Month: September 2026

डोंबिवलीत एफडीएची मोठी कारवाई

 ५०० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट, परवान्याशिवाय सुरू होती विक्री कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील भोईरवाडी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत सुमारे ५०० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले. सांगली येथून डोंबिवलीत आणलेल्या दुधाची तपासणी केली असता त्यामध्ये भेसळ आढळून आली. तसेच संबंधित व्यक्तीकडे दूध विक्रीसाठी आवश्यक परवानाही नसल्याचे तपासात समोर आले. एफडीएचे अधिकारी राजेंद्र कर्डक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे भेसळयुक्त दूध कल्याण-डोंबिवली परिसरातील विविध डेअऱ्यांच्या माध्यमातून विक्रीसाठी पाठवले जात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर विभागाच्या पथकाने कारवाई करत सुमारे ५०० लिटर दूध नष्ट केले. भेसळयुक्त दूध नेमके कोणत्या स्वरूपाचे होते, त्याचा पुरवठा कोणत्या डेअऱ्यांना करण्यात आला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सध्या सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात पुढील तपास आणि आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 0000000

जि.प. नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना राज्यस्तरीय एस. एस. गडकरी पुरस्कार

हरिभाऊ लाखे नाशिक : सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (IIPA), महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित एस. एस. गडकरी पुरस्कार २०२५-२६ नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना जाहीर झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या नवचेतना अभियान आणि पोषणदूत या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. समाजातील सर्वात दुर्बल घटकांची ओळख करून त्यांच्यापर्यंत विद्यमान शासकीय योजना व सेवांचा प्रभावी समन्वय साधत प्रत्यक्ष परिणाम घडवून आणणे, हे या उपक्रमांचे वैशिष्ट्य आहे. नवीन योजना निर्माण करण्याऐवजी उपलब्ध शासकीय यंत्रणा, निधी आणि योजनांचा एकत्रित वापर करून गरजू लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमांची आखणी करण्यात आली. नवचेतना अभियानाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील एकल महिला, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित व प्रौढ अविवाहित महिलांचे सर्वेक्षण करून १,०६,००० महिलांची माहिती संकलित, वर्गीकृत व मॅप करण्यात आली. या महिलांच्या गरजेनुसार त्यांना रोजगार, स्वयंरोजगार, शिक्षण, सामाजिक पुनर्वसन आणि बालसंगोपनाच्या विविध योजनांशी जोडण्यात आले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ३७ बचत गट क्लस्टर्सना शून्य व्याजदराने एकूण १.१८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. सामाजिक पुनर्वसनासाठी तीन मोफत व जातिनिरपेक्ष वधू-वर परिचय मेळावे आयोजित करण्यात आले, त्यातून सात पुनर्विवाह देखील संपन्न झाले आहेत. विधवांच्या सन्मानासाठी सौभाग्य शपथपत्र या उपक्रमातून ९१५ ग्रामपंचायतींनी विधवांबाबत असणाऱ्या असामाजिक प्रथा बंद करण्याबाबत ठराव केले आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात ३१ गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची उच्च शिक्षण शिष्यवृत्ती देण्यात आली. ३२२ मुलींना सायकलींचे वितरण करण्यात आले असून बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून १५,००६ बालकांना दरमहा २,२५० रुपये सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. ००००

रायगडमध्ये ५०० हून अधिक आरोग्य शिबिरांचा धडाका!

 आरोग्यसेवेसाठी प्रशासन सज्ज  गणेश मंडळांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचणार अशोक गायकवाड अलिबाग : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि सार्वजनिक ठिकाणी ५०० हून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, रायगड यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानात नागरिकांना विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना समन्वयक तसेच विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आरोग्य शिबिरांचे नियोजन, आवश्यक मनुष्यबळ, वैद्यकीय सुविधा, विभागांमधील समन्वय आणि अभियानाची प्रभावी अंमलबजावणी यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जिल्हा कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास पवार यांनी अभियानाच्या नियोजनाची माहिती दिली. अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, तसेच नागरिकांना जास्तीत जास्त आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या. गणेशोत्सवाच्या गर्दीतच नागरिकांच्या आरोग्याची तपासणी आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. 0000

बळीराम तातोड यांच्यावतीने गणेशभक्तांना मोफत साखरेचे वाटप

मुकुंद रांजाणे माथेरान: यावर्षी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा हॉटेल व्यवस्थापक बळीराम तातोड यांच्या वतीने गणेशभक्तांसाठी सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला असून गणेशभक्तांना मोफत साखरेचे वाटप करण्यात आले. माथेरान मध्ये एकूण ११५ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. सर्व गणेश भक्तांना प्रत्येकी तीन किलो साखरेचे वाटप जॉली चिक्की या दुकानात करण्यात आले. यावेळी वाटप करताना दिलीप नाईक, दिगंबर ढोले यांसह अन्य मित्र परिवार, नागरिक उपस्थित होते. 0000 संभाजी ब्रिगेडच्या वतीने होणार ठाण्यातील पत्रकार, डॉक्टरांचा सन्मान अनिल ठाणेकर ठाणे: संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोजदादा आखरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर “कार्यकर्ता सन्मान दिन” साजरा करण्यात येत असतो. त्याच अनुषंगाने ठाण्यातील पत्रकारिता, वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना “संभाजी ब्रिगेड सन्मान पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार यांनी दिली. उद्या होणाऱ्या  या सन्मान सोहळ्यात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप शिंदे, सरचिटणीस राजीव डाके ,सहचिटणीस प्रसाद सकट, उपाध्यक्ष मंडलिक, खजिनदार राजेश शेटकर, कार्याध्यक्ष शेलार, कार्यकारिणी सदस्य नितीन दुधसागर, सारिका साळुंखे, सचिन देशमाने, अमर राजभर, गजानन हरिमकर ,  यांच्यासह पत्रकार गणेश भोईटे,  अतुल पानसरे, प्रफुल वाघोले, वसंत चव्हाण, प्रिती पांड्ये, विकास काटे, संदीप लबडे, समीर मार्क॔डे, संदीप खर्डीकर,  संदीप भारती, प्रफुल्ल गांगुर्डे, गणेश थोरात, मनोज देवकर, निकेश शार्दुल , यतीन पवार, नम्रता सुर्यवंशी, संपदा शिंदे,  शिवकुमार मिश्रा, गणेश कुरकुंडे, प्रविण कामत , अनामिका भालेराव, *सिव्हील रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.. कैलास पवार, डॉ. अमोल गिते, डॉ. अजय सिंग, डॉ. अबरार,  डॉ. पांडुरंग भोसले, डॉ. संतोष कदम, दिपाली जाधव, कविता मौल्य , अनिरूद्ध कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे, प्रदीप पूर्णेकर,निशिगंध चोरगे, जतीन शहा, आशा पाटे, मारूती भालशंकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. उद्या दिनांक १२ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा नरेंद्र बल्लाळ सभागृह,  ठामपा मुख्यालय,  ठाणे येथे मा. अतिरिक्त आयुक्त देविदास पवार, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष योगेश पाटील,  अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी शिवचरित्र आणि सद्यस्थिती या विषयावर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, असे चंद्रशेखर पवार यांनी सांगितले.

  देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाणांच्या प्रोटोकॉलबाबत `टीडीसी’ बँकेच्या अहवालात चूक

– माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा आक्षेप ठाणे : ठाणे-लघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसी)वार्षिक अहवालात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याआधी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा फोटो छापल्याचा…

ठाणे-लघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी गडकरी रंगायतनमध्ये पार पडली. या सभेच्या सुरुवातीलाच अनेक सदस्यांनी अहवालातील चूकांवर आक्षेप घेतला. भाजपची बँकेत सत्ता असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा…

 ठाणे जिल्ह्यातही डॉल्बी आणि लेझर लाईट्सवर बंदी घाला !

– महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीl ठाणे : उत्सव साजरे करण्याच्या नागरिकांच्या अधिकाराचा पूर्ण आदर करतानाच नागरिकांच्या आरोग्याच्या किंमतीवर मोठ्या आवाजात डॉल्बी-डीजे वाजविणे आणि धोकादायक उच्च-तीव्रतेच्या लेझर लाईट्सचा वापर होऊ नये, यासाठी ठाणे जिल्ह्यातही डॉल्बी व धोकादायक लेझर लाईट्सवर कठोर बंदी अथवा निर्बंध लागू करावेत, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती–ठाणे शहरच्या शिष्टमंडळाने ठाणे निवासी जिल्हाधिकारी (प्रांत) संदीप माने यांच्याकडे केली. यावेळी कार्याध्यक्ष अनिल ठाणेकर, प्रधान सचिव अशोक मोहिते, किशोर भोईर, ठाणे नगर विभाग कार्यवाह दर्शना ढोले, कळवा विभाग कार्यवाह प्रमोद तामसे, प्राचार्य जयकुमार घोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते. यासंदर्भात समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले. ठाणे जिल्हा हा विविध धर्म, पंथ, जाती, भाषा आणि संस्कृतींच्या नागरिकांचा जिल्हा असून येथे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, ईद, मोहरम, ख्रिसमस, गुरुपौर्णिमा, विविध जयंती-मिरवणुका तसेच सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होतात. मात्र, उत्सवाचा आनंद हा अन्य नागरिकांच्या आरोग्यासाठी धोका ठरू नये, अशी भूमिका महा. अंनिसने मांडली. मोठ्या आवाजातील डॉल्बी-डीजे साऊंडमुळे श्रवणशक्तीवर परिणाम होण्याबरोबरच झोपेचा अभाव, मानसिक ताण, रक्तदाब आणि हृदयविकाराशी संबंधित धोके वाढू शकतात. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, हृदयविकाराचे रुग्ण, विद्यार्थी तसेच रुग्णालयातील रुग्णांना त्याचा मोठा त्रास होतो. त्यामुळे उत्सवाच्या नावाखाली ध्वनीमर्यादांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. उत्सव आणि मिरवणुकांमध्ये वाढत्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या उच्च-तीव्रतेच्या लेझर लाईट्समुळे डोळ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः लेझर किरण थेट डोळ्यांवर पडल्यास रेटिनाला इजा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या डोळ्यांच्या दिशेने अथवा आकाशाकडे प्रक्षेपित होणाऱ्या धोकादायक लेझर बीमवर बंदी घालावी, अशी मागणी समितीने केली. महा. अंनिसने स्पष्ट केले की, ही मागणी कोणत्याही एका धर्माच्या किंवा उत्सवाच्या विरोधात नाही. गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव, दहीहंडी, ईद, मोहरम, ख्रिसमस किंवा कोणतीही जयंती-मिरवणूक—ध्वनिप्रदूषणाचे नियम सर्वांसाठी समान असावेत, अशी भूमिका समितीने घेतली. धर्म, जात, पंथ किंवा राजकीय प्रभाव न पाहता कायद्याची समान अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. प्रत्येक मोठ्या उत्सवासाठी स्वतंत्र Noise Monitoring Squad नियुक्त करावी, पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संयुक्त पथकांमार्फत ध्वनीची तपासणी करावी, तसेच ध्वनीमर्यादा ओलांडणाऱ्या आयोजकांवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, न्यायालये आणि शांतता क्षेत्रांमध्ये विशेष ध्वनी नियंत्रण व्यवस्था करावी. नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाइन किंवा व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करून तक्रार मिळाल्यानंतर तातडीने ध्वनीमापन व कारवाई करावी. तसेच उत्सव काळात ध्वनीची डिजिटल मॉनिटरिंग व्यवस्था उभारून त्याची माहिती नागरिकांसाठी सार्वजनिक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. “उत्सव साजरा करा; पण दुसऱ्याच्या आरोग्याची किंमत देऊन नाही,” या भूमिकेतून ठाणे जिल्ह्यात डॉल्बी-डीजे आणि धोकादायक लेझर लाईट्सवर कठोर नियंत्रण आणून सर्वधर्मीय समान धोरण लागू करावे. यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने संबंधित विभागांची बैठक घेऊन जिल्हास्तरीय कृती आराखडा जाहीर करावा, अशी नम्र परंतु ठाम मागणी महा. अंनिस ठाणे शहरच्या शिष्टमंडळाने केली.शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी संदीप माने यांच्याकडे निवेदन सादर करून नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

नितेश राणे यांच्या माध्यमातून पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना!

  दादर रेल्वे स्थानकावर दाखवला झेंडा चाकरमानी गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी मोदी एक्सप्रेस काल दुपारी १२ वाजता दादर रेल्वे स्थानकावरून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली. गणेशभक्तांच्या उत्साहात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मोदी एक्सप्रेसने कोकणाकडे प्रस्थान केले. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दादर रेल्वे स्थानकावर मोदी एक्सप्रेसला झेंडा दाखवला. गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेचे आरक्षण मिळणे कठीण होते. त्यातच खासगी वाहनांचे वाढलेले प्रवासभाडे यामुळे चाकरमान्यांसमोर मोठे आव्हान निर्माण होते. अशा परिस्थितीत मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून गणेशभक्तांना मोफत आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ व्हावा, या उद्देशाने मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम गेली १४ वर्षे सातत्याने राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, गणेशभक्तांसाठी ही मोफत प्रवासाची सुविधा मंत्री नितेश राणे यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, दुसरी मोदी एक्सप्रेस रविवार, १३ सप्टेंबर रोजी कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे. गेली अनेक वर्षे गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाबद्दल गणेशभक्तांनी समाधान व्यक्त केले असून, मंत्री नितेश राणे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

रिंग मेट्रोचा मूळ मार्ग कायम ठेवण्याच्या मागणीसाठी मानवी साखळी

ठाणे – अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा नागरिकांच्या हितासाठीच हाती घेण्यात आला आहे. तर आम्हाला विश्वासात घ्या, अंतर्गत रिंग मेट्रोचा पूर्वीचा मूळ मार्ग कायम ठेवा. ठाणे महानगरपालिका, शासन, प्रशासनाने नागरिकांना सहकार्य…

गायकवाडवाडीतील गटारे, रस्ते आणि पायवाटांची दुरवस्था

 शाळकरी विद्यार्थ्यांनाही घाण पाण्यातून करावा लागतो प्रवास – तीन नगरसेवक असूनही समस्यांकडे दुर्लक्ष, कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडवरील स्वामी विवेकानंद अरुणोदय शाखेजवळील गायकवाडवाडी परिसरातील गटारे, पायवाटा आणि रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, हजारो रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून या समस्या कायम असून, पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार कामे करण्याची आश्वासने दिली जात असतानाही प्रत्यक्षात परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.  गायकवाडवाडी परिसरात ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचत असल्याने परिसरात चिखल आणि घाण पाण्याचे साम्राज्य निर्माण होते. गटारे तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असून, नागरिकांना याच घाण पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. तुंबलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरातून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, गणेश विद्यालय आणि भोईर जिमखाना हायस्कूलमधील सुमारे  हजारो विद्यार्थी दररोज ये-जा करतात. शाळकरी मुलांना तसेच त्यांच्या पालकांना खराब रस्ते आणि साचलेल्या घाण पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागते. शाळांच्या छोट्या वाहनांनाही या खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गायकवाडवाडी हा डोंबिवली शहरातील जुन्या वस्तीचा भाग असून, येथे जुन्या चाळींसोबतच नवीन गृहसंकुलेही उभी राहिली आहेत. त्यामुळे परिसरात पादचारी, दुचाकीस्वार तसेच इतर वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र अनेक वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या रस्ते आणि पायवाटांची योग्य देखभाल न झाल्याने त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रभाग क्रमांक २१ मधील स्थानिक नगरसेवक रवीना म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे आणि रेखा म्हात्रे यांच्याकडे गायकवाडवाडीतील रहिवाशांनी रस्ते, गटारे, कचरा, डास प्रतिबंधक फवारणी, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच गायकवाडवाडी नामकरण कमानीसह विविध समस्यांबाबत अनेक वेळा तोंडी आणि लेखी निवेदने दिल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र या समस्यांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रभागातील इतर भागांमध्ये गटारे, पायवाटा, रस्ते, फवारणी तसेच कमानीची कामे वेगाने सुरू असताना महात्मा फुले रोडवरील गायकवाडवाडी परिसराकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे. विशेषतः महिला रहिवाशांमध्ये याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. गायकवाडवाडी परिसरातील नागरिकांच्या या मूलभूत समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. 000