रायपूर : प्रेम, माणुसकी, नातेसंबंध आणि मानवी जीवनातील सूक्ष्म आनंद यांचा शोध घेणाऱ्या शब्दांचा कवी हरपला आहे. हिंदी साहित्यविश्वातील सुप्रसिद्ध कवी व लेखक विनोद कुमार शुक्ल यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय साहित्यविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.

धर्म, जात, पंथ आणि भेद विसरून माणूस म्हणून एकमेकांच्या जवळ यावे, असा संदेश देणाऱ्या त्यांच्या कविता आणि लेखनाने वाचकांच्या मनावर खोल ठसा उमटवला होता. अलीकडे प्रकृती खालावल्याने त्यांना रायपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

विनोद कुमार शुक्ल यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे झाला. ते दीर्घकाळ रायपूरमध्ये वास्तव्यास होते. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी सातत्याने लेखन केले. जबलपूर कृषी विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले होते. प्राध्यापक म्हणून अध्यापन करत असतानाच त्यांनी साहित्यनिर्मितीचा प्रवास अखंड सुरू ठेवला.

दिवार में एक खिड़की रहती थी’ ही त्यांची कादंबरी आजही विशेष प्रसिद्ध आहे. त्यांच्या कविता, कथा आणि कादंबऱ्यांना देशभरातील वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. हिंदी साहित्यातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

विनोद कुमार शुक्ल यांच्या निधनाने संवेदनशील, मृदू आणि माणुसकीचा पुरस्कार करणारा आवाज शांत झाला आहे. साहित्यविश्वातून तसेच देशभरातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात असून अनेक साहित्यिक, वाचक आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *