अजित पवारांचा घात झाला ?

संजय राऊत, भुजबळ, अमोल मिटकरींना शंका

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ आणि आमदार अमोल मिटकरी यांनीच शंका घेतली आहे.

संजय राऊत यांनी अनेक गंभीर सवाल उपस्थित होत असून, हा केवळ अपघात की घातपात, असा थेट प्रश्न विचारत चौकशीची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी आज राज्यसभेत अजित पवारांच्या मृत्यूवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल करत न्यायालयीन चौकशीची स्पष्ट मागणी केली.

राज्यसभेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, १५ जानेवारी रोजी अजित पवार यांनी भाजपवर सिंचन घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. “भाजपने सिंचन घोटाळ्यात पैसा खाल्ला असून, त्याची संपूर्ण फाईल माझ्याकडे आहे,” असे अजित पवारांनी जाहीरपणे सांगितले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या दहा दिवसांतच त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत संशयास्पद असून, ती सहज दुर्लक्षित करता येणार नाही, असे राऊत यांनी ठामपणे सांगितले.

संजय राऊत यांनी पुढे दावा केला की, सिंचन घोटाळ्याची फाईल अजित पवार कायम स्वतःसोबत ठेवत असत. बारामतीला जातानाही ती फाईल त्यांच्या जवळ होती. मात्र, त्याच बारामती परिसरात विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी संसदेत केली.

यावेळी राज्यसभेतील सभापतींनी “तुमची वेळ संपली आहे, हा आजचा विषय नाही,” असे सांगून राऊतांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजय राऊत यांनी आपले म्हणणे मांडत “अजित पवारांच्या मृत्यूकडे पाहिले की मला न्यायमूर्ती लोया प्रकरणाची आठवण येते,” असे विधान करून सभागृहात खळबळ उडवून दिली.

छगन भुजबळ यांनीही या अपघातामागे काहीतरी गडबड आहे अशी प्रतिक्रीया व्यक्त केलीय. तर अमोल मिटकरी यांनी विमानात सहा जण असताना फक्त पाचच मृतदेह कसे सापडले. तसेच दोन वैमानिक शेवटच्या क्षणी का बदलले असे सवालही उपस्थित केले आहे.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबतचा संशय अधिक गडद झाला असून, या प्रकरणाची चौकशी होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *