बांदोडकर महाविद्यालयात उपयोजित प्राणीशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

‘भविष्यासाठी शाश्वत प्रगती’ या संकल्पनेवर दोन दिवसीय शास्त्रीय मंथन

ठाणे – विद्या प्रसारक मंडळ संचलित बा. ना. बांदोडकर स्वायत्त विज्ञान महाविद्यालय, ठाणे येथील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने उपयोजित प्राणीशास्त्र विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद २३ व २४ जानेवारीला अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. ‘भविष्यासाठी शाश्वत प्रगती’ ही परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. परिषदेचे उद्घाटन शुक्रवार, २३ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता थोरले बाजीराव पेशवे सभागृहात पारंपरिक दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाले. यावेळी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, लॅब इंडिया प्रा. लि. चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बापट, हायमीडिया लॅबोरेटरीजचे संचालक डॉ. राहुल वारके तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. विंदा मांजरमकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

उद्घाटनपर भाषणात प्रा. डॉ. विंदा मांजरमकर यांनी शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात उपयोजित प्राणीशास्त्राची निर्णायक भूमिका अधोरेखित केली. पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग ही महाविद्यालयातील संशोधन संस्कृतीची सकारात्मक दिशा असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. विजय बेडेकर यांनी संशोधनातील दर्जेदार नियतकालिकांचे महत्त्व, संशोधनाची गुणवत्ता आणि नवोदित संशोधकांना योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज यावर सखोल भाष्य केले.

मार्गदर्शनपर भाषणात श्रीकांत बापट यांनी पर्यावरण संवर्धन, जैवविविधता, सार्वजनिक आरोग्य व जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांतील अनुप्रयुक्त प्राणीशास्त्र संशोधनाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. राहुल वारके यांनी शाश्वत जैविक उपाय विकसित करण्यासाठी वैज्ञानिक संशोधन अपरिहार्य असल्याचे अधोरेखित केले. याप्रसंगी परिषदेतील संशोधन पेपरच्या सारांचे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट बुक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. उर्मिला कुमावत यांनी केले तर डॉ. किरण परिया यांनी आभार प्रदर्शन केले.

महाविद्यालयाने आजवर २३ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांचे यशस्वी आयोजन केले असून प्राणीशास्त्र विभागातर्फे आयोजित ही २४ वी परिषद होती. परिषदेत एकूण १० ऑफलाईन व २ ऑनलाईन सत्रांचे आयोजन करण्यात आले.

परिषदेच्या पहिल्या दिवशी फ्लोरिडा विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. लॉरेन एम. डायपेनब्रॉक यांनी एचएलबी-प्रभावित लिंबूवर्गीय फळांमध्ये एकात्मिक कीटक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ. प्रताप माळी यांनी हवामान बदलामुळे पोषण, संसर्गजन्य रोग व मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण मांडले. प्रा. डॉ. अरुण खरात यांनी कर्करोगविरोधी व प्रतिजैविक अनुप्रयोगांसाठी व्युत्पन्न चांदीच्या नॅनो पार्टिकल्स वरील संशोधन सादर केले.
डॉ. धीरज धोत्रे यांनी इंडियन ह्यूमन मायक्रोबायोम या विषयावर मार्गदर्शन करत दैनंदिन आहाराचे आरोग्यावरील महत्त्व अधोरेखित केले.

ऑनलाईन माध्यमातून येमेन येथील थामर विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. फहद एम. अब्द अलगलील यांनी डिप्टेरा कीटकांवरील जैविक नियंत्रणावर व्याख्यान दिले.
कझाकस्तान येथील संशोधक सुश्री अल्योना काल्प्टोनकिना यांनी गिधाड प्रजातींची सद्यस्थिती, त्यांचे पर्यावरणीय महत्त्व व संवर्धनातील आव्हाने यावर सखोल मांडणी केली.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी नेदरलँड्स येथील तज्ज्ञ पक्षीशास्त्रज्ञ प्रा. तेज मुंडकुर यांनी पक्ष्यांच्या स्थलांतर प्रक्रियेवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. विविध खंडांमधून हजारो किलोमीटर अंतर पार करणारे पक्षी आपले अस्तित्व व हालचाली कशा नोंदवतात, यामागील वैज्ञानिक यंत्रणा त्यांनी उलगडून सांगितली.
तसेच प्रा. डॉ. शैल के. चौबे यांनी पर्यावरणीय व शारीरिक ताण तणावांचा सस्तन प्राण्यांच्या पुनरुत्पादन क्षमतेवर होणारा परिणाम स्पष्ट केला.

समारोप सत्रास डॉ. अरविंद इंगळे (ACTREC) तसेच फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष भालचंद्रसिंग रावराणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ही परिषद २४ जानेवारी २०२६ रोजी यशस्वीरीत्या संपन्न झाली. परिषदेत एकूण १२ नामवंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वक्त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. परिषदेचे यशस्वी आयोजन डॉ. किरण परिया, डॉ. अभय मोराजकर, डॉ. निलेश जवळकर, प्रा. साक्षी दांडेकर, प्रा. निकिता, प्रा. सलोनी आणि डॉ. अश्विनी टिळक यांनी उत्कृष्ट समन्वयातून केले.

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती विकसित व्हावी यासाठी महाविद्यालयातर्फे वर्षभर विविध कार्यशाळा, पोस्टर सादरीकरणे, संशोधन उपक्रम व आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून ही आंतरराष्ट्रीय परिषद अत्यंत यशस्वी ठरली. या परिषदेमुळे प्राणीशास्त्र, पर्यावरण, जैवविविधता व आधुनिक संशोधन क्षेत्रातील अद्ययावत ज्ञानाचा लाभ संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *