्या भागावर ‘सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स’चा कब्जा दाखवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तक्रारदाराला कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा त्यांची बाजू न ऐकता २०२५ मध्ये त्यांच्यावरच उलट गुन्हा दाखल करण्यात आला. मिरा-भाईंदर महानगरपालिका आणि महसूल विभाग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत का? बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी ८१ वर्षांच्या वृद्धालाच छळण्याचे धोरण प्रशासन का राबवत आहे? असा सवाल सध्या मिरा-भाईंदर मनपा नगर रचना विभागाचा भोंगळ कारभारासंदर्भात निर्माण होत आहे. जर एका ज्येष्ठ नागरिकाला स्वतःच्या जमिनीसाठी देशाच्या पंतप्रधानांकडे गाऱ्हाणे मांडावे लागत असेल, तर मिरा-भाईंदरमधील नगररचना विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे, हेच यातून सिद्ध होते. आता या ‘सेव्हन इलेव्हन’च्या संशयास्पद व्यवहारांवर आणि पालिकेच्या भ्रष्ट कारभारावर सीबीआय चौकशीची कुऱ्हाड चालवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 0000

कॅन्सरविरुद्धची लढाई केवळ आजाराशी नसते, तर भीती, एकटेपणा आणि अनिश्चिततेशीही असते

मिरा -भाईंदर कॅन्सरचे निदान झाल्याचे समजताच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात अनेक प्रश्न, भीती आणि अनिश्चितता निर्माण होतात. शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि औषधोपचारांसोबतच रुग्णाला भावनिक बळ, आपलेपणा आणि या लढाईत आपण एकटे नाही, हा विश्वासही आवश्यक असतो. याच भावनेतून वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड यांच्या वतीने भावनिक आधार देणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप मीट-अपचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात ४० हून अधिक कॅन्सर रुग्ण, कॅन्सरवर मात केलेले सर्व्हायव्हर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला. हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर अशा व्यक्तींसाठी एक विश्वासाचे व्यासपीठ होते, जिथे त्यांनी आपल्या वेदना, अनुभव, भीती आणि आशा एकमेकांशी मोकळेपणाने शेअर केल्या. कोणाच्या अनुभवात संघर्ष होता, तर कोणाच्या कथेत विजयाची आशा होती. अनेक रुग्णांसाठी आपल्यासारख्याच परिस्थितीतून जाणारे इतरही अनेकजण आहेत, ही जाणीव अत्यंत महत्त्वाची ठरली. यावेळी डॉ. अदिती अग्रवाल म्हणाल्या, “कॅन्सरवरील उपचार केवळ आजार दूर करण्यापुरते मर्यादित असू नयेत. रुग्णाला पुन्हा आत्मविश्वासाने सामान्य आयुष्याकडे परतण्यास मदत करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या भावना आणि संघर्ष समजून घेणाऱ्या व्यक्तींशी जेव्हा रुग्ण संवाद साधतात, तेव्हा या प्रवासात आपण एकटे नाही, ही भावना त्यांना मोठे मानसिक बळ देते.” डॉ. प्रियंक चवाथे म्हणाले, “वैद्यकीय विज्ञान कॅन्सरवर उपचार करू शकते; मात्र मानवी नातेसंबंध आणि भावनिक आधार रुग्णाच्या रिकव्हरीच्या प्रवासाला अधिक बळकटी देऊ शकतात. सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांना आपले अनुभव शेअर करण्याची, भीतीवर मात करण्याची आणि नव्या आत्मविश्वासाने पुढे जाण्याची संधी मिळते.” या उपक्रमातून एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला—कॅन्सरवरील वैद्यकीय उपचार हॉस्पिटलमध्ये संपले तरी रुग्णाचा भावनिक प्रवास तिथे संपत नाही. कुटुंबाचा आधार, समुपदेशन, पुनर्वसन आणि समाजाचे सहकार्य यामुळे रुग्णाला उपचारानंतर नव्या आत्मविश्वासाने आयुष्य जगण्याची ताकद मिळू शकते. 0000

 बदलत्या भारताच्या शिक्षणाची नवी दिशा ठरणार!

 ‘द स्कुल्स ऑफ इंडिया  २०२६’ चे खोपोलीत आयोजन  देशभरातील शिक्षणतज्ज्ञ, संस्थापक, प्राचार्य,एआय संशोधक एकत्र येणार ( राजेंद्र साळसकर ) मुंबई-भारतातील शिक्षण क्षेत्र सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभे आहे. पारंपारिक शैक्षणिक मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वर्गांमध्ये प्रभावी वापर करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत दर्जात्मक व समान शिक्षण पोहोचवणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी आव्हाने बनली आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारताच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांवर ठोस उपाय शोधण्यासाठी ‘द स्कुल्स ऑफ इंडिया एज्युकेशन समिट २०२६’ या भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत खोपोली येथील ‘नोव्होटेल इमॅजिका’ येथे ही तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद रंगणार आहे. या परिषदेत देशातील आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ, नामांकित शाळेचे संस्थापक, प्राचार्य, धोरणकर्ते आणि edटेक क्षेत्रातील तंत्रज्ञान संशोधक एकाच छताखाली एकत्र येऊन कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या मुद्द्यांवर विचारमंथन करणार आहेत, अशी माहिती मालपाणी ग्रुपचे संचालक यशवर्धन मालपाणी यांनी दिली। यावेळी   स्कूल ऑफ इंडियाचे संस्थापक अंकित पुष्पराज वर्मा, ध्रुव स्कूलच्या   संचालिका अनिष्का मालपाणी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना स्कूल ऑफ इंडियाचे संस्थापक अंकित पुष्पराज वर्मा म्हणाले की या तीन दिवसीय परिषदेत केवळ औपचारिक चर्चा न होता प्रत्यक्षात अंमलात आणता येतील अशा धोरणात्मक रणनीतींवर भर दिला जाणार आहे. प्रामुख्याने अध्यापन पद्धतीतील आधुनिक बदल, अभ्यासातील नावीन्यता, शालेय नेतृत्व व संस्थात्मक व्यवस्थापन, आणि विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य व सर्वांगीण विकास यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि मूलभूत विषयांवर सखोल मंथन होणार आहे. यासोबतच जागतिक पातळीवरील शैक्षणिक घडामोडींचा भारतीय शिक्षण पद्धतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन, तंत्रज्ञानाच्या युगात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) चा शालेय शिक्षणात कसा सुरक्षित आणि परिणामकारक वापर करता येईल, यावर विशेष कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन एडटेक उत्पादने आणि शैक्षणिक उपकरणांचे थेट प्रात्यक्षिकही उपस्थितांना पाहायला मिळेल. परिषदेविषयी माहिती देताना ध्रुव स्कूलच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिष्का मालपाणी यांनी सांगितले की या महापरिषदेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय शिक्षणाच्या विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे दिग्गज व अनुभवी मार्गदर्शक मंडळ या परिषदेला लाभले आहे. यामध्ये ‘अवसरा अकादमी’च्या लक्ष्मी कुमार (सामाजिक प्रभाव व सर्वांगीण शिक्षण), ‘मालपाणी ग्रुप ऑफ स्कुल्स’चे संजय मालपाणी (मोठ्या प्रमाणावरील संस्थात्मक जाळे), आणि ‘ECA व पोदार एज्युकेशन नेटवर्क’च्या डॉ. स्वाती पोपट वत्स (पुरोगामी शिक्षण व संशोधन) यांसारख्या नामांकित तज्ज्ञांचा समावेश आहे.  याशिवाय, शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत ‘Almach AI’ चे रसेल जॉन कॅली, आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाबाबत ‘IB वर्ल्ड स्कुल्स’च्या सीथा मूर्ती आणि ‘केंब्रिज इंटरनॅशनल’च्या अलका पांडे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे, ‘एसपी जैन स्कुल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट’चे परिमल मर्चेंट जागतिक व्यवसाय शिक्षणावर, तर ‘सोशल ब्रिक’च्या मृणाल शाह खेळातून व अनुभवात्मक शिक्षणावर आपले विचार मांडणार आहेत. परिषदेदरम्यान विशेष प्रदर्शन भरवले जाणार असून यामध्ये शैक्षणिक तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम सोल्युशन्स, टेक स्टार्टअप्स आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल. तसेच महत्त्वाच्या घोषणा आणि पत्रकार परिषदांचेही आयोजन करण्यात आले आहे. theschoolofindia.org या संकेतस्थळावर आपले नाव नोंदवा असे आव्हान संयोजकाकडून करण्यात येत आहे 0000

 गणेशभक्तांसाठी कल्याण पश्चिमेतून २० मोफत एसटी बसेस रवाना

 डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून चाकरमान्यांना गावाकडे जाण्यासाठी मोफत प्रवासाची सुविधा कल्याण : गणेशोत्सवासाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मोफत एसटी बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत कल्याण पश्चिम शहर तसेच मोहने-टिटवाळा विभागातील गणेशभक्तांसाठी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या नियोजनात तब्बल २० मोफत एसटी बसेस शुक्रवारी सायंकाळी भगवा झेंडा दाखवून गावाकडे रवाना करण्यात आल्या. शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवासाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबीयांसह गावी जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, शिवसेना उपनेत्या विजया पोटे, कल्याण पश्चिम विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर, नगरसेवक जयवंत भोईर, किरण भांगले, प्रतीक पेणकर, रुपेश सकपाळ, नगरसेविका अनघा देवळेकर, प्रमिला पाटील, अस्मिता मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 भक्ती, स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणासह गणेशोत्सव साजरा करा

एमबीएमसीचे सर्व विभाग सज्ज – आयुक्त राधा विनोद शर्मा मिरा-भाईंदर : आगामी गणेशोत्सव शांततेत, भक्तिभावाने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्तांनी सांगितले की, यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या सर्व विभागांची तयारी पूर्ण झाली आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने सुसज्जित व्यवस्था केली आहे. कृत्रिम तलावांची पाहणी: शहरातील विविध विसर्जन स्थळांवर कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. आयुक्तांनी स्वतः पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत या तलावांची पाहणी केली. तलावांची खोली, पाणी, सुरक्षा व्यवस्था तपासण्यात आली. पर्यावरण संरक्षण हा उद्देश: पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी कृत्रिम तलावातच विसर्जन करावे, असे आवाहन त्यांनी केले. कायदा व सुव्यवस्था: विसर्जनाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, लाईट, मंडप आणि क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सव हा भक्तीचा उत्सव आहे, तो स्वच्छता राखून आणि पर्यावरण जपून साजरा करूया, असे आवाहन आयुक्त शर्मा यांनी शेवटी केले.

एमके इव्हेंटचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उदघाटन!

उलवे :  एमके इव्हेंटचे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई यांच्या हस्ते मंगळवारी उदघाटन झाले. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मुलींनी व्यवसायात पदार्पण करणे, ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. सध्याचा जमाना…

कळंबोलीत दहशत माजविणाऱ्या ‘गोलूभाई’वर कारवाई

तरुणावरील हल्ल्यात दोघे अटकेत राज भंडारी पनवेल :मुंबई पुणे दृतगती महामार्गांवरील कळंबोली पोलीस ठाण्याच्या हादीत असणाऱ्या जाधववाडीतील परिसरात असलेल्या एका चायनीज सेंटरवर ३१ ऑगस्ट रोजी चायनीज खाण्यासाठी गेलेल्या तिघांनी फिर्यादी बसलेल्या टेबलवरच बसण्याचा हट्ट करून वाद घालत एका तरुणाला बेदम मारहाण करून गुन्हा दाखल होताच फरार झाले. कळंबोली पोलीसांच्या अथक प्रयत्नानंतर यापैकी दोघा आरोपींना कळंबोली पोलिसांनी अखेर महिन्याभरानंतर अटक केली. मात्र या घटनेतील एक फरार आरोपी निनाद पाटोळे हा अद्यापही पोलिसांच्या कचाट्यात सापडला नाही. यावेळी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी पिडीत कुटुंबाने मात्र या अशा दहशतवाद्यांना तडीपार करावे अथवा मोक्का लावण्याची विनंती प्रसारमध्यमांशी बोलताना केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय डांगे हे कळंबोली (जाधववाडी) परिसरातील चायनीज सेंटरवर जेवण करण्यासाठी गेला असताना याठिकाणी आरोपी प्रसाद रंगिले उर्फ गोलू, धनंजय सेंगर आणि निनाद पाटोळे हे तिघे आले. यावेळी फिर्यादी अक्षय डांगे ज्या टेबलवर बसला होता त्याला तिथून उठण्यास सांगू लागले. यावेळी अक्षय डांगे हा उठण्यास तयार झाला नाही. याचाच राग प्रसाद रंगिले उर्फ गोलू आणि त्याच्या साथीदारांना आला. याच रागात या तिन्ही आरोपिंनी अक्षय याला मारण्यास सुरुवात केली. अक्षयला झालेली दुखापत इतकी भयानक होती की, या तिघांनी केलेल्या हल्ल्यात त्याच्या हातावर चॉपरने मोठा घाव बसला, तसेच त्याच्या इतर अवयव्यांना जबर मार बसला. त्यामुळे अक्षय डांगे या तरुणाला तब्बल ४ ते ५ दिवस रुग्णालयात भरती होऊन उपचार घ्यावे लागले. शुल्लक कारणावरून जीवे ठार मारण्यासाठी केलेला हा हल्ला माणुसकीला काळिमा फासणारा होता. हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी कळंबोली पोलीस ठाण्यात प्रसाद रंगिले उर्फ गोलू, धनंजय सेंगर आणि निनाद पाटोळे  या तिघांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच प्रसाद रंगिले उर्फ गोलू, धनंजय सेंगर आणि निनाद पाटोळे हे तीनही आरोपी पोलिसांना चकवा देत फरार झाले. तब्बल १ महिना आणि ८ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अखेर कळंबोली पोलिसांनी यातील दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने या दोघांनाही ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र निनाद पाटोळे हा तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे. याबाबत फिर्यादी अक्षय डांगे यांच्यासह परिवाराशी संपर्क साधला असता त्यांनी प्रसाद रंगिले उर्फ गोलुभाई आणि त्याच्या साथीदारांबाबत मोठी गोष्ट समोर आणली. या परिवाराने घटना घडल्यानंतर माहितीच्या अधिकारात गोलुभाई आणि धनंजय सेंगर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीच मागवून घेतली. यामध्ये गोलुभाई याच्यावर कळंबोली पोलीस ठाण्यात तब्बल १२ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तर धनंजय सेंगर याच्यावरही मारहाण केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. 0000

मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये ‘हस्तलिखित’ प्रदर्शन

शतकानुशतकांच्या लेखन-परंपरेचे दर्शन रमेश औताडे मुंबई : भारताच्या प्राचीन लिखित वारशाची सफर घडवणाऱ्या ‘हस्तलिखित’  प्रदर्शनाचे आयोजन मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये करण्यात आले होते.  मुंबई महानगरपालिका मार्ग मेट्रो सिनेमा जवळ ९ ते ११ सप्टेंबर या तीन दिवस हे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाची संकल्पना प्रसिद्ध इतिहास अभ्यासक सेंट झेवियर्स कॉलेजच्या मुख्य डॉ. अनिता राणे-कोठारे यांची होती. शिलालेख, कोरीव लेख आणि दुर्मिळ हस्तलिखिते या विषयाला वाहिलेले हे विशेष प्रदर्शन आहे. यात दगडावर कोरलेले शिलालेख, ताम्रपटांवरील कोरीव लेखांपासून ते ताडपत्री आणि जुन्या कागदावरील हस्तलिखितांपर्यंतचा मोठा संग्रह मांडण्यात आला आहे. शतकानुशतके भारताचा इतिहास, धर्म, प्रशासन आणि साहित्य कसे जतन केले गेले, याची प्रत्यक्ष अनुभूती या प्रदर्शनातून मिळणार आहे. भारतीय लिपी आणि लेखन माध्यमांचा विकासक्रम अत्यंत सोप्या आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने येथे उलगडून दाखवण्यात आला आहे. प्रत्येक वस्तूचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भही समजावून सांगण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोबत दिली जाणारी विशेष माहिती-पुस्तिका आहे. डॉ. अनिता राणे-कोठारे व हृदय कुलकर्णी यांनी या पुस्तिकेचे लेखन आणि संपादन केले आहे. ही पुस्तिका केवळ प्रदर्शनाची माहिती देत नाही, तर प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्वशास्त्रातील शिलालेखांच्या अभ्यासाचे महत्त्व या पुस्तिकेत सांगितले आहे.

अखेर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हनुमानाच्या रूपातील पेंटिंग उतरवले

आरपीआयच्या आंदोलनाला यश केतन खेडेकर मुंबई : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हनुमानाच्या अवतारातील असलेले चित्र जहांगीर आर्ट गॅलरी येथील प्रदर्शनामध्ये भरवण्यात आले होते.  या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांना हनुमानाच्या रूपात पुस्तक घेऊन आकाशात  भ्रमंती करताना दाखवले दाखवले होते. याबाबत आरपीआयच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाली असता त्यांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन हे हनुमानाच्या स्वरूपातील असलेले बाबासाहेबांचे पेंटिंग त्वरित उतरवले.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन अगदी शांततापूर्णपणे झाले असून यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हनुमानाचे रूपात दाखवणे म्हणजे फार मोठी गंभीर चूक आहे आणि ही चूक यापुढे घडणार नाही अशी ग्वाही जहांगीर आर्ट गॅलरीच्या व्यवस्थापक के जी मेनन  मॅडम यांनी दिली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महामानव असून सर्वांसाठी दैवत आहे. त्यांचा असे हनुमानाचा रूप दाखवून चित्र काढणे हे योग्य नाही. आम्ही बाबासाहेबांनी सांगितलेल्या दया आणि करुणेचा माध्यमातून शांततेने आंदोलन करून हे चित्र प्रदर्शनातून काढले असून चित्रकार राजेश केदारे यांनी देखील आपली चूक झाल्याचे कबूल केले असून माफी मागितली  असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत दक्षिण मुंबईचे तालुका अध्यक्ष विशाल भाई दिवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव, कुलाबा तालुकाध्यक्ष मनोहर जाधव, जेष्ठ कार्यकर्ते डॅ.राजेंद्र जाधव, डॉ. रमेश ईपाकायला, तालुक्यातील कार्यकर्ते, वॉर्ड पदाधिकाऱ्यांसह, मुंबई प्रदेश चे सुनिल गरूड, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.